राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळ

गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा, जि. अमरावती

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले मोझरी हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक क्रांतीचे आणि रचनात्मक ग्रामविकासाच्या कार्याचे केंद्र आहे. येथे विकसित झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महासमाधी स्थळ आणि गुरुकुंज आश्रम हे गुरुदेव सेवा मंडळाशी जोडलेले कार्यकर्ते, वारकरी परंपरेतील भाविक आणि देश-विदेशातील अनुयायांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. राष्ट्रसंतांनी कर्मकांडांपेक्षा मानवसेवा, विश्वबंधुत्व, अंधश्रद्धानिर्मूलन, सर्वधर्मसमभाव आणि ग्रामसुधारणा यांना महत्त्व दिले. त्यांच्या या विचारांचे मूर्त स्वरूप संपूर्ण गुरुकुंज परिसरात अनुभवता येते. महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महासमाधी स्थळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम याला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

अमरावतीचा परिसर प्राचीन विदर्भाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवाहाचा भाग आहे. अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर हे वर्धा नदीकाठी वसलेले प्राचीन पुरातत्त्वीय स्थळ असून प्राचीन विदर्भाची राजधानी म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. ब्रिटिश काळात हा प्रदेश बेरारचा भाग होता. १ ऑक्टोबर १९०३ पासून बेरारचे प्रशासन मध्यप्रांतांच्या मुख्य आयुक्तांकडे सोपवण्यात आले आणि प्रशासकीयदृष्ट्या हा प्रदेश मध्यप्रांतांशी जोडला गेला. मोझरी हे पूर्वी स्थानिक शेतीवर आधारलेले लहान खेडे होते. उपलब्ध स्थानिक ऐतिहासिक नोंदींनुसार, १९३५ मध्ये ज्येष्ठ राजकीय नेते बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्या पुढाकाराने तुकडोजी महाराज मोझरी येथे आले. त्यावेळी गावाची लोकसंख्या जेमतेम दीड हजार होती. महाराजांच्या सामाजिक आणि रचनात्मक कार्यामुळे या परिसराचा पुढे विस्तार झाला. बाळासाहेब देसाई आणि आबासाहेब खेडकर यांच्या पुढाकारातून विशेष बाब म्हणून गुरुदेवनगरला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. त्या काळातील ग्रामविकासाच्या दृष्टीने हा एक वैशिष्ट्यपूर्ण निर्णय मानला जातो.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे बंडोजी इंगळे आणि मंजुळादेवी यांच्या पोटी झाला. त्यांचे बालपणीचे नाव माणिक होते. कौटुंबिक अडचणींमुळे बालपणी ते आईसमवेत वरखेड या मामाच्या गावी राहण्यास आले. तेथे त्यांची भेट संत आडकोजी महाराजांशी झाली. आडकोजी महाराजांनी माणिक यांच्यातील आध्यात्मिक ओढ ओळखून त्यांना शिष्यत्व दिले आणि ‘तुकड्या’ हे नाव दिले. पुढे ते तुकडोजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी यावली, चांदूर बाजार आणि वरखेड येथे इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले. बालपणापासूनच त्यांना ध्यान, चिंतन, योगसाधना, काव्यरचना आणि गायनाची आवड होती. खंजिरी, एकतारी आणि चिपळ्या या लोकवाद्यांच्या साथीने ते स्वतः रचलेली पदे गाऊ लागले.

१५ नोव्हेंबर १९२१ रोजी आडकोजी महाराज समाधिस्थ झाल्यानंतर तुकडोजी महाराजांनी दीर्घकाळ भ्रमंती आणि एकांत साधना केली. रामटेक, सालबर्डी आणि रामदिघी येथील जंगलांबरोबरच काशी, प्रयाग, हरिद्वार, पुष्कर आणि नेपाळमधील पशुपतिनाथ अशा विविध तीर्थक्षेत्रांचा त्यांनी प्रवास केला. या काळात त्यांनी विविध धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरांचा जवळून अभ्यास केला. या अनुभवांतून भक्ती आणि अध्यात्माचा उपयोग समाजप्रबोधनासाठी करण्याची त्यांची भूमिका अधिक दृढ झाली. त्यांनी जातिभेद, अस्पृश्यता, अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा आणि व्यसनांविरुद्ध जनजागृती केली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात त्यांच्या देशभक्तिपर भजनांनी ग्रामीण भागात स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली. या आंदोलनातील सहभागामुळे त्यांना अटकही झाली. त्यांच्या समग्र ग्रामविकासाच्या तत्त्वज्ञानाला पुढे ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून व्यापक स्वरूप मिळाले.

मोझरी येथे सुरुवातीला गवताची साधी कुटी उभारून भजन, ग्रामस्वच्छता आणि रुग्णसेवेचे कार्य सुरू झाले. ४ एप्रिल १९३५ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी ‘श्रीगुरुदेव धर्मसेवाश्रम’ची स्थापना करण्यात आली. पुढे याच कार्याचा विस्तार गुरुकुंज आश्रमाच्या रूपाने झाला आणि हे ठिकाण ग्रामविकास, समाजप्रबोधन आणि रचनात्मक राष्ट्रनिर्माणाचे प्रमुख कार्यकेंद्र बनले. तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. राष्ट्रपती भवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकल्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना आदराने ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले. त्यानंतर ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ हे संबोधन रूढ झाले.

आयुष्यभर लोकसेवा आणि समाजप्रबोधनाचे कार्य केल्यानंतर आश्विन वद्य पंचमी, शके १८९०, म्हणजेच ११ ऑक्टोबर १९६८ रोजी सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गुरुकुंज आश्रम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराजांच्या निर्देशानुसार त्या जागी पारंपरिक मंदिर उभारण्यात आले नाही. पुढे तेथे त्यांच्या जीवनकार्याचे प्रतीक असलेले ‘शांतिस्थान पंचवटी’ अर्थात महासमाधी स्थळ विकसित करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला राष्ट्रसंतांचे महासमाधी स्थळ तर दुसऱ्या बाजूला गुरुकुंज सेवाश्रम आहे. बाह्य तटबंदीने वेढलेल्या महासमाधी परिसरात प्रवेश केल्यानंतर आधुनिक स्थापत्यशैलीतील आयताकृती जलकुंड दिसते. त्यात स्वयंचलित कारंजे व समोरील दगडी कठड्याजवळ संगमरवरी समाधीस्तंभ उभारलेला आहे. या स्तंभावर वस्त्र घातलेले आहे व त्यामागे उंच स्मृतिस्तंभ आहे. समाधीजवळील निळा दिवा रस्त्याच्या पलीकडील प्रार्थना मंदिरातील रिकाम्या अधिष्ठानाच्या दिशेशी एका रेषेत ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे महासमाधीकडून प्रार्थना मंदिरातील अधिष्ठानाचे थेट दर्शन घडते. समाधी परिसराभोवती वृक्षराजी आणि बगीचा विकसित करण्यात आला आहे.

रस्त्याच्या विरुद्ध बाजूस आश्रमाचे तीन मजली मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या तळमजल्यावरील दोन्ही बाजूंना गोलाकार खांब आणि त्यावरील महिरपी कमानी दिसतात. आत पहारेकरी कक्ष आहेत. पहिल्या मजल्यावर लाकडी झडपांचे दरवाजे असलेला पारंपरिक नगारखाना आहे. त्याच्या छतावर चारही कोपऱ्यांजवळ स्तंभांचा खुला मंडप असून तेथे मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर दोन्ही बाजूंना नगारखान्याकडे जाणारे जिने आणि मधोमध आश्रमातील अंतर्गत रस्ता आहे. प्रवेशद्वाराजवळ डावीकडे प्रकाशन कार्यालय आहे. त्याच्या छतावर लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा आहे. उजवीकडे असलेल्या साहित्य भांडाराच्या छतावर महात्मा गांधींचा पुतळा आहे.

पुढे राष्ट्रसंतांचे निवासस्थान असलेली कौलारू छताची साधी कुटी आहे. कुटीतील माजघरात महाराजांची बैठक आणि भिंतीवर सद्गुरू आडकोजी महाराजांचे चित्र आहे. निजघरात महाराजांचे मोठे तैलचित्र ठेवण्यात आले आहे. कुटीलगत सेवाश्रम कार्यालय आहे. येथून पुढे स्वागत कमानीवर ‘सबके लिये खुला है! मंदिर यह हमारा!’ हे बोधवाक्य कोरलेले सर्वधर्म प्रार्थना मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणातील सुमारे तीन ते चार फूट रुंदीच्या जलमार्गावर आडव्या शिळा ठेवण्यात आल्या आहेत. त्याच्या परिसरात विविध वनस्पतींसह महादेव, मारुती, श्रीराम, महालक्ष्मी आणि दत्तात्रेय यांच्या पाषाणमूर्ती आहेत.

या जलमार्गापुढे ‘सर्वतीर्थ कुंड’ आहे. अंत्यविधी आणि अस्थिविसर्जनासाठी सामान्य माणसाला दूरवर जावे लागू नये, तसेच या विधींमुळे होणारा अनावश्यक आर्थिक भार कमी व्हावा, हा या संकल्पनेमागील प्रमुख विचार होता. उपलब्ध आश्रम नोंदींनुसार देशातील प्रमुख ३४ नद्यांचे जल येथे एकत्र आणण्यात आले होते. देशातील विविध नद्यांचे प्रतीकात्मक पावित्र्य एकाच स्थानी उपलब्ध करून देण्याची ही कल्पना होती. आश्रमपरंपरेतील नोंदीनुसार या कुंडाशी स्वामी सीतारामदास महाराजांचा संबंध सांगितला जातो. राष्ट्रसंतांच्या अस्थींचेही पुढे येथे विसर्जन करण्यात आले. सर्वधर्म प्रार्थना मंदिराच्या अंतर्भागात कोणतीही मानवनिर्मित देवमूर्ती नाही. मध्यभागी महाराजांचे रिकामे अधिष्ठान ठेवलेले आहे. भिंतींवर विविध धर्मांतील संत, विचारवंत आणि दैवतांची चित्रे आहेत. परिसरात प्रचार विभागाचे कार्यालय, भक्तनिवास, ध्यान-योग मंदिर, आरोग्य मंदिर आणि रसशाळा अशा विविध वास्तू आहेत.

गुरुकुंज आश्रमाची दिनचर्या शिस्त, सामुदायिक साधना आणि श्रमप्रतिष्ठा या तत्त्वांवर आधारलेली आहे. आश्रम परिसराला भेट देण्यासाठी सर्वसाधारण अभ्यागतांची नोंदलेली वेळ सकाळी ९ ते रात्री १० अशी आहे. आश्रमातील नित्य उपक्रमांची सुरुवात मात्र पहाटे होते. पहाटे ५.३० वाजता काकडा, सामुदायिक ध्यान आणि आत्मचिंतन केले जाते. सकाळी ७ ते ८ या वेळेत योगासने, प्राणायाम आणि ग्रामगीतेवरील मार्गदर्शनाचे कार्यक्रम होतात. सायंकाळी ६ वाजता प्रार्थना मंदिरात सामुदायिक प्रार्थना होते. रात्रीच्या वेळी कीर्तन आणि पारंपरिक खंजिरी भजनाचे कार्यक्रम होतात.

आश्रमाच्या कार्यपद्धतीत सप्ताहातील विविध दिवसांना समाजोपयोगी कार्यांची जोड देण्याची परंपरा आहे. सोमवारी श्रमदान आणि भजन, मंगळवारी आरोग्यसेवा आणि रुग्णशुश्रूषा, बुधवारी वाचन, अध्ययन आणि वक्तृत्व, गुरुवारी नामस्मरण, प्रार्थना आणि रामधून, शुक्रवारी ग्रामोद्योग आणि सूतकताई, शनिवारी सामुदायिक व्यायाम तर रविवारी राष्ट्रधर्म आणि आदर्श ग्रामनिर्मितीच्या विचारांचा प्रसार अशा उपक्रमांची परंपरा गुरुकुंजच्या कार्यात राहिली आहे.

आश्विन वद्य पंचमीच्या निमित्ताने आयोजित केला जाणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वार्षिक पुण्यतिथी महोत्सव हा येथील सर्वांत मोठा सोहळा आहे. साधारण सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महासमाधी परिसरातील धार्मिक कार्यक्रमांसह सामुदायिक ध्यान, ग्रामस्वच्छता, योगासने, ग्रामगीता पठण आणि प्रवचन, कीर्तन, खंजिरी भजन, वक्तृत्व स्पर्धा, कार्यकर्ता मेळावे आणि महिला संमेलने आयोजित केली जातात. हजारो गुरुदेव भक्त या काळात गुरुकुंज येथे येतात. महोत्सवातील मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा असून महाराजांच्या महानिर्वाणाची वेळ असलेल्या सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी भाविक स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. गुरुपौर्णिमेलाही गुरुकुंज येथे विशेष कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या संपूर्ण आश्रमव्यवस्थेचे आणि राष्ट्रसंतांच्या विचारप्रसाराच्या कार्याचे प्रमुख केंद्र अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ आहे.

उपयुक्त माहिती

  • अमरावती शहरापासून ३४ किमी अंतरावर
  • बडनेरा रेल्वे जंक्शनपासून ४५ किमी अंतरावर
  • अमरावती आणि नागपूरवरून राष्ट्रीय महामार्गाने नियमित एसटीची सुविधा
  • खासगी वाहने समाधी मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • आश्रम संकुलात भक्त निवासाची तसेच महामार्गालगत भोजन व न्याहारीची सोय उपलब्ध
  • संपर्क : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी, मो. ९४२२१२१९२३, ९४२२६७१६६५, ९४२०८३४३९६
Back To Home