गणोजा देवी (महालक्ष्मी) मंदिर
गणोजा (देवी), ता. भातकुली, जि. अमरावती
विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधील भातकुली तालुक्यात पेढी नदीच्या तीरावर गणोजा देवी मंदिर आहे. हे मंदिर करवीर निवासिनी कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मीचे प्रतिरूप मानले जाते. भक्ताच्या अनन्य भक्तीमुळे प्रत्यक्ष भगवंताला भक्ताच्या नावाने ओळखले जाण्याचे हे एक उदाहरण मानले जाते. गणोजी नावाच्या भक्ताच्या भक्तीमुळे या परिसरास व अधिष्ठात्री देवतेला गणोजा हे नाव पडले. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी व संकटाच्या प्रसंगी हाकेला धावून येणारी कुलस्वामिनी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला भरणारा वार्षिक जत्रोत्सव आणि शारदीय नवरात्रोत्सव हे येथील मुख्य धार्मिक उत्सव आहेत.
पेढी नदीचे खोरे हे ऐतिहासिक व पौराणिक काळापासून सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र राहिलेले आहे. महाभारतकालीन कौंडण्यपूरहून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केल्यानंतर ते याच दाढी-पेढी मार्गाने पुढे गेले होते, असा संदर्भ या भागात दिला जातो. इ.स. १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अमरावती जिल्हा गॅझेटिअरमधील नोंदीनुसार तत्कालीन अमरावती तहसिलातील गणोजा हे सुमारे चौदाशे लोकवस्तीचे खेडे होते. येथे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला देवीच्या सन्मानार्थ मोठी यात्रा भरते. या यात्रेत अनेक भाविक कौटुंबिक कुलाचार पार पाडण्यासाठी येतात. ते मंदिरात तीन रात्री मुक्काम करून उपासना करतात. विसाव्या शतकात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. इ.स. १९३५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी येथे महायज्ञ आयोजित करून विश्वशांतीचे आवाहन केले होते.
गणोजा येथील महालक्ष्मीच्या स्थापनेमागे सुमारे पाचशे वर्षांची परंपरा आणि आख्यायिका सांगितली जाते. गावातील गणोजी ऊर्फ गणू भटजी नावाचे गृहस्थ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे परमभक्त होते. ते दरवर्षी नित्यनेमाने पायी चालत कोल्हापूरला जात. ते नवरात्रात देवीचे दर्शन घेत असत. वृद्धापकाळात शारीरिक अशक्ततेमुळे पायी चालणे अशक्य झाल्यावर त्यांनी अत्यंत काकुळतीने देवीची प्रार्थना केली. त्यांनी देवीला आपल्या गावी येण्याची विनंती केली. भक्ताच्या हाकेला ओ देऊन देवीने गणोजींच्या मागोमाग चालण्याचे मान्य केले. मात्र गावापर्यंत पोहोचेपर्यंत मागे वळून पाहायचे नाही अशी अट घातली. प्रवासादरम्यान पेढी नदीच्या पैलतीरावर येताच गणोजींचे मन साशंक झाले. देवी खरोखर मागे येत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी मागे वळून पाहिले. अटीचा भंग होताच देवी त्या ठिकाणी अंतर्धान पावली. तिने ‘गणू जा’ असा आदेश दिला. या शब्दावरून गावाला गणूजा म्हणजेच गणोजा हे नाव पडल्याची जनमानसात धारणा आहे.
मंदिराच्या निर्मितीचा कालखंड सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा म्हणजेच सोळाव्या शतकातील मानला जातो.
देवी अंतर्धान पावल्यानंतर पुढे काही काळाने स्थानिक गावकऱ्यांना नदीपात्रातील गाळ उपसताना काळ्या पाषाणातील ही चतुर्भुज मूर्ती सापडली. दुसऱ्या एका स्थानिक श्रद्धेनुसार गावाच्या पाटलांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि नदीपात्रात उत्खनन केले असता ही मूर्ती प्रकट झाली. त्यानंतर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या तिथीवर शेकडो भाविकांच्या साक्षीने मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूळचे दगडी बांधकाम काळाच्या ओघात जीर्ण झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिर विश्वस्तांनी लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार घडवून आणला.
मंदिराभोवती दुमजली भक्तनिवास आहे. दुमजली प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन नक्षीदार स्तंभ व हत्तींची उठावशिल्पे आहेत. स्तंभदंडांवर द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी, हस्त आणि हस्तांवर तोललेला सज्जा आहे. त्यावर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले दिसते. प्रवेशद्वारातून आत येण्यासाठी बाहेर तीन आणि आत तीन अशा पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टीची नक्षी व ललाटबिंबावर गणेशाची प्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे.
आत प्रवेश करताच फरसबंद प्रांगण लागते. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंना भक्तनिवासाच्या खोल्या आणि उजव्या बाजूला तुळशीवृंदावन आहे. मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या पद्धतीचा आहे. बाह्य बाजूंनी महिरपी कमानींनी जोडलेले आठ कोरीव स्तंभ आहेत. सभामंडपाच्या छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. वितानावर चक्राकार नक्षीकाम आहे.
सभामंडपाच्या समोर एका सरळ रेषेत तीन गर्भगृहे आहेत. उजव्या बाजूचे मुख्य गर्भगृह श्रीमहालक्ष्मी देवीचे आहे. या गर्भगृहाच्या द्वारशाखा व ललाटपट्टीवर वेलबुट्टीचे कोरीव काम आणि ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना चौकोनी स्तंभ व त्यावर त्रिकोणी कमान आहे. कमानीतील देवकोष्टकामध्ये गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाहेर उजव्या बाजूस लाकडी मखरात देवीची पितळी उत्सवमूर्ती आहे. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर चांदीच्या मखरामध्ये अखंड काळ्या पाषाणातील सव्वादोन फूट उंचीची महालक्ष्मीची मूर्ती आहे. देवी सिंहावर आरूढ चतुर्भुज स्वरूपात आहे.
तिच्या चार हातांमध्ये त्रिशूळ, ढाल, गदा आणि कमळ आहेत. देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आणि पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे. महालक्ष्मीच्या डाव्या बाजूला तिन्ही बाजूंनी लोखंडी कठडा असलेले दुसरे गर्भगृह आहे. त्यात मध्यभागी शिवलिंग आणि मागील भिंतीलगत वज्रपीठावर विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे. त्याच्या डाव्या बाजूला तिसरे गर्भगृह आहे. तेथील संगमरवरी मखरात त्रिमुखी दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या छतावर तिन्ही गर्भगृहांवर स्वतंत्र शिखरे आहेत. महालक्ष्मीच्या गर्भगृहावर पाच थरांचे चौकोनी नागर पद्धतीचे शिखर आहे. त्याच्या प्रत्येक थरात ३६ याप्रमाणे एकूण १८० देवकोष्टके आहेत. या देवकोष्टकांमध्ये विविध देवीदेवता व संतांची शिल्पे कोरलेली आहेत. शिखराच्या माथ्यावर पशुशिल्पे, आमलक आणि त्यावर कळस आहे. दत्तात्रेयांच्या गर्भगृहावर तीन थरांचे शिखर आहे. त्यात ६० देवकोष्टके, आमलक व कळस आहे. मधल्या शिव-विष्णू गर्भगृहावर चौकोनी पिरॅमिड आकाराचे शिखर व त्यावर आमलक-कळस आहे.
दररोज पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९:३० वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. गणोजा येथील महालक्ष्मीचे एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसातील तीन प्रहरांत देवीची तीन वेगवेगळ्या रूपांत पूजा बांधली जाते. सकाळी बालस्वरूपामध्ये, दुपारी तरुणी स्वरूपामध्ये आणि सायंकाळी वृद्ध स्वरूपामध्ये देवीचा शृंगार व वस्त्रालंकार केले जातात. मंदिरात रोज चार मुख्य आरत्या होतात.
पहाटे ६ वाजता काकड आरती आणि नित्य महापूजा होते. दुपारी १२ वाजता माध्यान्ह भोग आरती अर्पण केली जाते. सायंकाळी ७:३० वाजता धूपारतीसह संध्या आरती होते आणि रात्री ९ वाजता शयन आरती पार पडते.
मार्गशीर्ष पौर्णिमेला भरणारा वार्षिक जत्रोत्सव हा येथील सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या सात दिवसांत अखंड वीणावादन, काकड आरती, ग्रंथपारायण, भजन, कीर्तन, भारूड, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या आणि ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत देवीची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते. यावेळी विदर्भ व लगतच्या भागातून आलेले हजारो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात. आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रोत्सवात नऊ दिवस घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन आणि ललितापंचमी व दुर्गाष्टमीला विशेष होमहवन केले जाते. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी पहाटे ६ वाजता परिसरातील अनेक गावांतील भाविक एकत्र येऊन सामूहिक महाआरती करतात. दसऱ्याला विजयादशमीनिमित्त देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी वाजतगाजत निघते. याखेरीज चैत्र पाडवा, हनुमान जयंती, महाशिवरात्र, कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
उपयुक्त माहिती
- भातकुली येथून ८ किमी अंतरावर
- अमरावती शहरापासून २७ किमी अंतरावर
- अमरावती व भातकुली येथून गणोजासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- मंदिर संस्थानच्या आवारात भाविकांसाठी भक्तनिवास व भोजनप्रसादाची सुविधा
- संपर्क : मंदिर कार्यालय ७७१९०७४७५०, ९५४५६०२५६१
