चक्रधर स्वामी ज्ञानमंदिर

भोकरदन शहर, ता. भोकरदन, जि. जालना

जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात खेळणा नदीच्या काठावर श्री चक्रधर स्वामी ज्ञानमंदिर वसले आहे. महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी तेराव्या शतकात संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करून भक्ती आणि अहिंसेचा प्रसार केला. या काळात स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली सर्व स्थाने महानुभाव पंथाच्या अनुयायांसाठी तीर्थक्षेत्रे बनली आहेत. जालना जिल्ह्यातील प्राचीन ‘भोगवर्धन’ म्हणजेच आजचा भोकरदन तालुका या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. या तालुक्यात चक्रधर स्वामींच्या स्मृती जागृत ठेवणाऱ्या दोन प्रमुख स्थानांपैकी भोकरदन शहरातील हे मंदिर मुख्य मानले जाते.

चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराचा इतिहास सुमारे तेराव्या शतकापासूनचा आहे. भोकरदन शहराचा इतिहास प्राचीन आहे. सातवाहन काळापासूनच हे नगर एक संपन्न व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. सांची, भारहूत आणि भाजे येथील स्तुपांवर कोरलेल्या प्राचीन लेखांमध्ये या नगरीचा उल्लेख ‘भोगवर्धन’ असा आढळतो. सन १९७३मध्ये नागपूर विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज यांनी येथे केलेल्या पुरातत्वीय उत्खननात सातवाहन काळातील एका समृद्ध नगरीचे अवशेष, मौल्यवान रोमन नाणी आणि हस्तिदंताची सुबक स्त्रीमूर्ती सापडली आहे. या प्राचीन शोधांमुळे भोकरदनचे आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध आणि ऐतिहासिक महत्त्व सिद्ध झाले आहे. अशा या संपन्न परिसरात तेराव्या शतकात महानुभाव पंथाच्या विचारांचे बीजारोपण झाले. चक्रधर स्वामींनी आपल्या उपदेशांसाठी संस्कृतऐवजी सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा मराठी भाषेचा स्वीकार केला. त्यांनी आपल्या शिष्यांना केवळ मराठीतच ग्रंथ लिहिण्याची आज्ञा दिली होती. यामुळे भोकरदन आणि परिसरातील बहुजन समाजाला अध्यात्माचे ज्ञान सोपे झाले. चक्रधर स्वामींनी स्वतः या भागात दीर्घकाळ भ्रमण केले होते. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या जागांना महानुभाव पंथाच्या ‘स्थानपोथी’ आणि ‘लीळाचरित्र’ या प्रमुख ग्रंथांमध्ये महत्त्व देण्यात आले आहे.

या स्थानाचा इतिहास द्वापारयुगाशी जोडणारी एक प्राचीन आख्यायिका येथे सांगितली जाते. त्यानुसार, भोकरदन ही पूर्वी ‘भौमासुर’ किंवा ‘घुमासुर’ नावाच्या राक्षसाची राजधानी होती. घुमासुराने भगवान शंकराची कठोर आराधना करून अनेक वर मिळवले होते. या वरांच्या बळावर त्याने सोळा हजार शंभर कन्यांचे अपहरण केले. या सर्व कन्यांना त्याने येथील डोंगरमाथ्यावरील एका खोल भुयारात बंदी बनवून कोंडून ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्ण गरुडावर आरूढ होऊन येथे आले. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून घुमासुराचा वध केला आणि सर्व सोळा हजार शंभर कन्यांची या बंदीखान्यातून मुक्तता केली. या भुयाराला आजही लोक बंदीखाना किंवा घुमासुराचे भुयार या नावाने ओळखतात. या परिसराजवळच आठव्या ते दहाव्या शतकातील राष्ट्रकूटकालीन प्रसिद्ध तुकाई लेणी आहेत. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी या ऐतिहासिक नदीकाठावरील शांत आणि निसर्गरम्य परिसरात दीर्घकाळ वास्तव्य केले होते. याच कारणामुळे या स्थानाला ज्ञानमंदिर म्हणून विशेष ओळख मिळाली.

भोकरदन गावापासून जवळ खेळणा नदीच्या तीरावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या समोर भाविकांच्या वाहनांसाठी एक प्रशस्त वाहनतळ आहे. काहीशा उंचावर असलेल्या मंदिराभोवती पाषाणात बांधलेल्या तटबंदीमधील प्रवेशद्वारापर्यंत येण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारात महिरपी तोरण असलेली एक स्वागतकमान भाविकांचे स्वागत करते.

सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचे अर्धे बांधकाम प्राचीन काळातील आहे, तर काही भागाचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे तो भाग नवीन वाटतो. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा काहीसे उंचावर आहे. सभामंडपाच्या पंचशाखीय प्रवेशद्वारावर द्वारपाल, गंगा, यमुना आणि यक्ष यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशद्वारात पर्णशाखा, पुष्पशाखा आणि स्तंभशाखा अशा विविध प्रकारच्या नक्षीदार द्वारशाखा पाहायला मिळतात. या द्वारशाखांच्या खालच्या बाजूला गजराज म्हणजे हत्ती आणि अश्वराज म्हणजे घोडे यांची पशुशिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचा हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्याच्या मध्यभागी चार नक्षीदार दगडी स्तंभ उभे आहेत. मजबूत स्तंभपादावर उभे असलेल्या या चारही स्तंभांच्या दंडावर चौकोन, वर्तुळ, षटकोन आणि अष्टकोन असे विविध भौमितिक आकार कोरलेले आहेत. या स्तंभदंडांवर विविध देवीदेवता, सूरसुंदरी आणि संयुक्त प्रकारची नक्षी कोरलेली आढळते. स्तंभांवरील चौकोनी पटांवर रामायणातील विविध पौराणिक प्रसंगांची शिल्पे बारकाईने चितारलेली आहेत. यामध्ये मारीच राक्षसावर बाण रोखून धरलेले प्रभू श्रीराम, वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्धाचा प्रसंग, मारुतीची शेपटी पेटवणारा रावण, हनुमान आणि श्रीराम यांची ऐतिहासिक भेट, तसेच राजदरबारात बसलेले श्रीराम, लक्ष्मण, जानकी आणि हनुमान इत्यादी प्रसंग दर्शवणारी शिल्पे आहेत. स्तंभांच्या शीर्षभागावर कणी आणि त्यावर हस्त आहेत. या हस्तांवर नागफणीची शिल्पे कोरलेली आहेत. या हस्तांवर आधारलेल्या तुळईवर एक अष्टकोनी छत आहे व त्याला एक पाळणा टांगलेला असतो. सभामंडपात चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान म्हणजेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थान जतन करून ठेवले आहे. या स्थानाच्या बाजूला स्वामींची एक पितळी मूर्ती आहे. सभामंडपाच्या पुढे मंदिराचे गर्भगृह आहे. या गर्भगृहात असलेल्या एका वज्रपीठावर श्रीकृष्ण आणि महानुभाव पंथातील इतर देवीदेवतांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. या बंदिस्त सभामंडपात उजेड आणि हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव हा या ज्ञानमंदिरातील सर्वात प्रमुख उत्सव मानला जातो. या उत्सवाच्या वेळी श्रीकृष्णाची उत्सवमूर्ती सभामंडपातील पाळण्यात ठेवून श्रीकृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मध्यरात्री ठीक बारा वाजता या पाळण्याची विधिवत पूजा करून जमलेल्या सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून काल्याच्या महाप्रसादाचे भोजन आयोजित केले जाते. या मंदिरात चक्रधर स्वामींचा जयंती उत्सव देखील भक्तीभावाने साजरा केला जातो. याशिवाय दत्तात्रेय जयंती, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी इत्यादी सण व उत्सव साजरे होतात. उत्सवांच्या दिवसांत मंदिरात महानुभाव पंथाचे ग्रंथ असणारे ‘लीळाचरित्र’ आणि ‘भगवद्गीता’ या ग्रंथांची अखंड पारायणे केली जातात. या काळात मंदिरात चक्रधर स्वामींची भजने आणि कीर्तने गायली जातात. सर्व प्रमुख उत्सवांच्या निमित्ताने मंदिरात मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर गुरुवार, एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. हे मंदिर भाविकांसाठी सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते.

उपयुक्त माहिती

  • भोकरदन बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • जालना येथून ६० किमी अंतरावर
  • भोकरदन येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

चक्रधर स्वामी ज्ञानमंदिर,

भोकरदन शहर, तालुका भोकरदन, जिला जालना।

Back To Home