विठ्ठल गणपती महादेव मंदिर

(प्रति पंढरपूर), कात्रक मार्ग, वडाळा, मुंबई

मुंबईतील वडाळा येथील कात्रक मार्गावर असलेले विठ्ठल गणपती महादेव मंदिर (प्रति पंढरपूर) हे या उपनगराची एक महत्त्वाची धार्मिक ओळख आहे. ‘प्रति पंढरपूर’ या नावाने ओळखले जाणारे हे देवस्थान मुंबापुरीतील वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. वडाळ्यातील कोळी आणि आगरी समाजाने स्थापन केलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला जत्रा भरते. ही जत्रा मुंबईतील जुन्या जत्रांपैकी एक आहे. या जत्रेला दरवर्षी सुमारे तीन ते चार लाख वैष्णवांचा मेळा जमतो.

प्राचीन काळी वडाळा हे आगरी-कोळी लोकांचे एक छोटेसे खेडे होते. इ.स. ११३८ मध्ये प्रताप बिंब या राजाने पूर्वी बरडबेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावर आपली राजधानी वसवली. त्या राजधानीला त्याने आपल्या आधीच्या राजधानीचे म्हणजे माहीमचे (केळवे-माहीम/महिकावती) नाव दिले. तेच मुंबईतील माहीम होय. वाळकेश्वर ते वसईपर्यंतचा प्रदेश त्याच्या राज्याचा भाग होता. यानंतर शतकभराने येथे दुसरा बिंब राजा होऊन गेला. त्याचे नाव बिंबदेव यादव होते. तो देवगिरीचे सम्राट रामदेवराय यादव यांचा चौथा पुत्र होता. मुस्लिम तवारिखांमध्ये त्याचा उल्लेख भीमदेव असा केला आहे. याने १२९५ मध्ये येथे आपली राजधानी स्थापन केली. ‘ग्रेटर बॉम्बे गॅझेटियर, खंड १’ नुसार वडाळा ते परळ दरम्यान असलेल्या भागात त्याच्या न्यायालयाचे स्थान होते. त्यामुळे त्याला न्यायग्राम म्हटले जात असे. तेच आजचे नायगाव होय. विसाव्या शतकापर्यंत येथील एक ठिकाण ‘भीमराजाची वाडी’ म्हणून दाखवले जात असे. तेथे भीमराजाचा एक राजवाडा होता, असे गॅझेटियरकार सांगतात. या न्यायग्रामापासून जवळच ‘वरेला’ किंवा वडाळा हे खेडे होते. वडाळा हे नाव येथे असलेल्या वडाच्या झाडांवरून पडल्याची आख्यायिका आहे.

येथील विठ्ठल मंदिराला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. याबाबतची आख्यायिका ग्रेट बॉम्बे डिस्ट्रिक्ट गॅझेटियरमध्ये नमूद केलेली आहे. ती अशी की त्या काळात (इ.स. १८२० ते १८३०) येथे वारकरी संप्रदायातील एक सत्पुरुष राहात असत. ते दर आषाढी एकादशीला अन्य काही वारकऱ्यांसोबत पंढरपूरची पायी वारी करीत असत. वृद्धापकाळामुळे आपण यापुढे वारी करू शकणार नाही, असे त्यांनी त्यांच्या एका अनुयायाला सांगितले. तेव्हा तो अनुयायी म्हणाला की तुम्ही विठ्ठलाचे परमभक्त आहात, आता तुम्हीच विठ्ठलाला मुंबईला बोलवा. त्यावर ते सत्पुरुष म्हणाले की ‘आपण कोण बोलवणारे? सारे काही त्या विठ्ठलाच्या हाती आहे.’ त्याच्या पुढच्या वर्षी मात्र ते सत्पुरुष दिंडीसोबत पंढरपूरला गेले. तेथे चंद्रभागेत स्नान करीत असताना त्यांच्या एका अनुयायाला नदीत विठ्ठलाची मूर्ती सापडली. ती पाहून सारेच आनंदित झाले. त्यांनी ती मूर्ती वडाळ्याला आणली आणि त्या सत्पुरुषाच्या झोपडीमध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर तिची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून वडाळ्यातून पंढरपूरला विठोबाची पालखी नेण्याची प्रथा सुरू झाली. सुरुवातीला विठोबाचे हे मंदिर लहान आकाराचे होते. सन १९६६ च्या सुमारास त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.

वडाळ्यातील कात्रक मार्गावरील चाळींच्या परिसरात, एका मोठ्या भूखंडावर हे ऐतिहासिक आणि भागवत संप्रदायाला साजेसे असे कोणताही बडेजाव नसलेले मंदिर वसलेले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडप प्रशस्त आहे आणि त्याची फरसबंदी संगमरवरी आहे. सभामंडपात प्रवेश करताच सुरुवातीलाच हनुमानाची देवळी आहे. तेथे चौकोनाकार संगमरवरी चौथऱ्यावर वीर हनुमानाची कोरीव पाषाणमूर्ती आहे. या देवळीनजीक काळ्या पाषाणातील गरुडस्तंभ आहे. सभामंडपातून तीन पायऱ्या उतरून खुल्या प्रकारच्या अंतराळात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या द्वारचौकटीच्या वरच्या भागात भागवत संप्रदायाच्या मंदिराचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर महाराज, त्या मंदिरावर कळस चढवणारे संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत.

या प्रशस्त दरवाजातून आत जाताच समोरच उंच संगमरवरी अधिष्ठानावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मूर्तीला वस्त्रालंकारांनी शृंगारलेले आहे. मूर्तीच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आहे. गळ्यात तुलसीपत्रांच्या आणि फुलांच्या माळा आहेत.

या मंदिराच्या सभामंडपावर बसक्या पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे. गर्भगृहावर चारही बाजूंनी वर किंचित निमुळते होत गेलेले रुंदसर शिखर आहे. त्यावर एक छोटा आमलक आहे आणि त्यावर त्रिस्तरीय कलश बसवला आहे.

या मंदिराच्या आवारात गणपती आणि महादेवाची मंदिरे आहेत. गणेशाचे मंदिर विठ्ठल मंदिराच्या उजवीकडे आहे. या संगमरवरी मंदिरात उंच अधिष्ठानावर गणेशाची पाषाणात घडवलेली मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या डावीकडे त्रिमुखी दत्ताची बसलेल्या स्थितीतील संगमरवरी मूर्ती आहे, तर उजवीकडे दुर्गामातेची प्रसन्नवदन संगमरवरी मूर्ती आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये पितळी शाळुंकेत महादेवाचे पाषाणलिंग प्रतिष्ठित आहे. या लिंगावरही धातूचे आवरण चढवलेले आहे. शिवलिंगाच्या वर पितळी गलंतिका आहे. शिवमंदिरातील मागच्या भिंतीवरील सोनेरी देवळीत पार्वतीमातेची मूर्ती विराजमान आहे. या दोन्ही मंदिरांवर उंच शिखरे आहेत.

या मंदिरात पहाटे ६ ते दुपारी १२.४५ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना देवदर्शन घेता येते. मंदिरात रामनवमी, हनुमानजयंती, शिवरात्र, नवरात्र असे विविध उत्सव व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. प्रति पंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या या मंदिरात आषाढी एकादशीला मोठी जत्रा असते. आषाढी दशमीपासूनच या मंदिरात अखंड भजनाचा कार्यक्रम सुरू होतो आणि तो एकादशीला रात्रीपर्यंत चालू राहतो. एकादशीला मंदिरात काकड आरती होते. दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता आरती होते. रात्री ९.३० वाजता शेजारती होते. या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा आयोजित केली जाते. या दिवशी मुंबई आणि परिसरातून येथे अनेक वारकरी दिंड्या येतात. आषाढी एकादशीला भागवत संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या मुहूर्तावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमते. कार्तिकी एकादशीच्या दिवशीही येथे मोठ्या प्रमाणावर वैष्णवांचा मेळा जमतो.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ७ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
मंदिर लोकेशन:
Back To Home