वेताळगुरू मंदिर

बेलवाडी, रेवणगाव, ता. खानापूर, जि. सांगली

पूर्वज किंवा भूतांच्या पूजनाची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. आर्यपूर्व काळापासून अशा प्रथा परंपरा आदिवासींसहित अनेक समाजात प्रचलित आहेत. पुढे वेगवेगळ्या संस्कृतींची सरमिसळ होत गेली तशी वेगवेगळ्या देवतांची पूजन पद्धतींचीही सरमिसळ होत गेली. त्यानुसार अनेक शीतल देवतांची तसेच उग्र भूतनाथांचीही पूजा केली जाऊ लागली. यापैकीच एक उग्र किंवा आग्या वेताळाचे प्राचीन मंदिर खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथे आहे. येथील वेताळास वेताळगुरू, भूतनाथ आदी नावाने संबोधले जाते. भिंती छत विरहित असलेल्या या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

वेताळगुरूचे हे स्थान हजारो वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. वेताळ देवाच्या जन्माबाबत अख्यायिका अशी की कैलास पर्वतावर शंकर पार्वतीने केलेल्या होमाच्या अग्नीतून वेताळाचा जन्म झाला. शंकराने त्याला आपला सेनापती बनवून समस्त भूतांचा राजा होण्याचा वर दिला. पुढे वेताळदेव शंकराच्या कालभैरव रूपासोबत उज्जैन येथे राहिला त्यांचा एक अंश रेवण गावातील डोंगरात येथील भक्तांच्या उद्धारासाठी प्रकट झाला. भक्तांचा रक्षक असलेल्या या देवाला बंदिस्त मंदिरात राहणे पसंत नसल्याने या देवाच्या मंदिरास छत भिंती नाहीत.

रेवणगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेताळगुरु मंदिराची पहिली स्वागत कमान आहे. रस्त्याच्या दुतर्फा चार गोलाकार नक्षीदार स्तंभ, त्यावरील तुळईवर छत छतावर महिरप आकारातील बाशिंग आहे. या बाशिंगावर मध्यभागी कळस बाशिंगी भिंतीवर दोन व्याघ्र चित्रे, असे स्वागत कमानीचे स्वरूप आहे. येथून काही अंतर पुढे आल्यावर तटबंदी प्रवेशद्वार असलेले मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण आहे. प्रवेशद्वारास दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन चौकोनी स्तंभ त्यावरील छतावर अर्धचंद्राकार कमान आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आसने आहेत.

प्रवेशद्वारातून पेव्हर ब्लॉक अच्छादित प्रांगणात प्रवेश केल्यावर पुढे पूजा साहित्यांची दुकाने आहेत. येथील दोन भव्य गजशिल्पे लक्ष वेधून घेतात. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. दुष्काळी भागातील या मंदिराच्या प्रांगणात हिरवीगार वनराई विविध फुलझाडांचे उद्यान आहे. प्रांगणातून पुढे गेल्यावर मंदिराची आवारभिंत आहे. या भिंतीत दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ त्यावर अर्धचंद्राकार कमान असलेले प्रवेशद्वार आहे. येथून पुढे दोन टप्प्याने उंच होत जाणाऱ्या प्रांगणात मागे पुढे खंकाळ दैत्याचे शिल्प असलेला चौकोनी पाषाण आहे. खंकाळ दैत्याने एका हातात अस्थीदंड दुसऱ्या हातात भाला धारण केलेला आहे. त्याच्या अंगावर उंची वस्त्रे, ओठावर भारदस्त मिशी डोक्यावर झोटिंगी केश संभार आहे. हे देवाचे द्वारपाल असल्याचे सांगितले जाते

मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर चौथरा त्यावर तीन थरांची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेत दीप प्रज्वलनासाठी स्वतंत्र हस्त आहेत. वर्तुळाकार रिंगणाने दीपमाळेचे थर विभागलेले आहेत. दीपमाळेच्या चौथऱ्यावर विक्रमादित्य राजाचे चित्र रंगवलेले आहे. दीपमाळेच्या बाजूला तुलसी वृंदावन एक चौथरा आहे. त्यावर शिवपिंडी आहे

वेताळ देवास बंदिस्त मंदिर मान्य नसल्याने येथे रुढार्थाने मंदिर नाही. असे असले तरी स्तंभ त्यावरील जाळीदार लोखंडी छत, अशी भिंती छतविरहीत सभामंडपाची रचना आहे. सभामंडपात बाह्य बाजूस एकूण बारा गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभपाद चौकोनी अधिक रूंद वरील भागावर कमळदल नक्षींचे रिंगण आहे. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. स्तंभात कमानीच्या वरील भागावर कमळ फुलांची नक्षी, शीर्षभागी लोखंडी तुळई तुळईवर धातूचे जाळीदार छत आहे. पुढे कमळ फुलाची नक्षी असलेले दोन गोलाकार स्तंभ त्यावर अर्धचंद्राकार कमान आहे. कमानीत वरच्या बाजूस कमळदल नक्षी वर मध्यभागी एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस आहेत. आमलकात कमळदल नक्षी चारही बाजूने नागशिल्पे आहेत

पुढे भिंती छत विरहित चौथऱ्यास तीन पायऱ्या आहेत. यास गर्भगृह संबोधले जाते. गर्भगृहाच्या तिनही बाजुला जाळीदार लोखंडी कठडा आहे. वज्रपिठावर वेताळगुरू देवाची द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या एका हातात अस्थीदंड दुसऱ्या हातात दंड आहे. देवाच्या अंगावर अलंकार, कासेस धोतर डोक्याला मुंडासा आहे. मूर्तीच्या मागे पाठशीला आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला व्याघ्रशिल्प आहे. उजव्या बाजूला स्तंभात दोन दीपकोष्टके शीर्षभागी व्याघ्र शिल्प आहे. येथील वेताळ देवास हळद, कुंकू गुलाल वाहणे वर्ज्य मानले जाते

येथून बाजूला असलेल्या चौथऱ्यावर मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ मारुती यांच्या मूर्ती आहेत. वेताळ देवाची सेना असलेल्या भुतांना बोकड अर्पण करण्यासाठी प्रांगणात बळीस्थान आहे. त्याशेजारी बळी दिलेल्या बोकडाचा महाप्रसाद तयार करण्यासाठी छत उभारलेले आहे. प्रांगणातील बालोद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे विविध खेळणी आहेत. चैत्र पाडवा हा मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवाचा पालखी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. मंदिरात दर महिन्याच्या अमावस्येला मासिक जत्रा साजरी केली जाते. मासिक तसेच वार्षिक उत्सवांचे वेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक भक्तनिवास आहे

उपयुक्त माहिती

  • विटा येथून १६ किमी, तर खानापूर येथून १० किमी अंतरावर
  • विटा खानापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : दस्तगीर मुलानी, मो. ७५०७८६००१९, पुजारी, मो. ९९७०८०७४८८
Back To Home