जोगेश्वरी गुंफा मंदिर,

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

महाराष्ट्रातील ‘पहिले हिंदू लेणे’ ही जोगेश्वरी लेण्यांची महत्त्वाची ओळख होय. घारापुरी येथील मुख्य लेण्याशी साम्य असलेल्या या जोगेश्वरी लेण्यांची निर्मिती सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी झालेली आहे. मुंबई शहराच्या प्राचीन वास्तुकलेचा वारसा असलेली ही लेणी प्राचीन काळात आंबोली या गावाच्या हद्दीत येत होती. त्यामुळे जुन्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये या लेण्यांचा उल्लेख ‘आंबोली लेणी’ असाही आढळतो. हे मंदिर सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून संरक्षित आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजेच १८८० मध्ये, जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी ‘द केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकात त्यांनी जोगेश्वरी लेण्यांच्या रचनेचे, तेथील खांबांचे आणि शिल्पकलेचे अतिशय सूक्ष्म मोजमाप व तपशील नोंदवले आहेत. कला इतिहासकार प्रा. वॉल्टर स्पिंक यांनीही आपल्या ‘अजिंठा टू एलोरा’ या पुस्तकात जोगेश्वरी लेण्यांच्या वास्तुरचनेचे सखोल विश्लेषण केलेले आहे. वॉल्टर स्पिंक यांच्या म्हणण्यानुसार, या लेण्यांची निर्मिती इसवी सनाच्या सहाव्या शतकात, साधारणपणे इ.स. ५२० ते ५५० च्या दरम्यान झाली असावी. हा कालखंड वास्तुकलेच्या दृष्टीने अजिंठा-वेरूळ आणि घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेण्यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो.

या लेण्यांचा एक जुना उल्लेख इ.स. १७८४ मधील आहे. प्रख्यात पुरातत्त्ववेत्ते विल्यम हंटर यांनी ‘आंबोली गुंफा’ असा त्यांचा उल्लेख केला होता. तेथील बहुतांश शिल्पे आधीच विद्रुप झालेली होती व गुंफेच्या आतील मुख्य गाभाऱ्यात पूजा-अर्चा सुरू होती असे त्यांनी ‘आर्किलॉजिया’च्या सातव्या खंडातील आपल्या लेखात नमूद केले आहे. सन १८०२ मध्ये जॉर्ज व्हॅलेंटिया यांनी या गुंफेस भेट दिली होती. ‘व्होयाज अँड ट्रॅव्हल्स टू इंडिया अँड सिलोन’ या पुस्तकात त्यांनी याची माहिती दिली आहे. येथील मुख्य सभागृहाच्या आतील मध्यवर्ती गाभाऱ्यात एक शिवलिंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून ही गुंफा महादेवाला समर्पित होती असे स्पष्ट होते. ‘कल्चरल हेरिटेज ऑफ मुंबई’ या ग्रंथात डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनीही, ‘प्राचीन काळी गाभाऱ्यात शिवलिंग असावे, परंतु आता त्यात एका देवीची स्थापना केल्यामुळे त्याला जोगेश्वरी नाव पडले’, असे म्हटले आहे.

घारापुरीप्रमाणेच जोगेश्वरी लेणीही प्रामुख्याने शैव पंथाची, त्यातही विशेषतः पाशुपत संप्रदायाची आहेत. लेण्यांतील लकुलीशाच्या मूर्तीवरून ती पाशुपतांची तीर्थस्थळे होती हे सिद्ध झाले आहे. त्या काळात महाराष्ट्रात कलचुरींची राजवट होती. येथे राज्य करणाऱ्या कलचुरी घराण्याची शाखा ही मूळची महेश्वर उर्फ महिष्मतीची. कृष्णराज (इ.स. ५५० ते ५७०) हा या शाखेचा संस्थापक. त्याची चांदीची नाणी ‘कृष्णराज-रूपक’ म्हणून ओळखली जात. त्यातील काही नाणी मुंबईच्या काळबादेवी-ठाकुरद्वार परिसरात सापडली होती. यावरून या बेटांवर त्याची सत्ता होती, हे स्पष्ट झाले आहे. हे कलचुरी पाशुपत पंथाचे उपासक होते.

ही लेणी एका मोठ्या प्रस्तरामध्ये, म्हणजेच काळ्या खडकात कोरलेली आहेत. या लेण्यांची एकूण लांबी आणि रुंदी समकालीन इतर लेण्यांच्या तुलनेत खूप मोठी आहे. जोगेश्वरी लेण्यांची रचना इतर अनेक लेण्यांपेक्षा वेगळी आहे. ही लेणी जमिनीच्या पातळीपासून खाली एका मोठ्या खडकात खोलवर खोदलेली आहेत. लेण्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मोठा आणि लांब रस्ता आहे. हा रस्ता खडकात काटकोनात कापून तयार केलेला आहे. लेण्यांच्या मध्यभागी विस्तीर्ण असा सभामंडप आहे. याला महामंडप असे म्हणतात. महामंडपाच्या चारही बाजूंना भव्य खांबांच्या रांगा आहेत. हे खांब वास्तुरचनाशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांच्या वरच्या भागावर पूर्ण उमललेले आमलकाकृती नक्षीकाम आहे. या रचनेला वास्तुकलेच्या भाषेत ‘कुशन कॅपिटल’ असे म्हणतात. हे गुप्त आणि वाकाटककालीन कलेचे वैशिष्ट्य आहे. या खांबांची रचना अतिशय प्रमाणबद्ध असून ते संपूर्ण छताचा प्रचंड भार पेलून धरतात. याच खांबांची प्रगत आणि अधिक देखणी रूपे पुढे घारापुरी येथील लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. यामुळे जोगेश्वरीची लेणी ही घारापुरी लेण्यांची पूर्वसुरी म्हणजेच नांदी मानला जातो.

महामंडपाच्या अगदी मध्यभागी मुख्य गर्भगृह आहे. हे गर्भगृह ‘सर्वतोभद्र’ पद्धतीचे आहे, म्हणजेच या गर्भगृहाला चारही बाजूंनी दरवाजे आहेत. सध्या या गर्भगृहात जोगेश्वरी देवी विराजमान आहे. ही देवी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अनेक स्थानिक रहिवासी कुटुंबांची आणि विशेषतः पाठारे प्रभू समाजाची कुलदेवता मानली जाते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आणि पूर्व दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेली शिल्पे अतिशय महत्त्वाची आहेत. पाशुपत संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक लकुलीश शिव यांचे शिल्प येथे कोरलेले आहे.

पशुपती अथवा शिवास उपास्य दैवत मानणाऱ्या पाशुपत पंथाचा प्रसार गुजरात-राजस्थानच्या भूमीतून झाला असे मानले जाते. लकुलीश हे या पंथाचे अध्वर्यू मानले जातात. सृत्युगात ‘इच्छापुरी’, त्रेतायुगात ‘मायापुरी’, द्वापरयुगात ‘मेघावती’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या कायावरोहण (ता. डभोई, जि. वडोदरा) या गावामध्ये इ.स. पूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा दुसऱ्या शतकात आचार्य लकुलीश यांचा जन्म झाला. ते भगवान शिवाचे अंतिम, २८वे अवतार मानले जातात. लकुलीश यांनी वेदाकाळापासूनची प्राचीन परंपरा असलेल्या शैव संप्रदायाची सुसूत्रपणे मांडणी केली. याला ‘आगमान्त संप्रदाय’ असेही म्हणतात. या संप्रदायामध्ये शिवअवतार लकुलीशाची मूर्तीरूपात पूजा केली जाते. पद्मासनात बसलेला, जननेंद्रिय उत्थित असलेला, उजव्या हातात महाळुंग व डाव्या हातात दंड धारण केलेला असे लकुलीशाचे मूर्तीरूप असते, तर पशुपतीनाथ हा शिवलिंग स्वरूपात पूजला जातो. येथील शिल्पात भगवान शिव कमळाच्या आसनावर पद्मासनात बसलेले दाखवले आहेत. त्यांच्या हातात एक लकुट म्हणजेच दंड आहे. त्यांच्या अवतीभवती त्यांचे शिष्य हात जोडून बसलेले दिसतात. हे शिल्प जोगेश्वरी लेण्यांचे पाशुपत संप्रदायाशी असलेले नाते सिद्ध करते.

जोगेश्वरी लेण्यांमध्ये कोरलेले दुसरे एक महत्त्वाचे शिल्प म्हणजे ‘अंधकासुरवध’ होय. या शिल्पात भगवान शिव अत्यंत क्रुद्ध रूपात अंधकासुराचा वध करताना दाखवले आहेत. शिवाच्या एका हातात त्रिशूळ आहे आणि त्यांनी तो अंधकासुराच्या छातीत खुपसला आहे. पौराणिक कथेनुसार, अंधकासुराच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडल्यास त्यातून नवीन राक्षस निर्माण होत असत. त्यामुळे शिवाच्या शेजारीच चामुंडा देवी एका पात्रात ते रक्त गोळा करताना दाखवली आहे. शिवाच्या पाठीवर गजासुराचे म्हणजेच हत्तीचे कातडे कोरलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि शरीराची ठेवण अतिशय जिवंत भासते. काळाच्या ओघात आणि पाण्याच्या साठ्यामुळे या शिल्पाची बरीच पडझड झाली असली, तरीही त्यातील बारकावे आजही स्पष्टपणे जाणवतात. हे शिल्प शैव कल्पनेतील शिवाच्या संहारक रूपाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

तसेच शिव-पार्वती विवाह म्हणजेच ‘कल्याणसुंदरमूर्ती’चे शिल्पही या लेण्यांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. या शिल्पात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा प्रसंग कोरलेला आहे. विवाहाचे विधी करणारे ब्रह्मदेव आणि साक्ष म्हणून उभे असलेले इतर देव व दिग्पाल यात पाहायला मिळतात. शिवाचा उजवा हात पार्वतीच्या हातात असलेला हा प्रसंग कुशलतेने पाषाणात जिवंत केलेला आहे. या शिल्पातील पात्रांच्या चेहऱ्यावरील भाव, त्यांचे अलंकार आणि वस्त्रप्रावरणे यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे आहे. याशिवाय लेण्यांच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात ‘रावणानुग्रह’ शिल्प कोरलेले आहे. या शिल्पात रावण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करताना आणि शिव आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत दाबून रावणाचे गर्वहरण करताना दाखवले आहेत. या शिल्पाच्या बाजूलाच नटराज शिव म्हणजेच नृत्य करणाऱ्या शिवाचे शिल्प आहे. यात शिवाच्या विविध मुद्रा आणि नृत्यहस्त कोरले आहेत.

आधुनिक काळात या लेण्यांचा पद्धतशीर अभ्यास करणारे इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ डॉ. सूरज पंडित आणि अरुण नारायणन यांचे ‘स्टोरीज इन स्टोन : हिस्टॉरिक केव्ह्ज ऑफ मुंबई’ हे पुस्तक विश्वसनीय मानले जाते. या पुस्तकात जोगेश्वरी लेण्यांमधील शिल्पकला, त्यांचा नेमका कालखंड आणि मुंबईच्या प्राचीन व्यापारी मार्गांशी असलेला त्यांचा संबंध यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्यांच्या मते, जोगेश्वरी लेण्यांची निर्मिती केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कारणासाठी झाली नव्हती. त्याला एक मोठा आर्थिक आणि भौगोलिक संदर्भ होता. प्राचीन काळी सोपारा आणि कल्याण ही कोकणातील अतिशय महत्त्वाची आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदरे होती. या बंदरांवरून येणारा माल देशावर म्हणजेच घाटावर पाठवण्यासाठी पैठण, जुन्नर आणि नाशिककडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांचा वापर केला जाई. याच मार्गावर कान्हेरी, मागाठणे, जोगेश्वरी आणि महाकाली या लेण्यांची एक साखळी निर्माण झाली होती. व्यापारी आणि प्रवाशांना मुक्कामासाठी, विश्रांतीसाठी आणि सुरक्षेसाठी या लेण्यांचा उपयोग होत असे. जोगेश्वरी लेणी या व्यापारी मार्गावरील एक मुख्य केंद्र होती. यामुळे या लेण्यांच्या निर्मितीसाठी व्यापारी आणि तत्कालीन सत्ताधीशांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य केले होते. या लेण्यांमधील भव्यता आणि विस्तीर्णता तेथील समृद्ध आर्थिक स्रोतांची साक्ष देते.

या लेण्यांच्या मुख्य महामंडपाच्या बाजूला असलेल्या खोल्या आणि ओसऱ्या बौद्ध लेण्यांच्या विहार पद्धतीशी मिळत्याजुळत्या असल्याचे दिसून येते. परंतु त्यांचे रूपांतर हिंदू मंदिराच्या रचनेत अतिशय कौशल्याने करण्यात आले आहे. लेण्यांच्या आतमध्ये प्रकाश येण्यासाठी छताला आणि बाजूंना विशिष्ट पद्धतीची छिद्रे व मोकळ्या जागा सोडल्या आहेत. यामुळे सूर्यप्रकाशाचा कवर्डसा थेट गर्भगृहाच्या किंवा महामंडपाच्या विशिष्ट भागांवर पडतो. मुख्य मंदिराव्यतिरिक्त येथे काही लहान उप-लेणी आणि पाण्याचे टाके देखील कोरलेले आहेत. बेसाल्ट खडकाच्या कमकुवत दर्जामुळे, आर्द्र हवामानामुळे आणि आसपासच्या तीव्र नागरीकरणामुळे साठणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे येथील अनेक शिल्पे झिजली आहेत. काही भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाळ्यात लेण्यांमध्ये पाणी साचण्याच्या समस्येमुळे तेथील पाषाणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जोगेश्वरीच्या गजबजलेल्या परिसरात ही लेणी स्थित आहेत. लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला दीपस्तंभ आहेत. यापैकी उजवीकडील दीपस्तंभाच्या खाली असलेल्या एका देवळीत गणपतीची मूर्ती आहे. डावीकडील दीपस्तंभाजवळ लेण्यांसंदर्भातील माहितीचे शिलालेख कोरलेले आहेत. येथून सुमारे ५० मीटर अंतराचा लेण्यांकडे जाणारा मार्ग हा दोन्ही बाजूने दगडांत काटकोनात कोरलेला आहे. प्रवेशद्वारापासून सुमारे १३ पायऱ्या उतरून या गुहेच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात सर्व बाजूंनी मोठे स्तंभ आहेत व मध्यभागी जोगेश्वरी देवीचे ‘सर्वतोभद्र’ पद्धतीचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर सभामंडपात हवनकुंड आहे. चार पायऱ्या चढून उंचावर असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर विविध शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर जोगेश्वरी देवीची मूर्ती आणि पादुका आहेत. देवीच्या मुख्य स्थानाव्यतिरिक्त या लेण्यांमध्ये महादेव, गणपती व हनुमान यांची स्वतंत्र गर्भगृहे आहेत.

या ऐतिहासिक जोगेश्वरी गुंफा मंदिरामध्ये वर्षभरात प्रामुख्याने महाशिवरात्री, नवरात्री आणि श्रावण महिना हे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. हे गुंफा मंदिर प्रामुख्याने भगवान शिव आणि जोगेश्वरी देवीला समर्पित असल्यामुळे येथे शैव आणि शाक्त दोन्ही परंपरांचे सण साजरे होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले जाते. या दिवशी येथील शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. कलचुरीकालीन वास्तुकलेचा नमुना असलेल्या या लेण्यांमध्ये शिव-पार्वती विवाह, नटराज आणि अंधकासुरवध यांसारखी शैव पंथाची अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीला या ऐतिहासिक वास्तूला विशेष महत्त्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे आश्विन महिन्यातील नवरात्री उत्सव हा येथील दुसरा मोठा सण आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची विशेष पूजा, महाआरती आणि भजनांचे आयोजन केले जाते. याशिवाय श्रावण महिन्यात दर सोमवारी या गुंफेत विशेष गर्दी असते. संपूर्ण महिनाभर गुंफेत भजनांचे कार्यक्रम चालतात. आठवड्याचे सातही दिवस सकाळी सहा ते दुपारी एक आणि सायंकाळी साडेचार ते रात्री नऊ या वेळेत भाविकांना व पर्यटकांना या गुंफेमध्ये प्रवेश दिला जातो.

उपयुक्त माहिती

  • जोगेश्वरी रेल्वे स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • बोरिवली एस.टी. बसस्थानकापासून १२ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून येथे येण्यासाठी बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने गुंफेच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

जोगेश्वरी गुफा मंदिर,

जोगेश्वरी ईस्ट, मुंबई

Back To Home