मुंबईतील दक्षिण भारतीय भक्तीपरंपरा, अध्यात्म आणि संस्कृतीचे एक सुप्रतिष्ठित केंद्र अशी ‘द साऊथ इंडियन भजन समाज’ मंदिराची ओळख आहे. मुंबईतील दक्षिण भारतीयांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या माटुंग्यामध्ये गेल्या सुमारे शतकभरापासून हे मंदिर उभे आहे. दाक्षिणात्य स्थापत्यशैलीत उभारलेले हे मंदिर प्रामुख्याने प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना समर्पित आहे. याचसोबत येथे राजराजेश्वरी देवीची मूर्तीही प्रतिष्ठित आहे. येथे रामनवमी आणि नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या उत्सवांमध्ये हजारो दक्षिण भारतीय भाविक सहभागी होतात.
माटुंगा परिसराचा इतिहास इसवी सनाच्या तेराव्या शतकात मुंबईवर राज्य करणाऱ्या बिंबदेव यादव याच्याशी निगडित आहे. माहीम म्हणजेच महिकावती ही बिंबदेवाची राजधानी होती. ऐतिहासिक आख्यायिकेनुसार माटुंगा परिसरात त्याची भव्य गजशाला होती. संस्कृतमध्ये हत्तीला मातंग म्हणतात, त्यावरून या परिसरास मातंगालय म्हटले जात असे. त्याचा अपभ्रंश मातंगा, मातुंगा आणि माटुंगा असा झाला असावा, असे मानले जाते. काहींच्या मते येथील हत्तींच्या देखभालीसाठी बिंब राजाच्या काळात येथे मातंग समाजाची वस्ती होती, त्यामुळे या भागास माटुंगा हे नाव पडले असावे. पौराणिक आख्यायिकेनुसार या परिसरात मतंग ऋषींचे निवासस्थान होते आणि त्यावरून माटुंगा हे नाव आले. ब्रिटिश कालखंडात साधारणपणे विसाव्या शतकाच्या आरंभापासून या परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर प्रारंभ झाला.
सन १८९६ च्या प्लेगच्या साथीनंतर ब्रिटिश सरकारने मुंबईला सुनियोजित आकार देण्याचे प्रयत्न केले. त्यामध्ये माटुंगा हे मुंबईतील पहिल्या नियोजित उपनगरांपैकी एक म्हणून विकसित करण्यात आले. मुंबईच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासामुळे येथे संपूर्ण भारतातून स्थलांतरितांच्या लाटा येऊन धडकल्या. विसाव्या शतकाच्या आरंभी येथे दक्षिण भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाला. कारखान्यांमध्ये, व्यापारी पेढ्यांमध्ये, तसेच सरकारी कचेऱ्यांमध्ये प्रामुख्याने काम करणाऱ्या या समाजाने येथेही आपली धर्मसंस्कृती व पारंपरिक जीवनपद्धती जपण्याचे कसोशीने प्रयत्न केले. माटुंगा भागातील दक्षिण भारतीयांनी येथे सायंकाळच्या वेळी एकत्र येऊन भजन तसेच संकीर्तन करण्याचा परिपाठ सुरू केला. त्यातून सन १९२७ मध्ये येथील दक्षिण भारतीयांच्या काही प्रतिष्ठित व श्रद्धाळू मंडळींनी भजन समाज या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला एका छोट्या जागेत एकत्र येऊन भजन आणि नामस्मरण करण्यापासून सुरू झालेला या समाजाचा प्रवास नंतर एका भव्य आणि प्रतिष्ठित मंदिर संस्थेमध्ये रूपांतरित झाला. आज हे मंदिर मुंबईतील एक प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. गेली ९९ वर्षे या संस्थेने येथे दाक्षिणात्य धर्मपरंपरा, धार्मिक रीतीरिवाज व संस्कृतीची ज्योत तेवत ठेवलेली आहे.
दाक्षिणात्य संस्कृतीची छाप असलेल्या माटुंग्यात शंकर मठम्, आस्तिक समाज मंदिर आणि कन्यका परमेश्वरी देवी मंदिर यांच्या नजीकच भजन समाजाचे हे मंदिर वसलेले आहे. पारंपरिक द्रविड शैलीतील या मंदिराला दूरवरूनच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे भव्य आणि शिल्पसमृद्ध असे राजगोपुरम् आहे. या पाच स्तरीय गोपुरम्च्या प्रवेशद्वारावरील उंच स्तरामध्ये श्रीरामपंचायतनाचे उठावशिल्प आहे. गोपुरम्च्या बाजूला असलेल्या भिंतींवर म्हणजेच सालाई गोपुरम्वर डावीकडील देवकोष्ठकात आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे, तर उजवीकडे श्रीलक्ष्मीची मूर्ती आहे. सर्वांत डावीकडे गरुडाची तर उजवीकडे हनुमानाची उभी मूर्ती विराजमान आहे. याशिवाय राजगोपुरम्मधील देवकोष्ठकांमध्ये गणेश, शंकर, हनुमान आणि दत्त यांसह विविध देव-देवतांच्या तसेच यक्ष-गंधर्वांच्या मूर्ती आहेत. भव्यता, सुबक शिल्पे आणि मनमोहक रंगसंगती यामुळे हे राजगोपुरम् भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मंदिराचा सभामंडप अतिशय प्रशस्त आहे. सभामंडपात अनेक रुंद कोरीव स्तंभ आहेत. हा सभामंडप खास भजन, कीर्तन आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या कचेऱ्या म्हणजेच मैफिलींसाठी बनवला गेला आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या समोर दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभरांगांच्या मधील मोकळ्या जागेत हे कार्यक्रम होत असतात. येथील गर्भगृह समोरून खुल्या स्वरूपाचे आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे स्तंभ आहेत आणि त्यामध्ये महिरपी कमान आहे. या कमानीच्या वरच्या भागात लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आहे. स्तंभांच्या बाजूला दाक्षिणात्य पद्धतीचे दोन द्वारपाल आहेत. आत संगमरवरी अधिष्ठानावर मोठे सोनेरी मंडपम् आहे. त्याच्या पुढील स्तंभांच्या बाजूला उंच अशा ‘याली’ म्हणजेच व्याल प्रतिमा आहेत. मंडपम्वर द्रविड पद्धतीचे शिखर आहे. आत प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती विराजमान आहेत. पुष्पमालांनी शृंगारलेल्या या मूर्तींच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आहे. या मूर्तींनजीक हनुमानाची मूर्तीही विराजमान आहे. याचप्रमाणे येथे गणेश, तसेच नटराज आणि पार्वती यांच्या पंचधातूच्या मूर्तीही आहेत. या मुख्य मूर्तींबरोबरच मंदिराच्या सभामंडपातील सुशोभित देवकोष्टकांमध्ये राजराजेश्वरी देवी आणि नवग्रहांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत.
या मंदिरात सकाळी ५.३० ते ११ आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ९ या कालावधीत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. रामनवमी हा येथील सर्वांत मोठा आणि प्रमुख उत्सव असतो. या उत्सवकाळात येथे रामायणावरील प्रवचने, वेदपठण, तसेच नामवंत कलाकारांच्या कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या मैफली असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि यज्ञ आयोजित केले जातात. रामनवमीला होणाऱ्या रथोत्सवात हजारो लोक सहभागी होतात. शारदीय नवरात्रोत्सवात येथे चंडी महायज्ञम्, चंडी पारायण, चंडी कलश पूजा, चंडी मूलमंत्र होम, नवग्रह पूजा आणि महापूर्णाहुती आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात. या काळात येथे गोरगरिबांना अन्नदानही केले जाते. स्कंद षष्टी महोत्सव, गोकुलाष्टमी, गणेशोत्सव आणि नववर्षारंभ आदी सण व उत्सवही येथे मोठ्या जल्लोषात तसेच अत्यंत धार्मिक वातावरणात साजरे केले जातात.