काटोल शहराला धार्मिक, पौराणिक तसेच ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. प्राचीन काळात काटोल हे कुंतलापूर या नावाने परिचित होते. काटोल येथील चंडिका माता मंदिर पांडवकालीन असून चंद्रहास राजाने ते बांधले, अशी पुराणांत नोंद आहे. हे मंदिर विदर्भातील अनेक भाविकांचे भक्ती आणि शक्तीचे स्थान आहे. चंडिका देवी मंदिरात साजरा होणारा नवरात्रोत्सव प्रसिद्ध असून येथील देवीची आरास वैशिष्ट्यपूर्ण असते. ही आरास पाहण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येथे येतात.
प्राचीन ग्रंथांमधील उल्लेखांनुसार, पूर्वीच्या काळी शक्तिशाली राजे आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी अश्वमेथ यज्ञ करून त्या यज्ञाचा घोडा इतर राज्यांमध्ये फिरवत असत. ज्या राज्यांतून हा घोडा दौडत जाईल ते ते राज्य यज्ञ करणाऱ्या राजाच्या स्वाधीन होई. जर कोणी हा घोडा अडवला तर त्या राजाला युद्ध करावे लागे. त्याचप्रमाणे कौरवांवर मिळालेल्या विजयानंतर संपूर्ण भारतावर आपला ताबा असावा म्हणून पांडवांनी अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरविले. त्यानुसार पांडवांचा अश्वमेध यज्ञाचा घोडा अनेक राज्ये पादाक्रांत करून कुंतलापूर नगरीत शिरतो. त्यावेळी कुंतलापूरमध्ये चंद्रहास राजा राज्य करत होता. त्याच्या आज्ञेवरून सैनिकांनी हा घोडा अडविला. त्याचवेळी घोड्याचे रक्षण करणारी पांडवसेना कुंतलापूर नगराजवळ पोचली. या सेनेचे नेतृत्व अर्जुनाकडे होते व त्याच्यासोबत स्वतः श्रीकृष्ण होते.
अर्जुनाने अश्वमेध यज्ञाचा घोडा अडविणाऱ्या चंद्रहास राजाला युद्धाचे आव्हान दिले; परंतु राजाने घोडा अडविला होता तो युद्ध करण्यासाठी नाही तर त्याला श्रीकृष्णांचे दर्शन घ्यायचे होते. त्याने सन्मानाने श्रीकृष्ण व अर्जुनाला आपल्या दरबारात आणून त्यांचे आदरातिथ्य केले. श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन अश्वमेध यज्ञाच्या सैन्यात सामील होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. श्रीकृष्णांकडून होकार येताच चंद्रहास राजा आपले राज्य मुलगा मकरध्वज याच्या स्वाधीन करून अर्जुन आणि श्रीकृष्णांसोबत निघून गेला. तत्पूर्वी त्याने आपले आराध्य दैवत चंडिका मातेचे दर्शन घेतले. महाभारतात उल्लेख असलेले कुंतलापूर हे नेमके कुठे आहे, याबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नसले तरी चंद्रहास राजाचे कुंतलापूर म्हणजे आजचे काटोल शहर व चंद्रहास राजाने बांधलेले चंडिका मंदिर म्हणजे काटोल शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले चंडिका माता मंदिर होय, असा अनेक अभ्यासकांचा दावा आहे.
काटोल शहराच्या मध्यभागी स्थापित असलेले चंडिका मंदिर हे काटोलवासीयांचे आराध्य दैवत आहे. सुमारे ८०० ते ८५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून ते यादव काळातील असावे, असे सांगितले जाते. वेळोवेळी मंदिराची डागडुजी झाली असली तरी अजूनही प्राचीनत्वाच्या खुणा या मंदिरात जागोजागी पाहायला मिळतात. मुख्य शिखराचा वरील भाग व मंदिराच्या काही भिंती या नव्याने बांधण्यात आल्याचे जाणवते. या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे.
मंदिर उंच चौथऱ्यावर स्थापित असून त्याच्या बाह्य भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यामध्ये गजमालिका (एका रांगेत हत्तींची विविध शिल्पे) व मैथुन शिल्पांचाही समावेश आहे. ७ ते ८ पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कमी उंचीच्या दीपमाळा आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी ४ दगडी स्तंभ असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. या स्तंभांच्या मध्यभागी हवनकुंड आहे. ४ स्तंभांच्या वर गोलाकार छताची रचना असून छताच्या टोकाला लहानशी खिडकी आहे. या हवनकुंडातील धूर बाहेर पडावे व मंदिरातील हवा खेळती राहावी, यासाठी ही रचना करण्यात आली असावी. मंदिरामधील छताची अशी रचना ही दुर्मिळ मानली जाते. अंतराळाच्या शेजारी भिंतीजवळ गणेशाची प्राचीन मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या द्वारावर नक्षीकाम असून ललाटबिंबावर गणेश प्रतिमा तर दोन्ही बाजूला देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत. गर्भगृहात काटोल शहराचे आराध्य दैवत देवी चंडिका विराजमान आहे. देवीच्या चारही हातात शस्त्रे असून पायाजवळ असलेल्या असुराचा वध करणारी अशी ही मूर्ती आहे. साधारणतः ३.५ फूट उंचीची ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते. विदर्भातील मोठ्या नवरात्रोत्सवांमध्ये येथील उत्सवाचा समावेश होतो. नागपूरसह विदर्भातील हजारो भाविक यावेळी देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्रीचे ९ दिवस येथे मोठी यात्रा भरते.