होनाई देवी मंदिर

हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रात परिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेल्या या देवीच्या नावावरूनच महाराजांची भवानी तलवार ओळखली जाते. या देवीची अनेक मंदिरे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आहेत. यातील काही मंदिरांत देवी अन्य नावांनी देखील ओळखली जाते. यापैकीच एक प्राचीन प्रसिद्ध मंदिर हातनूर गावाजवळील होनाई डोंगरावर आहे. तुळजाभवानीचे रूप असलेली येथील देवी होनाई या नावाने ओळखले जाते. ही जागृत देवी नवसाला पावते, अशी मान्यता आहे

हे प्राचीन देवस्थान अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत आख्यायिका अशी की ही देवी कर्नाटक प्रांतातून येऊन येथील ओढ्यावरील परिट घाटावर अवतरली. येथे देवीचे स्थान निर्माण झाले होते. परंतु परिट घाटाच्या पाण्याचा उपद्रव होत असल्याने देवी तेथून गुप्त झाली होनाई डोंगरावर प्रकटली. एका भक्ताला देवीने दिलेल्या स्वप्नदृष्टांतानुसार, डोंगरात खोदकाम करताना देवीची मूर्ती सापडली. त्या ठिकाणी नंतर हे मंदिर बांधण्यात आले. असे सांगितले जाते की तुळजाभवानीचे रूप असलेल्या या देवीच्या डोंगरावर किल्ला बांधण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. परंतू तत्कालिन परिस्थिती सुयोग्य नसल्याने महाराजांनी तो विचार सोडून दिला. शिवराय या देवीच्या दर्शनासाठी येत असत, अशी कथाही येथे सांगण्यात येते

हातनूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या होनाई डोंगराच्या पायथ्यापर्यंत पक्की डांबरी सडक आहे. येथे प्रशस्त वाहनतळ आहे. येथून मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे ३५० पायऱ्या आहेत. पायरीमार्गालगत विद्युत दिवे असलेले लोखंडी स्तंभ आहेत. रात्रीच्या वेळी विद्युत दिवे सुरू करून रोषणाई केली जाते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंस सुरक्षा कठडे आहेत. पायरी मार्गाच्या प्रारंभ बिंदूवर दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष येथून नगारखान्याकडे जाण्यासाठी जीना आहे

प्रवेशद्वारापुढे काही अंतरावर पायरीमार्गालगत प्राचीन पाषाण पादुका शिवपिंडी आहे. यावरून येथे प्राचीन समाधीस्थळ असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. येथून काही अंतरावर कुस्तीचे मैदान आहे. यात्रेच्या काळात येथे कुस्त्यांचे जंगी सामने होतात. पायरीमार्ग संपून वर देवीचे मंदिर आहे. सुमारे दोन फूट उंच जगतीवर हे मंदिर असून मंदिराभोवती कठडा आहे. मुखमंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपास समोरून एक उजव्या डाव्या बाजूला प्रत्येकी एक अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही प्रवेशद्वारांसमोर मुखमंडप आहेत. प्रत्येक मुखमंडपात चार चौकोनी स्तंभ त्यावरील तुळईवर छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत

मंदिराचा सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. यात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभ बाह्य बाजूला असून त्यांवरील तुळयांवर छत आहे. मंदिरास एकूण २४ स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दंडधारी द्वारपालांची शिल्पे आहेत. या शिल्पांच्या वर दोन्ही बाजूंस भिंतींवर कमळ फुलांची नक्षी आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर खालील बाजूस कमळ फुलांची नक्षी, वर पर्णलता पुष्पलता नक्षी आहे. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वारावरील तोरणात चक्राकार नक्षी आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर होनाई देवीची हातात ढाल तलवार असलेली द्विभुज मूर्ती आहे. वज्रपिठावर डाव्या बाजूला तुळजाभवानीची व्याघ्रारूढ मूर्ती उजव्या बाजूला अश्वारूढ खंडोबाची मूर्ती आहे. तिन्ही मूर्ती प्राचीन काळ्या पाषाणात उठावशैलीत कोरलेल्या आहेत. गर्भगृहात देवीसमोर शिवपिंडी आहे. गर्भगृहात नवसाच्या पितळी घंटा, पाळणे आरसे आहेत

समोरील मुखमंडपाच्या छतावर फक्त सज्जा आहे. उजव्या डाव्या बाजूच्या मुखमंडपाच्या छतावर उरूशृंगी प्रकारचे शिखर आहे. सर्व उपशिखरे मुख्य शिखरावरील आमलकांवर कळस आहेत. सभामंडपाच्या छतावर चहुबाजूंनी सुरक्षा कठडा, मध्यभागी घुमटाकार शिखर त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर उरुशृंग प्रकारचे शिखर, यात एकूण ४४ उपशिखरे एक मुख्य असे ४५ शिखरे आहेत. सर्व शिखरांवरील आमलकांवर कळस आहेत

मंदिरापासून काही अंतरावर गोड्या पाण्याची विहिर आहे. या विहिरीत बारमाही पाणी असते. विहिरीपासून काही अंतरावर खंडोबाचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या चार स्तंभ असलेल्या सभामंडपात दोन नंदी मूर्ती गर्भगृहात खंडोबाचा पाषाण आहे. मंदिरात माघ पौर्णिमेला देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवी पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणा करते. दसऱ्याला गावातील पाटील वाड्यातून देवीची पालखी मिरवणूक निघते. या दिवशी ओढ्याजवळील मंदिरातून दंडवत घालीत भाविक या मंदिरात येतात. मंदिरात चैत्र नवरात्र शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. सर्व उत्सवांच्या वेळी राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी येतात. दर शुक्रवारी मंगळवारी तसेच पौर्णिमा अमावस्या या दिवशी येथे भाविकांची वर्दळ असते

 

उपयुक्त माहिती

  • तासगावपासून १७ किमी, तर सांगलीपासून ४० किमी अंतरावर
  • तासगाव येथून हातनूरपर्यंत एसटीची सुविधा
  • हातनूरपासून मंदिराच्या पायथ्यापर्यंत खासगी वाहनांनी येता येते
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : गुरव, मो. ९७६६६८४१७१
Back To Home