नागेश्वर मंदिर (गोल देऊळ)

सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, पायधुणी, मुंबई

मुंबईतील पायधुणी भागात सरदार वल्लभभाई पटेल मार्गावर नागेश्वर मंदिर म्हणजेच गोल देऊळ हे ऐतिहासिक मंदिर वसलेले आहे. मुंबई हा ज्या कोकणचा भाग आहे, त्या कोकणात प्राचीन काळी नागवंशीय लोक मोठ्या प्रमाणावर राहत असत. कोकण हे नावही येथील नागांच्या एका पराक्रमी कुळाच्या नावावरून पडलेले आहे, असे मानले जाते. त्याची स्मृती म्हणून अनेक ठिकाणी नागांना देवत्व देऊन त्यांची पूजा केली जाते. या नागांचा शिवशंकराशी जवळचा संबंध आहे. हिंदू धर्मपरंपरेत बारा ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे, त्यातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे असून ते नागेश्वराच्या नावाने ओळखले जाते. याच नागेश्वराचे एक सुंदर शिवमंदिर पायधुणी येथे आहे. सरदार वल्लभभाई पटेल मार्गाच्या मधोमध असलेल्या या मंदिराचा आकार गोल असल्याने ते ‘गोल देऊळ’ म्हणूनही ओळखले जाते. पायधुणी परिसरातील शिवभक्तांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात रोज सकाळ-सायंकाळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

पूर्वी पायधुणी हे मुंबईतील एक सामान्य खेडे होते. याविषयी गोविंद नारायण माडगांवकर त्यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या १८६३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहितात की ‘ह्मातारपाखाडी, उमरखाडी, माजगांव, माहीम, हीं अलाहिदा बेटें असून मधून लहान खाऱ्या पाण्याच्या खाड्या होत्या. जिला आम्ही पायधुणी म्हणत असतों तेथून ही सलग खाऱ्या पाण्याची खाडी होती आणि भरती आली म्हणजे भेंडी बाजारापासून चिंचबंदर पर्यंत पाणी भरून जाईं. ह्या जाग्यास पायधुणी असें नांव पडण्याचें कारण असें सांगतात कीं पूर्वी माहीम, वरळी, व माटुंगें एथून लोक येऊन ह्या खाडींत पाय धुऊन मुंबईस येत, म्हणून तीस पायधुणी असें नाव पडलें.’ बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांच्या ‘मुंबईचा वृत्तांत’ (१८८९) या पुस्तकानुसार, साधारणतः १७९० च्या दशकापर्यंत पायधुणीपर्यंत भरतीचे पाणी येत असे. त्या काळात भायखळा, भेंडीबाजार आणि पायधुणी हा सखल भाग पाण्याने भरून जात असे. मुंबईचे गव्हर्नर विल्यम हॉर्नबी (कार्यकाल १७७१ ते १७८४) यांनी वरळी येथे बांध घालून हे पाणी अडवले आणि त्यानंतर या परिसराचा विकास झाला.

येथील गोल देवळाचा नेमका इतिहास उपलब्ध नसला, तरी या मंदिराविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. मुंबईत १८९६-९७ मध्ये ‘ग्रंथिक सन्निपाताची’ (प्लेग) मोठी साथ आली होती. शहरातील अस्वच्छता, तुंबलेली गटारे, पूरग्रस्त भाग आणि दाटीवाटीची दमट घरे अशा विविध कारणांमुळे ही महामारी पसरली होती. तेव्हा १४ फेब्रुवारी १८९८ रोजी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी शहरात नवे रस्ते बांधणे, जुन्या रस्त्यांत सुधारणा करणे आणि शहर अधिक हवेशीर व्हावे यासाठी काही उपाय प्रस्तावित करणारे ‘सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट बिल’ ब्रिटिश संसदेत सादर केले. संसदेने ते मंजूर केल्यानंतर ९ नोव्हेंबर १८९८ रोजी ‘बॉम्बे सिटी इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट’ची (BCIT किंवा BIT) स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या माध्यमातून शहरात रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले. पायधुणी भागात हे काम सुरू असताना, नागेश्वर महादेवाच्या मंदिराचा अडथळा येतो म्हणून ते हटवण्याचे प्रशासनाने ठरवले. त्यानुसार मंदिर पाडण्यासाठी सरकारी कंत्राटदार आला असता, मंदिरातील गर्भगृहातून एक नागराज बाहेर आला.

तो शंकराच्या पिंडीवर विराजमान होता. हा दैवी संकेत मानून मंदिर पाडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. या चमत्काराची सर्वत्र चर्चा झाली आणि त्यानंतर काही शिवभक्तांनी एकत्र येऊन येथे मोठे मंदिर बांधले. ही घटना साधारण १९०७ च्या सुमारास घडली. त्यानंतर वेळोवेळी जीर्णोद्धार होऊन आज या मंदिराला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

पायधुणी येथील गोल देऊळ चौकात, अत्यंत वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या मागच्या आणि पुढच्या बाजूस मार्ग दुभाजकाच्या जागी बगिचा करण्यात आलेला आहे. त्यात उंच चौथऱ्यावर पाषाणात कोरलेली नंदीची मोठी मूर्ती आहे. त्यासमोर ध्वजस्तंभ असून मंदिराची रचना खुला मंडप, मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. खुल्या मंडपावर उतरते छत आहे. सभामंडपात नक्षीकामाने सुशोभित केलेले सहा स्तंभ आणि महिरपी कमानी आहेत. येथे भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था आहे. यापुढे चार गोल स्तंभ असलेला मुखमंडप आहे.

प्रवेशद्वाराशेजारी हाती दंड घेतलेल्या द्वारपालांच्या मूर्ती आहेत. द्वारचौकटीच्या वरच्या भागात गणेशाची मूर्ती असून दोन्ही बाजूंना चवऱ्या ढाळणाऱ्या ऋद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. सभामंडप गोलाकार असून तेथून गर्भगृहाचा प्रदक्षिणामार्ग आहे. आत प्रवेश करताच डावीकडे द्रोणागिरी घेऊन चाललेल्या गदाधारी हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती दिसते.

मध्यभागी उंच चौथऱ्यावर नंदीची आकर्षक चांदीची मूर्ती आणि त्यासमोर चांदीचे कूर्मशिल्प (कासव) आहे. सभामंडपाच्या छताला पाच पितळी घंटा आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गणेशाची आणि उजवीकडे त्रिमुखी दत्ताची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार संगमरवरी आहे. त्यावर नक्षीकाम, गणेश प्रतिमा आणि मयूरशिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहात पितळी आवरण असलेली नागेश्वर महादेवाची पिंड असून त्यावर पितळी नागप्रतिमा आणि वरच्या बाजूस पितळी गलंतिका आहे.

या पिंडीस अभिषेक करण्यासाठीचे दूध मंदिरातील केंद्रात मिळते. गर्भगृहात मागे संगमरवरी देव्हाऱ्यात पार्वतीमातेची मूर्ती आहे. मंदिराचा शिखरभाग वैशिष्ट्यपूर्ण असून मुखमंडपावर राजस्थानी छत्रीसारखे शिखर आहे. गोलाकार सभामंडपावर मुख्य आणि उप अशी दोन शिखरे आहेत व त्यावर आमलक, कलश, धर्मध्वज आणि त्रिशूळ आहे.

येथे सकाळी ५.३० ते दुपारी १ आणि दुपारी ४.३० ते रात्री ९ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येते. रोज सायंकाळी ७.३० वाजता आरती होते. सोमवार, शनिवार, संकष्टी चतुर्थी, अंगारिका चतुर्थी तसेच विशेष कौटुंबिक प्रसंगी भाविक येथे अभिषेक करू शकतात. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव आहे. त्या दिवशी दुग्धाभिषेकासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. या सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिरात रोषणाई केली जाते.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

नागेश्वर मंदिर (गोल देउल)

सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, पायधुनी, मुंबई

Back To Home