देवळी या तालुक्याच्या शहरापासून जवळच असलेले सोनेगाव हे प्रसिद्ध आहे ते येथील संत आबाजी महाराज देवस्थानामुळे! येथील भाविकांचे ग्रामदैवत असलेल्या या देवस्थानामुळे या गावाचे नाव सोनेगाव आबाजी म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाचे वैशिष्ट्य असे की येथे भाऊबीज ही दिवाळीला साजरी न करता ती आबाजी महाराज यांच्या पुण्यतिथीला साजरी होते. या शिवाय आबाजी महाराजांचे गुरू नगाजी महाराज यांचे हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथे समाधी स्थान आहे. आबाजी महाराजांच्या पुण्यतिथीला शिष्याला भेटण्यासाठी पारडी येथून गुरूंची म्हणजेच नगाजी महाराजांची पालखी सोनेगाव येथे येते.
वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे दामोदर आणि साळूबाई दाणी या दाम्पत्याच्या पोटी १७९८ साली एका मुलाने जन्म घेतला. कुटुंबीयांनी त्याचे नाव गंगाधर ठेवले; परंतु सर्वजण त्याला प्रेमाने आबा असेच म्हणत. लहानपणापासूनच आबा यांचा ओढा ईश्वर चिंतन आणि अध्यात्माकडे होता. त्यामुळे त्यांचे मन कधी कुटुंबामध्ये रमलेच नाही. घरच्यांच्या आग्रहामुळे १८व्या वर्षी ते विवाहबद्ध झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ नोकरीही केली. या नोकरीत त्यांना गावोगावी तूप व लोण्याच्या विक्रीसाठी जावे लागत असे. असेच एकदा ते हिंगणघाटजवळील पारडी या गावात गेले असता तेथील संत नगाजी महाराज यांची महती त्यांच्या कानावर आली. त्या काळातील परंपरा आणि रूढीवाद्यांचा विरोध झुगारून नगाजी महाराज हजारो सामान्य लोकांना सोप्या भाषेत परमार्थ सांगत होते व त्यांना ईश्वरसाधनेचे महत्त्व पटवत होते. नगाजी महाराजांचे हे कार्य पाहून आबाजी महाराज प्रभावित झाले व त्यांनी नगाजी महाराजांकडून अनुग्रह घेतला.
नगाजी महाराजांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांचे प्रपंचात मन रमेनासे झाले होते. ते सतत नगाजी महाराजांच्या कीर्तन व भजनांत हजेरी लावत असत. एकदा रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला व त्यात सुवर्णग्राम म्हणजेच आजचे सोनेगाव येथे असलेल्या गढीवर (एक डोंगराचा उंच सुळका / लहानशी उंच टेकडी, जी वरच्या बाजूला सपाट असते. इंग्रजीमध्ये याला Table Top असे म्हणतात) जावे, असे संकेत मिळाले. सोनेगाव येथे येऊन त्यांनी गढीचा शोध घेतला असता स्वप्नात जी गढी त्यांनी पाहिली होती, तीच गढी गावाच्या मागच्या बाजूला होती. त्या गढीच्या वर जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे तेथे कोणीही येत–जात नसत.
त्या काळी सोनगावच्या या गढीची मालकी येथील मालगुजार कुरझडीकर यांच्याकडे होती. त्यासाठी एके दिवशी आबाजी महाराज कुरझडीकर यांच्या वाड्यावर गेले. कुरझडीकर हेही धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी महाराजांचे आदरातिथ्य केले व रात्री आपल्या वाड्यावर मुक्काम करण्याची विनंती केली. त्यानुसार महाराज त्यांच्या वाड्यात थांबले. अशी आख्यायिका आहे की त्याच रात्री कुरझडीकर यांच्या वाड्यात दोन चोर शिरले. त्यावेळी आबाजी महाराज झोपेतच त्या दोन चोरांची नावे घेऊन ओरडले. आपली नावे ऐकून ओळख पटली म्हणून त्या चोरांनी तेथून धूम ठोकली; परंतु आबाजी महाराजांच्या या कृतीमुळे ते कोणीतरी महात्मे आहेत हे कुरझडीकर यांना समजले व त्यांनी सोनेगाव येथील गढी आबाजी महाराजांना दान केली.
प्रपंचाचा त्याग करून आबाजी महाराजांनी या गढीची आपली कर्मभूमी म्हणून निवड केली. प्रथम त्यांनी गढीची स्वच्छता केली. तेथेच राहून ते दिवसेंदिवस तपसाधनेत रममाण होत. नगाजी महाराजांनी सुचविल्याप्रमाणे आबाजींनी या गढीवर मंदिर बांधून त्यात लक्ष्मीनारायण आणि मुरलीधर यांची स्थापना केली. दिवसेंदिवस आबाजी महाराजांची कीर्ती परिसरात वाढत होती. त्यावेळी नागपूरकर भोसलेंच्या कानावर आबाजांची कीर्ती गेली. त्यांनी आबाजी महाराजांसाठी तीन मजली भव्य रथ बनवून, चार हत्ती लावून, नागपूरहून सोनेगाव येथे तो रथ पाठविला. असे सांगितले जाते की आबाजींनी त्या रथावर नजर टाकली आणि सांगितले की हा रथ ओढण्यासाठी चार माणसे पुरेशी आहेत. तेव्हा प्रयत्न करून पाहिले असता हा अवाढव्य रथ केवळ चार माणसे ओढू शकत होती. तेव्हापासून रथ ओढण्यासाठी कधीही हत्ती, घोडे वा बैलांचा वापर न करता आबाजी महाराजांच्या इच्छेनुसार तो भाविकांकडूनच ओढला जातो.
गुरू संत नगाजी महाराज यांचा अनुग्रह पत्करल्यानंतर आबाजी महाराजांनी येथे गुरुपौर्णिमा उत्सव सुरू केला, तो आजही सुरू आहे. वयाच्या ६५व्या वर्षी १८६३ साली कार्तिक वद्य अष्टमीला आबाजी महाराज ब्रह्मलिन झाले. दरवर्षी कार्तिक वद्य अष्टमीपासून सहा दिवस त्यांचा पुण्यतिथी सोहळा येथे साजरा केला जातो. या उत्सवासाठी गावातील माहेरवाशिणी (लग्न होऊन परगावात गेलेल्या मुली) आवर्जून येथे उपस्थित राहतात व याच काळात त्या भाऊबीज सण साजरा करतात. दिवाळीत येथे भाऊबीज साजरी केली जात नाही, हे या गावाचे वेगळेपण आहे.
उत्सवाच्या वेळी हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथे असलेल्या नगाजी महाराज समाधी मंदिरातून नगाजी महाराजांची पालखी आपल्या शिष्याला भेटण्यासाठी सोनेगाव येथे येते. या पालखीसोबत हजारो भाविक असले तरी पालखीच्या पुढे २०० ते २५० भाविक लोटांगण घालत पालखीसोबत येतात. नगाजी महाराजांची पालखी पारडीहून येथे येताना चार दिवसांत येते; परंतु येथील उत्सवानंतर ती येथून निघते, तिला पारडीला पोचण्यासाठी चार महिने लागतात. या काळात परंपरेनुसार मार्गातील अनेक गावांत पालखीचा मुक्काम असतो. ज्या गावात पालखी असते त्या दिवशी संपूर्ण गावातील लोक पालखीच्या दर्शनाला येतात. याशिवाय संपूर्ण गावात अन्नदान होते.
सोनेगाव येथील आबाजी महाराजांचे समाधी स्थान असलेली गढी सुमारे अर्धा एकर परिसरात आहे. गढीचे बांधकाम किल्ल्याप्रमाणे भासते. काही पायऱ्या चढून मंदिर परिसरात प्रवेश होतो. मंदिराभोवती तटबंदी असून मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन मंदिरे नजरेस पडतात. त्यापैकी एकात लक्ष्मीनारायण व मुरलीधर यांच्या मूर्ती आहेत, तर दुसरे शंकराचे मंदिर आहे. शंकराच्या मंदिरातील शिवपिंडी सदाशिवरूपातील असून तिच्यावर पाच मस्तके आहेत. या दोन्ही मंदिरांत नागपूरकर लक्ष्मणराव भोसले यांनी भेट दिलेल्या पितळेच्या श्रीकृष्णाच्या मूर्ती आहेत. लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागच्या बाजूला तळघरात आबाजी महाराजांची समाधी असून तेथे त्यांची संगमरवरी मूर्ती आहे.
या मंदिरातील उत्सव अथवा पूजा ही दाणी घराण्यातील व्यक्तीच्या हातून पार पडते. आबाजी महाराजांनी घालून दिलेले नियम, त्यांनी सुरू केलेले उत्सव आणि परंपरा आजही येथे कटाक्षाने पाळल्या जातात. आबाजी महाराज पुण्यतिथी उत्सव हा येथील मोठा उत्सव असला तरी अश्विन वद्य द्वितीयेपासून त्यांचे शिष्य फकीरजी महाराज यांचा येथे तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.