बंगालच्या संस्कृती, कला आणि आध्यात्मिक जीवनात काली मातेच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काली मातेचे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर पश्चिमेकडे वसलेल्या वर्तकनगर या उपनगरात आहे. ‘ठाणे कालीबाडी’ (कालीबारी) म्हणजे ठाण्यातील कालीचे निवासस्थान या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर या उपनगरात व आजूबाजूच्या परिसरात वसलेल्या बंगाली नागरिकांच्या आस्थेचे एक प्रमुख केंद्र आहे. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने दुर्गापूजा महोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात केवळ बंगालीच नव्हे, तर मराठी बांधवही मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.
हिंदू धर्म परंपरेत काली माता ही काळ, प्रलय आणि मृत्यूची देवी मानली जाते. पुराणग्रंथांमध्ये काली, तारा, त्रिपुरसुंदरी (षोडशी), भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दशमहाविद्या सांगितल्या आहेत. त्यात काली मातेला प्रथम स्थान आहे. प्राचीन ग्रंथ आणि पुराणांमध्ये देवी कालीच्या रौद्र आणि कल्याणकारी रूपाचे अनेक उल्लेख आढळतात. ‘ब्राह्मण’ ग्रंथांमध्ये ‘दीर्घजिव्ही’ नामक देवीचा उल्लेख आहे. मुंडकोपनिषदात यज्ञाच्या सात जिव्हा असलेल्या स्वरूपात कालीचे वर्णन केलेले आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या कठ शाखेशी संबंधित असलेल्या काठक गृह्यसूत्रात कालीला प्रामुख्याने विवाहविधीत पूजली जाणारी देवता म्हटलेले आहे. महाभारताच्या सौप्तिक पर्वात काली ही कृष्णवर्णीय, रक्तरंजित डोळे आणि मुख असलेली व हाती पाश धारण केलेली दाखवलेली आहे.
काली मातेची श्रीकाली, महाकाली, भद्रकाली, स्मशानकाली, चामुंडाकाली, सिद्धिकाली, गुह्यकाली आणि दक्षिणाकाली अशी अष्टरूपे आहेत.
शाक्त आणि तंत्रमार्ग या जादूटोणा व मंत्र–तंत्रास महत्त्व असलेल्या वाममार्गी पंथातही कालीपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘कालिका पुराण’ आणि ‘महानिर्वाण तंत्र’ यांसारख्या तंत्रग्रंथांमध्ये काली पूजेचे विधी, तिचे ध्यान आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले आहे. अठराव्या शतकात पश्चिम बंगालमधील नाडियाचे जमीनदार असलेले राजा कृष्णचंद्र रॉय (इ.स. १७१० ते १७८२) हे शाक्त परंपरेचे पाईक होते. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून येथे राजकीय जागृती आणि धार्मिक पुनरुत्थानास हातभार लावला, त्याचप्रमाणे कृष्णचंद्र रॉय यांनीही बंगालमध्ये काली पूजेला व्यापक सामूहिक स्वरूप दिले. याचबरोबर रामप्रसाद सेन आणि रामकृष्ण परमहंस यांसारख्या संतांनी काली मातेचे रूप बंगाली जनमानसात अत्यंत साध्या आणि घरगुती स्वरूपात रुजवले. काली मातेच्या आधुनिक काळातील परमभक्तांमध्ये रामकृष्ण परमहंस यांचे नाव अग्रस्थानी आहे.
पश्चिम बंगालमध्ये कामारपुकुर नावाच्या खेड्यात १८ फेब्रुवारी १८३६ रोजी जन्मलेले रामकृष्ण परमहंस हे वयाच्या विसाव्या वर्षी कोलकात्यानजीकच्या दक्षिणेश्वर या खेड्यातील काली मातेच्या मंदिरात पुजारी म्हणून रुजू झाले होते. त्यांच्याविषयी एक आख्यायिका अशी सांगण्यात येते की दक्षिणेश्वर येथे मंदिरात पुजारीपण करीत असताना ईश्वरप्राप्तीच्या अत्युत्कट ओढीने ते मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली अहोरात्र ध्यानधारणा करू लागले. पुढे त्यांचे काळ-वेळेचे भानही नष्ट होत गेले. तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे. त्यांचा भाचा हृदय हा त्यांना दोन घास भरवत असे, एवढेच. ‘आई, दर्शन दे’ असा त्यांचा सततचा ध्यास होता. एके दिवशी त्यांनी गाभाऱ्यातील काली मातेचे खड्ग घेऊन आत्मत्याग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच त्यांना जगन्मातेने दर्शन दिले. या वेळी त्यांचे वय पंचवीस होते. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. अशा या कालीभक्ताच्या स्मृती प्रत्येक कालीबाडीमध्ये प्रतिमेच्या रूपाने जपलेल्या असतात.
वर्तकनगर येथील अय्यप्पा मंदिर, कानिफनाथ मंदिर, सिद्धिविनायक मंदिर,
बौद्ध विहार अशा प्रार्थनास्थळांनी पावित्र्य लाभलेल्या परिसरात ‘ठाणे कालीबाडी’ वसलेली आहे. साधारणतः ऐंशीच्या दशकात सर्वप्रथम या मंदिराची कल्पना समोर आल्याचे सांगण्यात येते. परिसरात राहणारे बंगाली भाषिक येथे उत्साहाने दुर्गापूजा करीत असत. त्यासाठी एखाद्या जागेवर तात्पुरता मंडप वगैरे टाकत असत. एरवीही विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी एकत्र येत असत. ‘सोम्मेलोनी कालीबाडी बेंगाली एज्युकेशन ट्रस्ट’ची स्थापना त्यातूनच झाली. या एकत्र येण्यातून मंदिराची संकल्पना समोर आली आणि अखेर १९९६ मध्ये हे मंदिर साकारले. तेव्हाही या मंदिराची वास्तू मोठ्या स्वरूपाची होती. त्यात काली मातेची मृण्मय मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती. पुढे सहा वर्षांनी कोलकात्याहून खास घडवलेली काली मातेची पाषाण मूर्ती मागवण्यात आली आणि १७ मे २००२ रोजी तिची येथे विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आता याच तारखेला मंदिर स्थापनादिन साजरा केला जातो. याच कालावधीत मंदिर वास्तूला नवे स्वरूप देण्यात आले.
या मंदिराकडे जाणारी वाट कानिफनाथ आणि सिद्धिविनायक मंदिरांच्या मधोमध असलेल्या एका छोट्या बोळातून जाते.
काही अंतरावर मंदिराची तीन मजली व वर गच्ची असलेली आधुनिक इमारत आहे. त्यात खालच्या मजल्यावर मंदिर आहे. मुख्य आणि उप असे दोन सभामंडप आणि दोन गर्भगृहे असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराचा मुख्य सभामंडप अतिशय प्रशस्त आहे. त्यात प्रवेश करताच समोरच्या भिंतीवरील मंदिरातील काली मातेच्या मुखप्रतिमेचे दर्शन होते. आधुनिक बांधणीच्या या सभामंडपातील अन्य एका भिंतीवर बंगाली समाजाच्या अस्मितेचे मानबिंदू असलेले स्वामी विवेकानंद, त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस आणि गुरूमाता शारदामणी यांच्या मोठ्या तसबिरी लावलेल्या आहेत. या सभामंडपात एका बाजूला शंकराला समर्पित असलेले गर्भगृह आहे. त्यात जमिनीवर कडप्पा पाषाणातील चौकोनाकार शाळुंकेसारख्या आकारात मोठे आणि उंच असे शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. या शिवलिंगात खालचा ब्रह्मभाग, मधला विष्णुभाग आणि सर्वांत वरचा रुद्रभाग असे तीन भाग आहेत. वरच्या भागातील शाळुंका आणि त्यातील शिवलिंगास पितळेचे आवरण घालण्यात आलेले आहे. शिवलिंगावर पितळेच्या नागाने छत्र धरलेले आहे. शिवपिंडीसमोर पाषाणात घडवलेली सुशोभित नंदीची मूर्ती आहे. दुर्गापूजेच्या वेळी याच सभामंडपात दुर्गामातेची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते.
येथील एका कोपऱ्यामध्ये भजन, संकीर्तन याकरिता एक उंच पीठही आहे.
मुख्य सभामंडपातून मंदिराच्या उपसभामंडपात प्रवेश होतो. त्यास मोठे आयताकार प्रवेशद्वार आहे. उपसभामंडपही प्रशस्त आकाराचा आहे. त्यात समोरच मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे. हे गर्भगृह पूर्णतः लाकडी बांधणीचे आहे. त्याच्या द्वारचौकटीच्या वरच्या बाजूस गणेशाची मूर्ती आणि सूर्य प्रतिमा आहे. आत उंच चौथऱ्यावर देवीची चांदीची पावले आहेत. समोर उंच वेदीवर लाकडाचेच सुशोभित मखर आहे. त्यात काली मातेची काळ्या पाषाणात घडवलेली उभी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीला बंगाली पद्धतीची साडी तसेच अलंकारांनी सजवले आहे. येथे कालीमाता चतुर्भुज स्वरूपात आहे. कालीमाता ही जशी रौद्र स्वरूप असलेली, तशीच ती ‘श्री’कालीही आहे. तिचे हे रूप या मूर्तीतून प्रतीत होते. तिची उजवी बाजू श्रीस्वरूप आहे, तर डावी बाजू रौद्र स्वरूप. उजवे हात अभय आणि वरद मुद्रेत आहेत, तर डावीकडील वरच्या हातात तिने खड्ग धारण केले असून खालच्या हातात दैत्याचे छिन्नमस्तक आहे. देवीच्या गळ्यात नरमुंडमाला आहे. देवीच्या पायतळी शिवाची मूर्ती आहे.
रामकृष्ण परमहंस हे ज्या दक्षिणेश्वर मंदिरातील कालीची उपासना करीत असत, त्या मूर्तीशी या कालीबाडीतील मूर्तीचे साम्य आहे. मूर्तीच्या समोर डावीकडे शिवलिंग, तर उजवीकडे राधाकृष्णाची मूर्ती आहे. देवीच्या मखराच्या डाव्या बाजूस भिंतीवर रामकृष्ण परमहंस आणि सत्यनारायण यांची प्रतिमा लावलेली आहे. उजवीकडे भिंतीवर शारदामणी माता आणि शनीची प्रतिमा आहे.
कालीबाडीमध्ये सकाळी ६ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या कालावधीत भाविक देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात रोज रात्री ८ वाजता देवीची महाआरती होते. या मंदिरात बंगाली नववर्ष (पोईला बैसाख – वैशाखाचा प्रथम दिन), १७ मे रोजी मंदिर स्थापना दिन, ‘अंबुबाची प्रवृत्ती’ आणि ‘अंबुबाची निवृत्ती’ (कामाख्या देवीच्या मासिक पाळीचा काळ, आषाढ कृष्ण सप्तमी व नवमी), जन्माष्टमी, राधाष्टमी, कोजागिरी लक्ष्मीपूजा, जगधात्री पूजा, महाशिवरात्री, होळी आदी उत्सव संपूर्ण धार्मिक रीतीरिवाजांनुसार साजरे केले जातात. मंदिरातील सर्वांत मोठे उत्सव म्हणजे नवरात्रोत्सवातील दुर्गापूजा आणि कार्तिक अमावस्येस येणारी कालीपूजा. हे दोन्ही उत्सव येथे अत्यंत उत्साहात आणि धार्मिक परंपरेनुसार साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी मंदिरात खास सजावट केली जाते. सर्वत्र विद्युत रोषणाई केली जाते. या काळात हा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो.