चंडिका देवी / बारादेव मंदिर

परमानंद वाडी, परळ गाव, मुंबई

आदिशक्ती महामायेचे रूप असलेली कालीदेवी म्हणजेच चंडिका देवी होय. ही देवी परळ आणि शिवडीतील कोळी समाजाची आराध्य देवता आहे. ही परळची गावदेवी आहे. मुंबईचे आद्य राजे प्रताप बिंब यांचे पुरोहित हेमाडपंत यांची कुलदेवता म्हणूनही या देवीला ओळखले जाते. परळमधील जुन्या गोलंजी टेकडीवर या देवीचे प्राचीन स्थान आहे. देवीचे येथील स्थान जागृत असल्याच्या श्रद्धेतून मुंबईतील भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराशेजारीच सुप्रसिद्ध बारादेव मंदिर आहे. शिल्पकलेचा अत्युत्कृष्ट नमुना असलेली, सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीची दुर्मिळ शिवमूर्ती या मंदिरात प्रतिष्ठित आहे. या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर पुरातत्त्व आणि इतिहासाच्या अभ्यासकांचेही आकर्षण केंद्र बनले आहे.

‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथातील पौराणिक आख्यायिकेनुसार, शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी देवराज इंद्राकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा पराभूत झालेल्या देवांनी आदिशक्ती भगवतीस साकडे घातले. ते भगवतीची प्रार्थना करत असताना तेथे देवी पार्वती आली. तिच्या शरीरकोषातून देवी अंबिका प्रकट झाली. चंड आणि मुंड हे शुंभ-निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले आणि तिच्या रूपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेला पत्नी बनण्याचा निरोप पाठवला. अंबिकेने तो निरोप धुडकावला. तेव्हा तिला पकडून आणण्यासाठी शुंभ-निशुंभाने चंड आणि मुंड यांना पाठवले. त्यांना पाहताच अंबिका क्रोधायमान झाली आणि तिच्या शरीरातून देवी काली प्रकट झाली. तिने चंड आणि मुंड यांचा शीरच्छेद केला. कालीदेवीने चंड आणि मुंड यांचा वध केल्यामुळे भगवतीने तिला चामुंडा असे नाव दिले. ही देवी पार्वतीच्या शरीरकोषातून निर्माण झाल्यामुळे तिला कौशिकी असेही म्हणतात. तिला चंडिका या नावानेही ओळखले जाते.

चंडिका देवीच्या मंदिराचा नेमका इतिहास अज्ञात आहे. ही देवी प्रताप बिंब राजाचे राजपुरोहित हेमाडपंत चामरे ऊर्फ चावरे यांची कुलदेवता आहे. इतिहासकारांच्या मते, मुंबईतील प्रभादेवीच्या मंदिराची स्थापना राजा प्रताप बिंब यांनी केली असावी. या मंदिरात प्रभादेवीच्या शेजारी चंडिका देवीचीही स्थापना करण्यात आली होती. याच देवीचे एक प्राचीन स्थान गोलंजी टेकडीवर आहे. प्राचीन काळापासून हे स्थान येथे असल्याचे सांगितले जाते. त्या काळी या टेकडीने भोईवाडा ते चिंचपोकळी एवढा विस्तीर्ण भाग व्यापला होता. परळ गावाचा भाग या टेकडीच्या उतरंडीवर वसला होता. ब्रिटिश सरकारच्या काळात परळ येथे गव्हर्नर हाऊस होते. त्या काळात सरकारचा ध्वज गोलंजी टेकडीच्या माथ्यावर फडकत असे. त्यामुळे या टेकडीला ‘फ्लॅगस्टाफ हिल’ असे म्हटले जात असे. देवीची येथील सध्याची मंदिरवास्तू तिच्या स्थापत्यशैलीवरून ब्रिटिश काळातील असल्याचे मंदिर अभ्यासक सांगतात. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे.

हे मंदिर मोठ्या भूखंडावर वसलेले आहे. मंदिरासमोर आवारभिंतीच्या आत भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारलेली आहे. मंदिराची संरचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या वास्तूवर मराठा स्थापत्यशैलीचा ठसा आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. त्यात रुंदसर चौकोनाकार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांमध्ये महिरपी कमानी आहेत. या सभामंडपात संगमरवरी फरशी बसवली आहे. तेथे भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिराचे गर्भगृह चौकोनाकार आहे आणि ते दगडी चिऱ्यांनी बांधलेले आहे. आत उंच वेदीवर चंडिकामातेची मूर्ती विराजमान आहे. पाषाणात कोरलेली ही मूर्ती वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेली असते. येथे देवी चतुर्भुज आहे. बाण, त्रिशूळ आणि तलवार धारण केलेल्या या देवीचा एक हात वरदमुद्रेत आहे. गर्भगृहावर मराठा स्थापत्यशैलीची छाप असलेले शिखर आहे. त्यावर आमलक आणि कळस आहे.

या मंदिराच्या शेजारी बारादेव मंदिर आहे. हे मंदिर छोटे आणि उभट चौकोनाकार आहे. हे मंदिर साधे असले, तरी तेथे विराजमान शिवमूर्तीमुळे या मंदिराला शिवभक्त आणि पुरातत्त्वज्ञांच्या दृष्टीने प्रचंड महत्त्व लाभले आहे. येथे प्रतिष्ठित शिवमूर्ती सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीची आहे. या काळात अपरान्त म्हणजेच ठाणे, रायगड आणि मुंबई बेटांवर त्रैकुटक राजांची सत्ता होती. पुढील काळात म्हणजेच सहाव्या शतकात ते कलचुरींचे मांडलिक झाले. मुंबईतील जोगेश्वरी, घारापुरी आणि मंडपेश्वर ही लेणी या त्रैकुटक तसेच कलचुरी राजांच्या काळातील आहेत. महाराष्ट्रात राज्य करणारी कलचुरी घराण्याची शाखा मूळची महेश्वर ऊर्फ महिष्मती येथील होती. या शाखेचा संस्थापक कृष्णराज (इ.स. ५५० ते ५७०) हा होता. त्याची चांदीची नाणी ‘कृष्णराज-रूपक’ म्हणून ओळखली जात असत. त्यातील काही नाणी मुंबईतील काळबादेवी आणि ठाकुरद्वार परिसरात सापडली होती. या शोधामुळे या बेटांवर त्याची सत्ता असल्याचे स्पष्ट होते. कलचुरी राजे पाशुपत पंथाचे अनुयायी म्हणजेच शैव होते. त्यांनी घारापुरी येथील प्रसिद्ध ‘शिवसृष्टी’ निर्माण केली. घारापुरीतील मुख्य लेण्यांसमोर सापडलेल्या शिल्पांशी साम्य असणारी एक शिवमूर्ती आज बारादेव मंदिरात प्रतिष्ठित आहे.

इतिहासकारांच्या मते या मूर्तीचा निर्माणकाळ इ.स. ५२५ ते ५३० असा आहे. ती साडेतीन मीटर (११.५ फूट) उंचीच्या एका करड्या बेसाल्ट पाषाणशिळेवर कोरलेली आहे. या शिल्पामध्ये शंकराच्या एकूण सात प्रतिमा आहेत. त्यापैकी तीन प्रतिमा मध्यभागी एका वर एक अशा उभ्या आहेत. या प्रतिमा समपाद स्थितीत आहेत. त्यांच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन-दोन शिवप्रतिमा आहेत. या सर्व प्रतिमा जटामुक्त स्वरूपातील आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर शांत, स्वमग्न असे भाव आहेत. यातील सहा शिवप्रतिमा द्विभुज आहेत, तर सर्वांत वरची शिवप्रतिमा दशभुजा आहे. त्यांनी अक्षमाला आणि कमंडलू धारण केले आहेत. मध्यभागी विराजमान उभ्या मूर्तीचा उजवा हात व्याख्यानमुद्रेत आहे. त्यात त्यांनी जपमाला धारण केली आहे. सर्व शिवमूर्तींच्या हातात कडे, गळ्यात ‘ग्रैवेयक’ (गळ्याभोवती घट्ट बसणारी एक प्रकारची कंठी) आहे. मस्तकी जटामुकूट व कानात कुंडले आहेत. त्यावरील शिवप्रतिमेचा उजवा हात ध्यानमुद्रेत आहे. सर्वांत वर मध्यभागी विराजमान दशभुजा शिवप्रतिमेच्या हातात परशू, अक्षमाला, ढाल आणि कमंडलू स्पष्टपणे दृश्यमान आहेत. सर्वसाधारणपणे लोकप्रिय शिवप्रतिमांमध्ये शिवशंकर व्याघ्रचर्म परिधान केलेला दाखवला जातो. या शिल्पात त्यांनी अधोवस्त्र परिधान केले आहे. त्या अधोवस्त्राला दोन पायांच्या मध्यभागी चुण्यांचा सोगा म्हणजेच ‘हस्तीशुंडक’ आहे. ‘सिकिंग स्टायलिस्टिक सोर्सेस फॉर परेल अँड एलिफंटा स्कल्पर्च्‌स’ या निबंधात शिल्प-अभ्यासक अपर्णा भोगल यांनी एक महत्त्वाचे मत मांडले आहे. त्यांच्या मते, या मूर्तीतून शिल्पकाराला शिवतत्त्व विश्वव्याप्त असल्याचे दाखवायचे होते. हे शिवतत्त्व पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर तसेच खाली, वर आणि त्याही वरच्या लोकांत भरलेले आहे. या शिल्पातील शिवमूर्ती सिंहासारखी छाती, रुंद खांदे आणि बारीक कंबर अशा ‘महापुरुष’ स्वरूपातील आहे. असे मत जर्मन प्राच्यविद्या पंडित हेनरिक झिमर यांनी ‘मिथ्स अँड सिम्बॉल्स इन इंडियन आर्ट अँड सिव्हिलायझेशन’ (संपादन – जोसेफ कॅम्पबेल, १९४६) या ग्रंथात मांडले आहे. या सात शिवप्रतिमांच्या खालच्या भागामध्ये शिवगणांच्या पाच प्रतिमा कोरलेल्या आहेत. येथे ते शिवगण मांडी घालून बसलेले आहेत. त्यांच्या हातात एकतारी, कच्छपी वीणा आणि टाळ ही वाद्ये आहेत. यातील तीन गणप्रतिमा अर्धवट कोरलेल्या आहेत.

डॉ. सदाशिव गोरक्षकर यांच्या मते हे शिल्प अष्टमूर्ती शिवाचे आहे. त्यांच्या मते, या शिल्पातील सात शिवप्रतिमा आणि हे शिल्प कोरलेला पाषाण पिंडी किंवा लिंग रूपात मानल्यास एकूण आठ मूर्ती होतात. अष्टमूर्ती शिव ही संकल्पना पाशुपत पंथाशी निगडीत आहे. अष्टमूर्ती हे रुद्राचेही एक रूप आहे. घारापुरी येथील लेण्यांत पाशुपत पंथाचा प्रभाव आहे, ही बाब या दृष्टीने लक्षणीय आहे. प्रख्यात अमेरिकन संस्कृत पंडिता बार्बरा स्टोलर मिलर यांनीही या मताला दुजोरा दिला आहे. शिल्पात एकूण बारा प्रतिमा असल्यामुळे या मूर्तीला आता ‘बारादेव’ असे संबोधले जाते. पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांच्या ‘कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया’ या ग्रंथाचा संक्षिप्त अनुवाद ‘मुंबईचा वैभवशाली वारसा’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी परळमधील या शिवशिल्पाची विस्तृत माहिती दिली आहे. डॉ. ढवळीकर यांच्या मते, हे शिवशिल्प परळ येथेच घडवले गेले होते. मात्र ही मूर्ती पूर्ण होऊ शकली नाही. तिच्या काही भागाचे कोरीव काम अर्धवट असल्यामुळे या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नसावी.

शिल्पकारांनी अपूर्णावस्थेत सोडलेली ही मूर्ती कालौघात जमिनीखाली गाडली गेली. गोलंजी टेकडीवर परळ ते शिवडी रस्त्याचे काम सुरू असताना ९ ऑक्टोबर १९३१ रोजी ही मूर्ती कामगारांना सापडली. त्या काळातील ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’चे संचालक डॉ. आचार्य आणि मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक फादर हेरास यांनी या मूर्तीची सखोल पाहणी केली. फादर हेरास यांनी १४ ऑक्टोबर १९३१ रोजी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लेख लिहून ही शिवमूर्ती असल्याचे स्पष्ट केले. या अनमोल ठेव्याचे योग्य जतन करण्यासाठी मूर्ती संग्रहालयात हलवण्याचे प्रयत्न झाले. परंतु स्थानिकांच्या आग्रहामुळे ती येथेच एका छोट्या मंदिरात ठेवण्यात आली. या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती १९५० मध्ये तयार करण्यात आली. ती प्रतिकृती ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’त जतन केली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने हे मंदिर ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे.

चंडिका देवीच्या नवरात्र उत्सवाच्या काळात या बारादेव मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जातो. एरवी हे मंदिर बंद असते. भाविकांना दरवाजाला लावलेल्या जाळीतूनच मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. नवरात्र हा चंडिका देवी मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव असतो. चंडिका मंदिरात नवरात्रातील अष्टमीस होमहवन केले जाते. येथे चंडिका देवी आणि बारादेव यांच्याप्रमाणेच वाघेश्वरी देवीचेही मंदिर आहे. या धार्मिक महत्त्वामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ८ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत

चंडिका देवी/बड़ादेव मंदिर

परमानंद वाडी, परेल गांव, मुंबई

Back To Home