मोतीराम महाराज समाधी मंदिर

फळा, ता. पालम, जि. परभणी

मराठवाडा या क्षेत्राला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. या प्रदेशाला ‘संतभूमी’ म्हणूनही ओळखतात. येथील मातीत अनेक थोर संत होऊन गेले. त्यापैकीच एक संत मोतीराम महाराज काकाणी हे होत. त्यांचे समाधी मंदिर परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फळा येथे गोदावरी नदीच्या काठानजीक वसले आहे. महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतली आणि अध्यात्मासोबतच मानवता व भूतदयेची शिकवण समाजाला दिली. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ भागात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. फळा येथील त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर एकादशीला हजारो भाविक येथे येतात. महाराजांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या वेळी हा सर्व परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जातो.

परभणी जिल्ह्यात आजवर अनेक संत आणि महापुरुष होऊन गेले. त्यामध्ये संत जनाबाई, भास्करभट्ट बोरीकर, रंगनाथस्वामी मोगरीकर, रंगनाथ महाराज परभणीकर, निवृत्तीबुवा ठाकूर, तुकाराम महाराज (येळेगावकर), योगानंद स्वामी महाराज, श्रीकृष्णाजी महाराज, सखाराम महाराज, शुकानंद महाराज आणि शिर्डीचे साईबाबा आदींचा समावेश होतो. या महान संत परंपरेतीलच एक असलेल्या संत मोतीराम महाराज यांचा जन्म शके १७७९ मध्ये चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी म्हणजेच ९ एप्रिल १८६७ रोजी मारवाडी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दौलतराव आणि आईचे नाव सरस्वती असे होते. मोतीराम महाराजांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांच्या कुटुंबाने गंगाखेड येथे स्थलांतर केले. परंतु काही काळातच त्यांच्या माता-पित्यांचे छत्र हरपले. त्यानंतर ते फळा या गावात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी आले. तेथे ते आपल्या मेहुण्याच्या किराणा दुकानात काम करू लागले. त्या दुकानात येणारे अनेक ग्राहक उधारीवर सामान घेऊन जात. ती उधारी वसूल करण्यासाठी मोतीराम महाराजांचे मेहुणे लोकांना शब्दांचा आणि प्रसंगी हातांचाही मार देत असत. बालपणापासूनच संतवृत्तीच्या असलेल्या मोतीराम महाराजांना ही गोष्ट मुळीच रुचली नाही. त्यामुळे त्यांनी फळा गाव सोडले आणि पुन्हा गंगाखेड गाठले. गंगाखेडला आपल्या मोठ्या भावाकडे ते राहू लागले. परंतु येथेही त्यांचे मन फार काळ रमले नाही.

काही दिवसांनी ते पंढरपूरला गेले. तेथे त्यांनी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते ठाकूरबुवा लोहगावकर यांच्या मठात निवृत्तीबुवा ठाकूर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले. निवृत्तीबुवा ठाकूर यांनी त्यांना लोहगाव येथे ठाकूरबुवा लोहगावकर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते लोहगाव येथे गेले. तेथे ठाकूरबुवा लोहगावकर यांनी त्यांना मंत्रदीक्षा दिली. तेव्हापासून वारकरी संप्रदायाची पताका हाती घेऊन त्यांनी जनप्रबोधनाचा वसा घेतला. ते अनेक भागांत पायी फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करू लागले. त्यांनी ठिकठिकाणी प्रवचन आणि कीर्तनांच्या माध्यमातून जनजागृतीही केली. आपल्या कीर्तनांमध्ये समाजातील जातीभेद, भोंदूगिरी, अंधश्रद्धा अशा अनिष्ट बाबींवर प्रहार करताना ते मानवता आणि भूतदयेची शिकवण देत. ते स्वतःही त्या विचारांचे आचरण करत असत. त्यांच्या पायाला एकदा जखम झाली होती आणि त्यात अळ्याही झाल्या होत्या. ते स्वतः स्वच्छ पाण्याने ती जखम धुवून अळ्या बाहेर काढत असत. जखम धुतल्यानंतर ते त्यातील अळ्या पुन्हा आपल्या जखमेमध्ये सोडून देत असत. या कृतीमागील संदर्भ असा की त्या अळ्यांचे अन्न हे आपल्या शरीराचे मांस आहे आणि त्यांना शरीराबाहेर काढल्यास त्या अन्नावाचून म्हणजेच भुकेने मरून जातील, अशी महाराजांची भावना होती. स्वतःला होणाऱ्या वेदनांची पर्वा न करता, त्या लहान जीवांना अन्न मिळावे आणि त्यांची भूक भागावी या भूतदयेपोटी ते असे करत असत. या अळ्यांना पुन्हा जखमेत ठेवून ते त्यांना आपले अन्न खाऊ देत, अशी त्यांच्या पराकोटीच्या कारुण्याची आणि दयाळू वृत्तीची कथा भाविकांकडून श्रद्धेने सांगितली जाते.

समाजातील व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करत मोतीराम महाराजांनी अनेकांना सन्मार्गाला आणले. मराठवाडा आणि विदर्भात त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनेक मंदिरे उभारली. ते नित्यनेमाने पंढरपूर आणि आळंदीची वारीही करत असत. मराठवाडा व विदर्भात त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. निर्वाण होण्यापूर्वी काही वर्षे आधी त्यांचे त्यांचे फळा येथे वास्तव्य होते. आपले कार्य समाप्त होत असल्याची जाणीव झाल्यावर, निर्वाणाच्या १५ दिवस आधी त्यांनी काही अनुयायांना जवळ बोलावून घेतले आणि आपण लवकरच समाधी घेणार असल्याचे जाहीर केले. याबाबतची माहिती मिळताच ठिकठिकाणचे अनुयायी फळा येथे दाखल झाले. २७ ऑगस्ट १९६४ रोजी म्हणजेच श्रावण वद्य पंचमीला असंख्य अनुयायांच्या उपस्थितीत भगवंतांच्या नामस्मरणात त्यांनी देहत्याग केला. कालांतराने फळा येथे त्यांचे समाधीमंदिर उभारण्यात आले.

गावातील प्रवेश कमानीपासून हे मंदिर काही अंतरावर स्थित आहे. समाधी मंदिराची ही वास्तू तीन मजली आहे. या वास्तूवर विविध देव-देवतांची सुंदर चित्रे रंगवण्यात आली आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी संत मोतीराम महाराजांचे समाधीस्थान आहे. या समाधीवर त्यांचा मुखवटा ठेवण्यात आलेला आहे. समाधीच्या मागील बाजूस, भिंतीलगत विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती विराजमान आहेत. या मूर्तींच्या डावीकडे आणखी महाराजांची एक मूर्ती स्थापित आहे. दूरवरून येणाऱ्या अनुयायांच्या निवासाच्या सोयीसाठी मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यात आलेले आहे. मंदिरापासून अवघ्या काही पावलांवरच गोदावरी नदीचे पात्र आहे.

संत मोतीराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दररोज असंख्य अनुयायी येतात. येथे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दर एकादशीच्या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शन घेतात. भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिराबाहेरील जागेत तसेच सभामंडपात लोखंडी रेलिंग बसवण्यात आले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थेतर्फे फराळाचीही व्यवस्था करण्यात येते. एकादशीच्या दिवशी मोतीराम महाराजांच्या मुखवट्याची पालखी काढण्यात येते. आषाढी तसेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी फळा येथून आळंदी येथे महाराजांची पालखीही जाते. मोतीराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त चैत्र शुद्ध पंचमीला तसेच पुण्यतिथीनिमित्त श्रावण वद्य पंचमीला येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात भजन, कीर्तन आणि प्रवचन आदींचा समावेश असतो. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने फळा येथे श्री संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचीही उभारणी करण्यात आली आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांना संस्कृत, गीतापाठ, भजन, कीर्तन, शास्त्रीय व सांप्रदायिक पद्धतीचे मृदुंगवादन आणि अन्य धार्मिक शिक्षण दिले जाते. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन दिले जाते.

उपयुक्त माहिती

  • पालम येथून ६ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून ३८ किमी अंतरावर
  • पालम येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८८१०९९२२८

मोतीराम महाराज समाधि मंदिर

फल, एच. पालम, जिला. परभनी

Back To Home