राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी आणि पोलिसांपासून आरोपींपर्यंत आणि चित्रपट अभिनेते, उद्योजक, व्यापाऱ्यांपासून सामान्य लोकांपर्यंत असंख्य लोक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्याच्या दर्शनासाठी येतात, तो संकटमोचक हनुमान काळबादेवीतील पिकेट रोडवर स्थित आहे. सुमारे दीड शतके जुने असलेले हे मंदिर ‘पिकेट रोडचा हनुमान’ या नावाने सुप्रसिद्ध आहे. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी असून ती स्वयंभू व जागृत मानली जाते. त्यामुळे येथे दर मंगळवारी आणि शनिवारी दर्शनासाठी भाविकांची एवढी झुंबड उडते की त्यासाठी येथे खास वाहतूक पोलिसांची व्यवस्था करावी लागते.
‘पिकेट’ या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ लष्कराची लहानशी चौकी असा होतो. पूर्वी अशी चौकी येथे असल्याने या रस्त्यास पिकेट रोड असे नाव पडले, असे सांगण्यात येते. मुंबईमध्ये सर्वप्रथम टायपिंग व्यवसाय सुरू करणारे आर. एस. सप्रे यांच्या नावाने मुंबई महापालिकेच्या दफ्तरी या मार्गाची नोंद करण्यात आली आहे. या मंदिराचा इतिहास असा सांगण्यात येतो की पूर्वी हनुमानाचे हे मंदिर भर समुद्रातील एका खडकावर होते. भाविक बोटींतून तेथे दर्शनासाठी जात असत. १८८० च्या दशकात ब्रिटिश सरकारने मुंबईचा विस्तार करण्याकरिता या भागातील समुद्र बुजवला. त्यावेळी हनुमानाच्या मूर्तीची सध्याच्या जागेत प्रतिष्ठापना करण्यात आली. हळूहळू येथील हनुमानाची ख्याती सर्वदूर पसरली आणि मंदिराकडे भाविकांचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू झाला.
मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या अशा भागामध्ये, लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यासमोर पिकेट रोडवर हे मंदिर आहे. ‘हनुमान बिल्डिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे खासगी मालकीचे मंदिर वसले आहे. यामुळे नेहमीच्या मंदिरांप्रमाणे यास शिखर नाही. साध्या प्रवेशद्वारातून, तीन पायऱ्या चढून या मंदिरात प्रवेश होतो. सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या सभामंडपात समोरच्या बाजूस पुढून खुले असलेले गर्भगृह आहे. त्यात नक्षीकाम केलेल्या चंदेरी पत्र्याचे आवरण असलेल्या उंच चौथऱ्यावर चांदीचा मोठा देव्हारा आहे. त्यात हनुमानाची स्वयंभू मूर्ती स्थित आहे. पाषाणशिळा आकाराच्या या मूर्तीवर शेंदूरचर्चन केलेले आहे. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. या गर्भगृहाच्या डावीकडे उंच चौथऱ्यावर चांदीच्या देव्हाऱ्यामध्ये त्रिमुखी दत्ताची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे.
येथे सभामंडपाच्या उजवीकडे असलेल्या उपगर्भगृहात संगमरवरी चौथऱ्यावर शनीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे.
या मूर्तीस वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारित करण्यात आले आहे. मूर्तीच्या देव्हाऱ्यासमोर एका संगमरवरी कुंडामध्ये शनीची पितळी मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीवर तेल आणि उडदाचा अभिषेक केला जातो. त्यासाठी येथे खास व्यवस्था केलेली आहे. याच बरोबर येथे राधा-कृष्ण आणि श्रीराम-सीता यांच्या मूर्तीही आहेत. एका संगमरवरी देव्हाऱ्यामध्ये या वस्त्रालंकारांनी शृंगारित केलेल्या चारही मूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत.
या हनुमानाच्या भक्तांमध्ये सामान्य आणि अतिविशेष अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत. या भक्तांमध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संस्थापक-संपादक रामनाथ गोएंका, मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी ज्यांच्यासमोर झाली, ते टाडा न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रमोद कोदे, सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, सुविख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, भजन सम्राट अनुप जलोटा, राजकीय नेते प्रफुल्ल पटेल आदींचा समावेश आहे. याशिवाय येथे अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी, तसेच वकील दर्शनासाठी येत असतात. या मंदिरास द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते.
या मंदिरात सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते रात्री ८, दर शनिवारी सकाळी ६ ते रात्री ९ आणि दर रविवारी सकाळी ६ ते दुपारी २ या काळात हनुमानाचे दर्शन घेता येते. मंदिरात रोज सकाळी ७ वाजता मंगल आरती होते. दुपारी १२ वाजता माध्यान्न भोग आरती होते, तर रात्री ८ वाजता सायंकाल शयन आरती होते. येथील हनुमान हा संकटमोचक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे सतत भाविकांची वर्दळ असते. मंगळवार आणि शनिवारी येथे दर्शनासाठी मोठी रांग लागते. या दिवशी, तसेच दर पौर्णिमेला हनुमानाच्या मूर्तीचा विशेष शृंगार केला जातो. त्यात शेंदूर, चांदीचा वर्ख आणि विशेष अत्तराचा वापर केला जातो. हनुमान जयंती हा येथील खास उत्सव आहे. या दिवशी येथे हनुमानाचा प्रकटोत्सव सोहळा आयोजित केला जातो. यानंतर हनुमानाची पालखी काढली जाते. या पालखी सोहळ्यात असंख्य भाविक पारंपरिक पोषाखात सहभागी होतात. याशिवाय मंदिरात नरक चतुर्दशीच्या दिवशीही विशेष पूजेचे आयोजन केले जाते. या मंदिराची स्थापना मोहनदास महंत यांनी केल्याचे सांगण्यात येते. सध्या त्यांची सातवी पिढी या मंदिराचा कारभार पाहात आहे.