नागपूर शहरात अनेक हनुमान मंदिरे आहेत. नावानुसार त्याच्या आख्यायिकाही प्रचलित आहेत. नंदनवन येथे पंचमुखी मारुती, बेसा गावाजवळ दुंडा मारुती, नागपूरच्या महालामध्ये असलेले काळा हनुमान व पश्चिम मुखी मारुती, सोनेगावातील पक्षिका मारुती अशा विविध नावांची हनुमान मंदिरे येथे आहेत. या सर्वांमध्ये प्रसिद्ध व जागृत स्थान असलेले राजाबाक्षा हनुमान मंदिर हे येथील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाते. या मंदिरातून हनुमान जयंतीच्या दिवशी लाखो भाविकांसह निघणारी व ५० ते ६० चित्ररथ असणारी शोभायात्रा हे नागपूर शहरातील एक आकर्षण आहे.
नागपूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उजव्या बाजूला व टीबी वार्डजवळ राजाबाक्षा हनुमान मंदिर आहे. हे मंदिर ४०० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. असे सांगितले जाते की राजे रघुजी भोसले (थोरले) विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी शाही लवाजम्यासह नाग नदी ओलांडून राजाबाक्षा हनुमानाच्या दर्शनाला जात असत. भोसले यांच्या राजवटीत हे मंदिर अधिक प्रकाशात आले आणि या काळातच त्याचे महत्त्व वृद्धिंगत झाले.
राजाबाक्षा मंदिराची आख्यायिका अशी की गोंड राजा चांदसुलतान यांच्याकडून राजे रघुजी भोसले यांना खंडणी वसूलीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. भोसले सोनेगाव येथे आले असता तिथे त्यांना एक साधू भेटला व त्याने मलाही तुमच्यासोबत राजाकडे यायचे आहे, असे सांगितले. भोसले यांनी साधूची विनंती मान्य करून त्याला सोबत येण्यास सांगितले, परंतु चालताना मागे पाहायचे नाही, अशी एक अट साधूने भोसलेंना घातली होती. भोसलेंनी ती मान्य करून ते पुढे व मागे साधू असा प्रवास सुरू झाला. दरम्यान, भोसलेंना प्रवासादरम्यान तहान लागली. त्यासाठी आज जेथे मंदिर आहे तेथे ते थांबले. तेथील एका झोपडीत त्यावेळी राजाबाक्षा नावाचे संत वास्तव्यास होते. भोसलेंनी त्यांच्याकडून पाणी मागून आपली तहान भागविली व नकळत साधू आपल्या मागे येत आहे का हे पाहण्यासाठी मागे मान वळविली. त्याक्षणीच त्यांच्या मागे येणारा साधू आणि राजाबाक्षा संत हे दोघेही अदृश्य झाले. त्या झोपडीत भोसलेंनी पाहिले असता तेथे त्यांना संत जेथे बसले होते तेथे हनुमानाची मूर्ती दिसली, तोच हा आजचा राजाबाक्षा हनुमान होय.
राजे भोसलेंची इष्ट देवता श्रीराम होती. त्यामुळे रामाचा परमभक्त असलेला हनुमान स्वतः आपल्यासोबत होता, या जाणिवेने भोसलेंनी या मूर्तीच्या भोवताली एक मंदिर बांधले. कालांतराने या मंदिराची देखरेख त्यांनी पर्वतराव गुजर यांच्याकडे सोपविली. गुजरांनी त्यावेळी आपल्याकडे असलेली जमीन विकून आलेल्या रकमेतून या मंदिराचे पुनर्निर्माण करून येथे मोठे मंदिर बांधले. तेव्हापासून या मंदिराची देखरेख आणि व्यवस्था आजही गुजर परिवाराकडे आहे.
राजाबाक्षा हनुमान मंदिर हे सभामंडप व गर्भगृह अशा रचनेचे आहे. येथील सभामंडप प्रशस्त असून या सभामंडपाचे बांधकाम करताना पूर्वी असलेले झाड येथे कायम ठेऊन त्याच्या बाजूने सभामंडप उभारला आहे. त्यामुळे आजही सभामंडपाच्या मध्यभागी प्राचीन झाड दिसते. गर्भगृह काहीसे उंचावर असून त्यात सुमारे पाच ते सहा फूट उंचीची राजाबाक्षा हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील हनुमानाची मूर्ती ही केवळ गुडघ्यापर्यंतच आहे. अशी मूर्ती इतरत्र पाहायला मिळत नाही. दर शनिवारी या हनुमानाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे येतात. या शिवाय श्रावण महिन्यात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी आलेल्या भाविकांना गुजर परिवाराकडून महाप्रसाद दिला जातो.
ज्याप्रमाणे नागपूर शहरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून रामनवमीच्या दिवशी निघणारी शोभायात्रा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे हनुमान जयंतीला राजाबाक्षा हनुमान मंदिरातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघणारी शोभायात्राही येथील आकर्षण आहे. पारंपरिक वेशभूषा, रामायण, महाभारत व इतर पौराणिक तसेच सामाजिक प्रसंगांवर आधारित असे ५० ते ६० चित्ररथ या शोभायात्रेसोबत असतात. हनुमानाच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून जातो. राजाबाक्षा हनुमान मंदिर मैदानातून निघणारी ही शोभायात्रा रामबाग, उंटखाना, हनुमान मंदिर चौक, चंदननगर, हनुमान नगर, क्रीडा चौक, स्मृती मंदिर रेशीमबाग, तिरंगा चौक, गणेशनगर, गुरुदेवनगर, सक्करदरा चौक, रघुजीनगर, छोटा ताजबाग, अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, हनुमान मंदिर चौक, वंजारीनगर, टीबी वॉर्ड या मार्गाने पुन्हा राजाबाक्षा हनुमान मंदिरात पोचते. या शोभायात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी हजारो भाविक थांबलेले असतात. अनेक इमारतींमधून शोभायात्रेमधील चित्ररथांवर पुष्पवृष्टी करण्यात येते. या मार्गावर यावेळी विविध संघटनांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
राजाबाक्षा मंदिरापासून सुमारे दोन किमी अंतरावर नागपूरचे भूषण समजले जाणारे रमण विज्ञान केंद्र आहे. समाजात विज्ञानाविषयी जागरूकता व वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, यासाठी १६ एकर जागेवर १९८७ मध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. संपूर्ण देशात एकूण २७ विज्ञान केंद्रे असून त्यात रमण विज्ञान केंद्राचे महत्त्वाचे स्थान आहे. ५ जानेवारी १९९७ रोजी या विज्ञान केंद्रामधील तारामंडळाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघातून नरसिंहराव खासदार म्हणून निवडून आले होते. विदर्भात असे विज्ञान केंद्र असावे, यासाठी नरसिंहरावांनी विशेष प्रयत्न केले होते. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रामार्फत येथील रमण विज्ञान केंद्राचे व्यवस्थापन पाहिले जाते. नोबल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचे काही काळ नागपूरमध्ये वास्तव्य होते. त्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नाव या केंद्राला देण्यात आलेले आहे.