पुणे जिल्ह्यातील वेल्हे (राजगड) तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आणि अंबी नदीच्या तीरावर शिरकोली हे गाव वसले आहे. हे गाव आपल्या ऐतिहासिक वारशासाठी परिचीत आहे. शिरकोली गावात भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिरकाई देवीचे ऐतिहासिक मंदिर आहे. हे देवस्थान स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर आणि मोसे खोऱ्यातील त्यांच्या चौऱ्याऐंशी मावळ्यांचे कुलदैवत मानले जाते. इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ येथील ग्रामदैवत असलेल्या शिरकाई देवीचे हेच मूळपीठ आहे. मंदिराच्या सभोवताली सह्याद्रीचा डोंगरप्रदेश आणि जवळच पानशेत धरणाचे म्हणजेच तानाजी सागर जलाशयाचे पाणी पसरलेले आहे. हे स्थान राजगड, तोरणा आणि रायगड किल्ल्यांच्या सानिध्यात वसलेले आहे.
शिरकाई देवी मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वारसा लाभलेला आहे. शिवकाळात या मंदिराचे विशेष महत्त्व होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावर वास्तव्यास होते, तेव्हा ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असत. या मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन त्या काळात मंदिराच्या दैनंदिन दिवाबत्तीचा आणि नित्यपूजेचा खर्च राजगडावरून पाठवला जात असे. नंतरच्या काळात हा खर्च सातारा येथील छत्रपतींच्या गादीवरून पाठवला जाऊ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५२ च्या सुमारास या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि देवीच्या सण-उत्सवांसाठी कायमस्वरूपी इनाम जमीन दिली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातही या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले.
१९५७ च्या सुमारास अंबी नदीवर पानशेत धरण म्हणजेच तानाजी सागर जलाशयाची निर्मिती सुरू झाली. या धरणाच्या बुडीत क्षेत्रात मूळ शिवकालीन शिरकोली गाव आणि शिरकाई देवीचे मंदिर गेले. हे मूळ मंदिर आजही वर्षातील साधारण आठ ते दहा महिने पाण्यात बुडून राहते. केवळ उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा धरणाची पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा हे दगड आणि चुन्यात बांधलेले वास्तूशिल्प जलाशयातून बाहेर येते. अशा वेळी त्या दगडी गर्भगृहाचे, छतावरील फुलांच्या नक्षीकामाचे आणि कळसाचे दर्शन घेण्यासाठी लोक येतात. धरणाच्या पाण्यात हे मूळ मंदिर बुडाल्यानंतर देवीच्या नित्यपूजेत खंड पडू नये म्हणून १९९३ मध्ये शासनातर्फे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंदिराचे पुनर्वसन पूरपातळीच्या वर करण्याचे ठरले. त्यानुसार जुन्या मंदिरातील मूळ अष्टभुजा मूर्ती बाहेर काढून धरणाच्या तीरावर नवीन बांधलेल्या मंदिरात तिची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली.
शिरकोलीच्या शिरकाई देवीसंदर्भात अनेक लोककथा आणि आख्यायिका आहेत.
यातील एक आख्यायिका कोकणच्या कोळी राजाविरुद्धच्या लढ्याशी संबंधित आहे. पूर्वीच्या काळात मोसे खोऱ्यातील स्थानिक मावळे कोकणच्या कोळी राजाच्या आक्रमणामुळे अडचणीत आले होते. या संकटातून मोसे खोऱ्याची मुक्तता करण्यासाठी मावळ्यांनी एकत्र येऊन सरसेनापती बाजी पासलकर यांच्या नेतृत्वाखाली एक गुप्त बैठक घेतली. कोळी राजाविरुद्ध मोहीम उघडण्यापूर्वी सर्व मावळ्यांनी शिरकाई देवीला साकडे घातले आणि विजयाचा कौल मागितला. देवीने त्यांना सकारात्मक कौल दिला. यामुळे मावळ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मावळ्यांनी कोळी राजाला शिरकोली येथील विलालपूर माळावर एका समारंभासाठी आमंत्रित केले. नियोजनानुसार शिरकोली गावचे पासलकर, पडवळ आणि साळेकर हे ग्रामस्थ लग्नकार्यातील वऱ्हाडी बनले आणि विलालपूर माळावर एक शामियाना उभारण्यात आला. कोळी राजा जेव्हा आपल्या मर्यादित सैन्यासह आणि काही अंगरक्षकांसह शिरकोली गावाकडे येत होता, तेव्हा वाटेतच केदळकर, बामुगडे, कडू आणि निवंगुडे या मावळ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या युद्धात त्यांना मानकर, तावरे, नरावडे, लोकरे, सांगडे आणि हरेकर या मावळ्यांची साथ लाभली. या हल्ल्यात कोळी राजाचा पराभव झाला आणि त्याचे सैन्य नष्ट झाले.
या विजयामुळे मोसे खोरे कोळी राजाच्या त्रासातून मुक्त झाले. मावळ्यांची ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे या देवीला नवसाला पावणारी शिरकाई देवी असे नाव पडले. तेव्हापासून या देवीची यात्रा भरू लागली.
या मंदिराच्या पुजारीपदाच्या इतिहासाबाबत पडवळ घराण्याशी संबंधित एक आख्यायिका सांगितली जाते. ऐतिहासिक काळात एका गर्भवती शिर्के महिलेने जंगलातील पडवळाच्या वेलींमागे एका मुलाला जन्म दिला होता. पडवळाच्या वेलींमागे जन्म झाल्यामुळे त्या मुलाचे आडनाव पडवळ पडले. तेव्हापासून देवीच्या पुजारीपदाचा मान पडवळ घराण्याकडे आहे. ही देवी या परिसरातील पडवळ, पासलकर, भोसले, साळेकर, बामुगडे, निवंगुडे, कडू, कुंभार, कदम, मानकर, राजेशिर्के, बोरगे, हेळदकर, माने, मोरे, तावरे, लोकरे आणि नरावडे या कुटुंबांचे कुलदैवत आहे. हीच देवी रायगड किल्ल्यावर गडस्वामिनी म्हणून देखील पूजली जाते. ऐतिहासिक संदर्भानुसार रायगड किल्ल्याच्या गडदेवतेचे मूळ स्थानही याच शिरकाई देवीशी जोडलेले मानले जाते.
नवीन शिरकाई देवीचे मंदिर धरणाच्या कडेला एका कड्यावर बांधण्यात आले असून, तेथून खाली पाणी आणि सभोवताली पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा दिसतात. गावातील मुख्य रस्त्यावरील प्रवेशकमानीतून मंदिराकडे येता येते. या मंदिरसंकुलाच्या सभोवताली असलेल्या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात डावीकडे शिरकाई देवीचे मंदिर व उजवीकडे वाघजाई देवीचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी अर्धखुला मंडप आहे. त्यावर पत्र्याची शेड उभारलेली आहे. सभामंडप व गर्भगृह अशी शिरकाई देवी मंदिराची रचना आहे. सभामंडपातून पाच पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दीपकोष्टके आहेत. प्रवेशद्वाराची द्वारशाखा चांदीच्या पत्र्याने मढवलेली असून द्वारशाखेच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात चांदीच्या मखरात शिरकाई देवीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. देवीने आपल्या एका हाताने महिषासुराची शेंडी पकडलेली आहे, तर तिचा डावा पाय महिषासुररूपी रेड्याच्या पाठीवर रोवलेला आहे.
देवीच्या इतर सात हातांमध्ये क्रमशः शंख, चक्र, त्रिशूळ, पानपात्र, बिछवा, धनुष्य आणि बाण ही आयुधे आहेत. ही आयुधे तिच्या शक्तीचे आणि वाईट प्रवृत्तीच्या नाशाचे प्रतीक मानली जातात.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे त्रिदेवींचे एकत्रित दर्शन घडते. मंदिराच्या गर्भगृहात शिरकाई देवीचे स्थान आहे, तर या मंदिराच्या डाव्या बाजूला मानाई देवीचे मंदिर आणि उजव्या बाजूला वाघजाई देवीचे मंदिर आहे. मानाई देवीच्या मंदिरात काळ्या पाषाणातील मानाई देवीसोबतच वज्रपीठावर विविध देवीदेवतांच्या पाषाणमूर्ती आहेत. उंच अधिष्ठानावर असलेल्या वाघजाई मंदिरातील वज्रपीठावर वाघजाई देवीची मूर्ती आहे. याशिवाय मंदिर परिसरात प्राचीन मूर्ती व काही विरगळ आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा आहे.
शिरकाई देवी मंदिरात वर्षभर विविध सण आणि पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांमध्ये चैत्र वद्य प्रतिपदेला भरणारी वार्षिक चैत्र यात्रा हा या परिसरातील मोठा उत्सव मानला जातो.
या यात्रेसाठी अनेक भाविक, विशेषतः राजेशिर्के आणि पासलकर कुटुंबातील लोक शिरकोली गावात येतात. यात्रेच्या दिवशी मंदिरात महापूजा, होमहवन आणि यज्ञाचे आयोजन केले जाते. या यात्रेत निघणाऱ्या पालखी सोहळ्याला मान आहे. पालखी वाहण्याचा पहिला मान जुन्या रीतीनुसार पासलकर कुटुंबाकडे असतो. यात्रेच्या दिवशी गावात अनेक भक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते. या यात्रेच्या काळातच येथे बगाड उत्सव देखील साजरा केला जातो. या उत्सवात गावातील निवडक पुरुष पारंपरिक वस्त्रे, फड आणि झेंडे घेऊन धावतात आणि नवस फेडण्यासाठी बगाड खेळतात. हा सोहळा पाहण्यासाठी लोक येतात.
चैत्र यात्रेशिवाय आश्विन महिन्यात साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव हा येथील दुसरा महत्त्वाचा उत्सव आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंदिरात अखंड नंदादीप, घटस्थापना, मंत्रजागर आणि विविध पारंपरिक कार्यक्रम होतात. अष्टमीच्या दिवशी मंदिरात रात्री जागरण आणि होमहवन केले जाते. या होमहवनात शेकडो भाविक आहुती देण्यासाठी उपस्थित असतात. दसऱ्याच्या दिवशी मंदिरात विशेष उत्साह असतो. या दिवशी पारंपरिक पद्धतीने सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. दसऱ्याच्या दिवशी येथील सुवासिनी आणि लेकी-सुना दोरीला बांधलेली खोबऱ्याची वाटी देवीला अर्पण करतात. ही पारंपरिक प्रथा आजही येथील ग्रामस्थांनी जपली आहे. उत्सवकाळात मंदिराची फुलांनी आणि दिव्यांनी विशेष सजावट केली जाते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचे दर्शन घेता येते.