क्वान कूंग मंदिर

वाडीबंदर, माझगाव, मुंबई

महानगरी मुंबईच्या बहुसांस्कृतिक वारशाचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणजे येथील चिनी समाज आणि त्यांनी उभारलेले चिनी मंदिर होय. माझगावच्या वाडीबंदर भागातील एका शांत गल्लीमध्ये चिनी इतिहासातील वीरयोद्धा व शक्तीचे प्रतीक असलेल्या क्वान कूंग (भगवान क्वान) यांचे मंदिर वसलेले आहे. चिनी भाविकांची अशी श्रद्धा आहे की क्वान कूंग हे बोधिसत्वाचा अवतार आहेत. त्यांना युद्धाचा आणि एकनिष्ठेचा देव मानले जाते. मुंबईमध्ये आता उरलेल्या मूठभर चिनी-भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात क्वान यीन या देवतेचीही मूर्ती प्रतिष्ठापित आहे.

मुंबईचा आणि चीन यांच्या संबंधांचा इतिहास जुना आहे. ब्रिटिश काळात भारतातून चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अफू आणि कापूस पाठवण्यात येत असे. त्या काळी माळवा प्रांतातील तत्कालीन संस्थानिकांच्या आश्रयाने मोठ्या प्रमाणावर अफू पिकवली जात असे. ही अफू मुंबईतील व्यापारी चीनला पाठवत असत. चीनमध्ये अफूवर बंदी असली तरी चिनी अधिकाऱ्यांना लाच देऊन हा व्यापार करण्यात येत असे. यात सर जमशेटजी जीजीभॉय, जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतन टाटा यांच्यासारखे पारशी व्यापारी आघाडीवर होते. या व्यापारातून चीनमधील तरुणांची पिढीच्या पिढी व्यसनाधीन झाली असली तरी त्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर भांडवलसंचय झाला. अशा प्रकारे मुंबईच्या प्रगतीचा चीनशी असलेल्या व्यापाराशी मोठा संबंध आहे.

अठराव्या शतकाच्या याच काळात चीनमधील अनेक व्यापारी, खलाशी, कुशल कामगार आणि दंतवैद्य मुंबईत आले. प्रामुख्याने माझगाव, शिवडी, गिरगाव या भागामध्ये या चिनी लोकांनी वस्ती केली. अँटॉप हिल येथे चिनी लोकांची स्मशानभूमी आहे. १० नोव्हेंबर १८८९ रोजी पाच चिनी व्यापाऱ्यांनी प्रती यार्ड सहा आणे या दराने ती जागा विकत घेतली होती. माझगाव जवळ असलेल्या बंदरांमध्ये चिनी खलाशी आणि अन्य व्यावसायिक काम करीत असत. त्यांच्या येथील वस्तीस ‘ओल्ड चायना टाऊन’ म्हणत. माझगाव भागात राहणाऱ्या चिनी समुदायामध्ये प्रामुख्याने दक्षिण चीनमधून आलेल्या लोकांचा भरणा होता. या समुदायास ‘सी यूप कून’ असे म्हणत. त्यांनी येथे १९१९ मध्ये क्वान कूंग मंदिराची स्थापना केली. क्वान कूंग यांना क्वान यू या नावानेही ओळखले जाते. ते चिनी इतिहासातील एक पराक्रमी सेनापती होते. त्यांचा जन्म इसवी सन १६० च्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येते. चीनमध्ये इसवी सन पूर्व २०६ मध्ये स्थापन झालेल्या हान घराण्याच्या राजवटीचा अंत झाल्यानंतर चीनमध्ये वेई, शू हान आणि पूर्व वू अशा तीन राजवटी आकारास आल्या. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात चेन शोऊ यांनी लिहिलेल्या ‘रेकॉर्ड्स ऑफ द थ्री किंगडम’ या ग्रंथानुसार, लिऊ बेई हे यातील शू हान राजवटीचे संस्थापक होते. क्वान कूंग हे त्यांचे एकनिष्ठ सेनापती होते. अतुलनीय शौर्य आणि युद्धनीतीसाठी ते ओळखले जात. चेन शू याने त्यांच्याबद्दल असे लिहिले आहे की ‘ते अत्यंत शूर होते आणि दहा हजार सैनिकांशी लढण्याची क्षमता त्यांच्यात होती.’ इ.स. २२० मध्ये पूर्व वूचा राजा सन क्वान याच्या फौजेशी झालेल्या लढाईच्या वेळी (फानचेंगचे युद्ध) क्वान यूच्या सैन्याने हार खाल्ली. अनेक सैनिक त्याला सोडून गेले तर अनेक जण शत्रूला शरण गेले. तरीही क्वान यू, त्याचा पुत्र क्वान पिंग आणि सहायक चाओ लेई हे माघार घेत असताना अचानक शत्रूच्या सैन्याने त्यांना घेरले. त्या युद्धात ते शत्रूच्या हाती सापडले व नंतर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. यानंतर सुमारे साडेतीनशे वर्षांनी सुई घराण्याचा ताकदवान सरदार यांग जियान हा चीनचा सम्राट बनला आणि येथे सुई घराण्याची सत्ता (इ.स. ५८१ ते ६१८) सुरू झाली. चीनमध्ये स्थैर्य आणि सुबत्ता निर्माण करणाऱ्या सुई राजवटीमध्ये क्वान यू यांचे दैवतीकरण झाले. चिनी लोकधर्मात त्यांना देवतेचा दर्जा देण्यात आला. त्यात त्यांना क्वान कूंग (भगवान क्वान) असे संबोधले जाते. बौद्ध आणि ताओ धर्मामध्ये त्यांना बोधिसत्वाचा अवतार मानण्यात येऊ लागले. इ.स. पूर्व ५५१ ते ४७९ या काळात होऊन गेलेले चीनमधील महान तत्त्ववेत्ते कन्फ्युशियस यांच्या विचारांवर आधारलेल्या ‘कन्फ्युशिॲनिझम’ या पंथामध्येही त्यांना दैवतस्वरूप देण्यात आले.

चीन, हाँगकाँग, मकाऊ, तैवान, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया तसेच जपानमध्ये त्यांची अनेक मंदिरे आहेत. चीनमध्ये युद्धमंदिरे (मार्शल टेंपल्स) उभारण्याची प्रथा आहे. वीरयोद्धे, कुशल सेनापती, रणनीतीज्ञ अशा व्यक्तींची तेथे पूजा केली जाते. क्वान कूंग यांचीही अशी अनेक युद्धमंदिरे आहेत. भाविकांची अशी श्रद्धा आहे की क्वान कूंग यांचा आत्मा सेनापतींना युद्ध जिंकण्यासाठी साहाय्य करतो. मिंग घराण्याचा संस्थापक झू युआनझँग याला चौदाव्या शतकात झालेल्या एका युद्धात क्वान कू यांनी साहाय्य केले होते, अशी आख्यायिका सांगण्यात येते. नीतिमत्ता, न्याय आणि दिलेल्या शब्दाला जागणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या मूर्ती घरांघरांतही पूजण्यात येतात. हाँगकाँगमधील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी भारतात ठग लोक काली मातेची पूजा करीत असत, त्याचप्रमाणे आजच्या चिनी माफियांच्या ‘ट्रियाड’सारख्या टोळ्या क्वान कूला भजतात. याचे कारण म्हणजे त्यांना ज्याप्रमाणे युद्धाचा देव मानले जाते, त्याचप्रमाणे त्यांना समृद्धीचाही देव मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना निष्ठेचा देव मानले जाते. आपले स्वामी, मित्र आणि कर्तव्य यांच्याप्रती क्वान कूंग यांची श्रद्धा हा चिनी भाविकांसमोरील आदर्श आहे. चीनमधील बौद्ध धर्मात त्यांना धर्मरक्षक मानले जाते. तेथील अनेक बौद्ध मंदिरांच्या प्रवेशद्वारावर त्यांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येते.

माझगावमधील एका तीन मजली इमारतीत हे मंदिर स्थित आहे. सुरुवातीच्या काळात या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच मंदिर होते व खालच्या मजल्यावर या मंदिराचे पुजारी व कारभारी राहात असत. काही वर्षांपूर्वी या मंदिराचे तत्कालीन कारभारी अल्बर्ट थाम यांनी इमारतीच्या तळमजल्यावर क्वान यीन देवीचे मंदिर स्थापन केले. अल्बर्ट थाम यांचे पूर्वज डॉकयार्डमध्ये काम करीत असत. त्यांचे आजोबा ‘ब्रिटिश इंडियन स्टीम नेव्हिगेशन कंपनी’त मजूर कंत्राटदार होते. असे सांगण्यात येते की या थाम घराण्याने क्वान कूंग मंदिराची स्थापना केली. अल्बर्ट थाम हे स्वतः सुतारकाम करीत. त्यांनी स्वतः क्वान यीन देवीचे मंदिर उभारले, तसेच मंदिरातील चिनी पद्धतीचे रंगकाम आणि त्यावरील नक्षीकाम व चित्रे रंगवली. काही वर्षांपूर्वीपर्यंत या इमारतीत चिनी मंदिर असल्याच्या बाह्यखुणा फारशा नव्हत्या. सन २०२१-२२ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भारद्वाज यांच्या ‘मॉडर्न लव्ह : मुंबई’ या मालिकेमधील ‘मुंबई ड्रॅगन’ या भागाचे चित्रीकरण येथे झाले. त्यावेळी त्यांनी या इमारतीस चिनी पद्धतीची रंगरंगोटी करून मंदिरास सध्याचे स्वरूप बहाल केले.

चिनी धर्मसंस्कृतीत विशेष महत्त्व असलेल्या लाल रंगवलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारास दोन झडपा आहेत. आत प्रवेश करताच समोरच क्वान यीन देवीचे मंदिर आहे. येथे लाल-गुलाबी रंगातील व चिनी पौराणिक चित्रे असलेले रेशमी कापड लावलेल्या एका मोठ्या वेदीवर देवीची प्रतिमा विराजमान आहे. या कापडावर चिनी लिपीतील आशीर्वचन चितारलेले आहे, ज्याचा अर्थ ‘आपले घर सोने आणि पाचूने भरून जावो’ असा होतो. प्रतिमेच्या समोर डाव्या बाजूस भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत, तर उजव्या बाजूस देवीची संगमरवरी मूर्ती आहे. याशिवाय येथे चिनी बौद्ध व ताओ धर्मातील विविध देवदेवतांची चित्रे लावलेली आहेत. यात डावीकडील भिंतीवरील शयनमुद्रेतील गौतम बुद्धाच्या मोठ्या चित्राबरोबरच एका कपाटावर ठेवलेल्या बुद्धाच्या कमलासनावरील मूर्तीचाही समावेश आहे. या मंदिराच्या बाहेर असलेल्या छोट्या ओवरीतून उजवीकडे दुसऱ्या मजल्यावर जाणारा अरुंद लाकडी जिना आहे. या जिन्याच्या पायऱ्या चढताना समोरच्या भिंतीवर सुरक्षा, दीर्घायू आणि समृद्धीच्या देवता मानल्या जाणाऱ्या फुक, लुक आणि साऊ यांची चित्रे दिसतात. या मजल्यावर प्रशस्त मंडपामध्ये क्वान कूंग यांचे मंदिर स्थित आहे. लाल रंग, चिनी पद्धतीचे कागदी दिवे, झुंबरे, चिनी सुलेखन यांनी सुशोभित केलेल्या या मंडपामध्ये एका बाजूस उंच वेदीवर उभारलेल्या मखरामध्ये क्वान कूंग यांची मोठी प्रतिमा लावलेली आहे. या प्रतिमेच्या समोर क्वान कूंग यांच्या तीन मूर्ती ठेवलेल्या असून मखराच्या उजवीकडेही त्यांची एक उंच मूर्ती आहे. वेदीवर पितळी समया तसेच एक मोठे पितळी भांडे ठेवलेले आहे. या वेदीवर अगरबत्ती, कागदी चलन, फळे आणि तांदळाने भरलेली लाल पाकिटे अर्पण केली जातात. या वेदीच्या समोर एका उंच लाकडी चौथऱ्यावर ड्रॅगनची मूर्ती, पोर्सेलिनच्या विविध मूर्ती, चिनी भांडी आणि समया मांडलेल्या आहेत. या जवळच पितळी घंटा आणि ‘गोंग’ आहे.

येथे ‘जिओ बेई’ नावाच्या भविष्य सांगणाऱ्या कामट्यांची एक प्राचीन परंपरा आजही पाळली जाते. भाविक आपल्या नशिबाचा कौल घेण्यासाठी या कामट्यांचा वापर करतात. या कामट्यांवर क्रमांक लिहिलेले असतात आणि त्या एका उभट भांड्यामध्ये ठेवल्या जातात. भाविक हे भांडे हलवतात आणि त्यातून जी कामटी बाहेर पडते, त्या क्रमांकाचे भविष्य भिंतीवर लावलेल्या कागदावरून वाचले जाते. येथे देवाची प्रार्थना पूर्ण झाल्यावर पितळी घंटा तीन वेळा वाजवून चॉकलेटचा प्रसाद वाटला जातो. भाविक येथे फळे, तांदूळ व पैसे असलेली लाल पाकिटे अर्पण करतात. मुंबईतील पर्यटकांचे आकर्षणस्थान असलेल्या या मंदिरात केवळ शनिवारी आणि रविवारी सकाळी ११ ते ३ या काळात दर्शन घेता येते. या मंदिरात चिनी नववर्षाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. १९६२ च्या भारत-चीन युद्ध काळात येथे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या चिनी नागरिकांकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. मुंबईतील अनेक चिनी-भारतीय कुटुंबांना छावण्यांमध्ये कैदेत ठेवण्यात आले. यानंतर येथून अनेक चिनी-भारतीयांनी पाश्चात्य देशांत स्थलांतर केले. सध्या मुंबईत सुमारे ४०० चिनी-भारतीय राहात असल्याचे सांगण्यात येते. हे नागरिक चिनी नववर्ष व अन्य सण-उत्सवांच्या निमित्ताने या मंदिरात येऊन भगवान क्वानचे दर्शन घेतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
    संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९३२४४८७७३८

क्वान कुंग मंदिर

वाडीबंदर, मझगांव, मुंबई

Back To Home