डोंबिवली पूर्वेकडे ठाकुर्ली परिसरातील मोठा गाव–देवीच्या पाड्यातील गावदेवी मंदिर हे परिसरातील जागृत देवस्थान समजले जाते. या देवीचा नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, असा लौकिक आहे. असे सांगितले जाते की या परिसरातील बाईचा पाडा, चिचोंड्याचा पाडा, कुंभारखाण पाडा, भोंगिऱ्याचा पाडा, देवीचा पाडा, नकटीचा पाडा व चितोऱ्याचा पाडा या सात पाड्यांची ही देवी आहे. चैत्र कृष्ण सप्तमी आणि अष्टमी या दोन दिवशी या देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.
मंदिराची आख्यायिका अशी की आता महानगराचे स्वरूप आलेल्या, खाडीकिनारी वसलेल्या डोंबिवली व ठाकुर्ली परिसरात पूर्वी घनदाट जंगल होते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या जंगलातील रांजणीच्या झाडाजवळ, वाघावर बसलेल्या स्वयंभू देवीने ग्रामस्थांना दर्शन दिले. वाघावरून उतरून ती पाळण्यात बसली. त्यानंतर ग्रामस्थांनी देवीला पालखीतून वाजतगाजत गावात आणले. पत्र्याची शेड असलेल्या छोट्या कौलारू मंदिरात काळ्या पाषाणातील या देवीची प्रतिष्ठापना केली. या मंदिर परिसरात पूर्वी वाघ येत असे, त्यामुळे या देवीला ‘व्याघ्रेश्वरी’ असेही म्हणतात. १९७६ मध्ये या मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाला. १९८४ मध्ये मंदिर परिसरात रेल्वेचे काम सुरू होते पण हे काम काही केल्या पूर्ण होत नव्हते. त्यावेळी देवीने या कामाचे कंत्राट घेतलेल्या पारशी गृहस्थाला दृष्टांत दिल्यानंतर त्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला. २००४ मध्ये पुन्हा झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
देवीच्या वाघाबाबतही एक आख्यायिका आहे. खाडीसमोरील भाटला जंगलातील एक वाघ दररोज मंदिर परिसरात येत असे. येण्यापूर्वी तो भाटला जंगलात एक डरकाळी फोडत असे. मंदिर परिसरात आल्यावर तीन डरकाळ्या फोडत असे. त्याच्या अस्तित्वामुळे भयभीत झालेल्या काही लोकांनी इंग्रजांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांंनी त्या वाघाची हत्या केली. त्यानंतर गावात महामारी पसरली. या महामारीत अनेक लोक दगावले. काही दिवसांनी गावातील एका व्यक्तीला दिलेल्या दृष्टांतानुसार ग्रामस्थांनी वनभोजन केल्यानंतर येथील महामारी संपुष्टात आली.
डोंबिवली व ठाकुर्ली रेल्वे स्थानकापासून सारख्याच अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराची वास्तू संगमरवरी दगडात उभारलेली असून मंदिराला लागून संस्थानाचे मोठे सभागृह आहे. तेथे विवाह, बारसे आदी मंगलकार्ये होतात. या मंदिराला दोन शिखरे आहेत. त्यावर अनेक देवदेवता व ऋषी–मुनींची शिल्पे आहेत. रस्त्यालगत असणाऱ्या पायऱ्या चढून आत गेल्यावर मंदिराच्या प्रांगणात डावीकडे रक्षकांचे स्थान दिसते. संपूर्ण प्रांगणात फरसबंदी करण्यात आलेली आहे.
सभामंडप, गर्भगृह आणि त्याभोवती प्रदक्षिणा मार्ग असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर स्वस्तिक, कलश आदी मंगल प्रतिके अंकित आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारे व दोन खिडक्या आहेत. गर्भगृहाच्या डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे व गर्भगृहासमोर देवीच्या पादुका आहेत. गर्भगृहात चांदीने मढवलेल्या मोठ्या मखरात अखंड पाषाणातील शेंदूरचर्चित मूर्ती आहे. त्यावर सोनेरी मुखवटा व दागिने आहेत. देवीच्या डाव्या बाजूस वाघाची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला मखरावर त्रिशूळ कोरण्यात आलेले आहेत व वरच्या बाजूला सूर्यप्रतिमा आहे. रोज सकाळी दही–दूध, मध तसेच पाण्याने स्नान केल्यानंतर देवीचा साजशृंगार करण्यात येतो. दररोज शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी तसेच नवस बोलण्यासाठी येथे येतात.
चैत्र कृष्ण सप्तमी आणि अष्टमीला देवीचा मोठा उत्सव होतो. पहिल्या दिवशी देवीची पूजा झाल्यावर देवीच्या दोन पालख्या गावातून फिरतात. दुसऱ्या दिवशी देवीचा मान दिला जातो. या दिवशी भरणाऱ्या यात्रेदरम्यान ६०,००० ते ६५,००० भाविक देवीचे दर्शन घेतात. यावेळी नवस बोलले तसेच फेडले जातात. महिला भाविक भक्तिभावाने देवीची ओटी भरतात. ही देवी शाकाहारी असल्याने तिला शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो. मंदिरात भाजलेल्या तांदळाचे पीठ करून त्याचे लाडू वळले जातात व त्यांचा देवीला नैवेद्य दिला जातो. इतर देवांना कोंबडे व बकरे दिले जातात.
येथे नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. नऊ दिवस ब्रह्ममुहूर्तावर (साधारणतः पहाटे चार ते साडेपाच ही वेळ) काकड आरती होते. पहाटे पाच वाजता देवीला अभिषेक केल्यावर तिचा साजशृंगार केला जातो. त्यानंतर वीणापूजन व हरिपाठ होतो. संध्याकाळपासून कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होतात. अष्टमीला मंदिरात होम व नवमीला भंडारा होतो. दसऱ्याला घटाचे विसर्जन होते. या उत्सवादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होतो. गावदेवी मंदिर संस्थानतर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात. संस्थानतर्फे वैद्यकीय शिबिर, नेत्रतपासणी शिबिर, तसेच रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातात. गरीब कुटुंबांतील वधू–वरांचे संस्थानच्या सभागृहात विवाहही लावून दिले जातात.