मल्लिकार्जुन मंदिर

अचलेर, ता. लोहारा, जि. धाराशिव

मल्लिकार्जुन हे बारापैकी दुसरे ज्योतिर्लिंग मानले जाते. आंध्र प्रदेशातील कर्णुल जिल्ह्यात श्रीशैलम पर्वतावर ते स्थित आहे. या मंदिराचा अनेक अर्थाने महाराष्ट्राशी संबंध आहे. मंदिर ज्या कृष्णा नदीच्या तीरावर आहे, ती नदी महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे उगम पावते. दुसऱ्या शतकातील या मंदिराच्या गोपुराचे बांधकाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ.स. १६६७ साली केले होते. असे सांगितले जाते की महाराष्ट्रातील एका भाविकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तेथील देव धाराशिव जिल्ह्यातील अचलेर येथे प्रतिरुपात स्थापित झाला आहे. येथील जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम व त्यावरील कोरीव काम पाहता ते प्राचीन मंदिर असल्याची खात्री पटते. परंतू तसा लिखित स्वरूपात कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मंदिराची अख्यायिका अशी की या गावातील मल्लिकार्जुन देवाचे परमभक्त नियमीत पणे मल्लिकार्जुन देवाच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे जात असत. पुढे वृद्धापकाळाने त्यांना श्रीशैलम येथे जाणे अशक्य होऊ लागले व त्यांनी देवाला आपल्या गावी येण्याची प्रार्थना केली. भक्ताच्या विनवणीनुसार देव स्वतः या ठिकाणी येऊन स्थापित झाले व पुढे येथे मंदिर बांधले गेले.
गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. कमानीच्या सज्जावर दोन्ही बाजूला दोन नंदी शिल्पे व मध्यभागी मल्लिकार्जुन देवाचे शिल्प आहे. येथून मंदिरापर्यंत रस्ता जातो. मंदिरापासून काही अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडी बांधणीचे दोन चौथरे व त्यांवर गोलाकार दीपमाळा आहेत. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळापासून काही अंतरावर उंच चौकोनी निरीक्षण मनोरा आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या मनोऱ्यावर नगारखाना होता. मनोऱ्याच्या बाजूला स्थानिक देवतेचे पाषाणात बांधलेले प्राचीन मंदिर आहे. या मंदिरावर पिरॅमिडप्रमाणे उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले शिखर आहे.
मंदिराचे पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगण रस्त्यापेक्षा सुमारे दहा ते बारा फूट खाली आहे व तेथे उतरण्यासाठी दोन पायरी मार्ग आहेत. जुन्या पायरीमार्गावर कोरीव पाषाणात बांधलेल्या एक फूट उंचीच्या पायऱ्या आहेत. या पायरीमार्गाच्या उजवीकडे नवा पायरी मार्ग आहे. येथील पायऱ्या कमी उंचीच्या व अधिक रुंद असल्याने चाढण्या-उतरण्यास सोपे होते. प्रांगणाच्या सभोवती भक्कम तटबंदी आहे. प्रांगणात कोरीव पाषाणात बांधलेल्या दोन दीपमाळा व प्राचीन विहीर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीच्या कठड्याजवळ सुमारे सहा फूट उंचीचा पितळी त्रिशूळ व त्याशेजारी अष्टकोनी तुलसी वृंदावन आहे.
तीन मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या समोरील बाजूला तसेच डाव्या व उजव्या बाजूला मुखमंडप आहेत. प्रत्येक मुखमंडपाच्या तिन्ही बाजूने कठडे आहेत. मुखमंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. मुखमंडपात सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपिठावर नंदी आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर पर्णशाखा, पुष्पशाखा, स्तंभशाखा व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. उत्तरांगेवरील तोरणात शिखर शिल्पे आहेत. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस भैरव द्वारपाल शिल्पे आहेत. त्यांच्या हातात त्रिशूल व डमरू आहेत. नक्षीदार मंडारकास चौकशिला आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडात चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडांचा खालील सुमारे दोन फूट भाग चौकोनी व त्यावरील भाग षट्कोनी, अष्टकोनी, द्वादशकोनी व वर्तुळाकार अशा विविध भौमितिक आकारात आहे. त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. येथील अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहेत. सभामंडपात जमिनीवर पितळी कासव आहे. भाविकांच्या सुविधेसाठी येथे दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभामंडपात उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दारे आहेत.
अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नक्षीदार वातायने आहेत. प्रवेशद्वारावर पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती व तोरणात शिखर शिल्पे आहेत. मंडारकास चंद्रशिला आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास विविध नक्षी असलेल्या पाच द्वारशाखा आहेत. स्तंभशाखांवर तोरण व तोरणात शिखर शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावरील पितळी मखरात महादेव व पार्वती यांच्या मल्लिकार्जुन स्वरूपातील मूर्ती व चांदीचे मुखवटे आहेत.
मंदिराच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. बाह्य भिंतींवर मध्यभागी पुष्पथर आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूला भिंतीत असलेल्या देवकोष्टकांत स्थानिक देवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी सुरक्षा कठडे व कठड्याच्या प्रत्येक कोनावर नंदीशिल्पे आहेत. मुखमंडपाच्या छतावर कठड्यावरील बाशिंगातील देवकोष्टकात महादेवाची मूर्ती आहे. महादेवाच्या पुढ्यातून खाली झेप घेणाऱ्या लहान बाळाचे शिल्प आहे. यात्राकाळात गावातील लहान बाळांना छतावरून खाली टाकून झेलण्याची प्रथा आहे. त्या प्रथेचे हे प्रतीक शिल्प आहे. या देवकोष्टकाच्या दोन्ही बाजूला कठड्यांवर नंदीशिल्पे आहेत.
मंदिराच्या प्रांगणात सांस्कृतिक सभागृहाची दुमजली इमारत आहे. याच्या दुसऱ्या मजल्यावर भाविकांच्या सुविधेसाठी भक्तनिवास आहे. मंदिरापासून जवळच कुस्तीचे मैदान आहे. यात्रा काळात येथे कुस्त्यांच्या स्पर्धा भरतात.
फाल्गुन आमावस्येपासून मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव सुरू होऊन तो सलग पाच दिवस चालतो. फाल्गुन अमावस्येला देवाची नंदी पालखी निघते. पालखी मिरवणुकीने देव गावातील मठापर्यंत जातात व पाडव्याच्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक मंदिरात परत येते. तिसऱ्या दिवशी पंचनद्यांची कावड येते व देवास पंचतीर्थाने अभिषेक केला जातो. देवावर खोबरे उधळले जाते. यात्रेच्या चौथ्या दिवशी कुस्त्यांच्या स्पर्धा होतात. या कुस्त्यांमध्ये भाग घेण्यासाठी जिल्हाभरातून पैलवान येतात. यात्रोत्सव काळात मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, मनोरंजनाचे कार्यक्रम, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेनिमत्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात.

उपयुक्त माहिती

  • लोहारा येथून ३५ किमी, तर धाराशिव येथून ८३ किमी अंतरावर
  • लोहारा व तुळजापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : श्रीमंत बसवणप्पा कंटे, अध्यक्ष, मो. ८३८१०६४२५२
Back To Home