महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या बारा स्थानांपैकी एक स्थान ठाणे जिल्ह्यातील बदलापूरनजीक मुळगाव येथे आहे. जेजुरी गडावरून घोड्यावरून उडी मारून थेट मुळगावच्या डोंगरावर आलेल्या खंडेरायाचे हे मंदिर राज्यातील जागृत देवस्थानांपैकी एक आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या मंदिराच्या गर्भगृहातून अचानक देवाचा भंडारा निघत असे. पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला होणाऱ्या देवाच्या विवाह सोहळ्याला ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात, भंडारा उधळत लाखो भाविक येथे हजेरी लावतात. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सवही येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
मंदिराची आख्यायिका अशी की जेजुरीहून घोड्यावरून उडी मारून खंडेराय थेट मुळगावच्या जंगलात आले. मनुष्याच्या रूपात जंगलातून मार्गक्रमण करत असताना त्यांना वाटेत शेळ्या–मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन आलेले काही ग्रामस्थ दिसले. खंडेरायाने त्यांना थांबवून ‘तुम्हाला काही हवे आहे का’, अशी विचारणा केली. ते सर्वसामान्य मनुष्याच्या रूपात असल्याने ग्रामस्थांनी त्यांना ओळखले नाही. त्यामुळे त्यांनी ‘आम्हाला काहीही नको आहे. तुम्हाला काही हवे असेल तर सांगा’, असे सांगितले. त्यावर खंडेरायांनी त्यांच्याकडे काहीतरी खाण्यासाठी मागितले, तसेच डोंगरावर जाण्याचा रस्ता विचारला. ग्रामस्थांनी त्यांना आपल्याकडील भाकऱ्या दिल्या आणि डोंगराकडे जाणारा मार्ग सांगितला. त्यानंतर खंडेराय डोंगरावर आले आणि अंतर्धान पावले. त्या रात्री खंडेरायांनी ग्रामस्थांच्या स्वप्नात येऊन ‘मी सकाळी तुम्हाला जंगलात भेटलो होतो’, असे सांगितले. ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी डोंगरावर जाऊन पाहिले असता तेथे त्यांना घोड्याच्या पावलांचे ठसे दिसले. काही अंतरावरच खंडोबाच्या लिंगाचे दर्शन झाले. त्यावर भंडाराही दिसला. कालांतराने या ठिकाणी मंदिर उभारून खंडेरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बदलापूरपासून काही अंतरावर निसर्गाच्या कुशीत हे मंदिर वसलेले आहे. पायथ्यापासून मंदिरात येण्यासाठी सुमारे ५०० पायऱ्या चढाव्या लागतात. काही पायऱ्या चढून गेल्यावर खंडोबाची धर्मपत्नी बानाईमातेचे मंदिर लागते. निसर्गसमृद्ध परिसर न्याहाळत पायऱ्या चढत असताना उजवीकडे बारवी धरणाचे विहंगम दर्शन घडते. यावेळी विविध पक्ष्यांचे कानावर पडणारे कुजन व स्वच्छंद विहारणारी शेकडो फुलपाखरे पाहिल्यावर पायऱ्या चढणे सुसह्य होते. रुंद असलेल्या या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुरक्षिततेसाठी रेलिंग लावण्यात आल्या आहेत. पायरीमार्गाच्या बाजूला काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे भक्त निवास आहे. तेथून काही अंतरावर दगडात उमटलेल्या आकृत्या दिसतात. असे सांगितले जाते की या आकृत्या म्हणजे देवाच्या व घोड्याच्या पावलांचे ठसे आहेत. पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोचण्यासाठी सुमारे ३० ते ४० मिनिटे लागतात.
डोंगराच्या लहानशा कड्यावर हे मंदिर असल्यामुळे मंदिराचे प्रांगण आटोपशीर आहे. या संपूर्ण प्रांगणात फरसबंदी करण्यात आली असून बाजूने कठडे बांधलेले आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला मोठी दीपमाळ आहे. मंदिराच्या समोरील बाजूस भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आलेली आहे. या प्रांगणात देवाच्या रक्षकाचे तसेच सात आसऱ्याचे स्थान आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूकडील शिळेवर कडेपठार महाराजांचे स्थान आहे. अशी आख्यायिका आहे की या शिळेवर भगवान शंकर गुप्त झाले होते. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून ३६० अंशांतून दिसणारे निसर्गाचे दृश्य विलोभनीय भासते. येथून मलंगगड–माथेरान डोंगररांग दिसते. या डोंगररांगेवर असलेले मलंगगड, चंदेरी व पेब किल्ले, म्हैसमाळ सुळका, बारवी धरण व बॅकवॉटरचे विहंगम दृश्य दिसते. आकाश निरभ्र असल्यास येथून प्रबळगड, तसेच कलावंतीणीचा सुळकाही दिसतो.
दर्शनमंडप व गर्भगृह असे या छोटेखानी मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपाजवळ भाविकांना बसण्यासाठी बाकडे आहेत. येथे गर्भगृहासमोर नंदी व कासव यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी असलेल्या एका लहान चौथऱ्यावर अश्वारूढ खंडेरायाची मूर्ती आहे. त्याच्या हातात डमरू, त्रिशूळ, खडग (तलवार) आणि पानपत्र आहे. खंडेरायाच्या मूर्तीच्या बाजूला गणेशाची छोटी मूर्ती आहे. चौथऱ्याच्या खालील बाजूस तांदळारूपात खंडोबा, म्हाळसा व बानू आहेत. येथे या देवतांचे मुखवटेही ठेवण्यात आले आहेत. असे सांगितले जाते की या मूर्तींच्या डाव्या बाजूला लहानशा छिद्रातून पूर्वी भंडारा बाहेर पडत असे. कालांतराने छिद्र बुजल्याने भंडारा बाहेर पडणे बंद झाले आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीवर जेजुरीच्या खंडेरायाची प्रतिमा आहे. गर्भगृहात नारळ फोडण्यास, मांसाहाराचा नैवेद्य ठेवण्यास तसेच चामड्याच्या वस्तू आणण्यास मनाई आहे.
रविवार हा खंडेरायाचा दिवस असल्याने त्या दिवशी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला दुपारी दोनच्या सुमारास देवाला हळद लावली जाते. पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी पाच वाजता खंडोबाचा विवाह सोहळा पार पडतो. यावेळी असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. माघ महिन्यातील पौर्णिमेला येथे तीन दिवसांची मोठी यात्रा भरते. या तीन दिवसांत येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता खंडेरायाला अभिषेक झाल्यानंतर देवदर्शनाला सुरुवात होते. दुपारी गावातील हनुमानाच्या मंदिरातून पालखी निघते. ती गडावर जाऊन देवाचे दर्शन घेते. नंतर पालखी गावात फिरते. दुसऱ्या दिवशी कबड्डी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन होते. तिसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांकडून देवदर्शन व नवसफेड केले जातात. दुपारनंतर कुस्तीचे सामने व ऑर्केस्ट्रासारखे मनोरंजनपर कार्यक्रम होतात. दररोज सकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेता येते.