तमिळ भाषेत ‘थिरू’ म्हणजे पवित्र किंवा शुभ. थिरूचेंबूर म्हणजे पवित्र चेंबूर. साष्टी (सालसेत) बेटांवर वसलेला चेंबूरचा परिसर हा पूर्वी निसर्गरम्य आणि डोंगर-टेकड्यांनी व्यापलेला होता. हा परिसर पवित्र मानून ‘श्री सुब्रमण्य समाज’ या संस्थेने ऐंशीच्या दशकात येथे मुरुगन (कार्तिकेय) या आपल्या आराध्य दैवताचे मंदिर उभारले. द्रविड स्थापत्यशैलीत उभारलेले हे मंदिर मुंबईतील तमिळ आणि अन्य दाक्षिणात्य भाविकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. या मंदिरवास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे या बहुमजली इमारतीच्या शीर्षभागात मुख्य गर्भगृह वसलेले आहे. दरवर्षी येथे थाईपुसम उत्सवाला अलोट गर्दी होते.
दक्षिण भारतात प्रामुख्याने मुरुगन या नावाने पूजली जाणारी ही देवता स्कंद, कुमार, षडानन, षण्मुख, अंगार, सेनानी, देवसेनापती, अग्निभू, द्वादशकर, गुह, गंगा-पुत्र, महासेन, शक्तिधर, सिद्धसेन आणि विशाख या नावांनीही ओळखली जाते. शिव आणि पार्वतीचा पुत्र, देवसेनेचा सेनापती आणि तारकासुराचा संहार करणारा पराक्रमी देव ही त्याची पौराणिक ओळख आहे. कार्तिकेयाचा स्पष्ट उल्लेख प्रारंभीच्या वैदिक साहित्यात आढळत नाही. मात्र इ.स.पूर्व ८०० ते ३०० या उत्तर वैदिक काळातील ‘अथर्ववेद’, ‘शतपथ ब्राह्मण’, ‘छांदोग्य उपनिषद’ यांसारख्या ग्रंथांमध्ये कुमार किंवा स्कंदाचे उल्लेख आढळतात. या काळात तो युद्धाशी संबंधित देवता मानला गेला. दक्षिण भारतात मात्र तो विद्येचा देव मानला गेला. ‘महाभारत’ तसेच ‘रामायण’ या ग्रंथात कार्तिकेयाच्या विविध पौराणिक कथा सांगण्यात आल्या आहेत. देवांचे सेनापतीपद करून त्याने तारकासुर व सूरपद्म या दैत्यांचा वध केल्याच्या कथा ‘पद्म पुराण’, ‘मत्स्य पुराण’ आदी पुराणांत तसेच ‘महाभारतात’ आहेत. काही कथांत तो ब्रह्मचारी असल्याचे, तर काही कथांत त्याच्या देवसेना व वळ्ळी या पत्नी आणि शाख, विशाख व नैगमेय हे पुत्र असल्याचे म्हटले आहे.
कार्तिकेय हा युद्धाशी संबंधित देव असल्यामुळे अनेक राजघराण्यांनी त्याला आपले कुलदैवत मानल्याचे दिसते. इ.स.पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकात सतलज आणि यमुना यांच्यामधील प्रदेशांवर (सध्याचा लुधियाना, अंबाला, कर्णाल, रोहटक आणि हिस्सार) यौधेयांचे गणराज्य होते. कार्तिकेय ही त्यांची कुलदेवता होती. त्यांच्या नाण्यांवर षडानन कार्तिकेय विराजमान होता. इ.स.च्या पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यान कुषाण साम्राज्याच्या नाण्यांवरही ‘स्कंदो-कुमारो’ या नावाने त्याचे चित्रण होते. विशेषतः सम्राट कुमारगुप्त प्रथम (सु. इ.स. ४१५–४५५) याने आपल्या नावातूनच या देवतेशी असलेले नाते अधोरेखित केले होते. त्याच्या नाण्यांवर मोरासह कार्तिकेयाचे चित्र आढळते. गुप्तकालात कार्तिकेयाची स्वतंत्र मंदिरे उभारली गेल्याचे पुरावे आहेत. गुप्तकालानंतर उत्तर भारतातील कार्तिकेयाची स्वतंत्र उपासना कमी होत गेली आणि त्याच्या स्वतंत्र मंदिरांची उभारणीही दुर्मीळ होत गेली. याच काळात दक्षिण भारतात मात्र कार्तिकेयाची उपासना जोमाने सुरू झाली. तमिळ परंपरेतील संगमकालीन साहित्यावरून साधारण इ.स.पूर्व ३०० ते इ.स. ३०० या कालखंडात मुरुगन ही देवता अत्यंत लोकप्रिय असल्याचे दिसते. ‘तिरुमुरुगात्रुप्पडै’ या संगमकालीन काव्यात मुरुगनाचे विस्तृत वर्णन आढळते.
अनेक आधुनिक धर्मइतिहासकारांच्या मते मुरुगन ही मूळची तमिळ प्रदेशातील स्थानिक देवता असावी. पुढे तिचे वैदिक-पुराणकालीन स्कंदाशी एकरूपीकरण झाले आणि आजचा कार्तिकेय किंवा सुब्रह्मण्य या संमिश्र स्वरूपात विकसित झाला. इ.स. ८५० ते १२७९ या काळात चोल राजांनी मुरुगन उपासनेला मोठा राजाश्रय दिला. त्यानंतर पांड्य आणि विजयनगर राजवटींनीही ही परंपरा अधिक समृद्ध केली. तमिळनाडूमधील ‘आरुपडै वीडू’ म्हणून प्रसिद्ध असलेली मुरुगनाची सहा प्रमुख मंदिरे आजही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. पलानी मुरूगन मंदिर (जि. डिंडीगुल), थिरूचेंदूर सुब्रमण्य स्वामी मंदिर (तुतिकोरीन), थिरुपरनकुंड्रम मुरुगन मंदिर (मदुरै), स्वामीमलाई स्वामनाथ स्वामी मंदिर (कुंभकोणम), थिरूथानी मुरूगन मंदिर (थिरूवल्लूर) आणि पळामुदिरचोलाई मुरूगन मंदिर (मदुरै) ही ती मंदिरे होत. दक्षिण भारतात मुरुगन हा केवळ शिवपुत्र नसून स्वतंत्र देवता, रक्षक आणि ज्ञानदाता म्हणून पूजला जातो.
चेंबूर येथील थिरुचेंबूर मुरुगन मंदिराचा आणि या देवस्थानाची व्यवस्था पाहणाऱ्या सुब्रमण्य समाजाचा इतिहास विसाव्या शतकाच्या मध्यापासून सुरू होतो. सन १९४० च्या दशकात दक्षिण भारतातून रोजगाराच्या निमित्ताने आलेले अनेक तमिळ भाषिक नागरिक मुंबईतील माटुंगा परिसरात स्थलांतरित झाले होते. माटुंगा हा त्या काळी मुंबईचा ‘मिनी मद्रास’ (छोटा मद्रास) म्हणून ओळखला जात असे. या स्थलांतरित नागरिकांनी आपली धार्मिक आणि सांस्कृतिक पाळेमुळे टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी माटुंगा येथील ‘विम्को लक्ष्मण’ या नावाने लोकप्रिय असलेल्या टी. व्ही. लक्ष्मणन यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन तमिळ भाविक विविध धार्मिक कार्यक्रम करीत असत.
यातूनच सुब्रमण्य समाजाची मुहुर्तमेढ रोवली गेली. एप्रिल १९४५ मध्ये या संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्या काळात संस्थेकडे स्वतःची जागा नव्हती. त्यामुळे माटुंगा येथील ‘श्री शंकर मठम्’ आणि ‘साऊथ इंडियन भजन समाज’ यांच्या जागेचा वापर ‘स्कंद षष्ठी’, ‘थाईपुसम’ आणि ‘पंगुनी उथिरम’ यांसारखे सण व उत्सव साजरे करण्यासाठी केला जात असे.
पुढे संस्थेने चेंबूरमधील छेडानगर येथील सलग तीन भूखंड मंदिराच्या उभारणीसाठी निश्चित केले. त्यावेळी ‘अष्टमंगल प्रशनम’ (दैवी कौल घेण्याचा विशेष तांत्रिक विधी) यामधून एक विशेष माहिती समोर आली. प्राचीन काळात छेडानगरच्या या परिसरात घनदाट जंगल होते. येथे अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली होती. त्यामुळे हे स्थान मुरुगन मंदिरासाठी पवित्र मानले गेले. मंदिराचे ‘थिरूचेंबूर’ हे विशेषण त्यातूनच आले.
सप्टेंबर १९७२ मध्ये कांची कामकोटी पीठाचे ६८ वे आचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा पायाभरणी समारंभ करण्यात आला.
मंदिराचा ‘पंच शिलान्यासम’ महाराष्ट्राचे तत्कालीन विधानपरिषद सभापती वि. स. पागे, मुंबईचे माजी शेरीफ प्रा. टी. व्ही. रामानुजम, तमिळ विद्वान कि. वा. जगन्नाथन, ‘श्रीमद् भागवत’चे गाढे अभ्यासक अंजम माधवन् नंबुद्रि आणि ‘भारतीय विद्या भवन’चे संचालक एस. रामकृष्णन या मान्यवरांच्या हस्ते पार पडला. आगमशास्त्राच्या नियमांनुसार येथे मुख्य मंदिरापूर्वी एका ‘बाललायम’ (तात्पुरते लहान मंदिर) उभारण्यात आले. या बाललायममध्ये ५ फेब्रुवारी १९७३ रोजी भगवान मुरुगन, भगवान विनायक आणि अय्यप्पा यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराच्या बांधकामात राष्ट्रीय एकात्मतेचे एक अनोखे दर्शन घडते. वास्तुविशारद सी. एस. के. राज यांनी मंदिराचे वास्तुशिल्पीय नियोजन केले. ख्रिश्चनधर्मीय वास्तुविशारद सी. एस. के. राज यांनी मंदिराची रचना केली, तर बोहरा मुस्लिमधर्मीय अब्बास जुसदानवाला यांनी या रचनेला तमिळनाडूतील प्राचीन मंदिरकलेशी जोडण्याचे तांत्रिक काम केले. या मंदिराच्या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे ते बहुमजली आहे. त्याचा १०८ पायऱ्यांचा सोपान चढून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो. हे गर्भगृह मंदिराच्या टेरेसवर आहे. आगमशास्त्रात मंदिराचे गर्भगृह थेट जमिनीशी जोडलेले असावे, हा कडक नियम आहे.
तो पाळण्यासाठी या इमारतीमध्ये जमिनीपासून वरपर्यंत काँक्रीटचे अवाढव्य विहिरीच्या आकाराचे खांब उभारण्यात आले व त्यावर गर्भगृहाचा पाया रचण्यात आला. २४ जानेवारी १९८० रोजी या नवनिर्मित मंदिराचा पहिला महाकुंभाभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर १२ डिसेंबर १९९१ रोजी दुसरा, २७ मार्च २००० रोजी तिसरा महाकुंभाभिषेक पार पडला. सर्वांत अलीकडचा आणि चौथा महाकुंभाभिषेक टाटा सन्सचे तत्कालीन अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखालील मंदिर उत्सव समितीच्या नेतृत्त्वाखाली ६ एप्रिल २०२२ रोजी पार पडला.
हे मंदिर चार मजली उंच आणि भव्य स्वरूपाचे आहे. त्याच्या बांधकामात द्रविड स्थापत्यशैलीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. मंदिरास उंच राजगोपुरम आहे. त्यावर विविध स्तरांमध्ये देवतांच्या, ऋषींच्या, यक्ष-गंधर्वांच्या तसेच पौराणिक प्रसंगांच्या रंगीत शिल्परचना केलेल्या आहेत. मंदिराच्या प्राकाराला उंच प्रवेशद्वार आहे. येथील उतरत्या छपराच्या उंच पोर्चमधून मंदिराच्या तळमजल्यावर प्रवेश होतो. त्यास दगडी बांधकामाचे उंच प्रवेशद्वार आहे. या तळमजल्यावर समोरच्या भिंतीवर खालच्या बाजूस कोरीव देवकोष्टकात तमिळनाडूतील शैव संत अरुणागिरीनाथर यांची मूर्ती आहे. इसवी सनाचे १४ वे शतक हा त्यांचा काळ होता. त्यांचा मुरुगनस्तुतीपर ‘थिरुप्पुगल’ हा काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे.
याच्या वरच्या बाजूस मोठा शिल्पपट आहे. त्यात भगवान मुरुगन आणि माता वल्ली यांचा पाणिग्रहण सोहळा शिल्पांकित केलेला आहे. पौराणिक कथेनुसार, वल्लीी ही दक्षिण भारतातील एका वन्य जमातीच्या नंबिराजन नामक राजाची कन्या होती. या शिल्पपटामध्ये नवरदेवाच्या रूपात मुरुगन डाव्या बाजूला आणि वधूच्या रूपात वल्ली उभी आहे. दाक्षिणात्य मूर्तिकलेच्या परंपरेनुसार वल्लीची मूर्ती येथे हरितवर्णात साकारलेली आहे. याशिवाय या शिल्पपटात राजा नंबिराजन, वल्लीचे बंधू, तिच्या सख्या, विवाह होम करताना पुरोहित अशी शिल्पे आहेत. वरच्या बाजूस शंकर-पार्वती, ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी यांचीही शिल्पे आहेत. याच्या शेजारी एक भव्याकार शिल्पपट आहे. त्यात मुरुगन आणि माता देवसेना यांचा विवाह सोहळा (‘देवसेना कल्याणम्’) साकारलेला आहे. त्यातील मध्यभागी असलेल्या विवाह मंडपात मुरुगन देवसेनेचे पाणिग्रहण करीत आहेत. तिच्या उजवीकडे तिचे पिता देवराज इंद्र हाती सुवर्ण कलश घेऊन ‘कन्यादान’ विधी करत आहेत. मंडपाच्या एका बाजूला मुरुगन यांचे माता-पिता शिव आणि पार्वती आहेत.
त्यांच्या बाजूला सरस्वती आणि ऋषीच्या वेशातील नारद आहेत. दुसऱ्या बाजूला विष्णू आणि लक्ष्मी उभी आहे. अगदी उजव्या कोपऱ्यात इंद्राचे वाहन असलेला ऐरावत हत्ती आहे. मंडपाच्या तळभागी विवाहाचे पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या बाजूला मुरुगनाचा ज्येष्ठ बंधू गणेश विराजमान आहे. स्कंद पुराणातील पौराणिक कथेनुसार, तारकासूर आणि सूरपद्म या अत्यंत बलाढ्य राक्षसांनी देवलोकावर आक्रमण करून देवांना पळवून लावले. तेव्हा मुरुगनाने देवांचे सेनापतीपद स्वीकारले आणि राक्षसांचा पूर्ण संहार केला. त्याने इंद्राला त्याचे सिंहासन परत मिळवून दिले. तेव्हा कृतज्ञता म्हणून, देवराज इंद्राने आपली कन्या ‘देवसेना’ हिचा विवाह मुरुगन यांच्याशी लावून दिला. तमिळनाडूतील थिरुपरनकुंड्रम या डोंगराळ भागात हा दिव्य विवाह सोहळा वैदिक पद्धतीने पार पडल्याची आख्यायिका आहे.
या दालनात मुरुगन, देवसेना आणि वल्ली यांची भव्य अशी प्रतिमा, तसेच पितळी मूर्ती विराजमान आहेत. तळमजल्याच्या या दालनातून मुख्य मंदिराकडे जाणारा सोपान आहे. या सोपानाच्या संगमरवरी पायऱ्या विविध प्रकारच्या रांगोळ्यांनी सजवलेल्या आहेत.
सोपानाच्या कठड्यांवर गजरांग आहे. तसेच भिंतींवर ठिकठिकाणी भगवान मुरुगनाची विविध रूपे, ‘षट कार्तिककन्या’, शिव-पार्वती, ‘नववीर’, ‘गजमुखासूर’ अशी रंगीत विविध उठावशिल्पे लावलेली आहेत. हा १०८ पायऱ्यांचा सोपान चढून वर आल्यानंतर इमारतीच्या शीर्षभागातील मंदिराच्या मुख्य प्राकारात प्रवेश होतो.
या प्राकाराला भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे. त्याच्या बाजूला असलेल्या कोरीव स्तंभांलगतच्या दगडी चौथऱ्यावर नटराज मुद्रेतील द्वारपालांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गजलक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे. प्रवेशद्वाराला भक्कम असा शिसवी लाकडाचा जुन्या पद्धतीचा दरवाजा आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात गोपूर आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच समोरच उंच चकचकीत पितळी ध्वजस्तंभ आहे. समोरच विस्तीर्ण अशा सभामंडपात मध्यभागी मंदिराचे मुख्य गर्भगृह स्थित आहे. त्याच्या पुढे देवाचे वाहन असलेला मोर आणि कुक्कुट यांचे धातूशिल्प आहे. हे गर्भगृह व येथील अन्य देवालये ग्रॅनाइट पाषाणात बांधलेली आहेत. त्यासाठीचा पाषाण खास महाबलीपुरम येथून आणण्यात आला होता.
उभ्या स्वरूपातील ही मूर्ती द्विभुज आहे. मूर्तीच्या उजव्या हातात पार्वतीने दिलेला सुवर्णमंडीत ‘वेल’ (भाला) आहे, तर डावा हात कंबरेवर आहे. सुवर्णमुकूट, मौल्यवान हार आणि दाक्षिणात्य पद्धतीची रेशमी वस्त्रे यांनी मूर्तीला शृंगारले आहे. मूर्तीच्या मागे चांदीचे नक्षीदार मखर आहे. त्याच्या वरच्या बाजूला एक भव्य चांदीची प्रभावळ आहे. या प्रभावळीवर मोराची पिसे आणि सूर्यकिरणांची आकृती कोरलेली आहे. या प्राकारात मुख्य देवस्थानाबरोबरच गणपती, दुर्गा, गुरुवायूरप्पन, धर्मशास्ता (अय्यप्पा), दक्षिणामूर्ती, अंजनेय (हनुमान), शिव, नटराज आणि नवग्रह यांची स्वतंत्र देवस्थाने उभारलेली आहेत. सभामंडपाच्या भिंतींमधील देवकोष्टकांत अष्टलक्ष्मीच्या मूर्ती आहेत.
या मंदिराचे दैनंदिन वेळापत्रक तमिळनाडूतील आगमशास्त्राच्या नियमांनुसार चालते. मंदिरात सकाळी ५.३० ते दुपारी १२.०० आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री ९ या काळात भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे सकाळी ६ वाजता उषःकालपूजा आणि आरती होते. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता कालशांतीपूजा केली जाते. दुपारची मुख्य आरती म्हणजेच उचिकालापूजा दुपारी ११.३० वाजता होते. संध्याकाळी ६.३० वाजता सायंरक्षापूजा म्हणजेच संध्याकाळची महाआरती होते. यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. रात्रीची शेवटची पूजा म्हणजेच अर्थजामापूजा ८:३० वाजता केली जाते.
मंदिरात वर्षभर तिथीनुसार पारंपरिक पद्धतीने विविध उत्सव साजरे केले जातात. येथील सर्वात मोठा वार्षिकोत्सव म्हणजे ‘थाईपुसम’ होय. हा सण तमिळ महिन्यातील ‘थाई’ म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील पुष्य नक्षत्राच्या दिवशी येतो. या दिवशी भगवान मुरुगन यांना राक्षसाचा पराभव करण्यासाठी पार्वतीने वेल (भाला) दिला होता. या उत्सवाच्या दिवशी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविक कडक उपवास करून अंगावर सुया टोचून, खांद्यावर कावड घेऊन येथे दर्शनासाठी येतात. येथील दुसरा महत्त्वाचा उत्सव म्हणजे ‘स्कंद षष्ठी’ होय. हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत सलग सहा दिवस चालतो. षष्ठीच्या दिवशी मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर ‘सूरसंहारम’ (मुरुगनाने केलेला सूरपद्म दैत्याचा वध) हा प्रसंग नाट्यरूपात सादर केला जातो. चैत्रात येणाऱ्या ‘पंगुनी उथिरम’ या तिथीला भगवान मुरुगन आणि देवी वल्ली यांचा विवाह सोहळा म्हणजेच ‘कल्याण उत्सवम’ अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. मार्गशीर्षात ‘कार्तिकई दीपम’ या सणाच्या दिवशी संपूर्ण मंदिर आणि गोपुरावर हजारो मातीचे दिवे लावले जातात. तसेच दर महिन्याला येणाऱ्या कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी मंदिरात विशेष अन्नाभिषेकम (मूर्तीला शिजवलेल्या भाताचा लेप देण्याचा विधी) आणि पालखी सोहळा आयोजित केला जातो. नवरात्रातील नऊही दिवस येथे चंडीहोम केला जातो.