भारतातील प्राचीन साधू, संतांनी सनातन धर्मात शिरलेल्या कुप्रथा, कर्मकांडे, अनिती यांवर टीका करीत सातत्याने सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून सर्वांसाठी आत्मज्ञानाची कवाडे खुली केली. तत्पूर्वी बाराव्या शतकात असाच धर्मसुधारणेचा प्रयत्न दक्षिणेकडे आलमप्रभू यांनी केला. लिंगायत संत आणि कवी म्हणून पूजल्या जाणाऱ्या आलमप्रभू यांचे समाधी मंदिर भूम शहरात आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी झटणाऱ्या आलमप्रभूंचे समाधीस्थळ हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
लिंगायत संत आलमप्रभू यांच्या जीवनचरित्राबद्दल आज ठोस अशा माहितीचा अभाव आहे. होयसाळ राजा नरसिंह पहिला याचा दरबारी कवी हरिहर याने लिहिलेल्या ग्रंथांतून आलमप्रभू यांच्या बालपणाविषयी काही माहिती मिळते. त्यानुसार, महात्मा बसवेश्वर आणि लिंगायत संत अक्का महादेवी यांचे समकालीन असलेल्या आलमप्रभूंचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नीरशंकर तर आईचे नाव सुजननी असे होते. आलमप्रभू हे उत्तम ढोलवादक होते.
गावातील मंदिरात ते ढोलवादनाची सेवा बजावत असत. लवकरच त्यांचा विवाह झाला. कमलाथे हे त्यांच्या पत्नीचे नाव. तिचे अकाली निधन झाल्यानंतर आलमप्रभू यांना वैराग्य आले. घरदार सोडून फिरत असताना एका गुंफामंदिरात त्यांची संत अनिमिष यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी तपस्या सुरू केली. आत्मसाक्षात्कारानंतर ते काव्यरचना करून धर्मप्रचार करू लागले. त्यांच्या काव्यात गूढार्थ भरलेले असल्याचे सांगण्यात येते. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील कर्दळीबनात त्यांचे निर्वाण झाले.
भूम येथील आलमप्रभू देवस्थान येथील ग्रामदैवत आहे. आजही येथे आलमप्रभूंचे अस्तित्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की आलमप्रभू देवस्थान हे समाधी स्थळ बाराव्या शतकातील आहे. काही अभ्यासकांच्या मते आलमप्रभू यांचे निधन आंध्र प्रदेशातील श्रीशैलम जवळील कर्दळीबनात झाले. परंतू त्यांची समाधी मंदिरे आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. याचे कारण म्हणजे आलमप्रभूंच्या कार्याचा प्रसार करणाऱ्या सर्वच प्रसारकांच्या समाध्या या आलमप्रभू देवस्थान म्हणून जनमानसात ओळखल्या जाऊ लागल्या होत्या.
भूम शहराच्या वेशीवर असणाऱ्या या देवस्थानासमोर स्वागतकमान आहे. उंचावर असलेल्या देवस्थानाला भक्कम आवारभिंत आहे. आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून या देवस्थानाच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील फरसबंदी प्रांगणात, महावृक्षांच्या फांद्यांना टांगलेल्या नवसाच्या पितळी घंटा आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांच्या समोर चौकोनी तुलसी वृंदावन व महंतांच्या काही प्राचीन समाध्या आहेत. प्रांगणात मध्यभागी सुमारे चार फूट उंच चौथरा आहे. चौथऱ्यावर चढण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस व चौथऱ्यास सभोवताली लोखंडी जाळीदार सुरक्षा कठडे आहेत. चौथऱ्याच्या चारही कोपऱ्यांवर कमळदल नक्षी असलेले वामनस्तंभ आहेत. सर्व स्तंभांच्या पायाजवळ रक्षक देवतांच्या मूर्ती, शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहेत. चौथऱ्यावर उजव्या बाजूला अर्धभिंत आहे. त्यातील देवकोष्टकात दत्तात्रयांची तसबीर आहे. भिंतीवर मध्यभागी गोशिल्प व दोन्ही बाजूला आमलक आणि त्यावर कळस आहेत. चौथऱ्यावर मध्यभागी आलमप्रभूंची समाधी व त्यावर भगवी शाल पांघरलेली आहे. चौथऱ्याच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे.
दत्त जयंती हा या देवस्थानाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री फटाक्यांची आतषबाजी केली जाते. यात्रेनिमित्त गावातील दत्त मंदिरापासून आलमप्रभू देवस्थानापर्यंत रथयात्रा व पालखी निघते. यावेळी पालखीमार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजवला जातो. ही पालखी गावातील गांधी चौकात आल्यानंतर तेथे मल्लखांबावरील कसरतीने देवाला मानवंदना दिली जाते. यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी सामने भरवले जातात. त्यासाठी जिल्हाभरातील पैलवान व कुस्तीरसीक येथे येतात. यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या हाल्यांच्या झुंजी, टक्करीची स्पर्धा या गावच्या परंपरा टिकवून आहेत. श्रावण महिन्यात देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी असते. प्रत्येक सोमवार, गुरूवार, पौर्णिमा, अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.