महादेव मंदिर

उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव

भारतात चालुक्य राजवंशाची सत्ता जवळपास ६०० वर्षे टिकली. या काळात त्यांनी सामाजिक व आर्थिक सुधारणांसोबत मंदिर स्थापत्यकलेचा विकास केला. त्यांनी बांधलेली मंदिरे आजही सुस्थितीत आहेत. चालुक्यांनी बांधलेल्या प्रसिद्ध मंदिरांत पट्टडक्कल येथील विरूपाक्ष मंदिर, येहोले येथील लाड खान मंदिर, एलोरा येथील रामेश्वर, धर्मापुरी येथील केदारेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कंकाळेश्वर मंदिर आदी मंदिरांचा सामावेश होतो. याच पठडीतील एक चालुक्यकालीन प्रसिद्ध मंदिर उमरगा येथे आहे. तीन गर्भगृहे व तीन मुख्य देवता असलेले हे शिल्पांकित मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
हे मंदिर चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या कार्यकाळात बांधले गेले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. शैव वैष्णव वादावर समेट घडवण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. त्रिगुणात्मक त्रिदेव एकच आहेत, हे या मंदिराच्या रचनेतून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असे सांगितले जाते. या तारकाकृती मंदिरातील शिल्पकला, सभामंडपातील अष्टदिक्पाल मूर्ती, तीन अंतराळ व गर्भगृहांची रचना अनोखी आहे.
उमरगा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात दोन चौथरे व त्यांवर गोलाकार दीपमाळा आहेत. दोन्ही दीपमाळांच्या मधल्या चौथऱ्यावर नाग युगुल शिल्प, नंदी व शिवपिंडी आहेत. प्रांगणात डेरेदार वृक्ष व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिरालगत मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी डावीकडील मंदिरात गणेशमूर्ती व उजवीकडे देवीची मूर्ती आहे. महादेवाचे हे मंदिर सुमारे चार फूट उंच जगतीवर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपातून सभामंडपात जाण्यासाठी सहा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी चौथऱ्यांच्या स्वरूपात सुरक्षाकठडे आहेत. सुरक्षाकठड्यावर पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला शिल्पे आहेत.
मुखमंडपाच्या प्रवेशद्वारास दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ, त्यावर अर्धचंद्राकार शिला, त्यावर मध्यभागी ललाटबिंब व ललाटपट्टीवर शिल्पे कोरलेली आहेत. मुखमंडपात असलेली ही रचना दुर्मिळ व अनोखी आहे. मुखमंडपात दोन्ही बाजूला कक्षासनांची रचना आहे. पुढे सभामंडपाचे पाच शाखीय प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास सिंहशाखा, गजशाखा, शुकशाखा, अश्वशाखा व पुष्पशाखा आहेत. ललाटबिंबावर गजलक्ष्मीची मूर्ती व त्यावरील उत्तरांगेवर मकरतोरण आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. हे स्तंभ व त्यावरील हस्त आणि तुळईंवर नक्षीकाम आहे. सभामंडपात पुढील चार स्तंभांच्या मधील जागेत रंगशिला आहे. येथे एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. येथील वितानावर अष्टदिक्पाल शिल्पे आहेत. येथील स्तंभ व तुळईवर कीर्तीमुखे व सप्तमातृका शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपात शिवतांडव शिल्पे आहेत. सभामंडपाच्या भिंतीतील देवकोष्टकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपापुढे तीन अंतराळ व तीन गर्भगृहे आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. अंतराळाच्या डाव्या व उजव्या बाजूला देवकोष्टके आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात शिवपिंडी आहे. येथील अंतराळातील देवकोष्टकांत बसवप्पा व संत तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पुष्पशाखा, वेलबुट्टीशाखा, स्तंभशाखा, पर्णलताशाखा व पुष्पलताशाखा आहेत. ललाटबिंबावरील उत्तरांगावर शिखर शिल्पे आहेत. नक्षीदार मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे.
डाव्या बाजूच्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालिका शिल्पे व नक्षीदार द्वारशाखा आहेत. मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. येथील प्रवेशद्वाराला पाच द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावर विष्णूची चतुर्भुज उठाव शैलीतील मूर्ती व शिवपिंडी आहे. मंदिरातील उजव्या बाजूच्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास उभ्या धारेच्या नक्षी असलेल्या द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. प्रवेशद्वारास पाच नक्षीदार द्वारशाखा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर ब्रह्मदेवाची मूर्ती व बाजूला शिवपिंडी आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी बाशिंगी कठडा व मध्यभागी शिवपिंडीची विशाल प्रतिकृती आहे. हे मंदिर पंचरथ प्रकारचे आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सलग आठ दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. श्रावणातील सर्व सोमवारीही येथे भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • उमरगा बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
  • धाराशिव जिल्ह्यातील अनेक शहरांतून उमरग्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home