यादव काळापासून प्राचीन काळातील राज्यकर्ते हे शक्ती म्हणजेच देवीचे उपासक होते. त्यांनी आपल्या राज्यांमध्ये शक्तीच्या रूपात अनेक देवी–देवतांची मंदिरे बांधली. त्यापैकीच नागपूर शहरापासून काही अंतरावर असलेले पारडी येथील भवानी मातेचे मंदिर हे विदर्भातील प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. पारडी शहराची ग्रामदेवता असलेली ही भवानी माता विदर्भातील अनेक घराण्यांची कुलदेवता व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, यादव काळातील ही मूर्ती असून या मंदिराचा जीर्णोद्धार नागपूरच्या भोसले राजवटीत झाला आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की आज जेथे मंदिर आहे तेथे पूर्वी आंब्याची बाग होती. या बागेत कडुनिंबाच्या झाडाजवळ जमिनीतून काहीतरी वर येत असल्याचे येथील कामगारांनी पाहिले. त्याच रात्री गोंदिया येथील देवीचे निस्सीम भक्त मुन्ना महाराज यांना देवीने स्वप्नदृष्टांत देऊन मी पारडी येथे आहे, असे सांगितले. मुन्ना महाराज गोंदियाहून स्वप्नदृष्टांताप्रमाणे शोध घेत देवीच्या स्थानावर पोचले. त्यांनी देवीने दिलेला दृष्टांत आणि जमिनीतून वर आलेल्या मूर्तीबाबत ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी देवीची मूर्ती जमिनीतून काढण्यासाठी खोदकाम सुरू केले. त्यावेळी कुदळीचा घाव मूर्तीला लागला आणि त्या दगडाच्या मूर्तीतून रक्त वाहू लागले. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. देवीने पुन्हा मुन्ना महाराजांच्या स्वप्नात सांगितले की मी यापेक्षा जमिनीतून वर येणार नाही. त्यामुळे माझ्या मुखाचीच पूजा करावी. देवीच्या सांगण्यानुसार ग्रामस्थांनी त्याच जागेवर देवीची प्राणप्रतिष्ठापना करून छोटेसे मंदिर बांधले.
नागपूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या पारडी या शहरवजा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी भवानी मातेचे भव्य मंदिर आहे. दर्शन मंडप, सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शन मंडपाजवळ एका संगमरवरी चौथऱ्यावर सुमारे ४० फूट उंचीचा वैशिष्ट्यपूर्ण ध्वज आहे. सभामंडपात महाराष्ट्रातील थोर संतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. सभामंडप भव्य असून सभामंडपातच असलेल्या संगमरवरी गर्भगृहातील सुंदर मखरात भवानी माता विराजमान आहे. या मूर्तीमध्ये केवळ भवानी मातेचा चेहरा दिसतो. देवीच्या कपाळावर मुकुट, कानात सोन्याचे झुमके, सरळ नाक आणि मोठे कपाळ व चेहऱ्यावर शांत भाव अशी ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती भोसले काळातील असल्याचे सांगितले जात असले तरी काही अभ्यासकांच्या मते, ती यादव काळातील आहे. मंदिराच्या दरवाजासमोर उजव्या बाजूला भैरवनाथांची मूर्ती आणि मध्यभागी हवन मंडप आहे.
एका आख्यायिकेनुसार, या मंदिरात सर्पदेवतांचा वास आहे. एकदा एका गायकाने मातेला गळ घातली होती की जोपर्यंत सर्पदेवाचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी माझे गायन थांबविणार नाही. त्या गायकाने संध्याकाळी गायन सुरू केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो गात राहिला. शेवटी मातेच्या कृपेने मध्यरात्री सर्पदेवाने त्याला दर्शन दिले. तेव्हापासून अनेक प्रसिद्ध गायकांनी येथे आपले गायन सादर केले आहे.
भवानी माता मंदिरात दरवर्षी आश्विन आणि चैत्र महिन्यात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आश्विन महिन्यातील नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो. घटस्थापनेने उत्सवाची सुरुवात होते. दररोज सुमारे ७५ ते ८० हजार भाविक मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात. अष्टमीच्या दिवशी यज्ञ–होम आणि नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी दीड लाखांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. दिवाळीनिमित्त देवीला ५६ भोग बनविले जातात व त्यांचा नैवेद्य दाखविला जातो. यावेळी भाविकांकडून येथे २५०० ते ३००० अखंड दीपज्योती प्रज्वलित केल्या जातात. नवसपूर्तीनिमित्त अशा दीपज्योती लावण्याची येथे प्रथा आहे. त्यासाठी माती अथवा रेतीवर गहू वा धान्य पेरले जाते. त्यावर मडकं ठेवलं जातं व त्यावर वात प्रज्वलित केली जाते. मंदिर प्रशासनातर्फे घटावर पाणी व मडक्यात तेल टाकून या ज्योती नऊ दिवस अखंड प्रज्वलित राहतील याची काळजी घेतली जाते. त्यासाठी दररोज या मडक्यामध्ये तेल टाकले जाते. या अखंड मनोकामना ज्योतीसाठी मंदिरात आगाऊ नोंदणी करावी लागते.
भाविकांसाठी येथे धर्मशाळा व भक्त निवास, सत्संगसाठी सभागृह आदी सुविधा उपलब्ध आहेत. भवानी माता मंदिर सेवा समितीतर्फे येथील नागरिकांसाठी भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे. यामध्ये ११० खाटांची व्यवस्था आहे. येथे नाममात्र शुल्कात इसीजी, एक्स–रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा आदी सुविधा पुरविल्या जातात. येथे दररोज सुमारे २०० ते २५० रुग्णांवर उपचार केले जातात. येथे ३ रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असतात. याशिवाय पारडीपासून १० किमी अंतरावर दिघोरी (महालगाव) येथे भवानी गो रक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये सुमारे २५० ते ३०० गायींची काळजी घेतली जाते.