दत्तसंप्रदायात औदुंबारास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परशुरामकवीकृत गुरुचरित्रानुसार, ‘त्वच्छाये बैसुनि जो जप करि होमादी सर्व दानाशी। पावे अनंत फळ तो, आल्या विघ्नाशि सर्वदा नाशी।।’ असा वर विष्णुने औदुंबरास दिला होता. दत्तात्रेय अवतार नृसिंह सरस्वती यांनी संन्यासदीक्षेनंतर ज्या–ज्या क्षेत्रांना भेटी दिल्या, त्यातील बरीच स्थाने औदुंबर वृक्षांखाली होती. त्यापैकीच एक ठिकाण हे कृष्णाकाठाच्या औदुंबर वनात आहे. येथे दत्तात्रेयांच्या निर्मल पादुका आहेत. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे नृसिंह सरस्वती यांचा गुप्त वास आहे.
इ.स. १५४८च्या सुमारास सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’नुसार, नृसिंह सरस्वती यांनी वयाच्या सातव्या वर्षी वेदाभ्यास करण्यासाठी गृहत्याग करून काशीस प्रयाण केले. वेदपठण पूर्ण होताच त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. पुढे भारतभ्रमण करता करता ते इ.स. १४२१ मध्ये या औदुंबराच्या वनात आले. येथे त्यांनी चातुर्मास तपसाधना केली. ती पूर्ण होताच त्यांना ज्ञानाची व सिद्धींची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांनी १४२२ साली हे स्थान सोडून नृसिंहवाडीस जाण्याचा संकल्प केला. परंतु त्यांच्या भक्तांनी त्यांना हे स्थान न सोडण्याची विनंती केली. तेव्हा आपले या स्थानावर गुप्तरुपात कायम वास्तव्य असेल व येथील निर्मळ पादुकांत श्रीदत्तात्रेयांचा वास असेल, असे त्यांनी सांगितले. आजही येथे याच पादुकांची पूजा केली जाते.
कृष्णेच्या तीरावर असलेल्या या मंदिराकडे जाताना सर्वप्रथम नदीकडे जाण्यासाठी बांधीव पायऱ्यांचा घाट उतरावा लागतो. नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन दत्तमंदिराकडे जाता येते. घाट उतरणे व चढणे शक्य होत नाही, अशा आजारी व वृद्ध भक्तांना पाय धुण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ व्यवस्था केलेली आहे. येथून पुढे मंदिराचे फरसबंदी केलेले प्रांगण आहे. प्रांगणात मंदिराचा खुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात दोन्ही बाजूस प्रत्येकी पाच चौकोनी स्तंभ व त्यावरील तुळईवर छत आहे. सभामंडपातीच्या समोरील बाजूस चौथऱ्यावर पादुका, डाव्या व उजव्या बाजूस तुलसी वृंदावन आहेत.
पुढे सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अरुंद आहे. रजतपटल आच्छादित द्वाराशाखांवर दंडधारी द्वारपाल व पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीच्या वरील बाजूस असलेल्या नक्षीतील कमानीत गणपती, सरस्वती व लक्ष्मी यांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाची दर्शनी भिंत रजतपटल आच्छादित आहे. भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले चतुर्भुज द्वारपाल आहेत. द्वारपालांच्या वरील बाजूस कमळ व मयूर आहेत. दर्शनी भिंतीच्या दोन्ही बाजूस भांडार कक्ष आहेत.
गर्भगृहात दत्तगुरुंच्या निर्मल पादुका आहेत. त्यावर छताला टांगलेले अभिषेकपात्र आहे. मागील बाजूस वज्रपिठावर श्रीकृष्ण, दत्तात्रेय आदी देवतांच्या पितळी मूर्ती व चांदीच्या खडावा आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीवरील रजतपटलावर नृसिंह सरस्वती यांचे उठाव चित्र आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांना कमळ फुलांची प्रतिकृती असलेली चार घुमटाकार लघू शिखरे, त्यावर आमलक व कळस आहेत. मध्यभागी कमळ फुलाची प्रतिकृती असलेल्या मुख्य शिखरावर आमलक व कळस आहे.
गर्भगृहाच्या मागे असलेल्या औदुंबर वृक्षास पार आहे. त्यावर काचेच्या मखरात दत्तपादुका, विष्णु, नृसिंह सरस्वती, गणेश, हनुमान, कृष्णावेणी, अन्नपूर्णा, महादेव व शेषनाग यांच्या मूर्ती आहेत. प्रदक्षिणा मार्गावर बाह्य बाजूस भिंत व पुढे गोलाकार अर्धचंद्राकार कमानींनी जोडलेले स्तंभ व त्यावर छत आहे. या ठिकाणी दत्तभक्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात. प्रदक्षिणा मार्गावर मेघडंबरीत शिवपिंडी व बाहेर नंदीची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्गात अनेक औदुंबर वृक्ष आहेत. मंदिराकडून वरच्या बाजूला ‘आजोबा’ नावाने ओळखला जाणारा एक महावृक्ष आहे. येथून पुढे इ.स. १८२६ साली गिरनारहून येथे आलेल्या ब्रम्हानंद स्वामींचा मठ आहे. मठात त्यांचे समाधी स्थान आहे. ‘सांगली गॅझेटियर’नुसार, येथील कृष्णानदीवरील घाट ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी लोकसहभागातून बांधून घेतला होता.
मंदिराच्या मागील बाजूस अन्नछत्र आहे. येथे दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंदिर परिसरात धर्मशाळा आहे. त्यात लांबून येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था आहे. मंदिरात दत्त जयंती, नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, श्रीपाद वल्लभ उत्सव व कृष्णामाई उत्सव आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. तसेच दत्त सप्ताहाचे आयोजन केले जाते.