अलबेला हनुमान मंदिर

कात्रक रोड, वडाळा, मुंबई

मारुती, बजरंग, बलभीम, रामदूत, केसरीनंदन, आंजनेय, वायुपुत्र, पवनसुत, वज्रांग, संकटमोचन, महावीर, महारुद्र, हनुमंत अशा अनेक नावांनी पूजला जाणारा हनुमान हे अनेकांचे आराध्यदैवत आहे. या दैवतास भाविकांनी प्रेमाने दिलेली नावे तर असंख्य आहेत; अलबेला हनुमान हे त्यातीलच एक सुप्रसिद्ध नाव. या हनुमानाचे एक प्राचीन व सुप्रसिद्ध मंदिर वडाळा येथे आहे. पूर्वी या हनुमानास ‘गुण्या हनुमान’ असेही म्हटले जात असे. दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी होते.

हनुमान हा शक्ती, भक्ती आणि युक्तीचा आदर्श मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. रामायण आणि महाभारतातील हनुमान शास्त्रप्रवीण, राजनीतिज्ञ, शौर्य, बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, रामभक्ती आणि वक्तृत्व इत्यादी अलौकिक गुणांनी परिपूर्ण आहे. संत तुलसीदास यांनी सोळाव्या शतकात रचलेल्या ‘हनुमान चालिसा’ स्तोत्रामध्ये हनुमानाचे वर्णन ‘ज्ञान गुणसागर’, ‘महावीर’, ‘तेज प्रताप’ अशा शब्दांत केले आहे. हनुमान ही सर्व संकटांपासून सुटका करणारी देवता असून तिच्या नामस्मरणाने भूतपिशाच्चे पळून जातात असेही त्यांनी म्हटले आहे. हनुमान हा आर्येतरांचा मूळ देव आहे. पुढे वैदिक आर्यांनी त्याचा स्वीकार केला, असे अभ्यासकांचे मत आहे. हनुमानास रुद्रावतार मानले असून ‘भीमरूपी महारुद्र’ असेही त्याला म्हटले जाते. विशेष म्हणजे ‘आंजनेयसंहिता’ (हनुमत्संहिता) हा ग्रंथ त्याच्या नावावर आहे. तो संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानला जातो.

‘वाल्मिकी रामायणात’ त्याच्या ‘हनुमान’ या नावाविषयीची आख्यायिका सांगितलेली आहे. ती अशी की एकदा लहान असताना हनुमानाने नुकताच उगवलेला सूर्य पाहिला. ते लालभडक सूर्यबिंब हे एखादे फळ असल्याचे त्याला वाटले आणि ते घेण्यासाठी त्याने उडी मारली. ते पाहून इंद्राने त्याला वज्र फेकून मारले, ज्यामुळे त्याची डावी हनू (हनुवटी) मोडली. तेव्हापासून तो ‘हनुमान’ झाला. ख्यातकीर्त प्राच्यविद्या संशोधक फ्रेडरिक एडन पार्जिटर (१८५२ ते १९२७) यांच्या मते, हनुमान हा शब्द ‘हनुमंत’पासून आला आहे. हनुमंत हे मूळ तमिळ शब्दाचे संस्कृत रूप आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची प्रथा आहे. त्यामुळे तमिळ ‘आणमंदि’ (आण = कपि, मंदि = नर) या शब्दाचे संस्कृतीकरण ‘हनुमंत’ असे झाले असावे, असे पार्जिटर तसेच सुनीतीकुमार चतर्जी आदी अभ्यासकांनी म्हटले आहे.

‘हिंदवी शब्दकोशामध्ये’ अलबेला शब्दाचा अर्थ अनोखा, अनूठा, बाँका किंवा सुंदर असा दिलेला आहे. येथील मंदिराच्या संदर्भात हा शब्द ‘हठिला’ या अर्थाने वापरल्याचे दिसते. या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी मुंबईच्या या बेटावरील एका सत्ताधारी व्यक्तीला, सध्या हे मंदिर उभे आहे त्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती आढळली. त्याकाळी हा सर्व जंगलभाग होता. तेव्हा येथून ती मूर्ती हलवावी आणि अन्यत्र न्यावी, असे त्या व्यक्तीने ठरवले. परंतु वारंवार प्रयत्न करूनही ती मूर्ती तेथून हलेना. ही परमेश्वरी इच्छा असल्याचे समजून त्याने येथील जंगल साफ करून हनुमानाचे मंदिर बांधले. हनुमानाची ही मूर्ती येथे आग्रहाने राहिल्याचे पाहून त्यास ‘अलबेला’ असे नाव देण्यात आले, अशी कथा सांगण्यात येते.

हे मंदिर ज्या भागात आहे, त्या वडाळ्यास येथे असलेल्या वडाच्या झाडांवरून हे नाव पडल्याचे सांगितले जाते. इ.स. ११३८ मध्ये प्रताप बिंब या राजाने पूर्वी ‘बरडबेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावर आपली राजधानी वसवली. त्या राजधानीला त्याने ‘महिकावती’ हे नाव दिले; तेच मुंबईतील आजचे माहीम होय. वाळकेश्वर ते वसईपर्यंतचा प्रदेश त्याच्या राज्याचा भाग होता. यानंतर शतकभराने येथे दुसरा बिंब राजा होऊन गेला, ज्याचे नाव बिंबदेव यादव होते. तो देवगिरीचे सम्राट रामदेवराय यादव यांचा चतुर्थ पुत्र होता. मुस्लिम इतिहासकारांनी (तवारिखांमध्ये) त्यास भीमदेव असे संबोधले आहे. याने १२९५ मध्ये येथे आपली राजधानी स्थापन केली. ‘ग्रेटर बॉम्बे गॅझेटियर’नुसार, वडाळा ते परळ दरम्यान असलेल्या भागात त्याच्या न्यायालयाचे स्थान होते. त्यावरून त्यास ‘न्यायग्राम’ म्हणत असत, तेच पुढे ‘नायगाव’ झाले. विसाव्या शतकापर्यंत येथील एक ठिकाण ‘भीमराजाची वाडी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे भीमराजाचा एक राजवाडा होता असे गॅझेटियरकार सांगतात. या न्यायग्रामापासून जवळच असलेल्या ‘वरेला’ किंवा वडाळा येथे हे मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अज्ञात असला, तरी ते सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे स्थानिक पुजाऱ्यांकडून सांगण्यात येते. हा काळ १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काही वर्षे आधीचा आहे. मंदिरातील मूर्ती त्याहून प्राचीन असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

वडाळ्याच्या सुप्रसिद्ध राममंदिराच्या अगदी समोरच रामभक्त हनुमानाचे हे मंदिर आहे. जुन्या बैठ्या वाड्यासारख्या या मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. लाकडी बांधणीच्या या मुखमंडपावर दोन्ही बाजूंस उतरते छप्पर आहे. मंदिराचा सभामंडप उंच जगतीवर (ओट्यावर) बांधलेला आहे. सभामंडपाच्या समतल छतावर कठडा बांधलेला असून तेथे दोन तपस्वींच्या मूर्ती विराजमान आहेत. सभामंडपास कमानाकार प्रवेशद्वार आहे. येथून आत प्रवेश करताच समोरच अलबेला हनुमानाचे दगडी गर्भगृह दिसते. सभामंडपातून या गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपात दत्तात्रेय आणि संतोषी माता यांच्या मूर्ती आहेत. उजवीकडील भिंतीवर सालासर हनुमानाची मोठी प्रतिमा आहे. सालासर बालाजीचे मूळ स्थान राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात आहे. तेथील मोहनदास नावाच्या परमभक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन हनुमानाने त्यांना दाढी-मिशा असलेल्या मूर्तीच्या रूपात प्रकट होण्याचे वचन दिले. १७५४ मध्ये नागौर जिल्ह्यातील एक जाट शेतकरी शेत नांगरत असताना त्याला हनुमानाची मूर्ती आढळली. त्याच रात्री हनुमानाने ओसोटा गावातील एका ठाकुराला दृष्टांत देऊन आपल्याला सालासर येथे नेण्यास सांगितले. त्याचवेळी हनुमानाने मोहनदास यांनाही दृष्टांत देऊन ‘मी बैलगाडीतून सालासर येथे येत असून ही बैलगाडी जिथे थांबेल तिथेच मंदिर उभारण्यात यावे’, असे निर्देश दिले. यानुसार, बैलगाडी ज्या ठिकाणी थांबली तेथेच मंदिर उभारण्यात आले. कालांतराने अंजनीमाताही सालासर येथे आल्याचे सांगण्यात येते.

अलबेला हनुमान मंदिराच्या गर्भगृहास कोरीव नक्षीकाम असलेल्या चंदेरी पत्र्याने मढवलेले आहे. गर्भगृहातील एका वज्रपिठावर हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सालासर हनुमानाप्रमाणेच अलबेला हनुमानासही मिशा आहेत. या मूर्तीच्या मागे उंच वेदीवरील चांदीच्या देव्हाऱ्यामध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती विराजमान आहेत. या मूर्तींच्या बाजूला हनुमानाचे सेवक असलेल्या वानरांच्या दोन मूर्ती आहेत. या मंदिरास दोन शिखरे आहेत. त्यातील एक शिखर गर्भगृहावर असून त्यास चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. तर दुसरे शिखर मंदिरावर आहे. चारही बाजूंनी वर निमुळत्या होत गेलेल्या या उरुशृंग पद्धतीच्या शिखरावर छोटा आमलक आणि त्यावर द्विस्तरीय सोनेरी कळस आहे.

या मंदिरात रविवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते ११.३० आणि सायंकाळी ४.३० ते ८.३० या काळात, तर शनिवारी सकाळी ६ ते दुपारी २ व सायंकाळी ४ ते रात्री ९.३० या काळात दर्शन घेता येते. येथे रोज सकाळ-सायंकाळी अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हनुमान जयंती आणि रामनवमी हे दोन उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या दिवशी सकाळपासूनच भाविकांची मोठी रांग लागलेली असते. पूर्वी या दिवशी हनुमानास लोक गोण्या भरून नारळ अर्पण करीत असत, त्यामुळे या हनुमानास ‘गुण्या हनुमान’ असेही संबोधले जाते.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ८ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
मंदिर लोकेशन:

अलबेला हनुमान मंदिर

कतरक रोड, वडाला, मुंबई

Back To Home