अंबाबाई मंदिर
हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
महाराष्ट्राची चांदीनगरी म्हणून देशभरात ख्यातकीर्त असलेल्या हुपरी येथील अंबाबाईचे स्थान अत्यंत प्राचीन आहे. ही देवी हुपरी या गावाची ग्रामदेवता आहे. असे सांगण्यात येते की तेराव्या-चौदाव्या शतकात विजापूर ते कोकण या व्यापारी मार्गावरील पंचगंगाकाठचे हे एक मुक्कामाचे स्थान होते. येथे व्यापाऱ्यांची ये-जा असल्याने साहजिकच त्यांच्या सोयीसाठी लोक वस्ती करून राहू लागले. अंबाबाईच्या स्थापनेनंतर येथील वसाहत वाढून हुपरी या गावाची निर्मिती झाली. येथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की या देवीमुळेच गावास वैभव प्राप्त झाले.
अंबाबाई हे जगन्माता पार्वतीचे एक रूप मानले जाते. तिच्या येथील मूर्तीबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की हुपरीपासून जवळच पंचगंगेच्या पलीकडे चंदूर हे गाव आहे. एकदा पंचगंगेच्या पुरामध्ये ही मूर्ती वाहून आली. ती पाहण्यासाठी हुपरीतील काही लोक गेले. मूर्ती ताब्यात घेण्यावरून चंदूर आणि हुपरीतील लोकांमध्ये वाद झाला. त्यात तोडगा काढण्यासाठी असे ठरले की एक घोड्याचा गाडा आणून त्यात मूर्ती ठेवावी. घोडा जेथे मूर्ती घेऊन जाईल तेथेच तिची स्थापना करण्यात यावी. त्या घोड्याने फिरत फिरत ही मूर्ती हुपरीत आणली. तेव्हा ठरल्याप्रमाणे येथेच मूर्तीची स्थापना झाली. तसेच चंदूर हे देवीचे माहेर मानून चंदूरच्या पाटलांचा पूजेचा मान मान्य करण्यात आला. तेव्हापासून नवरात्र, यात्रा आदी प्रसंगी चंदूरमधून देवीस वस्त्र व नैवेद्य येतो.
पूर्वी हुपरीतील या भागामध्ये मोठे जंगल होते. एकोणीसाव्या शतकात हा भाग कोल्हापूर संस्थानच्या ताब्यात आला, तेव्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपली स्नुषा प्रिन्सेस इंदुमतीदेवी यांच्या नावाने येथे उद्यान निर्माण केले. हा भाग शिकारीसाठी राखीव होता. इंदुमतीदेवी या वयाच्या बाराव्या वर्षी विधवा झाल्या. त्यांना शाहू महाराजांनी पोटच्या मुलीप्रमाणे शिकवले, मोठे केले. पुढे इंदुमतीदेवींनी स्त्री शिक्षणासाठी मोठे काम केले. माँटेसरी इंटरनॅशनलच्या त्या भारतातील अध्यक्ष होत्या. त्यांचे नाव दिलेल्या या उद्यानाच्या स्मृती आजही कायम आहेत. आजही या भागास लोक इंदुमती पार्क या नावानेच ओळखतात. याच परिसरात एका टेकडीवरील गढीमध्ये अंबाबाईचे मंदिर स्थित आहे. असे सांगितले जाते की ही बुरुजबंद अशी तटबंदी असलेली गढी मुळात सांगलीचे पटवर्धन राजे यांनी बांधली होती. या तटबंदीत दोन प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे.
मंदिराचे आवार विस्तिर्ण आहे. प्रवेशद्वारातून मुख्य मंदिराकडे येताना वाटेवर बिरोबा, लक्ष्मी, कृष्ण, गणपती, नवग्रह, बालाजी यांची आकाराने लहान पण सुबक अशी मंदिरे लागतात. ही सर्व मूळ मंदिरे दगडी बांधणीची होती. जीर्णोद्धारावेळी ती आधुनिक साधनांचा वापर करून बांधण्यात आली.
मुख्य मंदिराची रचना सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराचे शिखर उंच व मराठा स्थापत्यशैलीतील आहे. मुख्य सभामंडप खुल्या प्रकारचा व प्रशस्त आहे. उपसभामंडप व गर्भगृह दगड व सिमेंटचा वापर करून बांधलेले आहे. या दुमजली उपसभामंडपास असलेल्या सज्जायुक्त खिडक्यांमुळे त्यास प्राचीन वाड्यासारखे स्वरूप आले आहे. उपसभामंडपाच्या रुंद अशा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस भिंतीतील देवकोष्ठकांत प्रतिहारी देवतांच्या उभ्या दगडी मूर्ती आहेत. त्यांच्या खालच्या भागामध्ये शरभशिल्पे आहेत. प्राचीन साहित्यामध्ये शरभ हे शंकराचे रूप मानले आहे. हा व्याघ्रसदृश काल्पनिक संमिश्र प्राणी असून त्यास शिंगे तसेच पंखही असतात. अनेकदा त्याने आपल्या पंजाने हत्तीला पकडलेले दाखवले जाते. शरभाची शिल्पे साधारणतः किल्ल्यांवर आढळतात. अंबाबाईचे हे स्थान एका भुईकोट किल्ल्यात असल्याने ही शिल्पे येथे दिसतात.
मंदिराचा उपसभामंडप प्रशस्त आहे. आत ताशीव चौरस लाकडी स्तंभ आहेत. यातील दोन स्तंभांच्या वरच्या बाजूस चांदीचे अश्व आहेत. आत तुळयांच्या खाली चारही बाजूंना सोनेरी पत्र्यात देवीची विविध रूपे कोरलेली आहेत. येथे देवीची चांदीची पालखी ठेवण्यात येते. या पालखीचे वजन ६० किलो असल्याचे सांगतात.
गर्भगृहात भव्य अशा शिसवी देव्हाऱ्यात अंबाबाईची पाषाणमूर्ती विराजमान आहे. येथे देवी महिषासुरमर्दिनी स्वरूपात आहे. तिला चार भुजा आहेत. शंख, त्रिशूल, कट्यार धारण केलेल्या देवीच्या पायाशी महिषासूर आहे. मूर्तीच्या मागे चांदीची कोरीव नक्षीकाम केलेली सुंदर महिरप आहे. देवीच्या या मूर्तीविषयी असे सांगितले जाते की पूर्वी देवीला चांदीच्या मिशा लावलेल्या होत्या. काहींच्या मते, कुण्या भक्ताने नवस फेडण्याकरता देवीला त्या अर्पण केल्या असाव्यात, तर काहींच्या मते देवीने पुरुषाचा वेश धारण करून काही दैत्यांना ठार केले होते. त्यानंतर भक्तांच्या विनंतीनुसार ती त्याच रूपात येथे राहिली. त्याची आठवण म्हणून पुढे भक्तांकडून त्या मिशा लावण्यात आल्या असाव्यात. देवीच्या मूर्तीवर २४ ऑगस्ट १९९५ मध्ये वज्रलेप करण्यात आला. त्यासाठी मूर्ती हलवण्यात आली. त्यावेळी देवीच्या जागी शिवलिंग आढळून आले. शिवलिंगावर खोबण करून ही मूर्ती उभी करण्यात आली होती. मूर्तीच्या वज्रलेपाच्या वेळी कर्नाटकातील नीडसोशी मठाचे गुरु निजलिंगेश्वर स्वामी उपस्थित होते. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार देवीच्या मिशा काढून टाकण्यात आल्या आणि शिवलिंग दिसेल अशा प्रकारे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
अंबाबाईचे हे मंदिर धार्मिक केंद्रासोबतच हुपरी गावचे सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. मंदिराच्या आवारात एक छोटे नाट्यगृह आहे. त्याच्या समोर कुस्त्यांचे गोलाकार मैदानही आहे. यात्रेच्यावेळी तेथे कुस्त्यांचे फड भरतात. मंदिर परिसरात गढीचे काही जुने बुरुज आणि काही बुरजांचे अवशेष दिसतात. मंदिरात दरवर्षी माघ महिन्यातील अनुराधा नक्षत्र ज्या दिवशी येते, त्या दिवशी देवीची वार्षिक यात्रा असते. नवरात्रीच्या काळातही येथे मोठे उत्सवी वातावरण असते. प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे स्वरुप सजावटीतून साकार केले जाते.