बत्तीस शिराळा हे ऐतिहासिक गाव, येथील नागपंचमीला होणाऱ्या जिवंत नागांच्या पूजेमुळे प्रसिद्ध आहे. नागपंचमीच्या दिवशी येथे जिवंत नागांची भव्य मिरवणूक काढली जात असे. अंबाबाई ही या गावाची ग्रामदेवता आहे व तिचे येथील प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. नागपंचमीच्या एक महिना आधी या अंबाबाईला कौल लावूनच येथील ग्रामस्थ नाग पकडण्यास सुरूवात करीत असत व याच मंदिरात पहिली नागपूजा केली जात असे. या नागपूजेला आठशे ते नऊशे वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. २००२ पासून मात्र नागपूजेवरील न्यायालयीन निर्बंधांमुळे आता येथे जिवंत नागांऐवजी नागप्रतिमेची पूजा केली जाते.
दगडी बांधकाम असलेले येथील प्राचीन मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. पुण्याजवळील निघोजे या गावी जन्मलेल्या आदिनाथ भैरव याने इ.स. १८३४ मध्ये सांगलीतील विटपक्षेत्र म्हणजे विटे या गावात ‘नाथलीलामृत’ हा ग्रंथ रचला. त्यानुसार गुरू गोरक्षनाथांमुळे शिराळा येथे जिवंत नागांची पूजा सुरू झाली. गुरू गोरक्षनाथ हे वामाचारी तंत्रसाधनांविरोधात आंदोलन उभे करून भारतीय साधनेचे शुद्धिकरण करणारे क्रांतिकारक सिद्ध होते. त्यांच्या या कार्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी त्यांचा विषयविध्वंसकैवीर म्हणजे विषयांचा विध्वंस करणारा वीर असा गौरव केलेला आहे. इ.स. १०५० ते ११५० हा त्यांचा कालावधी गणला जातो. त्र्यंबकेश्वर या परिसरात त्यांचे प्रामुख्याने वास्तव्य असे. एकदा ते श्रीयाळपूर म्हणजे आजचे शिराळा येथे आले होते.
‘नाथलीलामृता’च्या दहाव्या अध्यायात असे म्हटले आहे की ‘तेथूनि (म्हणजे मत्स्येंद्रगडावरून) निघाले सत्वर। तों प्राप्त झालें श्रियाळरुर। तेथें येवोनि मत्स्येंद्रपुत्र। नगरप्रदेशीं उतरले।।’ त्या दिवशी नागपंचमीचा दिवस होता. नित्यनेमानुसार गोरक्षनाथ हे गावात भिक्षेसाठी निघाले. एका ब्राह्मणाच्या दारात जाऊन त्यांनी ‘अलक्षशब्द’ म्हणजे ‘अलख निरंजन’ अशी साद दिली. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या पत्नीने त्यांना सांगितले की आज नागपूजा आहे. मातीच्या नागांची षोड्षोपचार पूजा झाली की नंतर आपण भोजन करावे. या व्रतामुळे आयुष्य वाढते तसेच लक्ष्मी प्राप्त होते, अशी माहितीही तिने दिली. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की ‘दरवर्षी तुम्ही हे व्रत करता, तरी तुमची अशी दैन्यदशा कशी? मातीच्या पुजेने तुमच्या इच्छा पूर्ण होतात, तर मग तुम्ही पर्वताचीच पूजा का करीत नाही? सगळे लोक भ्रमाने भुलले आहेत.’(गोरक्ष म्हणे प्रतिवर्षीं। अनुष्ठीतसा या व्रतासी। तरी दैन्यदशा किमर्थ ऐसी। अन्नआच्छादन नसेची।। मृत्तिकापूजन पुरते आर्त। तरी कां न पूजिती पर्वत। भ्रमेंभुलले जनसर्वत्र।।) ते पुढे म्हणाले की मातीच्या शेषाची पूजा करण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष नागांचीच पूजा का करीत नाही? आणि त्यांनी असे म्हटल्यानंतर तेथे अघटित घडले. ‘नाथ करी शृंगी वादन। असंख्य प्रगटले कद्रुनंदन। श्वेतपीत आणि कृष्ण। मणिमस्तकीं शोभती।।’ गोरक्षनाथांनी शृंगी वाजवताच त्या ठिकाणी असंख्य नाग अवतरले.
‘प्रत्यक्ष प्रचिती तुह्माप्रती। दैवेंदेवतासिद्ध होती। याचें अर्चन परमप्रीतीं। देव गौरव करावा।।’ म्हणजे तुम्हाला ही प्रत्यक्षाची प्रचिती दाखवली आहे. यांची प्रेमपूर्वक पूजा केल्यास दैव आणि देवता सिद्ध होतील, असे गोरक्षनाथांनी सांगितले. तेव्हापासून येथे जिवंत नागपुजा केली जाते.
‘नाथलीलामृता’च्या काही वर्षे आधी कोल्हापूर येथील दाजीबा जोशीराव यांनी रचलेल्या ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथातही या मंदिराची माहिती आहे. ती अशी की गरूड सर्पांना त्रास देऊ लागला. तेव्हा सर्व सर्प कोल्हापूरच्या महालक्ष्मीला शरण गेले. तिने त्यांना सांगितले की करवीरच्या उत्तरेस एक शिळा आहे, तेथे तुम्ही वास करा. तेथील लोक तुमची पूजा करतील. तेव्हा सर्प येथे आले. दुसरी आख्यायिका अशी की प्राचीन काळी एक ब्राह्मण अंबाबाई मंदिरात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन करीत असे. तेव्हा एक नाग नित्य नेमाने पाठ श्रवण करण्यासाठी येथे येत असे व जाताना ब्राह्मणास एक सुवर्णमुद्रा दक्षिणा ठेवून जात असे. एके दिवशी ब्राह्मणास मोह झाला व या नागाला मारल्यास त्याच्या पोटातील सर्व सुवर्णमुद्रा आपल्याला मिळतील, असे त्याला वाटले. दुसऱ्या दिवशी पाठ श्रवण करण्यासाठी नाग येताच ब्राह्मणाने नागावर काठीने प्रहार केला. त्याच क्षणी नाग गुप्त झाला व ब्राह्मण भ्रमिष्ट झाला. त्यामुळे या गावात कोणीही नागास मारीत नाही.
चहूबाजुंनी आवारभिंत असलेल्या अंबाबाई मंदिराच्या मुख्य प्रवेशकमानीत दोन्ही बाजूस दोन चौकोनी स्तंभ व त्यावर सज्जा आहे. स्तंभांत देवकोष्टके, शीर्षभागी शिखर, शिखरावर आमलक व त्यावर कळस आहेत. सज्जावर कळस असलेली मेघडंबरी आहे. प्रवेशकमानीतून २५ ते ३० पायऱ्या उतरून काहीशा खोलवर असलेल्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरुपाचा आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या नंदीच्या वशिंडावर शिवपिंड, पाठीवर नाग व कपाळावर ओमकार कोरलेला आहे. नंदीच्या पाठीवर झूल व माळा कोरलेल्या आहेत.
पुढे चार स्तंभांवर तीन कमानी असलेले अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात दर्शनरांगेची व्यवस्था आहे. अंतराळात शिवपिंडी व गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला वज्रपीठावर मारुती आणि इतर देवतांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. अंतराळास डाव्या व उजव्या बाजूला प्रवेशद्वारे आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. ललाटबिंबावर गणपती व मंडारकावर कमळ फुलाची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर नक्षीदार मखरात अंबाबाईची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीने त्रिशूल, तलवार, ढाल आदी शस्त्रे धारण केलेली आहेत व अंगावर उंची वस्त्रे आणि अलंकार आहेत. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर मध्यभागी कीर्तिमुख व दोन्ही बाजूंस पानाफुलांची नक्षी आहे. मंदिराच्या छतावर चौकोनी शिखर आहे. शिखरात चारी बाजूंना देवकोष्टके व त्यात नागशिल्पे आहेत. हे शिखर उरूश्रृंग प्रकारचे आहे व त्यास ३६ उपशिखरे आहेत. शिखरातील कळसाच्या जागेवर नाग प्रतिमा आहे.
मंदिरात नागपंचमी हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पूर्वी या दिवशी ग्रामस्थांकडून रानातून पकडून आणलेले शंभर ते दीडशे नाग मंदिरात आणून त्यांची पुजा केली जात असे. नंतर घरोघरी नागपूजा करून बैलगाडी व ट्रॅक्टरसारख्या वाहनांतून गावात नागांची मिरवणूक काढली जात असे. यावेळी सर्वात जास्त लांबीचा नाग, सर्वात जाड नाग, सर्वात जास्त उंच उभा राहणारा नाग अशा नागांच्या स्पर्धा भरवल्या जात असत. सन २००२ साली वन्य जीव कायद्यानुसार नाग पकडणे व त्यांचे खेळ सादर करणे यावर बंदी घालण्यात आल्यानंतर प्रतिकात्मक नागांची पूजा व मिरवणूक काढण्यात येते. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नागांची जत्रा पाहण्यासाठी येतात. मंदिरात महाशिवरात्री, चैत्र पाडवा, शारदीय नवरात्री आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. दर मंगळावर, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी येथे भाविकांची गर्दी असते.
बत्तीस शिराळा येथील या अनोख्या सर्पोत्सवाची माहिती प्रथम १९५४ च्या ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखविण्यात आली होती. त्यानंतर ‘नॅशनल जिऑग्राफीक’ या वाहिनीतर्फेही शिराळ्यातील या उत्सवाला प्रसिद्धी देण्यात आली होती. याशिवाय डिस्कव्हरी, ॲनिमल प्लॅनेट आदी इंग्रजी वाहिन्यांवर येथील नागपंचमी दाखवण्यात आली होती. त्यामुळे अनेक परदेशी पर्यटकही आवर्जून शिराळा येथील या मंदिराला भेट देतात.