आदिष्टी देवी मंदिर

खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील आदिष्टी देवी हे ग्रामदैवत आहे. ती आदिशक्तीचे रूप मानले जाते. स्थानिक दैवतकथेनुसार खांबाळेची आदिष्टी ही वैभववाडी येथील आदिष्टी देवी, तसेच आचिर्णे येथील रासाई देवी यांची सख्खी बहीण आहे. येथील लोकांची अशी श्रद्धा आहे की ही देवी माहेरवाशिणींच्या (या गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या स्त्रिया) हाकेला धावून येणारी आणि नवसाला पावणारी आहे. खांबाळे येथे आदिष्टीचे प्राचीन मंदिर होते. २००४ मध्ये त्याचे नूतनीकरण करून भव्य मंदिर बांधण्यात आले.

पश्चिम दिशेस असलेला सालवा डोंगर आणि पूर्वेस असलेली सह्याद्रीची रांग यांमध्ये, वैभववाडी-फोंडा या रस्त्यावर खांबाळे गाव वसलेले आहे. गावात मुख्य रस्त्याला लागूनच देवीचे मंदिर आहे. मंदिरास मोठे प्रांगण असून प्रवेशद्वारी सिमेंट-काँक्रिटची मोठी कमानदार रंगीत वेस आहे. तेथून आत गेल्यावर समोर एका मोठ्या चौथऱ्यावर उभारलेली दीपमाळ दिसते. या दीपमाळेच्या चौथऱ्यास लागूनच तुळशी वृंदावन आहे. तेथून काही अंतर पुढे जाताच या प्रांगणाच्या मधोमध उभे असलेले मंदिर आहे. पोर्चप्रमाणे पुढे आलेला मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मुखमंडपास चार नक्षीदार खांब आहेत. त्यावर तसेच सभामंडपावर पॅगोडाची आठवण करून देईल, अशी एकावर एक दोन छत आहेत. मुखमंडपातून दोन पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या बाजूला सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूने भाविकांना विश्रांतीसाठी दगडी बाक बनवलेले आहेत.

सभामंडप आयताकृती व खुल्या प्रकारचा आहे. दोन्ही बाजूंनी महिरपी कमानीने जोडलेले चार नक्षीदार खांब, त्यांमध्ये कक्षासने, खाली संगमरवरी फरशी असे या सभागृहाचे स्वरूप आहे. त्यातच पुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. दोन पायऱ्या चढून प्रथम अंतराळात प्रवेश होतो. या ठिकाणी एका बाजूस देवतांच्या पाच काठ्या मांडून ठेवलेल्या आहेत. गर्भगृहास लाकडी चौकटीचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या बाजूस भिंतीमध्ये दोन्ही बाजूंना छोट्या देवळ्या आहेत. त्यात एका बाजूस देवीची मूर्ती तर दुसऱ्या बाजूस गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण वज्रपीठावर मधोमध आदिष्टी देवीचा छोटा दंडगोलाकार पाषाण व बाजूस इतर देवतांच्याही काही लहान-मोठ्या शीळा ठेवलेल्या आहेत. या मंदिराच्या बाहेर गर्भगृहाच्या शेजारीच उजव्या बाजूस छोटे इटलाई (विठ्ठलाई) मंदिर, तर दुसऱ्या बाजूस मिराशीचे मंदिर आहे. इटलाई देवीच्या मंदिरात वज्रपीठावर इटलाईची दगडी मूर्ती आहे, तर मिराशी देवीच्या मंदिरात दोन वीरगळ मांडलेले आहेत. मंदिराच्या आवारात एका मोठ्या प्राचीन वृक्षाखाली सहा सतीशिला आणि वीरगळ मांडलेले आहेत.

आदिष्टी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव, शिमगोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, अक्षय्य तृतीया, अखंड हरिनाम सप्ताह असे उत्सव साजरे केले जातात. नवरात्रोत्सवात विजयादशमीस देवीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशिणींची मोठी गर्दी होते. आदिष्टी देवी मंदिरासोबत या गावात खंडोबा, शंकर, खांबदेव, श्रीदत्त, हनुमान व भैरव भवानी अशी मंदिरे आहेत. खांबाळे गावापासून तीन किमी अंतरावर मोठा धबधबा आहे. पावसाळ्यात तेथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

उपयुक्त माहिती

  • वैभववाडीपासून ५ किमी, तर खारेपाटणपासून २५ किमी अंतरावर
  • वैभववाडी व राजापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home