‘विदर्भाची काशी’ अशी ख्याती असलेल्या देवळी तालुक्यातील कोटेश्वर महादेवाचे मंदिर विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. हे देवस्थान सुमारे ४००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, असा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर निसर्गसमृद्ध प्रदेशात ज्या टेकडीवर हे मंदिर आहे, ती भस्माची टेकडी असल्याचे सांगितले जाते. केवळ या मंदिराभोवती वर्धा नदी उत्तर वाहिनी होऊन मंदिराला प्रदक्षिणा घालते व पुन्हा पूर्व–पश्चिम वाहते हे येथील आश्चर्य व वैशिष्ट्य मानले जाते.
कोटेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की ऋषी विश्वामित्र या नदीकिनारी भ्रमण करीत असताना त्यांना श्रीरामांचे गुरू वशिष्ठ ऋषी यांचे शतपुत्र येथील अरण्यात निद्रिस्त अवस्थेत दिसले. हे पाहून विश्वामित्रांचा क्रोध अनावर झाला व त्यांनी निद्रिस्त असलेल्या शतपुत्रांवर आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडून भस्म केले. ध्यानधारणेत मग्न असलेल्या वशिष्ठ ऋषींना जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी येथे कोटीयज्ञ केले व या नदीचा प्रवाह उत्तर वाहिनी व्हावा म्हणून तिला प्रसन्न करून घेतले. वशिष्ठांच्या विनंतीवरून ही नदी येथे उत्तरवाहिनी झाली व त्या पवित्र पाण्याने त्यांनी आपल्या पुत्राला पुन्हा जिवंत केले. कार्यसिद्धीनंतर त्यांनी या भस्माच्या टेकडीवरच शिवलिंगाची स्थापना केली. तेच हे आजचे कोटेश्वर मंदिरात असलेले शिवलिंग आहे, असे म्हटले जाते. या परिसरात खोदकाम केले असता येथे मातीऐवजी तुपाचा सुगंध असलेले यज्ञाचे भस्म सापडते.
वर्धा–यवतमाळ मार्गावर वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिर परिसरात श्रीरामांचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. या मंदिराची स्थापत्यशैली हेमाडपंती रचनेची असून बांधकामात लांब व मोठ्या आकाराच्या दगडी चिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. पुराच्या पाण्याने मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणून मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीच्या सर्व बाजूंनी दगडी संरक्षक भिंत घालण्यात आली आहे. मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण असून ५ ते ६ फूट उंच चौथऱ्यावर मंदिराचे बांधकाम आहे. प्रांगणातून १२ ते १३ पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार व त्याभोवती असलेली द्वारपट्टी पितळेची असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस उभा नंदी, तर त्याच्याही वर छतावर असलेल्या देवळीमध्ये महादेवाची मूर्ती आहे.
प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर प्राचीन व मूळ मंदिर दिसते. अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. अंतराळात पितळी नंदी आहे. येथील गर्भगृह अंतराळापासून ३ फूट खोलवर असून त्यात असलेल्या प्राचीन शिवपिंडीला पितळी पत्र्याने मढविलेले आहे. येथील गाभाऱ्यामध्ये अनेकदा अचानक गंगा अवतीर्ण होऊन शिवपिंडीवर दीड ते दोन फूट पाणी येते व काही वेळाने ते ओसरून जाते.
वर्धा नदी ही वर्धा व यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे. कोटेश्वर मंदिराच्या पलीकडील तीरावर खटेश्वर नावाचे देवस्थान आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात येते. या दोन्ही मंदिरांना जोडण्यासाठी शासनाच्या निधीतून नदीवर झुलता पूल बनविण्याचे काम सुरू आहे. हा विदर्भातील अशा प्रकारचा पहिलाच पूल होणार असून तो येथील आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीपासून येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर महाशिवरात्री व फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला दहीहांडी, गोपालकाला, महाप्रसाद अशा कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता होते. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवादरम्यान १,००,००० पेक्षा अधिक भाविक कोटेश्वर महादेवाच्या दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. याशिवाय श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे दर्शनाला येत असतात.
मंदिराच्या परिसरात अनेक साधू–संतांची समाधी स्थाने आहेत. वर्धा नदीच्या पूर्वेकडील बाजूस श्रीरामांचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की वर्धा नदी कधीही कोरडी पडत नाही. उन्हाळ्यातसुद्धा नदीला भरपूर पाणी असते. विशेष म्हणजे बेलाचे पान नदीत टाकले तर ते पान या नदीत तरंगत नाही, ते थेट बुडते. उत्तर वाहिनी असल्यामुळे या नदीला विशेष महत्त्व आहे. कोटेश्वर येथे रक्षा विसर्जन केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे दररोज रक्षा विसर्जनासाठी अनेक लोक येत असतात.
देवळी तालुक्यातील या प्राचीन देवस्थानावर भाविकांची असलेली श्रद्धा, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या व निसर्गसमृद्ध परिसरामुळे पर्यटकांचीही या स्थानाला असणारी पसंती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब‘ दर्जा देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने या मंदिर परिसराच्या विकासासाठी ९,००,००,०००/- रुपयांचा (नऊ कोटी) निधी दिला आहे. इतर पर्यटनस्थळांप्रमाणे कोटेश्वर मंदिर व या परिसराचाही विकास होत आहे.