रामलिंगेश्वर देवस्थान

काळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर

लातूर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या लातूर शहरातील काळे गल्ली परिसरात प्राचीन रामलिंगेश्वर देवस्थान स्थित आहे. बालाघाट पठारावर वसलेल्या लातूर तालुक्याच्या या मुख्य नगरीला प्रदीर्घ प्राचीन परंपरा लाभली आहे. प्राचीन दस्तऐवज आणि विविध शिलालेखांमध्ये या शहराचा उल्लेख लट्टलूर, लातनूर, सत्पूर, श्रीपूर, रत्नापूर, रट्टगिरी आणि लत्तनीर अशा विविध नावांनी आढळतो. इतिहासानुसार लातूर हे राष्ट्रकूट राजवंशाचे मूळ उगमस्थान मानले जाते आणि या वंशातील राजांनी स्वतःला ‘लट्टलूरपुरवराधीश’ म्हणजेच लट्टलूर नगराचे अधिपती असा बहुमान दिला होता. या प्राचीन नगराच्या मध्यवर्ती भागात प्रतिष्ठित असलेल्या रामलिंगेश्वर मंदिरातील शिवपिंडीविषयी स्थानिक भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे. हे मंदिर सुमारे एक हजार वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते.

‘रामलिंगेश्वर’ म्हणजे श्रीरामाने प्रस्थापित केलेले किंवा पूजिलेले शिवाचे लिंग होय. पुरातत्वीय दृष्टिकोनातून ही संकल्पना वैष्णव आणि शैव पंथांमधील समन्वय साधणारी एक महत्त्वाची कडी मानली जाते. भारताच्या विविध भागांत, विशेषतः दक्षिण आणि मध्य भारतात रामलिंगेश्वर नावाची अनेक मंदिरे आहेत. या संकल्पनेचे सर्वात महत्त्वाचे आणि प्राचीन संदर्भ पुराणग्रंथांमध्ये आढळतात. ‘वाल्मीकी रामायणा’च्या ‘युद्धकांडा’त लंका विजयानंतर श्रीरामाने भगवान शिवाचे पूजन केल्याचा उल्लेख आहे. या कथेचे सविस्तर वर्णन ‘स्कंद पुराण’ या ग्रंथातील ‘सेतू माहात्म्य’ या भागात विस्तृतपणे आलेले आहे. स्कंद पुराणातील वर्णनानुसार, रावण हा ऋषी पुलस्त्य यांचा नातू असल्याने तो जन्माने ब्राह्मण होता. त्यामुळे रावणाचा वध केल्यामुळे श्रीरामांना ब्रह्महत्येचे पातक लागले होते. या पातकातून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषी अगस्तींच्या सल्ल्यानुसार श्रीरामांनी समुद्रकिनाऱ्यावर शिवलिंगाची स्थापना करण्याचे निश्चित केले. या शिवलिंगाच्या स्थापनेसाठी हनुमान कैलास पर्वतावरून मूळ शिवलिंग आणण्यासाठी गेले होते, परंतु शुभ मुहूर्त टळत चालल्यामुळे माता सीतेने समुद्रातील वाळूपासून एक शिवलिंग तयार केले आणि श्रीरामांनी त्याची विधीवत स्थापना केली. हेच लिंग पुढे रामलिंगेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.

‘शिवपुराण’ या ग्रंथाच्या ‘कोटिरुद्र संहिता’ या भागात बारा ज्योतिर्लिंगांच्या वर्णनात रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख येतो. त्यानुसार श्रीरामांच्या प्रार्थनेवरून भगवान शिव तेथे लिंगस्वरूपात कायमचे स्थायिक झाले आणि हेच स्थान रामलिंगेश्वर म्हणून ओळखले जाते. याशिवाय ‘पद्म पुराण’ या ग्रंथाच्या पाताळ खंडात श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळच्या प्रवासाचे वर्णन आढळते. या प्रवासादरम्यान श्रीरामांनी विविध ठिकाणी शिवलिंगांची स्थापना करून त्यांची पूजा केल्याचे स्पष्ट संदर्भ यात मिळतात. लातूर शहरातील या मंदिराबाबत आख्यायिका अशी की महाभारतातील राजा ताम्रध्वज हा रामलिंगेश्वरचा परमभक्त होता. त्याने स्वतःच्या कारकिर्दीत या मंदिराची स्थापना केली होती. लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर देखील याच राजाने बांधले असल्याची कथा प्रचलित आहे.

कुरुक्षेत्राच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर पांडवांनी युधिष्ठिराच्या पापमुक्तीसाठी आणि सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यासाठी श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार अश्वमेध यज्ञ आयोजित केला होता. या यज्ञाचा घोडा फिरत असताना राजा ताम्रध्वजाच्या राज्यात म्हणजे त्यावेळच्या रत्नापूर अर्थात आजच्या लातूर परिसरात आला. त्या वेळी ताम्रध्वज आणि त्याचे वडील राजा मयूरध्वज यांनी तो अश्व अडवला. त्यांनी पांडवांचे अधिपत्य मान्य केले नाही, त्यामुळे पांडव आणि राजा ताम्रध्वज यांच्यात युद्ध झाले. कथेनुसार, ताम्रध्वजाने पराक्रम गाजवून अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी तीव्र लढा दिला होता. या युद्धादरम्यान ताम्रध्वजाच्या मस्तकावर तलवारीचा घाव बसणार होता, परंतु भक्ताचे रक्षण करणाऱ्या रामलिंगेश्वराने तो वार स्वतःच्या अंगावर झेलून ताम्रध्वजाचे रक्षण केले. या घटनाक्रमाची साक्ष म्हणून आजही रामलिंगेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर तलवारीच्या घावाची खूण पाहायला मिळते, असे सांगितले जाते.

मंदिराबद्दल दुसरी आख्यायिका अशी की रामायण काळात रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर, तिच्या शोधात फिरत असताना श्रीराम या भागात थांबले होते. त्या वेळी त्यांनी स्वतःच्या नित्य पूजेसाठी पाषाणाच्या शिवपिंडीची स्थापना केली. रामाने स्थापन केलेली शिवपिंड म्हणून या महादेवास रामलिंगेश्वर या नावाने संबोधले जाते.

शहरातील काळे गल्ली या गजबजलेल्या भागात रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिराला भक्कम तटबंदी आणि दुमजली प्रवेशद्वार आहे. हे मंदिर रस्त्यापेक्षा काहीसे उंचावर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना स्तंभ असून त्यावर महिरपी तोरण आहे. या तोरणाच्या दोन्ही बाजूंना पद्मसुंदरी शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार बरोबर विरुद्ध दिशेला असून या प्रवेशद्वाराची रचना द्राविडी शैलीतील आहे. प्रवेशद्वाराच्या शीर्षभागावर शाल पद्धतीचे शिखर आहे आणि त्यावर आडव्या ओळीत कळस बसवलेले आहेत. मंदिराच्या प्रांगणात डाव्या बाजूला पाषाणाची नंदीमूर्ती, तुळशीवृंदावन व पाणपोई आहे. प्रांगणात वट व पिंपळ वृक्ष आहेत. या वृक्षांच्या पारावर वीरगळ शिल्पे आणि इतर देवीदेवतांची शिल्पे आहेत. प्रांगणामध्ये तटबंदीलगत ओवऱ्या बांधलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात भाविकांना राहण्यासाठी या ओवऱ्यांचा उपयोग केला जात असे.

मंदिरासमोर नव्याने दर्शनमंडप बांधण्यात आला आहे. दर्शनमंडपात उजव्या बाजूला विठ्ठल-रखुमाई यांचे मंदिर आहे. या मंदिरासमोर जमिनीवर कासवशिल्प बसवलेले आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर शृंखला, पर्णलता, पुष्पलता यांचे नक्षीकाम आहे. तसेच ललाटबिंबावर गरुड, हनुमंत आणि वैष्णव शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहामध्ये वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई यांच्या काळ्या पाषाणातील सालंकृत मूर्ती प्रतिष्ठित आहेत. मंदिराच्या छतावर शिखर असून त्यावर आमलक आणि कळस बसवलेला आहे. दर्शनमंडपात सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या आकाराची शिवपिंड स्थापन केलेली आहे. उत्सवकाळात या शिवपिंडीला विशेष शृंगार केला जातो.

मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या नंदीमूर्तीपुढे कासवशिल्प आहे. सभामंडपामध्ये चारही बाजूंना भाविकांना बसण्यासाठी कक्षासने तयार केलेली आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीलगत असलेल्या वज्रपीठावर श्रीगणेशाची काळ्या पाषाणातील मूर्ती प्रतिष्ठित आहे. त्याच्या बाजूला महाकाल आणि आणखी एक शिवपिंड स्थापन केलेली आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे गर्भगृह सभामंडपाच्या प्रवेशद्वारापेक्षा खोल पातळीवर आहे. त्यामुळे येथे पायऱ्या उतरून खाली यावे लागते. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंड प्रतिष्ठित आहे. या शिवपिंडीवर तलवारीच्या घावाची खूण असल्याचे दाखविले जाते. शिवपिंडीवर पितळी नागाचे छत्र आहे. तसेच छताला टांगलेल्या पितळी अभिषेक पात्रातून शिवपिंडीवर अखंड जलधारा पडत असते. या पिंडीच्या मागे वज्रपीठावर रामलिंगेश्वर महादेवाची पितळी मूर्ती आहे. या मूर्तीच्या मस्तकावर पाचफणी नागाचे छत्र आहे. गर्भगृहात डाव्या बाजूला एक देवकोष्टक असून त्यामध्ये आणखी एक शिवपिंड आहे. गर्भगृहाच्या छतावर कोरीव कामाचे शिखर आहे.

महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव आहे. या दिवशी दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविक मंदिरात येतात. उत्सवाच्या दिवशी लघूरुद्र अभिषेकाने दिवसाची सुरुवात होते. दिवसभर मंदिरात मंत्रपठण, भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात दर्शनासाठी यात्रेकरूंची व भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात नागपंचमी, महाकाल जयंती, दसरा, दिवाळी, आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे सण व उत्सव साजरे होतात. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात रामलिंगेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • लातूर बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून लातूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

रामलिंगेश्वर मंदिर

काले गली, लातूर, तालुका और जिला लातूर

Back To Home