पुणे शहरातील प्रसिद्ध पर्वती टेकडीवर विराजमान असलेले देवदेवेश्वर मंदिर मराठा साम्राज्याच्या आणि विशेषतः पेशवेकालीन वैभवाचे प्रतीक मानले जाते. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी इ.स. १७४९ मध्ये आपल्या मातोश्री काशीबाईंच्या व्याधीमुक्तीचा नवस पूर्ण करण्यासाठी या मंदिराची निर्मिती केली. भगवान शंकर मुख्य देवता असलेल्या ‘पंचायतन’ शैलीतील या मंदिर संकुलात नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पादुका शिवलिंगाखाली जतन केल्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. खगोलशास्त्रीय अचूकतेमुळे वर्षातून दोनदा सूर्यकिरणे थेट गर्भगृहात पोहोचणारे काळ्या पाषाणातील हे मंदिर आजही पेशवेकालीन संपन्नतेची साक्ष देते.
पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचा विचार करताना ‘पर्वती’ या नावाचा उल्लेख करणे अनिवार्य ठरते. शहराच्या अनेक भागांतून स्पष्टपणे दिसणारी ही टेकडी ऐतिहासिक काळात महत्त्वाचे निरीक्षण केंद्र होती.
पायथ्याला असलेल्या नौबतखान्यापासून टेकडीवर जाण्यासाठी १०३ पाषाणी पायऱ्यांचा अत्यंत कौशल्याने तयार केलेला मार्ग आहे. रुंद आणि कमी उंचीच्या या पायऱ्यांवरून पेशवेकाळात पेशवे व त्यांचे पाहुणे हत्तीवरून सहजपणे ये-जा करत असत. हत्तींना त्यावरून सहजपणे चढता-उतरता यावे या उद्देशानेच या पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती.
ऐतिहासिक नोंदींनुसार पर्वती टेकडीचा इतिहास सतराव्या शतकापासून सुरू होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या टेकडीची व्यवस्था महादभट पुरंदरे यांच्याकडे होती, मात्र या परिसराचा विकास अठराव्या शतकात श्रीमंत नानासाहेब पेशवे ऊर्फ बाळाजी बाजीराव यांच्या काळात झाला. तावरे पाटलांच्या मालकीच्या या टेकडीवर त्यांच्या कुलदैवत असलेल्या पर्वताई देवीचे लहानसे मंदिर होते. पेशव्यांनी हा परिसर विकसित करण्यासाठी तावरे पाटलांकडून ही जमीन रीतसर विकत घेतली आणि पर्वताई देवीच्या नावावरूनच पुढे या टेकडीला ‘पर्वती’ असे नाव प्राप्त झाले.
या टेकडीवरील देवदेवेश्वर मंदिराचे बांधकाम २३ एप्रिल १७४९ रोजी, म्हणजेच शके १६७१ मधील वैशाख शुद्ध पंचमीला पूर्ण झाले. या मंदिराची प्रतिष्ठापना श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केली. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांच्या उजव्या पायाला झालेल्या गंभीर व्याधीवर अनेक औषधोपचार करूनही सुधारणा होत नव्हती. त्यानंतर पर्वतीवर असलेल्या देवीच्या मंदिरातील अंगारा लावल्यास रोग बरे होतात, अशी माहिती त्यांना मिळाली. काशीबाईंनी तिथे जाऊन देवीची भक्तिभावाने आराधना केली आणि आपला पाय बरा झाल्यास या जागेवर भव्य मंदिर उभारण्याचा नवस बोलल्या. काही दिवसांनी त्यांची व्याधी पूर्णपणे बरी झाली आणि त्यांच्या नवसाची पूर्ती करण्यासाठी नानासाहेबांनी या देवदेवेश्वर मंदिराची निर्मिती केली.
छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिरासाठी ७३ किलो वजनाची शंकराची, १४ किलोची पार्वतीची आणि ८ किलो वजनाची गणपतीची अशा शुद्ध सोन्याच्या तीन मूर्ती दिल्या होत्या. पुण्यावर परकीय आक्रमणाची चाहूल लागताच या सुवर्णमूर्ती सुरक्षिततेसाठी सिंहगडावर नेल्या जात असत. १० नोव्हेंबर १८१७ रोजी दुसऱ्या बाजीरावांनी पांडुरंग कृष्ण बापट यांच्यासोबत या मूर्ती सिंहगडावर पाठविल्या होत्या. २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहगड ताब्यात घेतल्यानंतर येथील नागरिकांच्या श्रद्धेचा आदर करून या मूर्ती पुन्हा पर्वतीवर पाठविल्या, तथापि १५ जुलै १९३२ रोजी या अमूल्य मूर्ती चोरीस गेल्या.
सध्या या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेल्या पितळेच्या आणि चांदीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे छत्रपती शाहू महाराजांवर नितांत प्रेम आणि आदर होता. शाहू महाराज जेव्हा कैलासवासी झाले, तेव्हा नानासाहेबांनी त्यांच्या खडावा म्हणजेच पादुका मागवून घेतल्या होत्या. देवदेवेश्वर मंदिरातील शिवलिंगाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी नानासाहेबांनी या पादुका शिवलिंगाच्या खाली जतन करून त्यावर पिंडीची स्थापना केली.
पर्वती टेकडीने मराठा साम्राज्यातील अनेक निर्णायक आणि हृदयद्रावक क्षण पाहिले आहेत. १७६१च्या पानिपतच्या युद्धात झालेल्या पराभवाचा धक्का नानासाहेब पेशवे सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी आपला अंतकाळ पर्वतीवरील होमशाळेत व्यतीत करून तिथेच प्राण सोडले.
त्यांची समाधी आजही तिथे अस्तित्वात असून दक्षिण आणि पश्चिमेकडील वाडे हे एकेकाळी श्रीमंत पेशव्यांचे वास्तव्याचे ठिकाण होते. शहरातील नानासाहेब पेशवे चौकासमोरून टेकडीवर जाणाऱ्या पायरीमार्गाच्या प्रारंभी अलीकडील काळात बांधलेली स्वागतकमान आहे. काही पायऱ्या चढून पुढे आल्यावर डाव्या बाजूला लहानशा देवळीत शिवपिंडी आहे. पायऱ्या चढल्यावर विटांनी बांधलेले बुरुज व प्रवेशद्वार नजरेस पडतात.
पर्वतीवरील मुख्य मंदिर संकुल पंचायतन शैलीत बांधलेले आहे. यामध्ये मध्यभागी मुख्य मंदिर आणि चार कोपऱ्यांवर चार उपमंदिरे आहेत. भगवान शंकराला समर्पित असलेले देवदेवेश्वर हे मुख्य मंदिर संकुलाच्या मध्यभागी स्थित आहे. मंदिराच्या एका बाजूला सुमारे चार फूट उंच अधिष्ठानावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गरुड व हनुमानाची चित्रे असलेल्या गर्भगृहात वज्रपीठावर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा अर्धपुतळा व समाधी स्मारक आहे. येथेच पेशवे संग्रहालयाची वास्तू आहे. त्यात ऐतिहासिक नाणी, शस्त्रे आणि कागदपत्रे यांसह इतर वस्तू जतन केलेल्या आहेत.
पुढे विष्णू नारायण मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशा स्वरूपाच्या या मंदिरात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल व श्रीदत्तात्रेय यांची चित्रे आहेत. येथील ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहातील वज्रपीठावरील नक्षीदार मखरात चतुर्भुज विष्णूची मूर्ती आहे. द्रविडी शैलीतील उरुश्रृंगी शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आणि कळस आहेत. त्यापुढे स्वतंत्र तटबंदी असलेले कार्तिकेय स्वामींचे मंदिर आहे. नानासाहेब पेशव्यांचे बंधू रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा यांनी बांधलेल्या या मंदिरातील गर्भगृहात वज्रपीठावर कार्तिकेय स्वामींची मूर्ती आहे.
पुढे देवदेवेश्वर म्हणजेच महादेवाचे मुख्य मंदिर आहे. या मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. भैरव द्वारपाल शिल्पे असलेल्या या प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. मंदिरासमोर प्रशस्त प्रांगणात नंदीमंडप असून त्यातील काळ्या पाषाणातील सुबक नंदीमूर्तीवर उत्तम कलाकुसर केलेली आहे. उत्सवप्रसंगी या नंदीवर चांदीचे कवच चढविले जाते. प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. सभामंडप आणि अंतराळ अशा स्वरूपाच्या या मंदिरात महिरप कमानीने जोडलेले पाच स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या नक्षीदार प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. नेपाळमधील गंडकी नदीतील पाषाणातून तयार केलेल्या येथील शिवपिंडीच्या बाणावर अक्रोडासारख्या नैसर्गिक रेषा आहेत. २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या विषुववृत्त दिनी उगवत्या सूर्याची किरणे या शिवपिंडीवर पडतात. शिवपिंडीच्या मागील भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात पार्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावरील तीन थरांच्या शिखराच्या पहिल्या थराच्या चारही कोपऱ्यांवर चार मिनारसदृश स्तंभ आणि त्यांच्यासह मुख्य शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत. या मंदिरासमोर प्रांगणात सूर्यनारायण, गणपती, पर्वताई व भवानी देवी मंदिर तसेच जनार्दन विष्णू मंदिर ही मंदिरे आहेत. या मंदिरांची रचना आणि कळस यांच्यातून राजपूत, मुघल, गुजराती आणि महाराष्ट्रीय वास्तुशैलीचा सुंदर संगम दिसून होतो.
पर्वतीवरील उत्सव मराठा संस्कृती आणि पुण्याच्या परंपरेचे दर्शन घडवतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेय मंदिरात महिलांना दर्शनासाठी २४ तासांची विशेष सवलत दिली जाते आणि संपूर्ण टेकडीवर ‘देवदिवाळी’ साजरी केली जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते तसेच श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवपिंडीवर रुद्राभिषेक केला जातो. पेशवे काळात पर्वतीच्या पायथ्याशी भारतभरातून येणाऱ्या विद्वानांची परीक्षा घेऊन त्यांना दक्षिणा देण्याची ‘रमणा’ नावाची अनोखी परंपरा सुरू होती. १७५२ च्या सुमारास ही दक्षिणा वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती असे ऐतिहासिक नोंदींवरून स्पष्ट होते.