हनुमान मंदिर

मुचेपार (बोटेझरी), ता. भिवापूर, जि. नागपूर

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील राखीव वन क्षेत्रात असलेले मुचेपार येथील प्राचीन हनुमान मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात येथे दर शनिवारी सोमवारी भरणाऱ्या यात्रेला १५० वर्षांची परंपरा असून या यात्रा कालावधीत येथे लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. हा हनुमान नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिरात जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून किमी अंतर हे जंगलातील मार्गाने पार करावे लागते. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाशेजारी असलेल्या या परिसरात सर्वत्र घनदाट जंगल आहे. या मार्गाला लागून बोटेझरी तलाव असून तेथून पुढे हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. हे मंदिर ५०० वर्षांपूर्वीचे असून समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात ११ मारुतींच्या देवस्थानची स्थापना केली होती, त्यावेळचे हे देवस्थान असल्याचा दाखला येथील वरिष्ठ नागरिकांकडून देण्यात येतो. हनुमान मंदिराचे बांधकाम साधेसे असले तरी सभामंडप प्रशस्त आहे. भाविकांच्या सोयीसाठी सभामंडपात दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सभामंडपाच्या मध्यभागी गर्भगृह असून तेथे हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. सुमारे फूट उंचीच्या अखंड दगडात असलेल्या या मूर्तीला मुकुट, चांदीचे डोळे चांदीचा टिळा लावून सजविण्यात येते. चौकोनी आकाराच्या या मंदिराच्या गर्भगृहावर कळस आहे. मंदिराच्या आवारात ऋण मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर, जिंदामाता मंदिर तसेच गणेशाचे स्थान आहे. मंदिरापासून जवळच वनविभागाकडून सुमारे ५० फूट उंचीचा टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. वन्यप्राण्यांपासून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी येथे वनरक्षकांकडून कायम पहारा देण्यात येतो. याशिवाय मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी आसने, जेवण बनविण्यासाठी सुविधा करण्यात आल्या आहेत

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येथे मोठा उत्सव होतो. तो साधारणतः सव्वा महिना चालतो. या कालावधीत दर शनिवारी सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची हनुमंताच्या दर्शनासाठी रीघ लागलेली असते. यावेळी हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. त्यामध्ये विदर्भासह परराज्यांतील भाविकांचाही मोठा सहभाग असतो. येथे नवस फेडण्याची एक पद्धत आहे. ज्याच्या नावाने नवस फेडला जातो, त्याच्या वजनाएवढे गूळ, साखर किंवा पेढे यांची तुला केली जाते. फार पूर्वीपासून या यात्रेसाठी परिसरातील नागरिक आपल्या कुटुंबासह जेवण बनविण्याच्या साहित्यासह बैलगाड्यांनी येथे येतात. येथे दिवसभर थांबून येथेच जेवण बनवून हनुमानाला नैवेद्य दाखवून ते ग्रहण करण्याची प्रथा आहे. आजही ती परंपरा कायम असून यात्रा कालावधीत शेकडो बैलगाड्यांमधून अनेक कुटुंबे येथे येतात. बैलगाड्यांसोबतच आता खासगी वाहनेही मोठ्या प्रमाणात येथे येतात. वनखात्याच्या नियमानुसार येथे सकाळी ते सायंकाळी पर्यंतच थांबण्याची मुभा आहे.

यात्रा कालावधीत दररोज काकड आरती, भजन, रामधून, गीता भागवत पुराण आदी पारायणे होतात. गोपालकाला महाप्रसादाने यात्रेचा समारोप होतो. उमरेड ते बोटेझरी येथे येण्यासाठी एसटी बसची सुविधा असली तरी बोटेझरीपासून मंदिरापर्यंत येण्यासाठी बैलगाडी वा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. जंगलव्याप्त परिसरातील या देवस्थानावर असलेली भाविकांची श्रद्धा, तसेच भाविक पर्यटकांची वाढती संख्या यामुळे या स्थानाला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला आहे

उपयुक्त माहिती:

  • भिवापूरपासून २७ किमी, तर नागपूरपासून ५८ किमी मार्गावर
  • उमरेड ते बोटेझरी एसटी सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने सकाळी ते सायंकाळी या दरम्यान मंदिर परिसरात जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home