कोंडेश्वर मंदिर

कोंडेश्वर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरनजीक, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दोन नद्यांच्या संगमावर वसलेले कोंडेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत, नैसर्गिक काळ्या पाषाणातील गुहेत असलेल्या या मंदिराची जागृत देवस्थान अशी ख्याती आहे. त्यामुळे महाशिवरात्र, तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील कोंडेश्वर धबधबा हा पर्यटनस्थळ म्हणून राज्यात परिचित आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक येथे येतात.

मंदिरानजीकच्या ओढ्याच्या मार्गावर पाण्यात पाच ते सात कुंड आहेत. या कुंडांचा अधिपती म्हणून हे देवस्थान पूर्वीकुंडेश्वरम्हणून ओळखले जात असे. कालांतराने या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यालाकोंडेश्वरहे नाव पडले. या कुंडांजवळील उभ्या कड्यात पाच गुहा आहेत. यापैकी तीन गुहा कातळभिंतीतील खोबणीप्रमाणे दिसतात, चौथी ढासळलेली आहे, तर पाचव्या गुहेत शिवलिंग आहे. येथे पाच गुहा असल्याने या भागात पांडवांचे वास्तव्य होते त्यांनी हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. मात्र ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये या मंदिराच्या बांधकामाबाबत कोणताही उल्लेख नाही. शंकराने या ठिकाणी तांडव नृत्य केल्याचीही वंदता आहे. असे सांगितले जाते की या मंदिरानजीकच्या कुंडांतील दगडांचा वापर येथून जवळच असलेल्या अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या उभारणीसाठी करण्यात आलेला आहे.

हे मंदिर पूर्वी नैसर्गिक गुहेत होते. या गुहेशेजारी पाण्याचे कुंड होते. सुमारे ७५ वर्षांपूर्वी श्री अवधूत निरंजनगिरी महाराज ऊर्फ कोंडेश्वर बाबा साधनेसाठी जागा शोधत या ठिकाणी आले. येथील वातावरणामुळे प्रभावित होऊन त्यांनी ही जागा निवडली. त्यांनी आयुष्यभर गुहेतील शिवलिंगाची परिसराची देखभाल केली. पावसाळ्यात गुहेपासून काही अंतरावर वरच्या भागात असलेल्या झोपडीत ते वास्तव्य करत असत. पाणी ओसरल्यावर पुन्हा गुहेत येऊन ते साधना करीत असत. १९९९ मध्ये त्यांनी येथेच समाधी घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकसहभागातून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथे भाविकांकडून रोख स्वरूपातील देणगी स्वीकारली जात नाही.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत हिरवीगार मखमल पांघरलेल्या निसर्गाच्या सानिध्यातील हे मंदिर बदलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या वनराईत स्थित आहे. प्रवेशद्वारापासून मुख्य मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गावर पेव्हर ब्लॉक लावले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी पत्र्याच्या शेड्स उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी काही पावलांवर डाव्या बाजूला शिवलिंग नंदीचे दर्शन घडते. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्यात भाविकांसाठी आसनव्यवस्था आहे. मंदिराच्या गर्भगृहाजवळ गणेश, विठ्ठलरखुमाई, हनुमान, दत्त, दुर्गादेवी आदी मूर्ती आहेत. या मूर्तींच्या मागील बाजूस कोंडेश्वर बाबांची प्रतिमा आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहासमोर नंदीची दगडी मूर्ती आहे. येथून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. काळ्या पाषाणात कोरलेल्या गर्भगृहात स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होते. शिवलिंगावर फणाधारी नागाचे छत्र असून त्यावर असलेल्या गलंतिकेतून लिंगावर अभिषेक होत असतो. शिवलिंगाच्या मागील बाजूला गणेशाची तसेच पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला कुंडांनजीक कालिकामाता आणि गणेशाची मंदिरे आहेत. वर्षानुवर्षे धबधब्यांचे पाणी कोसळत असल्याने ही दोन कुंडे तयार झाली आहेत. खोल असल्याने या कुंडांभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. अधिकमासात अनेक भाविक मंदिराजवळच्या कुंडांमध्ये स्नान करतात. महिला भाविकांसाठी येथे कपडे बदलण्याची सुविधा आहे.

दररोज सकाळी ते रात्री .३० वाजेपर्यंत भाविकांना येथील गर्भगृहात जाऊन कोंडेश्वराचे दर्शन घेता येतेयेथे महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, त्रिपुरारी पौर्णिमेला मोठे उत्सव होतात. प्रत्येक सोमवारी भाविकांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्या दिवशी येथे देवस्थान कमिटीच्या माध्यमातून भजन, प्रवचन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम होतात. आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादही दिला जातो. प्रत्येक श्रावणी सोमवारीही भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते.

मंदिराजवळ असलेला धबधबा हजारो पर्यटकांचे आकर्षण आहे. पावसाळ्यात धबधब्याच्या रूपात कोसळणाऱ्या जलधारा अंगावर झेलण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे परिसरातील अनेक पर्यटक येथे येतात. मुख्य मंदिरातून बाहेर आल्यावर तीनचार पायऱ्या उतरून या धबधब्यावर जाता येते. पावसाळ्यात अनेकदा येथील दोन कुंडे धबधब्याच्या पलिकडील दोन मंदिरे पाण्याखाली जातात. दुर्घटना होऊ नये म्हणून मुसळधार पावसादरम्यान त्या मंदिरांत भाविकांना जाण्यास मनाई केली जाते.

उपयुक्त माहिती:

  • बदलापूरपासून किमी, तर ठाण्यापासून ४८ किमी अंतरावर
  • बदलापूरहून खासगी वाहने एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
  • संपर्क : देवस्थान कमिटी, प्रभाकर म्हात्रे, मो. ९१४५४७८१३२, चंद्रकांत सुरोशे, मो. ७३७८७८४५०५
Back To Home