रामायणकाळाशी नाते सांगणारे वाल्मीकेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर या गावी आहे. या मंदिराला ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. प्राचीन काळी लूटमार करणाऱ्या वाल्या कोळीने पश्चातापदग्ध मनाने याच ठिकाणी कठोर तपश्चर्या केली, अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. तपश्चर्या करत असताना त्याच्या अंगावर मुंग्यांचे वारूळ निर्माण झाले. पुढे हाच वाल्या कोळी वाल्मीकी ऋषी म्हणून ओळखला जाऊ लागला. रामायण या महाकाव्याची रचना करणाऱ्या वाल्मीकी ऋषींनी येथे या शिवलिंगाची स्थापना केली. यामुळे या शिवलिंगाला वाल्मीकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. हे महादेव वालूर गावचे ग्रामदैवत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
लूटमारीचा व्यवसाय करणाऱ्या वाल्या कोळीने एकदा जंगलात नारद मुनींना घेरले. त्यावेळी नारदांनी त्याला मोलाचा उपदेश केला. त्यांनी वाल्याला विचारले, “तू तुझ्या कुटुंबासाठी हे पापकर्म करतोस, त्या पापात तुझे कुटुंबीय वाटेकरी होतील का?”
वाल्या कोळीन घरी जाऊन विचारले असता, कुटुंबातील एकाही व्यक्तीने त्याच्या पापात वाटेकरी होण्यास साफ नकार दिला. या घटनेमुळे वाल्या कोळीला तीव्र उपरती झाली. तो पश्चातापदग्ध मनाने या ठिकाणी आला आणि ‘राम’ मंत्राचा जप करत तपश्चर्येला बसला. ही तपश्चर्या करत असताना त्याच्या अंगावर मुंग्यांचे वारूळ चढले. कालांतराने बकदालभ्य ऋषी आपली तीर्थयात्रा आटोपून या मार्गाने जात होते. त्यांनी त्या वारुळातून उमटणारा मंत्रघोष ऐकू आला. त्यांनी तात्काळ वाल्या कोळीला त्या वारुळातून बाहेर काढले. त्यांनी वाल्याला ‘गायत्री मंत्र’ दिला आणि चारही वेदांचा अधिकार प्रदान केला. तेव्हापासून वाल्या कोळीला ‘वाल्मीकी ऋषी’ असे संबोधले जाऊ लागले. याच वाल्मीकी ऋषींनी पुढे ‘रामायण’ या महाकाव्याची रचना केली. प्रभू श्रीरामाने सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मीकी ऋषींनी तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी सीतेचे जुळे पुत्र लव आणि कुश यांचा सांभाळ केला. त्यांनी त्यांना उत्तम शिक्षण देऊन ‘रामायणा’चा पाठ पढवून घेतला, अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.
सेलू तालुक्यातील वालूर हे गाव प्राचीन संस्कृतीच्या वारशाने समृद्ध आहे. वाल्मीकी ऋषींनी या भूमीत तप केल्यामुळे या गावाला पूर्वी ‘वाल्हूर’ असे नाव होते.
पुढे कालौघात त्याचा अपभ्रंश झाला आणि ‘वालूर’ हे नाव प्रचलित झाले. पांडवकाळात पांडवांनी काही काळ या ‘वाल्हूर’ गावात मुक्काम केला होता, असाही दावा केला जातो. हा संपूर्ण परिसर ऐतिहासिक देवगिरीच्या यादवांच्या काळात राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध होता. पुढे निजामशाहीच्या काळात वालूर हे एक मोठे व्यापारी केंद्र बनले. त्या काळी मराठवाड्यातील या भागाला प्रशासकीय व्यवस्थेत ‘परगणा’ असे म्हटले जाई. या परगण्याचे मुख्य केंद्र वालूर होते. याच कारणामुळे परिसरातील ७२ गावांचा संपूर्ण कारभार या ठिकाणाहून चालत असे. त्या काळात या गावात न्यायालय, तहसील आणि कचेऱ्या यांसारखी शासकीय कार्यालये कार्यरत होती. त्यामुळे राजकारण, समाजकारण आणि धार्मिक क्षेत्रात या गावाचा नेहमीच मोठा प्रभाव राहिला आहे. वऱ्हाडातील लोणी गावाजवळील गुंधा या ठिकाणी समाधी घेतलेले लिंगायत वाणी संप्रदायाचे संत हरिहर महाराज यांचा जन्म याच वालूर गावात झाला होता. तसेच ‘कलगीतुरा’ या प्रसिद्ध लोककलेचे जनक नंदभवानी हे वालूरजवळ असलेल्या कौसडी या गावचे रहिवासी होते. वालूर गावामध्ये दोन पुरातन बारव म्हणजेच विहिरी आहेत.
यापैकी सर्पिलाकार ऐतिहासिक बारव तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीच्या रचनेमुळे प्रसिद्ध आहे. वाल्मीकेश्वर मंदिराव्यतिरिक्त या गावामध्ये हेमाडपंती स्थापत्यशैलीची इतरही प्राचीन मंदिरे आहेत. यामध्ये सिद्धेश्वर मंदिर, नगरेश्वर मंदिर, माणकेश्वर मंदिर आणि कवठेश्वर मंदिर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यासोबतच गावातील सिद्धराम बादशहा मठही भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.
वाल्मीकेश्वर मंदिर देखील पूर्वी हेमाडपंती स्थापत्यशैलीचे होते. मात्र परकीय आक्रमकांकडून या मंदिराची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली, असे सांगितले जाते. पूर्वी गावाच्या बाहेर असलेल्या या मंदिराचे आता आधुनिक पद्धतीने नूतनीकरण आणि बांधकाम करण्यात आले आहे. शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजने’अंतर्गत या मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. सध्या हे मंदिर परिसरातील शिवभक्तांचे मोठे श्रद्धास्थान बनले आहे.
या मंदिराला विस्तिर्ण परिसर लाभलेला आहे. अर्ध्या दगडी आणि अर्ध्या विटांच्या भिंती असलेला सभामंडप आणि गर्भगृह, असे या मंदिराचे सध्याचे स्वरूप आहे. मंदिराच्या समोरील प्रांगणात एक तुळशीवृंदावन आहे. या तुळशीवृंदावनाजवळ एक शिवलिंग स्थापित आहे. सभामंडपात प्रवेश केल्यावर गर्भगृहाच्या अगदी समोर महादेवाचे वाहन असलेला नंदी विराजमान आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये एका मोठ्या शाळुंकेत लंबगोलाकार शिवलिंग प्रतिष्ठित आहे. गर्भगृहाच्या मागील बाजूस एक आडवा चौथरा आहे. या चौथऱ्यावर शिवाचा मुखवटा ठेवलेला असतो. वार्षिक उत्सव आणि विशेष सणांच्या काळात हा मुखवटा पिंडीवर चढवला जातो.
या चौथऱ्याजवळील मुखवट्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीत काही मूर्ती कोरलेल्या आहेत.
वाल्मीकेश्वर मंदिराच्या आवारात प्राचीन काळातील शिल्पकलेचे अनेक अवशेष भग्नावस्थेत विखुरलेले पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने सप्तमातृकापट्टी, आसनस्थ मुद्रांमधील शिव-पार्वती, शेषशायी भगवान विष्णू आणि हात जोडलेल्या स्थितीतील गरुड यांच्या प्राचीन मूर्तींचा समावेश होतो. मंदिर परिसरातच एक प्राचीन बारव आहे. ती सध्या जवळपास बुजलेल्या अवस्थेत दिसते. मंदिराच्या मुख्य भिंतीला लागूनच भैरवदेवाची एक नग्नावस्थेतील मूर्ती आहे. या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव अत्यंत शांत आहे. या मूर्तीच्या वरच्या दोन हातांमध्ये त्रिशूळ आणि डमरू धरलेले आहेत. भैरवाच्या डोक्यावरचे केस एका मुंडमाळेने बांधलेले आहेत. त्यांच्या मस्तकाच्या मागे जळत्या ज्वालेप्रमाणे भासणारे एक प्रभामंडल कोरलेले आहे. मूर्तीचा खालचा उजवा हात भंगलेला आहे, तर डाव्या हातामध्ये त्यांनी एक नरमुंड धरलेले आहे. या डाव्या हाताच्या खालच्या बाजूला एक श्वान उभा आहे. हा श्वान त्या नरमुंडातून खाली पडणारे रक्त चाटत आहे, असे शिल्पामध्ये दाखवले आहे. या मूर्तीच्या कमरेला एक साखळी बांधलेली आहे.
त्यांच्या मांड्यांवर लहान घंटा लोंबताना दिसतात. या मुख्य मूर्तीच्या उजवीकडे भूतनाथ आणि डावीकडे एक गण कोरलेला आहे. तसेच भैरवदेवाच्या गुडघ्यावरून खाली एक मोठी मुंडमाला लोंबताना दिसते.
वालूर गावचे ग्रामदैवत असल्यामुळे वाल्मीकेश्वर महादेवाच्या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव मानला जातो. या उत्सवानिमित्त मंदिरात शिवमहापुराण’ कथा आणि ‘ज्ञानेश्वरी’ पारायण ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. याशिवाय श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हे मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजलेले असते. आश्विन पौर्णिमेला येथे वाल्मीकी ऋषींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. चातुर्मासाच्या काळात मंदिरात नियमितपणे अभिषेक, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडतात.
वालूर गावाच्या पूर्व दिशेला असलेले सिद्धेश्वर मंदिर देखील प्राचीन स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना मानले जाते. तेराव्या शतकात, म्हणजेच देवगिरीच्या यादवांच्या वैभवशाली राजवटीत हे मंदिर उभारण्यात आले होते, असे सांगितले जाते. या मंदिराच्या दर्शनी भागात दोन मोठे द्वारपाल कोरलेले आहेत. या वैशिष्ट्यामुळे स्थानिक लोक या देवालयाला ‘द्वारपाल सिद्धेश्वर मंदिर’ म्हणूनही ओळखतात. या द्वारपालांच्या डोक्यावरील मुकुट, पाठीमागची सुंदर प्रभावळ आणि अंगावरील अलंकरण या सर्व बाबी तत्कालीन यादव काळातील समृद्धी दर्शवतात. या दोन्ही द्वारपाल मूर्तींचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, प्रवेशद्वाराच्या बाजूचे त्यांच्या पायांचे पंजे आत वळलेले आहेत, तर त्याच्या विरुद्ध बाजूचे पायांचे पंजे अगदी सरळ समोर आहेत. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी मोठ्या आकाराचे प्राचीन शिवलिंग स्थापित केलेले आहे. दररोज सकाळी पाच ते दुपारी एक व सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना वाल्मीकेश्वराचे दर्शन घेता येते.