व्यंकटेश मंदिर

फणसवाडी, मुंबई

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे डोंगरमाथ्यावर वास्तव्य असलेला बालाजी म्हणजेच व्यंकटेश होय. विष्णूच्या पुराणप्रसिद्ध चोवीस अवतारांशी संबंध नसलेला, परंतु विष्णुरूप पावलेला व्यंकटेश हा पंढरपूरच्या विठ्ठलाचा समधर्मी असलेला देव आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाप्रमाणेच व्यंकटेश बालाजी हे राजस्थान तसेच महाराष्ट्रातीलही अनेकांचे कुलदैवत आहे. दक्षिणेकडे वेंकट, पेरुमल, श्रीनिवास, वेंकटेश्वरुडु, शेषाद्री, तिरुपती आणि तिरुमलवास आदी भिन्न नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या व्यंकटेशाचे एक प्राचीन व सुप्रसिद्ध मंदिर फणसवाडीत वसलेले आहे. एका शतकाची परंपरा लाभलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे व्यंकटेशभक्त या मंदिराला ‘छोटा तिरुपती’ म्हणून गौरवतात.

व्यंकटेश बालाजीबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. सत्ययुगात ऋषीमुनींच्या तपाचे फळसंचित कोणत्या देवाला द्यावे, याबाबत परीक्षा घेण्याकरिता भृगू ऋषी विष्णूकडे गेले. त्यावेळी त्यांनी देवाची परीक्षा घेण्यासाठी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. ते पाहून विष्णूच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी रागावून देवलोक सोडून पृथ्वीवर आली. विष्णूने मात्र भृगू ऋषींच्या पायास श्रम पडले म्हणून त्यांचे पाय कुरवाळले आणि त्यांच्या पायाला असलेल्या गर्वाच्या डोळ्याचा नाश केला. तेव्हा भृगू ऋषींनी सर्व संचितफळ विष्णूला अर्पण केले. त्यांनी विष्णूला “कलियुगात पृथ्वीवर प्रत्येक याचकाच्या इच्छा तू पूर्ण करशील,” असा आशीर्वाद दिला. त्यानंतर विष्णू पृथ्वीवर बालाजी रूपात स्थापित होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करू लागला.

या व्यंकटेश बालाजीच्या मुंबईतील देवालयाची परंपरा मुदुंबई-नंबी वंशाशी निगडित आहे. मुदुंबई-नंबी वंश ही दक्षिण भारतातील ऐतिहासिक व सुप्रतिष्ठित अशी गुरू-परंपरा आहे. अकराव्या शतकात दक्षिणेत होऊन गेलेले व वैष्णव भक्तिमार्गाचा संप्रदाय देशभर प्रसृत करणारे महान वैष्णव संत रामानुजाचार्य (१०१७-११३७) यांनी भक्तिमार्गाच्या प्रसाराकरिता देशात आपल्या ७४ मुख्य शिष्यांना ‘आचार्य पुरुष’ या रूपात नियुक्त केले होते. त्यांना सिंहासनाधिपती वा पीठाधिपती असे म्हटले जाते. मुदुंबई नंबी हे त्यांपैकी एक होते. त्यांच्या वंशात इ.स. १३६१ मध्ये जन्मलेले हस्त्यद्रिनाथेश्वर अर्थात मुदुंबई अण्णा हे शास्त्रार्थात व वादविवादात अत्यंत निपुण होते. त्यांच्या याच अफाट ज्ञानामुळे आणि विरोधकांना निरुत्तर करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना ‘प्रतिवादी भयंकर अण्णा’ ही पदवी बहाल करण्यात आली होती. तिरुपतीच्या मंदिरात पहाटे व्यंकटेश्वरास जागृत करण्यासाठी गायले जाणारे ‘व्यंकटेश सुप्रभातम्’ या स्तोत्राप्रमाणेच ‘व्यंकटेश स्तोत्रम्’, ‘व्यंकटेश प्रपत्ती’ आणि ‘व्यंकटेश मंगलाशासनम्’ यांची रचना प्रतिवादी भयंकर अण्णा यांनी केली आहे. रामानुजाचार्यांचे अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी मणवाल मामुनिगल उर्फ वरवरमुनी (इ.स. १३७०-१४४३) यांनी संप्रदायाच्या वृद्धीकरिता नियुक्त केलेल्या अष्टदिग्गज म्हणजे आठ प्रमुख आचार्यांमध्ये प्रतिवादी भयंकर अण्णा यांचा समावेश होता. या परंपरेतील ‘श्री कांची प्रतिवादी भयंकर मठ’ या मठाचे प्रमुखपद भूषवणारे व ‘जगद्‌गुरू गादी स्वामी’ या नावाने प्रसिद्ध असलेले पी. बी. अर्थात प्रतिवादी भयंकर अनंताचार्य यांनी मुंबईतील या मंदिराची स्थापना केली.

धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक व सुदर्शन उपासक असलेल्या पी. बी. अनंताचार्य यांनी सन १९२० मध्ये मुंबईत वैष्णव धर्माचा प्रसार करण्यासाठी एक ‘दिव्यदेश’ म्हणजेच देवालय उभारण्याची इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेस मूर्त रूप देण्यासाठी येथील अनेक भाविक व्यापारी व व्यावसायिक एकत्र आले. मुंबईत सन १८८० मध्ये ‘श्रीवेंकटेश प्रेस’ (मुद्रणालय) स्थापन करणारे बालाजी भक्त खेमराज श्रीकृष्णदास बजाज यांनी या मंदिरासाठी जमीन दान दिली होती. अनेकांनी रोख व वस्तूंच्या रूपात देणग्या दिल्या. स्वतः पी. बी. अनंताचार्य यांनी आपली सर्व स्वकष्टार्जित संपत्ती मंदिर उभारणीसाठी दान केली. सात वर्षे या मंदिराचे बांधकाम चालले आणि १९२७ मध्ये ते पूर्ण झाले. त्या वर्षी शनिवार, ४ जून ते १० जून या कालावधीत चाललेल्या सोहळ्यामध्ये मंदिरात व्यंकटेशाच्या मूर्तीची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या मंदिराच्या स्थापत्यावर दाक्षिणात्य मंदिरशैलीचा मोठा प्रभाव आहे. मंदिराचे गोपूर पद्धतीचे प्रवेशद्वार याची प्रथम प्रचिती देते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर उंच, बहुमजली द्रविड शैलीतील गोपूर आहे. त्यावर विष्णूचे विविध अवतार, गरुड, लक्ष्मी, अलवार संत, यक्ष-गंधर्व, तसेच पुराणातील प्रसंगांची रंगीत शिल्पे आहेत. प्रत्येक थरावर लहान देवकोष्ठके आणि शिखरावर कलश आहे. गोपुरातून आत पहिल्या प्राकारात प्रवेश होतो. येथे दगडी फरसबंदी, रंगीत कमानी, नक्षीकाम केलेले भव्य स्तंभ आणि छतावर फुलांचे व भौमितिक आकृत्यांचे नक्षीकाम केलेले आहे. येथील स्तंभांवर दक्षिण भारतीय शैलीतील रंगकाम केलेले आहे. काही स्तंभांवर व्याल अर्थात याली, कमलपुष्प, वेली आणि शंख-चक्र-नाम अशी वैष्णव चिन्हे रंगवलेली आहेत. मंदिराच्या प्राकार भिंतीवर विष्णूच्या २४ अवतारांची शिल्पे अर्थात चतुर्विंशती मूर्ती कोरलेली आहेत. एकाच ठिकाणी ही सर्व २४ रूपे पाहायला मिळणे हे या मंदिराचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते. प्राकारात बाजूला ‘उत्सव भवन’, ‘काच मंडप’ आणि देवांचे कपडे व चंदन ठेवण्याच्या विशेष खोल्या म्हणजेच वस्त्र गृह व चंदन गृह आहेत. येथे काही अंतरावर पारंपरिक वैष्णव मंदिरांप्रमाणे ध्वजस्तंभ आहे. सोनेरी मुलामा दिलेल्या या भव्य ध्वजस्तंभासमोर बळीपीठ आहे. येथून मंदिराच्या मुख्य बारा खांबी सभामंडपात प्रवेश होतो. उंच छत, बहुरंगी स्तंभ, कोरीव कमानी, वैष्णव प्रतीकांनी सजवलेला आंतरभाग, उत्सवमूर्ती ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा तसेच भजनासाठी व वेदपठणासाठीची व्यवस्था ही या सभामंडपाची वैशिष्ट्ये आहेत. या सभामंडपात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक मंदिराचे संस्थापक प्रतिवादी भयंकर अनंताचार्य स्वामी यांची प्रतिमा लावलेली आहे. या मंडपातूनच मुख्य गर्भगृहाकडे जाण्याचा मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास रजत आणि सुवर्णजडित दरवाजे आहेत. त्यांच्यावर द्वारपालांची शिल्पे, तसेच शंख, चक्र, कमलपुष्प आदी चिन्हे कोरलेली आहेत. येथील मुख्य गर्भगृहात भगवान व्यंकटेशाची अर्थात बालाजीची देखणी आणि भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती तिरुपती येथील मूळ मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मूर्तीस सुवर्ण अलंकार, किरीट, वैजयंती माळ, तुलसी माळ, तसेच रेशमी वस्त्रांनी शृंगारलेले आहे. मूर्तीच्या बाजूस श्रीदेवी (लक्ष्मी) आणि भूदेवी यांच्या मूर्ती विराजमान आहेत. मंदिरात मुख्य मूर्तीबरोबरच लक्ष्मी नरसिंह स्वामी आणि चक्रराज सुदर्शन यांच्याही मूर्ती विराजमान आहेत. या गर्भगृहावर दाक्षिणात्य पद्धतीचे विमान म्हणजेच शिखर आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतींवरील देवकोष्ठकांत विविध देव-देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत. मुख्य मंदिरालगत देवी पद्मावतीचे उपमंदिर आहे. त्याच प्रमाणे डाव्या बाजूला राजगोपालस्वामी म्हणजेच कृष्ण व रुक्मिणी, सत्यभामा यांचे तसेच श्रीराम परिवाराचे उपमंदिर आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील भिंतीवर वैष्णव परंपरेतील विविध संतांच्या प्रतिमा आहेत. त्याच प्रमाणे येथे व्यंकटेशाच्या पौराणिक चरित्रातील प्रसंगांची चित्रेही रंगवण्यात आलेली आहेत.

या मंदिरात दक्षिण भारतीय पांचरात्र आगम पद्धतीनुसार कडक नियमबद्ध अशी दैनंदिन पूजाअर्चा केली जाते. येथे पहाटे ५.३० वाजता मंगलवाद्यांनी मंदिरातील पूजाविधीस प्रारंभ होतो. सकाळी ६.२० वाजता विश्वरूप दर्शनम् व मंगलारती होते. यानंतर ६.२५ ते ७.१० वाजेपर्यंत देवदर्शन, ६.२५ ते ६.४५ या काळात विष्णुसहस्रनामाची अर्चना, तर ७.१५ ते ८.४५ या कालावधीत नित्याराधन, मंत्रपुष्प, नक्षत्रारती, दिव्यप्रबंध पाठ आणि व्यंकटेश सहस्रनामार्चना होते. यानंतर ८.०० ते ८.४५ या कालावधीत देवदर्शन, ८.४५ ते ९.१५ दरम्यान भोग व बळीप्रदान, सकाळी १०.०० ते ११.०० या काळात पंचपर्व व अभिषेक, यानंतर ११.३० वाजेपर्यंत देवदर्शन, ११.३० ते १२.०० या काळात राजभोग, दुपारी १२.०० वाजता मास नक्षत्रारती आणि १२.०० ते १.०० वाजेपर्यंत दर्शन असे विधी होतात. दुपारी १.०० ते ४.३० या काळात मंदिराची प्रवेशद्वारे बंद केली जातात. यानंतर सायंकाळी ४.३० ते ५.४५ वाजता मंगलवाद्यम, ५.०० ते ५.४० दरम्यान दिव्यप्रबंध पाठ, ५.४५ ते ६.१५ वाजेपर्यंत भोग, ६.१५ ते ७.२० वाजेपर्यंत दर्शन, रात्री ७.३० ते ८.०० दरम्यान रात्र आराधना व अष्टोत्तर नामार्चना, ८.०० वाजता भोग आणि ८.३० ते ९.०० वाजेपर्यंत देवदर्शन होते. रात्री ९.३० वाजता शयन विधी होऊन मंदिराची दारे भाविकांच्या दर्शनासाठी बंद होतात. या मंदिरात एकादशी हा महत्त्वाचा दिवस असतो. याचप्रमाणे येथे विविध हिंदू सण व उत्सवही धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. ब्रह्मोत्सवानिमित्ताने येथे होणाऱ्या पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी होतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • संपर्क: मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२ २२०८४६२८, २२०१३४०१, २२०८६९७७
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत

वेंकटेश मंदिर

फणसवाडी, मुंबई

Back To Home