नागेश्वर मंदिर

चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड

महादेव हे शैव पंथीयांचे आराध्य दैवत असल्यामुळे त्यांना भाविक भक्तिभावाने पूजतात. महादेवाची अनेक नावे आहेत. त्यांच्या अंगावर नाग विराजमान असतात आणि ते देवाच्या पूर्णपणे अधीन असतात. यामुळेच महादेवाला नागांचा स्वामी म्हणजेच नागेश्वर किंवा नागनाथ अशा नावांनीही संबोधले जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर तसेच गुजरातमध्ये द्वारकेजवळील दारूकावनातील नागेश्वर मंदिर प्रसिद्ध आहेत. नागेश्वराचे असेच एक प्राचीन मंदिर पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावाजवळील डोंगरमाथ्यावर स्थित आहे.

हे मंदिर सुमारे बाराव्या ते तेराव्या शतकातील यादवकालीन असावे असे अभ्यासकांचे मत आहे. मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बांधकाम व मंदिराच्या स्तंभांवरील देखणे शिल्पकाम पाहता, ते सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे स्पष्ट होते. या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की, पूर्वी हा भाग घनदाट अरण्याने व्यापलेला होता. त्यामुळे येथे ऋषी-मुनी तपश्चर्येसाठी बसत असत. त्या काळी जंगलात राक्षसांचे राज्य होते. ते तपश्चर्या करणाऱ्या ऋषींच्या साधनेत अडथळे निर्माण करीत आणि त्यांना त्रास देत. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून ऋषींनी महादेवाची आराधना केली. महादेवाने नागसेनेच्या साहाय्याने राक्षसांचा निपात केला व आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी येथेच लिंग स्वरूपात ते स्थापित झाले. पुढे याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले.

चुंबळी गावापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात जुने वृक्ष व त्याभोवती पार बांधलेले आहेत. या पारांवर प्राचीन विरगळ, सतीशिळा व इतर प्राचीन शिल्पे आहेत. प्रांगणात कोरीव पाषाणात बांधलेली प्राचीन विहीर आहे. या विहिरीतील जलसाठा अक्षय असल्याचे मानले जाते.

महादेवाचे मंदिर प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे भाविकांना सुमारे पंधरा पायऱ्या चढून वर जावे लागते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मूळ रचना असलेल्या मंदिरासमोर अलीकडील काळात दुमजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर देवस्थानचे कार्यालय व वरील मजल्यावर दर्शनमंडप आहे. दर्शनमंडपात बाह्य बाजूंनी सात चौकोनी स्तंभ आहेत आणि या स्तंभावरील तुळईवर छत आहे. दर्शनमंडपात एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याशिवाय जमिनीवर मध्यभागी कासव शिल्प आहे. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारास पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा कोरलेल्या आहेत आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारास स्टेनलेस स्टीलच्या जाळीदार झडपा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आढळतात. यातील बाह्य बाजूंना असलेले स्तंभ भिंतीत गुंफलेले आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. त्यांच्या स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार दिसतात. प्रत्येक चार स्तंभांच्या मधील वितानावर चक्राकार नक्षी कोरलेली आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन देवकोष्टके आहेत, ज्यात विविध देवमूर्ती आहेत. सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने ठेवलेली आहेत.

पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना नक्षीदार स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. अंतराळ काहीसे अरुंद आहे. त्याच्या पुढे अंतराळापेक्षा उंचावर गर्भगृहाचे पंचशाखीय प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास एक पायरी आहे आणि त्यावर पर्णशाखा, पुष्पशाखा, स्तंभशाखा व अस्पष्ट नरशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. या शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीनजीक वज्रपीठावर महादेव व पार्वती यांच्या मूर्ती विराजमान आहेत.

गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखराच्या खालील तीन थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके आहेत आणि त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराचा चौथा थर उंच व निमुळता होत गेलेला आहे. त्यात स्तंभनक्षी आहे. शिखराचा प्रत्येक थर पद्मदलमंडळाने विभागला गेला आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात गणपती व हनुमान यांची लहान व स्वतंत्र मंदिरे आहेत. मंदिराच्या बाजूलाच लहान बंधारा असल्यामुळे पावसाळ्यात येथे मुबलक पाणीसाठा उपलब्ध होतो. मंदिराच्या प्रांगणात पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यात्रेनिमित्त देवाची रथ मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. सर्व भाविक ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळीत रथोत्सवात सहभागी होतात. संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते. मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नागपंचमी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. या मंदिरात कालसर्प शांतीसारखे विधीही केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • पाटोदा येथून १० किमी अंतरावर
  • बीड येथून ४८ किमी अंतरावर
  • पाटोदा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२११४७७९४, ७३५०३९७८९९

नागेश्वर मंदिर

चुम्बली, ताल. पाटोदा, जिला. बीड

Back To Home