सिद्धेश्वर महादेव मंदिर

खरटवाडी, ता. हादगाव, जि. नांदेड

महादेवाच्या सिद्धेश्वर या उपाधीमागे अनेक आध्यात्मिक आणि पौराणिक संदर्भ दडलेले आहेत. ‘सिद्ध’ म्हणजे सिद्धीप्राप्त, परिपूर्ण, सर्वगुणसंपन्न आणि ‘ईश्वर’ म्हणजे परमेश्वर. शैवमतानुसार महादेव हे तत्त्वज्ञान, तपश्चर्या, योग आणि अध्यात्म यांचे सर्वोच्च स्वरूप मानले जातात. या महादेवाची सिद्धेश्वर नावाने अनेक मंदिरे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. यापैकीच हादगाव तालुक्यातील खरटवाडी येथील सुमारे चारशे वर्षे प्राचीन असलेले सिद्धेश्वर मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराची आख्यायिका अशी की या गावातील शिवभक्त गवळी येथून जवळच असलेल्या एकाळा गावी महादेवाची पूजा करण्यासाठी नियमित जात असे. परंतु पूजा करताना त्याला कायम अडथळा येत असे. त्यामुळे तो नाराज होऊन एकेठिकाणी पाषाणावर बसला. येथे त्याला तंद्री लागली व तंद्रीतच त्याला दृष्टांत झाला. गुराखी जागा झाला तेव्हा त्याची एक गाय झुडपातील पाषाणावर पान्हा सोडत असलेली त्याला दिसली. देवाच्या दृष्टांतानुसार हेच महादेवाचे स्थान असल्याचे त्याने ओळखले व तेथील झुडपे बाजूला केली तेव्हा जमिनीतून स्वयंभू शिवपिंडी प्रकट झाली. पुढे देवाच्या कृपेने त्याने या ठिकाणी महादेव मंदिर बांधले.
मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहिली स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूला गोलाकार स्तंभ, त्यावरील तुळईवर महिरपी कमान आणि वरील देवकोष्ठकात महादेवाची ध्यानस्थ मूर्ती, असे या स्वागत कमानीचे स्वरूप आहे. मंदिरास भक्कम दगडी तटबंदी व तटबंदीत मोठे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराची पुनर्बांधणी केली असल्याने यात नव्या-जुन्याचा सुंदर संगम दिसून येतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेल्या दोन नक्षीदार चौकोनी स्तंभांमध्ये दीपकोष्ठके व खालील दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांची आसने आहेत. द्वारशाखा व ललाटपट्टीवर पानाफुलांच्या अस्पष्ट नक्षी आहेत. प्रवेशद्वारावर महिरपी कमान व आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या मागील बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर मध्यभागी वज्रपीठावर महादेवाची ध्यानस्थ मूर्ती आहे.

मंदिराचे प्रांगण पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे. प्रांगणात चहूबाजूंनी तटबंदीला लागून अनेक प्राचीन वास्तू आहेत. यात धर्मशाळा, मंदिराचे भांडारकक्ष व पुजाऱ्यांची निवासस्थाने यांचा समावेश आहे. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. प्रांगणात मध्यभागी एका चौथऱ्यावर महादेवाची सुमारे पाच फूट उंचीची उभी मूर्ती आहे. महादेवाच्या एका हातात त्रिशूळ व त्याला जोडलेले कमंडलू आणि दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मूर्तीच्या शेजारी शिवपिंडी आहे. या मूर्तीच्या शेजारी महादेवाची बसलेल्या स्थितीतील आणखी एक मूर्ती आहे. प्रांगणात लोखंडी बॅरिकेड्स लावून दर्शनरांगेचे व्यवस्थापन केले आहे. प्रांगणात दोन उंच दगडी दीपस्तंभ आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मूळ रचना असलेल्या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला आहे. मूळ सभामंडपाला जोडून बंदिस्त सभागृह बांधले असल्याने समोरील बाजूने असलेले मूळ प्रवेशद्वार आतील बाजूला गेले आहे. त्यामुळे सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या दरवाजांतून सभामंडपात प्रवेश करता येतो. या सभामंडपात चार दगडी स्तंभ व त्यावर तीन अर्धचंद्राकार कमानी आहेत. हा मूळ खुल्या स्वरूपाचा सभामंडप नंतरच्या काळात भिंती बांधून बंदिस्त केल्याचे दिसून येते. बंदिस्त सभामंडपात हवा येण्यासाठी गवाक्षे आहेत. सभामंडपात मध्यभागी प्रत्येकी चार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. हे स्तंभ सुमारे दीड फूट उंच पाषाणी स्तंभपादावर उभे असून स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहेत. सभामंडपाच्या जमिनीवर मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.

पुढे सभामंडपापेक्षा काही इंच उंच अर्धप्रदक्षिणा मार्ग व त्यापुढे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले गर्भगृह आहे. प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाच्या मागील दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गर्भगृहाच्या भिंतीत दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व वरील बाजूला महिरपी कमान आहे. स्तंभांना खालील बाजूस रिंगण नक्षी आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखा व ललाटपट्टीवर अस्पष्ट नक्षी आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी व त्याभोवती नैसर्गिकरीत्या तयार झालेली शाळुंका आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले पितळी अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. या शिवपिंडीचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले जाते. शिवपिंडीच्या शेजारी महादेवाचा पितळी मुखवटा आहे. गर्भगृहाचे वितान अष्टकोनी व घुमटाकार आहे. छताला नवसाच्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूस सभोवती उंच अधिष्ठान आहे. सभामंडपाच्या छतावर चहूबाजूंनी बाशिंगी कठडा व गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर नंदी शिल्पे आहेत. गर्भगृहावर मध्यभागी पाच थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात बारा देवकोष्ठके व त्यात देवप्रतिमा आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.

मंदिरात महाशिवरात्री व श्रावण मास हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी परिसरातील शेकडो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजल्याने परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात दर सोमवारी, पौर्णिमा व अमावस्येला भाविकांची वर्दळ असते.

उपयुक्त माहिती:

  • हादगाव येथून २८ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ४२ किमी अंतरावर
  • हादगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही

सिद्धेश्वर महादेव मंदिर

खरतवाड़ी, हदगांव, जिला. नांदेड़

Back To Home