जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या अंबा गावामध्ये बागेश्वरी देवीचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. शाक्तपंथीय देवतांमध्ये बागेश्वरी ही एक प्रमुख व सौम्य देवता मानली जाते. उच्चार, भाषा, साहित्य आणि बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी बागेश्वरी देवीची प्रामुख्याने पूजा केली जाते. देवीला बागेश्वरी, वागेश्वरी आणि वाघेश्वरी अशा विविध नावांनी पूजले जाते. नेपाळमधील मंदिर हे या देवतेचे मुख्य पीठ मानले जाते. देवीची उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम या प्रांतांमध्ये प्रसिद्ध मंदिरे आहेत. महाराष्ट्रातही देवीची अनेक मंदिरे आहेत. अंबा गावातील हे मंदिर जागृत स्थान मानले जाते आणि ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
बागेश्वरी देवीच्या उत्पत्तीबाबत ‘देवीपुराणात’ एक कथा आहे. त्यानुसार महादेवाची पत्नी सती हिचे वडील प्रजापती दक्ष यांनी एका महायज्ञाचे आयोजन केले होते. परंतु या यज्ञाचे आमंत्रण त्यांनी सती किंवा महादेवाला धाडले नव्हते. तरीही सती यज्ञकार्यासाठी आपल्या वडिलांच्या महालात गेली. तेथे प्रजापती दक्षाने महादेवाचा अपमान करणारे शब्द उच्चारले. आपल्या पतीचा हा घोर अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी घेऊन आत्मदहन केले. सतीच्या मृत्यूमुळे महादेवाचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी सतीचे मृत शरीर खांद्यावर घेऊन तांडव नृत्य सुरू केले. महादेवाच्या या तांडवामुळे पृथ्वीवर भयानक ज्वाला निर्माण झाल्या. त्यामुळे जगाचा विनाश होण्याची भीती निर्माण झाली.
या संकटातून जगाला वाचवण्यासाठी सर्व देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली. सतीचे कलेवर खांद्यावर आहे तोपर्यंत महादेवाचा राग शांत होणार नाही, हे विष्णूंनी ओळखले. त्यांनी सुदर्शन चक्र सोडून सतीच्या देहाचे ५१ तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडले, त्या ठिकाणी शक्तीपीठे निर्माण झाली. नेपाळमधील नेपाळगंज येथे सतीची जीभ पडली. तिथे बागेश्वरी देवीचे शक्तीपीठ निर्माण झाले. या देवीच्या दर्शनाने बुद्धी, भाषा आणि ज्ञान यांचे वर्धन होते. त्यामुळे हजारो भाविक दर्शनासाठी नेपाळला जातात. परंतु सर्वांनाच नेपाळला जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यामुळे भारतात अनेक ठिकाणी देवीची उपपीठे निर्माण झाली. याच परंपरेतील एक उपपीठ जालना जिल्ह्यातील अंबा या गावी सन २०१३ मध्ये स्थापन करण्यात आले.
अंबा गावापासून काही अंतरावर हे मंदिर आहे. मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे येण्यासाठी एक उपमार्ग तयार केलेला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाम वृक्षांच्या रांगा आहेत. मंदिराच्या समोर एक प्रशस्त वाहनतळ उभारण्यात आले आहे. मंदिराच्या स्वच्छ व मोकळ्या प्रांगणात भाविक-पर्यटकांना बसण्यासाठी आसनांची उत्तम व्यवस्था केलेली आहे.
तसेच मंदिराच्या समोरील भागात एक तुलसीवृंदावन बांधलेले आहे.
या मंदिराची वास्तुरचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. हे संपूर्ण मंदिर सुमारे तीन फूट उंच जगतीवर म्हणजेच अधिष्ठानावर स्थित आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर सहा पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराला लाकडी नक्षीदार द्वारशाखा आहेत. येथील बंदिस्त सभामंडपामध्ये पुरेसा उजेड आणि हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी येथे दर्शनरांगेची व्यवस्था आहे. सभामंडपाच्या वितानावर म्हणजेच छताच्या आतील भागावर पद्मफुलांची नक्षी कोरलेली आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवर डाव्या बाजूला साईबाबा आणि उजव्या बाजूला सत्य साईबाबा यांच्या सुमारे सहा फूट उंच तसबिरी आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वारावरील तोरणावर गजलक्ष्मीचे शिल्प आहे. गर्भगृहामध्ये वज्रपीठावर बागेश्वरी देवीची अष्टभुजाधारी सिंहारूढ मूर्ती प्रतिष्ठित आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आहे.
देवीने आपल्या हातांमध्ये त्रिशूळ, तलवार, पाश आणि अग्निकुंड धारण केलेली आहेत. देवीचा एक हात आशीर्वाद मुद्रेमध्ये आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या छतावर सभोवताली बाशिंगी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील चार थरांचे चौकोनी शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरात चारही दिशांना कूट आणि शाल यांची रचना केलेली आहे. शिखराच्या शीर्षभागावर स्तूपिका व कळस आहे.
बागेश्वरी देवी मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या एका उंच चौथऱ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोर एक लहान पुष्करणी आहे. या पुष्करणीमध्ये कमळाची फुले आहेत. मंदिराच्या समोर वज्रपीठावर नंदीची मूर्ती स्थापित आहे. या मंदिराच्या चार कोनांवरील स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. मंदिराच्या मध्यभागी वज्रपीठावर शिवपिंड प्रतिष्ठित आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नागराज व जलधारा धरण्यासाठी एक अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. या मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागावर स्तूपिका आणि त्यावर कळस बसवलेला आहे. मंदिराच्या डावीकडे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराप्रमाणेच रचना असलेले गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरातील गर्भगृहात काळ्या पाषाणातील सुबक गणेशमूर्ती आहे.
बागेश्वरी देवी मंदिरापासून जवळच परतूर येथील प्रसिद्ध साखर कारखाना स्थित आहे.
शारदीय नवरात्रोत्सव हा या मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव मानला जातो. या उत्सवाच्या काळात सलग दहा दिवस मंदिरात शतचंडी यज्ञ, ‘दुर्गासप्तशती’ पाठ, रात्री गरबा नृत्य आणि जागरण-गोंधळ यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. उत्सवाच्या दिवसांमध्ये सलग सहाव्या दिवसापासून कन्या पूजन केले जाते.
अष्टमीच्या दिवशी नवचंडी यज्ञ पार पडतो. दसऱ्याच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे तीस ते चाळीस हजार भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी मंदिरात येतात. या सोहळ्याच्या वेळी भाविक देवीला साडी-चोळी, चुनरी, मंगळसूत्र, मिठाई आणि विविध अलंकार अर्पण करतात.
ते आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी व प्रगतीसाठी प्रार्थना करतात. या मंदिरात चैत्र नवरात्री, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, श्रावण मास, नागपंचमी, नारळी पौर्णिमा आणि शाकंभरी पौर्णिमा यांसारखे वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. दर सोमवार, मंगळवार, शुक्रवार तसेच पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना मंदिरात भाविकांची वर्दळ असते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात