
कर्मकांडे, कडक वैराग्य, संन्यास यांवर भर न देता सामान्य माणसाला भक्तिप्रवण करणारा अध्यात्मविचार मांडणारा, तसेच योगसाधनेला महत्त्व देणारा शिवपूजक असा ‘नागेश संप्रदाय’ मोहोळ तालुक्यात उदयास आला. अशा या तालुक्यात पापरी येथे स्वयंभू महादेवाचे इतिहासकालीन स्थान आहे. याची आख्यायिका अशी की येथील महादेवाची पिंडी कोणीही स्थापन केलेली नसून ती जमिनीतून आपोआप उगम पावलेली आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील महादेव जागृत आहे व त्याच्या आराधनेने पुत्रप्राप्तीसारख्या मनोकामना पूर्ण होतात.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की पूर्वीच्या काळी पापरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळी गावात खटवांग नावाच्या राजाची सत्ता होती. हा राजा कोण याची इतिहासात नोंद नाही. याच नावाचा राजा त्रेतायुगात प्रभू श्रीरामांच्या कुळात जन्मला होता व त्याने देव–असूर युद्धात देवांच्या बाजूने भाग घेतला होता. या राजाने आपली सर्व संपत्ती गरीब व ब्राह्मणांना दान केली होती, अशी पौराणिक कथा आहे. मात्र पापरीच्या स्थान माहात्म्यातील खटवांग राजा मूळचा मीरजजवळील बुधगावचा असे सांगण्यात येते. या राजाला अपत्य नव्हते. त्याला शिकारीचा छंद होता. उन्हाळ्यात एकदा दुपारपर्यंत कोणतीही शिकार न मिळाल्याने थकून एका झाडाखाली हा राजा थांबला. त्याच ठिकाणी त्याला झोप लागली.
झोपेत असताना त्याला दृष्टांत झाला, की ‘तू ज्या ठिकाणी झोपला आहेस, तेथे महादेवाची पिंडी आहे. त्या पिंडीवर सावली कर, तुझा वंश वाढेल.’ त्या दृष्टान्तानुसार राजाला तेथे स्वयंभू शिवलिंग दिसले. राजाने पिंडीवर सावली म्हणून छोटा इमला उभारला. यानंतर या आख्यायिकेनुसार, काही दिवसांतच त्याला अपत्य झाले. या मंदिराबाबत दुसरीही एक आख्यायिका आहे. ती अशी की पूर्वी येथील जंगलात शेतकऱ्यांची मुले जनावरांना चरण्यासाठी घेऊन येत
असत. तेव्हा खेळता खेळता एका मुलाकडून तेथील पाषाणास काठी लागली. त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. मुलांनी घरी जाऊन हा प्रकार सांगितला. तेव्हा वडिलधारी माणसे येथे आली. त्यांना येथे जमिनीतून वर आलेले शिवलिंग दिसले. तेव्हापासून या ठिकाणी पूजा होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
येथील मंदिर सुमारे दीडशे वर्ष जुने असल्याचे सांगण्यात येते. करवीर संस्थानचे छत्रपती शहाजी ऊर्फ बुवासाहेब महाराज (कार्यकाळ इ.स. १८२१ ते १८३७) यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख सापडतात.
गावाबाहेर असलेल्या या मंदिरास आवारभिंत व मोठे प्रांगण आहे. प्रांगणात स्थानिक देवतांची मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन चौकोनी स्तंभ व त्यावर पुढील बाजूस पुढे आलेल्या तुळईवर छत असल्याने ही रचना तरंगत्या मुखमंडपासारखी झाली आहे. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. मधल्या दोन रांगांतील स्तंभ गोलाकार व बाह्य बाजूच्या रांगातील
चौकोनी स्तंभ भिंतीत आहेत. येथील छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत.
सभामंडपाच्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी खडकातून वर निघालेली स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूला एक दरवाजा आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील दोन थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके आहेत व त्यांत शिवपिंडी आणि वरील थरांतील देवकोष्टकात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या भिंतीवर पुष्प व प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. देवकोष्टकांच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.
श्रावणात या मंदिरात सप्ताहाचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन यांसह वारकरी संप्रदायातील थोरांची व्याख्याने आयोजिली जातात. बारा दिवसांच्या या सोहळ्याची सांगता काल्याच्या प्रसादाने होते. ग्रामस्थांच्या वतीने सप्ताहादरम्यान अन्नदानाची व्यवस्था केली जाते. शिवरात्रीलाही मंदिरात भाविकांची गर्दी असते. व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले मूळचे रहिवासी या दिवशी आवर्जून गावात दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात येते. या दिवशी दोन हजार किलो साबुदाण्याची खिचडी बनवली जाते, असे सांगितले जाते.