भीमेश्वर मंदिर

भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे

विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीमध्ये (जि. ठाणे) भीमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. चारशे वर्षांहूनही जुने, शहराच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेले हे पुरातन मंदिर आजही दिमाखात उभे आहे. येथील भीमेश्वराचे स्थान हे जागृत असल्याच्या श्रद्धेतून शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवरायांनीही येथे येऊन भीमेश्वराचे दर्शन घेतल्याचे सांगण्यात येते. भिवंडीचे ग्रामदैवत असलेल्या भीमेश्वराच्या मंदिरात १७५ वर्षांपासून होणारा गंगा दशहरा उत्सव शहराच्या सांस्कृतिक मानबिंदूपैकी एक मानला जातो. ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या असलेल्या या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात.

व्यापारीदृष्ट्या आदर्श अशी भौगोलिक रचना असलेल्या भिवंडी शहराला प्राचीन इतिहास आहे. जलमार्ग आणि भूमार्गाच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेले हे शहर राजा भीमदेव याच्या कारकीर्दीत नावारूपास आले. भिवंडी हे शहर भिमडी, तसेच बिंब्री या नावाने ओळखले जाई. हा उत्तर कोकण ऊर्फ कवडीद्वीपाचा भाग होता. येथे शिलाहारांचे राज्य होते. भिवंडीनजीकच्या भेरे येथे अपराजित शिलाहार याचा इ.स. ९९७ मधील ताम्रपट सापडला आहे. इ.स. ११४० मध्ये चंपानेरमधील बिंब या महाराष्ट्रीय क्षत्रिय घराण्यातील प्रताप बिंब याने शिलाहारांच्या ताब्यातील हा परिसर हस्तगत केला. मुंबई-माहीम ऊर्फ बिंबस्थान येथे त्याने आपली राजधानी स्थापन केली. या बिंब राजाचा उल्लेख इंग्रज इतिहासकारांनी चुकून भीम असा केला व तोच रूढ झाला. येथे १५ हिंदू मंदिरे होती, असा उल्लेख ‘गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या चौदाव्या खंडात आहे. ब्राह्मण आळीत असलेल्या भीमेश्वर मंदिराची वास्तू ही त्यापैकीच एक.

या मंदिराबाहेर ४०० वर्षांपूर्वीची एक शिळा आहे. त्यावरून हे मंदिर प्राचीन असल्याची कल्पना येते. जव्हारमधील कोळी राजाने भीमेश्वराचे मंदिर बांधल्याची, तसेच मंदिरास १२६ रुपयांचे वर्षासन सुरू केल्याची नोंद गॅझेटीयरमध्ये आहे. १८५७ मध्ये या मंदिरास सनद देण्यात आली होती. त्यावेळी पतंगशाह तिसरे हे जव्हारचे राजे होते. या मंदिरातील दिवाबत्तीसाठी आजही सरकारकडून पैसे मिळतात. भीमेश्वर मंदिरात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, तसेच वसईच्या स्वारीच्या काळात चिमाजी अप्पा हे दर्शनासाठी येऊन गेले होते असे सांगण्यात येते. संत राम मारुती हे ही या प्राचीन मंदिरात येऊन भीमेश्वरासमोर नतमस्तक झाल्याचे सांगण्यात येते.

रस्त्यालगत असलेल्या या मंदिरात येण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. या मंदिराला घुमटाकार शिखर आहे. मंदिरासमोर एक छोटी दीपमाळ आहे. पूर्वी मंदिराच्या बाजूला हौद होते. कालांतराने ते बुजले गेले. मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे भीमेश्वराचे स्थान असून समोर सीताराम प्रमुख पंचायतन मंदिर आहे. भीमेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीच्या खालील बाजूला असलेल्या देवळीमध्ये गणेशाची सुबक मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. संगमरवरी गर्भगृहात लाकडी खांब आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी असलेल्या शिवलिंगासमोर अखंड पाषाणात साकारलेली नंदीची मूर्ती आहे. या नंदीच्या समोर कासवाची दगडी मूर्ती आहे. येथील शिवपिंडी जमिनीपासून काहीशी खोलगट जागेवर आहे. त्यामुळे या शिवलिंगाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग लावलेले आहे. पिंडीच्या मागील भिंतीवर पार्वतीची मूर्ती आहे व तिच्यासमोर देवीच्या पादुका आहेत. या मंदिरात भाविकांना काही शुल्क आकारून पूजा, अभिषेक व लघुरुद्र विधी करता येतात.

येथील सीताराम प्रमुख पंचायतन मंदिरातील गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर श्रीराम-लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडे गणपतीची तर उजवीकडे हनुमान यांच्या मूर्ती आहेत. श्रीरामाच्या मूर्तीवर नागाने छत्र धरले आहे. या मूर्तींच्या मागे आकर्षक प्रभावळ आहे. या मंदिरात सतत भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्र व श्रावणी सोमवारी येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. येथे दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी या कालावधीत गंगा दशहरा उत्सव साजरा होतो. नदीकिनारी शिवमंदिर असलेल्या ठिकाणीच सहसा हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र, भिवंडी शहरात या मंदिरानजीक नदी नसतानाही हा उत्सव होण्यामागे एक ऐतिहासिक घटना कारणीभूत आहे.

सध्या भिंवडीतील धामणकर नाका परिसरात असलेल्या वऱ्हाळा देवीच्या मंदिरानजीक वऱ्हाळा तलाव आहे. पेशवाईदरम्यान या तलावातील पाणी ग्रामस्थांना मिळावे, या हेतूने श्रीमंत माधवराव पेशवे यांनी एक विशेष पाणी योजना तयार केली होती. मात्र, ती काही कारणांमुळे बारगळली. पुढे १८४८ ते १८५० या कालावधीत भिवंडीत मोठा दुष्काळ पडला होता. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर १८५१ मध्ये या तलावातील पाणी खापरी नळाने शहरात आणण्यात आले. त्या कामास त्या काळी १६ हजार रुपये खर्च आला होता. त्यापैकी पाच हजार रुपये स्थानिक नागरिकांनी जमा केले होते. उर्वरित खर्च ईस्ट इंडिया कंपनी सरकारने केला होता. या कामात पुढे १८७३-७४ मध्ये आणखी खर्च करून सुधारणा करण्यात आली. वऱ्हाळा तलावातील पाणी खापरी नळाद्वारे भीमेश्वर मंदिरासमोर बनवण्यात आलेल्या हौदात सोडण्यात येत असे. गोमुखातून ते या हौदात पडत असे. या हौदाला जोडूनच गावात अनेक हौद बांधण्यात आले. गॅझेटियरमध्येही याबाबत नोंद आहे. या हौदाच्या रूपाने गंगा अवरतली या भावनेतून ग्रामस्थांनी भीमेश्वर मंदिरात १८५० मध्ये गंगा दशहरा उत्सव सुरू केला.

आजतागायत हा उत्सव पूर्वीच्याच स्वरूपात साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान दहा दिवस कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळा, रुद्राभिषेक, गंगालहरी वाचन, गंगापूजन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. २०२४ मध्ये या उत्सवाचे शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. त्यानिमित्त गंगापूजन, गंगाकलशाची स्वागतयात्रा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उपयुक्त माहिती

  • भिवंडी बस स्थानकापासून २ किमी, तर ठाणे शहरापासून १७ किमी अंतरावर
  • ठाणे, कल्याण व पालघर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मयुरेश घुले, मो. ९८६०७६३६७३,
  • अमोल काळे, मो. ९८६०१२०४०२
Back To Home