अचलबेट देवस्थान

कोलसुर, ता. उमरगा, जि. धाराशिव

सामान्यतः देवस्थान किंवा मंदिर आधी बांधले जाते व मग तेथे अध्यात्म, भक्ती, पूजा वा साधना केली जाते. परंतू काही स्थाने अशी आहेत की जेथे शेकडो वर्षे तप, ध्यान, साधना करून साधू व संत तेथून ऊर्जा, ज्ञान, शक्ती प्राप्त करून घेतात. या शक्तीचा अनुभव वा प्रत्यय येऊ लागला म्हणजे सामान्य माणसाचे लक्ष या तपोभुमीकडे वळते व तपोभुमीचे देवस्थानात रूपांतर होते. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध देवस्थान उमरगा तालुक्यातील कोलसुर गावाजवळील डोंगरांच्या कुशीत स्थित आहे. अचलबेट या नावाने प्रसिद्ध असलेल्या या स्थानावर आजही अध्यात्मिक अनुभूती येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मूलतः हे गुफा मंदिर सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे असले तरी या डोंगरावर अलीकडील काळात अनेक मंदिरांचे बांधकाम झालेले आहे. असे सांगितले जाते की येथील प्रमुख संत उज्वलानंद महाराज यांनी आपल्या ग्रंथात ही गुफा, साधनास्थान आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे लिहिले आहे. तेव्हापासून अनेक बैरागी, हठयोगी व तपस्वी या गुहेत साधना करून गेले होते. सद्गुरू काशिनाथ महाराज सुमारे शंभर वर्षांपूर्वी येथे आले व तेव्हापासूनचा इतिहास ज्ञात आहे.
गावापासून काही अंतरावर डोंगरमाथ्यावर हे देवस्थान आहे. मंदिरासमोर असलेल्या प्रशस्त वाहनतळापर्यंत पक्का रस्ता आहे. याशिवाय पायथ्यापासून एक दगडी पायरी मार्ग आहे. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटभिंतीतील प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त व पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे. प्रांगणात ठिकठिकाणी भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. पाच गर्भगृहे असलेले विठ्ठल-रखुमाईचे मंदिर हे येथील मुख्य मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
मुखमंडपात चार गोलाकार नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. मुखमंडपात, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला, सूर्य नक्षी असलेले दोन चौथरे व त्यांवर मेघडंबरी आहेत. मेघडंबरींच्या अर्धंचंद्राकार शिखरावरील आमलकावर कळस आहेत. डाव्या बाजूच्या मेघडंबरीत पद्मपिठावर गणपतीची मूर्ती व उजव्या बाजूच्या मेघडंबरीत पाषाणपादुका आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर पर्णलता, पुष्पलता नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीवर डावीकडे श्रीराम, सीता व उजवीकडे हनुमान यांच्या मूर्ती व ललाटबिंबाच्या वरील तोरणात शिखरशिल्पे कोरलेली आहेत. मंडारकावर पर्णपुष्प नक्षी आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी बारा वातायने आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीत प्रत्येकी सहा स्तंभ आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर कासव शिल्प आहे. अंतराळाची प्रवेशद्वाराकडील बाजू अर्धंखुली असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. कठड्यातील व प्रवेशद्वारावरील स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. अंतराळात मध्यभागी पादुका व उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. अंतराळाच्या भिंतीवर विविध दैवतांची चित्रे लावलेली आहेत. अंतराळात डाव्या व उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गात दरवाजे आहेत.
अंतराळाच्या पुढे समोरील बाजूला तीन आणि डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी एक, अशी एकूण पाच गर्भगृहे आहेत. सर्व गर्भगृहांच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर, ललाटबिंबावर व मंडारकावर पानाफुलांच्या नक्षी आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात वज्रपिठावर विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ व त्यावर शिखर आहे. वज्रपिठावर डाव्या व उजव्या बाजूला संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. या गर्भगृहाच्या डाव्या बाजूच्या गर्भगृहातील वज्रपिठावर दत्तात्रयांची मूर्ती व खालच्या बाजूला स्वामी समर्थांची मूर्ती आहे. दत्तात्रयांच्या गर्भगृहाच्या डाव्या बाजूच्या गर्भगृहात वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. श्रीरामाच्या पायाजवळ दास मारुतीची, हात जोडून बसलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे.
विठ्ठल-रखुमाई गर्भगृहाच्या उजवीकडील गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. या गर्भगृहाच्या उजवीकडील गर्भगृहात वज्रपिठावर हात जोडून बसलेल्या मारूतीची दास स्वरूपातील मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्य बाजूने अंतराळ व गर्भगृहांच्या सभोवती सुरक्षा कठडे असलेला प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या छतावर एकूण सहा शिखरे व कळस आहेत. मुखमंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर आणि त्यावर एकावर एक असे दोन आमलक आहेत. आमलकावर कळस व ध्वजपताका आहे. विठ्ठल रखुमाई, श्रीदत्त व महादेव यांच्या गर्भगृहांच्या छतावर गोलाकार, उंच व वर निमुळती होत गेलेली शिखरे आहेत. तिन्ही शिखरांच्या शीर्षभागी एकावर एक असे प्रत्येकी दोन आमलक व त्यावर कळस आहेत.
या मंदिराच्या उजवीकडे अर्धखुल्या स्वरूपाचे गोमाता मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर गाईची मूर्ती आहे. गोमाता मंदिरासमोर प्रांगणात कमळ फुलाची प्रतिकृती असलेला गोलाकार कठडा आहे. या कठड्यातून खाली डोंगराच्या गुहेत असलेल्या शिवपिंडीचे दर्शन होते. प्रांगणात उज्वालानंद महाराजांचे समाधी मंदिर आहे. गर्भगृहात उज्वलानंद महाराजांची समाधी व त्यावर महाराजांची आसनस्थ मूर्तीं आहे. मूर्तीचा डावा हात मांडीवर व उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा व त्यावर मेघडंबरी आहेत. सभामंडपाच्या छतावर मध्यभागी अष्टकोनी शिखर व त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. या मंदिरासमोर उज्वलानंद महाराजांचा दहनस्थान चौथरा आहे.
प्रांगणाच्या डाव्या बाजूला खाली उतरणारा पायरी मार्ग आहे. हा पायरी मार्ग डोंगरांच्या कड्यातील सुमारे ८०० वर्षे प्राचीन गुहेकडे जातो. असे सांगितले जाते की या गुहेत उज्वलानंद महाराज तपसाधना करीत असत. याच गूहेत सुमारे चाळीस फूट अरुंद मार्गाने पुढे गेल्यावर शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी मंदिराच्या प्रांगणातील कठड्यातून दिसते. या ठिकाणी तपस्वी सिद्ध पुरुषांचे आजही वास्तव्य असल्याची मान्यता आहे. गुहेत अनेक कक्ष व धूनी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी येथील सत्पुरुषांची सेवा केलेल्या गुंडा बाबा यांची समाधी आहे.
मंदिरात गुरूपौर्णिमा, दत्त जयंती आदी वार्षिक उत्सवांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. दोन्ही उत्सवांच्या वेळी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील हजारो भाविक सद्गुरूंच्या दर्शनासाठी येतात. देवस्थानातून निघालेली पालखी आळंदी व पंढरपूर करून गुरुपौर्णिमेस मंदिरात परत येते. यावेळी मंदिराच्या पायथ्याशी दिंडीरिंगण सोहळा साजरा केला जातो. रिंगणात पालख्या, घोडे नाचवले जातात. हजारो महिला भाविक आपल्या डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन रिंगणात सहभागी होतात. टाळ मृदंगाच्या गजरात डोंगराचा परीसर दुमदुमून जातो. दर गुरुवारी सकाळी येथे आरतीसाठी हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

उपयुक्त माहिती

  • उमरगापासून १२ किमी, तर धाराशिवपासून ११४ किमी अंतरावर
  • उमरगापासून कोलसूरपर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : उल्हास माने महाराज, मो. ७५५८२६१०१२,
  • हेबाडे गुरुजी, मो. ९८५०२४३६७८
Back To Home