सतीधाम मंदिर

जयस्तंभ चौक, अमरावती, ता. व जि. अमरावती

अमरावती शहरातील जयस्तंभ चौक परिसरात सतीधाम मंदिर वसले आहे. राजस्थानातील झुंझुनू येथील प्रसिद्ध श्री राणी सती पीठाच्या परंपरेशी जोडलेले हे विदर्भातील एक महत्त्वाचे उपपीठ मानले जाते. या मंदिरात आदिमायेचे प्रतीक म्हणून राणी सती दादीजींची त्रिशूळाच्या रूपात पूजा केली जाते. येथे स्थापन केलेले हे पीठ विदर्भ आणि खान्देश परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात दरवर्षी माघ शुक्ल पंचमीला होणारा वसंतोत्सव, भाद्रपद महिन्यातील भादवा बदी महोत्सव आणि १० जुलै रोजी होणारा पाटोत्सव मोठ्या संख्येने भाविक एकत्र येऊन साजरा करतात.

मंदिराचा परिसर असलेल्या अमरावती शहराचा इतिहास प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’मधील नोंदींनुसार, या भागात उंबराची (औदुंबराची) झाडे विपुल प्रमाणात असल्यामुळे या नगरीचे मूळ नाव ‘उदुंबरावती’ असे पडले होते. काळाच्या ओघात प्राकृत भाषेत त्याचे रूपांतर ‘उंबरावती’ असे झाले आणि त्यावरून पुढे ‘अमरावती’ हे नाव रूढ झाले. दुसऱ्या एका संदर्भानुसार, येथील प्राचीन अंबादेवी मंदिरामुळे या परिसरास ‘अंबावती’ म्हणूनही ओळखले जाई. इसवी सन १०९७ मधील एका जैन मूर्तीच्या पाषाणलेखात अमरावतीचा प्राचीन उल्लेख आढळतो. अठराव्या शतकात छत्रपती शाहू महाराजांनी अमरावती व बडनेरा ही जहागीर रघूजी भोसले यांना दिली, ज्यानंतर या भागाचा विस्तार झाला. जयस्तंभ चौक हा अमरावतीच्या व्यापारी बाजारपेठेचा मध्यवर्ती भाग असून ब्रिटिश काळातील कापूस व्यापार आणि जिनिंग-प्रेसिंग उद्योगाचे हे एक प्रमुख केंद्र होते.

राणी सती दादीजींच्या अवताराची कथा महाभारताशी जोडलेली आहे. स्थानिक परंपरेनुसार आणि झुंझुनू पीठाच्या मान्यतेनुसार, कुरुक्षेत्राच्या युद्धात वीर अभिमन्यू धारातीर्थी पडल्यानंतर त्याची गर्भवती पत्नी उत्तरा सती जाण्यास निघाली होती. गर्भातील परीक्षित राजाचे रक्षण होऊन पांडवांचा वंश पुढे चालावा यासाठी भगवान श्रीकृष्णाने तिला सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यावेळी उत्तराने पुढील जन्मात अभिमन्यू हाच पती मिळावा आणि सती जाण्याचे कर्तव्य पूर्ण व्हावे असा वर मागितला. पुढे कलियुगात उत्तराने हरियाणामधील हिस्सार येथे अग्रवाल समाजात ‘नारायणी’ नावाने जन्म घेतला, तर अभिमन्यूचा जन्म ‘टंडनदास’ यांच्या रूपाने झाला. टंडनदास यांच्याकडील एका उमद्या पांढऱ्या घोड्यावरून हिस्सारच्या राजाच्या सैन्याशी त्यांचा संघर्ष झाला. या संघर्षात टंडनदास मारले गेले. ही वार्ता समजताच नारायणीने रणभूमीवर जाऊन शत्रूचा पराभव केला आणि त्यानंतर आपल्या पतीच्या पार्थिवासह झुंझुनू येथे सती गमन केले. त्या बलिदानाचे स्मरण म्हणून राजस्थानातील झुंझुनू येथे मूळ शक्तिपीठाची स्थापना झाली आणि तेथे सती मातेची आदिपराशक्तीच्या त्रिशूळाच्या रूपात पूजा सुरू झाली.

अमरावती येथील सतीधाम मंदिराची स्थापना विदर्भातील भाविकांना स्थानिक पातळीवर दर्शनाची सोय व्हावी या हेतूने करण्यात आली. अमरावती येथील जिनिंग मिलच्या जागेवर हे मंदिर उभारण्यात आले. या जागेवर एका वृक्षाखाली पूर्वीपासूनच हनुमानाचे लहान मंदिर अस्तित्वात होते. ते मंदिर मूळ रूपात कायम राखून शहरातील उद्योजक मधुसूदन शिवचंदराय झुनझुनवाला यांनी नव्या मंदिराची उभारणी केली. इसवी सन १९७४ मध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि १० जुलै १९७५ रोजी राणी सती दादीजींच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुढे मंदिराचा विस्तार होत गेला आणि परिसरात इतर देवतांच्या लहान मंदिरांची स्थापना करण्यात आली.

मंदिराची वास्तुरचना आधुनिक उत्तर भारतीय आणि राजस्थानी हवेली स्थापत्यशैलीत केलेली आहे. दुमजली बांधणीच्या या मंदिराच्या प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. आत प्रवेश करताच स्तंभांवर आधारलेला मोठा सभामंडप दृष्टीस पडतो. सभामंडपातील स्तंभांवर राजस्थानी शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण रंगकाम केलेले आहे. हे स्तंभ एकमेकांना अर्धगोलाकार महिरपी तोरणांनी जोडलेले आहेत. भिंतींवर रामायण, महाभारत आणि पुराणांतील विविध प्रसंग चित्रित केलेले आहेत आणि छतावर काचेची झुंबरे टांगलेली आहेत. सभामंडपाच्या एका भागात लाकडी कोरीव मखरामध्ये मंदिराचे संस्थापक दिवंगत मधुसूदन झुनझुनवाला यांचा पुतळा बसवला आहे.

सभामंडपाच्या समोर तीन गर्भगृहे आहेत. त्यातील मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात संगमरवरी वज्रपीठावर राणी सती दादीजींची त्रिशूळाच्या रूपातील धातूची मूर्ती प्रतिष्ठित आहे. या मूर्तीवर दोन मोठे तेजस्वी डोळे कोरलेले आहेत. मध्य गर्भगृहाच्या एका बाजूस श्रीगणेशाचे, तर दुसऱ्या बाजूस श्रीराम दरबाराचे गर्भगृह आहे. श्रीराम दरबारात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत व पायथ्याशी नमस्कार मुद्रेत दास मारुती आहेत. सभामंडपाच्या बाजूला असलेल्या स्वतंत्र गर्भगृहांमध्ये बाबा खाटूश्याम, राधा-कृष्ण तसेच पूर्वापार चालत आलेले मारुतीचे मंदिर आहे. मंदिर संकुलात स्वतंत्र शिवालय आहे. तेथे सुमारे दोन ते तीन फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण चतुर्मुख शिवपिंड आहे. या लिंगपाषाणाच्या चारही बाजूंना देवीशिल्पे कोरलेली आहेत. तीन मुख्य गर्भगृहांवर उत्तर भारतीय नागर शैलीतील तीन शिखरे उभारलेली आहेत. त्यांच्या भिंतींवर अंगशिखरे आहेत. एका शिखरावर शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे, तर इतर दोन शिखरांवर आमलक व कळस बसवले आहेत. मंदिराच्या मागील प्रांगणात गाय आणि वासराचे शिल्प आहे. येथेच अन्नछत्रासाठी स्वयंपाकघर बांधलेले आहे.

मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी पहाटेपासून सुरू होतात. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. मंदिरात दररोज राणी सती दादीजींचा मंगलपाठ, अभिषेक आणि विशेष शृंगार केला जातो. संकुलातील शिवालयामध्ये चतुर्मुख शिवपिंडीवर दररोज सकाळी रुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे.

मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव परंपरेने साजरे होतात. माघ शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी ‘राणी सती बसंत महोत्सव’ होतो. या दिवशी मंदिरात छप्पन भोगाचा नैवेद्य दाखवला जातो आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते. भाद्रपद कृष्ण अमावस्येला ‘भादवा बदी महोत्सव’ (राणी सती दादीजींची पुण्यतिथी) साजरा केला जातो; या निमित्ताने अखंड ज्योत प्रज्वलित करून मंगलपाठ व महाआरतीचे आयोजन करण्यात येते. १० जुलै रोजी मंदिराचा वर्धापन दिन ‘पाटोत्सव’ म्हणून साजरा होतो. फाल्गुन पौर्णिमेला भक्तीगीतांच्या गायनाचा ‘फागुन महोत्सव’ आयोजित केला जातो. याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीला मंदिर परिसरात वार्षिक यात्रा भरते, तसेच चैत्र रामनवमी आणि महाशिवरात्रीलाही विशेष धार्मिक अनुष्ठाने होतात.

उपयुक्त माहिती

  • अमरावती रेल्वे स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • अमरावती मध्यवर्ती एसटी बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून एसटी व ऑटो रिक्षाांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९३२६२१२१२६
Back To Home