पाताळेश्वर मंदिर

काळा गणपती मंदिर

मंगळवारी पेठ, ता. उमरेड, जि. नागपूर

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील मंगळवारी पेठेत पंचमुखी महादेव काळा गणेश ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमुळे मंगळवारी पेठ परिसराला उमरेडची प्राचीन देवस्थानांची भूमी म्हणून ओळखले जाते. येथे असलेल्या महादेवाच्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवपिंडी सतत पाण्याखाली असते. या मंदिरापासून १०० मीटर अंतरावर असलेले काळा गणपती मंदिरही उमरेडवासीयांचे श्रद्धास्थान आहे.

उमरेड शहरातील मेडिकल चौकाजवळ असलेले पाताळेश्वर मंदिर हे शेकडो वर्षांपासून भाविकांसोबतच अभ्यासकांनाही पडलेले एक कोडे आहे. मुख्य मार्गाला लागून असलेल्या या मंदिरात छोटेखानी सभामंडप आहे. त्यात नंदीची मूर्ती असून त्यापुढे सुमारे १० फूट खोल गाभारा आहे. या गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो सतत पाण्याने भरलेला असतो. त्यातील पाण्याची पातळी कमीजास्त होत असते; परंतु तेथील शिवपिंडी मात्र पाण्याखाली असते. गाभाऱ्यात उतरण्यासाठी पायऱ्या असून पाण्याच्या पातळीपर्यंत पायरी मार्गाने जाता येते. गाभाऱ्यात पाणी कितीही भरलेले असले तरी ते नितळ असल्यामुळे पाण्यात असलेल्या शिवपिंडीचे दर्शन घेता येते. येथील शिवपिंडीला मुखे असल्यामुळे या देवस्थानाला पंचमुखी महादेव मंदिर असेही म्हटले जाते.

श्रावण महिन्यात गाभाऱ्यातील पाण्याची पातळी वाढत जाते. असे सांगितले जाते की मंदिरापासून सुमारे किमी अंतरावर असलेल्या गांधीसागर तलावातील पाण्याची पातळी पावसाच्या पाण्याने जसजशी वाढते तशीच मंदिराच्या गाभाऱ्यात देखील वाढते. प्राचीन काळापासून तलावातील जलवाहिन्या थेट या पाताळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याशी जोडल्या गेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी स्थापत्य अभियंत्यांकडून गाभाऱ्यातील पाण्याचे जिवंत झरे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

मंदिर परिसर आटोपशीर असून छोटेसे सभामंडप गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिर लहान असले तरी येथील शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे ३० फूट उंच असलेल्या या शिखरावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती असून त्यावर गोलाकार कळस आहे. पाताळेश्वर मंदिर हे उमरेडमधील जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची दर्शासाठी गर्दी होते. याशिवाय श्रावणी सोमवारी महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.

पाताळेश्वर मंदिरापासून उत्तरेकडे हाकेच्या अंतरावर जागृत काळा गणेश मंदिर आहे. हे मंदिर साधारणतः २०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. मेडिकल चौकात स्थित असलेल्या या प्राचीन मंदिरात सव्वादोन फूट उंचीची पूर्वाभिमुख गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती अखंड काळ्या पाषाणात कोरलेली आहे. गणेश मूर्तीच्या खाली दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धि विराजमान आहेत. डाव्या मांडीखाली मूषकराज आहेत. मूर्तीच्या एका हातात मोदक, दुसऱ्या हातात अक्षमाला, तिसऱ्या हातात अंकुश तर चौथ्यात कमळपुष्प आहे.

मंदिर गणेशपंचायतन स्वरूपाचे असून चारही बाजूने शिवविष्णूसूर्यशक्तीसह मध्यवर्ती गणेशमूर्ती विराजमान आहे. गणेश मूर्तीच्या मागील डाव्या बाजूला अन्नपूर्णा माता, उजव्या बाजूला रथावर स्वार असलेली सूर्य देवतेची काळ्या पाषाणातील मूर्ती, समोरील डाव्या बाजूला विष्णूसोबत लक्ष्मी गरुड, तर उजव्या बाजूला महादेवांची प्राचीन मूर्ती आहे. या गणेशाचे सर्व अलंकार जसे कंबरपट्टा, बाजूबंद, जाणवे गळ्यातील कंठा यांवर सर्वत्र नाग कोरलेले आहेत म्हणून ही मूर्ती नागबंध गणेशमूर्ती म्हणून प्रचलित आहे. गणेशोत्सवातील १० दिवस येथे मोठा उत्सव असून उमरेडमधील हजारो भाविक यावेळी येथे दर्शनासाठी येतात. सार्वजनिक गणेशोत्सवात उमरेडमधील या काळा गणेश मंदिराला मानाचे स्थान असते. या मंदिरासोबतच पाताळेश्वर मंदिराच्या दक्षिणेला लाल गणपतीचे मंदिरही प्रसिद्ध आहे.

उपयुक्त माहिती:

  • नागपूरपासून ४५ किमी, तर उमरेड बस स्थानकापासून पायी १० मिनिटांवर
  • उमरेड तालुक्याचे ठिकाण असल्याने 
  • नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home