मुंबादेवी मंदिर,

भुलेश्वर, मुंबई शहर, मुंबई

मुंबादेवी ही मुंबईची ‘ग्रामदेवता’. या रक्षणकर्त्या देवीच्या नावावरून या महानगरीस मुंबई हे नाव प्राप्त झाले, असे सांगण्यात येते. मुंबादेवी ही मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या आगरी-कोळी समाजाची लोकदेवता आहे. किमान ७०० वर्षांपासून मुंबई बेटावर वास्तव्य असलेल्या मुंबादेवीचे भुलेश्वर येथील मंदिर अठराव्या शतकात उभारण्यात आले. या मंदिरात त्या देवीस पार्वतीच्या रूपात पूजले जाते. मंदिरात जगदंबा आणि अन्नपूर्णा मातेचेही स्थान आहे. शक्ती आणि समृद्धीच्या या देवींच्या दर्शनासाठी केवळ मुंबईच नव्हे, तर मुंबईबाहेरील भाविकांच्याही येथे रोज रांगा लागतात.

मुंबई हे नगरनाम मुंबादेवीच्या नावावरून आल्याचे आता सर्वमान्य आहे. या नावाचा इतिहास मोठा रंजक आहे. पंधराव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत येथे हे शहरही नव्हते आणि त्याचे मुंबई हे नावही नव्हते. येथे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, माझगाव, परळ, वरळी, माटुंगा आणि माहीम अशी सात बेटे होती. ग्रीक गणिती आणि भूगोलशास्त्रवेत्ता क्लॉडियस टॉलेमी याने इ.स. १५० मध्ये या बेटांची नोंद अपरांतातील ‘हेप्टॅनेसिया’ अशी केली आहे. पोर्तुगीजांनी माहीम बेटावर पहिल्यांदा पाऊल ठेवले ते २१ जानेवारी १५०९ रोजी. यानंतर इ.स. १५३४ मध्ये गुजरातच्या सुलतान बहादूरने ही बेटे पोर्तुगीजांना दिली. पोर्तुगीज या बेटास ‘बॉन व्हिडा’, ‘बुआन बाहिया’, ‘बॉम्बाईम’ अशा काही नावांनी संबोधत असत. या नावांचा अपभ्रंश होऊन बॉम्बे व त्यावरून मुंबई हे नाव पडले अशी उत्पत्ती सांगण्यात येते.

तथापि, एस. एम. एडवर्ड्स यांचा ‘द राईज ऑफ बॉम्बे – ए रिट्रोस्पेक्ट’ (१९०२) हा अभ्यासपूर्ण ग्रंथ, तसेच ‘ग्रेटर बॉम्बे गॅझेटियर’चा खंड १ यांनी ही बाब खोडून काढली आहे. एडवर्ड्स यांनी स्पष्ट म्हटले आहे की या शहराचे मूळ नाव मुंबई हेच होते. पोर्तुगीजांनी त्याचे बॉम्बाईम, तर इंग्रजांनी बॉम्बे केले. हे नाव अर्थातच मुंबादेवीच्या नावावरून आले आहे. ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (१९००) या पुस्तकात इतिहासकार जे. गेर्सन दा कुन्हा यांनीही यास दुजोरा दिलेला आहे
.
मुंबादेवी या नावाविषयी अनेक आख्यायिका सांगण्यात येतात. श्री मुंबादेवी मंदिर ट्रस्टने १९८५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘शक्तितत्व अने शिवतत्त्व’ या गुजराती पुस्तकात जे. एच. दवे यांनी अशी आख्यायिका दिली आहे की रावणाचा मामा मारीच हा ज्या देवीची कुलदेवता म्हणून पूजा करीत असे, ती सौराष्ट्रात मामाई या नावाने ओळखली जाते. सौराष्ट्रातून मुंबईत चार-पाचशे वर्षांपूर्वी आलेल्या गुजराती व्यापाऱ्यांनी या देवीची येथे स्थापना केली. तिला मामाईवरून मुंबादेवी असे नाव पडले. मात्र ‘केंब्रीज युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या मारिका व्हिकझियानी आणि जयंत बापट यांच्या ‘मुंबादेवी अँड द अदर मदर गॉडेसेस इन मुंबई’ (मार्च २००९) या प्रबंधामध्ये या आख्यायिकेविषयी शंका व्यक्त केलेली आहे. या आख्यायिकेविषयी अन्यत्र कोणताही पुरावा वा स्पष्टीकरणकथा नसल्याचे या लेखकद्वयाने म्हटले आहे.

मुंबादेवीविषयीची एक जनमान्य आख्यायिका कोळी जमातीशी निगडित आहे. गोविंद नारायण माडगांवकर यांच्या ‘मुंबईचें वर्णन’ (१८६३) या पुस्तकानुसार, मुंबादेवी ही कोळ्यांची कुलदेवता असून तिची स्थापना मुंगा नामक कोळी स्त्रीने केली व ‘हिंदूलोकांच्या शास्त्राप्रमाणें तीस आपलें नाव मुंगादेवी असें ठेविलें. ते प्रवृत्तींत मुंबादेवी असें आलें असावें. अथवा कोणी ब्राह्मणानें गा या अक्षराबद्दल बा या अक्षराची योजना केली असावी.’ या देवीच्या नावाबद्दलची एक आख्यायिका एका ५२ श्लोकी संस्कृत माहात्म्यात येते. ती अशी की ‘पूर्वी मुंबारक नावाचा एक महादैत्य या बेटात होता. त्याने तप करून ब्रह्मदेवास संतुष्ट करून घेतले व आपणास कोणापासून मृत्यू नसावा व आपण सर्वकाळ विजयी व्हावे असा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्याची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे तो पृथ्वीवर लोकांना व देवांना पीडा करू लागला. तेव्हा सर्व देव विष्णूस शरण गेले व या दैत्याचा संहार करावा अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यावेळी विष्णू, शिव आदी देवांनी आपापले तेज काढून त्या दैत्यास मारण्यास देवी उत्पन्न केली. त्या देवीने मुंबारकास मरणप्राय करून भूमीवर टाकले. तेव्हा तो दैत्य देवीस शरण आला. त्याने देवीचे स्तवन केले. त्यावर देवीने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला की माझे नाव तुझ्या नावाबरोबर यावे आणि ते सर्वकाळ जगात प्रसिद्ध असावे.’ या मुंबारक दैत्याच्या नावावरून देवीने मुंबादेवी हे नाव धारण केले. मुंबादेवी ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरही ही आख्यायिका नमूद करण्यात आली आहे. गोविंद नारायण माडगांवकर यांनी असे म्हटले आहे की ‘हा दैत्य कदाचित पहिला मुबारक असावा.’ जे. एच. दवे, तसेच १८९५ साली ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ हे पुस्तक प्रसिद्ध करणारे कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनीही तसे मत व्यक्त केले आहे.

‘द गॅझेटियर ऑफ बॉम्बे सिटी अँड आयलंड’ (खंड १)नुसार, मुबारक शहा पहिला हा चौदाव्या शतकातील गुजरातचा सुलतान होता. इ.स. १३१८ मध्ये त्याने माहीम आणि सालशेत हे भाग काबीज केले. या वेळी मुस्लिम फौजेने येथील महालक्ष्मीच्या आणि मुंबादेवीच्या मंदिराचा विध्वंस केला होता. देवीच्या मूळ मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अज्ञात आहे. परंतु मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब याचा सरदार बाळकृष्णराव सोमवंशी याने सन ११४२ मध्ये वालुकेश्वरापर्यंतचा परिसर आपल्या अंमलाखाली आणला, त्या काळात येथे वालुकेश्वराप्रमाणेच मुंबादेवीचेही मंदिर होते. मुंबईत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी, पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) जेथे उभे आहे, तेथे पूर्वी ‘फाशी तलाव’ होता. या तलावानजीक मुंबादेवीचे मूळ मंदिर होते. मुंबईच्या किल्ल्याभोवती नव्याने तटबंदी करण्यासाठी ते मंदिर तेथून हलवण्यात आले. ‘ग्रेटर बॉम्बे डिस्ट्रिक्ट’ (खंड १) या गॅझेटियरनुसार, ही घटना सन १७६६ मध्ये घडली. गोविंद नारायण माडगांवकर यांच्यानुसार, फाशी तलाव येथे उभ्या असलेल्या मूळ मंदिराचा खरा वारस कोणी नसल्याने ईस्ट इंडिया कंपनी सरकारने त्या देवालयाची किंमत ठरवून ते मोडले. हे मंदिर सध्याच्या जागेवर उभारण्याची जबाबदारी पांडुशेठ सोनार यांच्याकडे सोपवली. ते त्यावेळचे एक प्रख्यात व्यापारी व सरकारदरबारी वजन असलेले प्रतिष्ठित गृहस्थ होते. त्यांनी भुलेश्वर येथील सध्याच्या जागी हे मंदिर उभारले. ब्रिटिश प्रवासवर्णनकार मारिया ग्रॅहम (लेडी कॅलकॉट) यांच्या ‘जर्नल ऑफ ए शॉर्ट रेसिडन्स इन इंडिया’ या पुस्तकात नव्या मुंबादेवी मंदिराचा उल्लेख आढळतो. मारिया ग्रॅहम यांनी १५ ऑगस्ट १८०९ या दिवशी या मंदिरास प्रत्यक्ष भेट दिली होती. त्या लिहितात, ‘बॉम्बेमधील सर्वांत मोठे पॅगोडा (मंदिर) किल्ल्यापासून साधारण दीड मैल अंतरावर ब्लॅक टाउनमध्ये आहे. ते मोम्बा देवीला समर्पित आहे. तिच्या मूर्ती आणि लक्षणांवरून ती शिवाची पत्नी पार्वती असावी असे वाटते. उंच भिंतींनी वेढलेल्या मोठ्या चौकाच्या आत एक सुंदर तलाव आहे. तो दगडात बांधलेला असून पाण्याच्या पातळीनुसार स्नान करणाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून त्याला पायऱ्या केलेल्या आहेत. तलावाभोवती ब्राह्मणांची घरे, प्रवाशांच्या निवासासाठी धर्मशाळा आणि विविध देवतांची मंदिरे आहेत. यांपैकी एका मंदिरात सुंदर कोरलेली त्रिमूर्ती आहे. ती एक प्रचंड अर्धपुतळ्यासारखी असून त्याला तीन चेहरे आहेत. मधला चेहरा सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचा आहे, उजव्या बाजूचा चेहरा संहारकर्ता शिवाचा आणि डाव्या बाजूचा पालनकर्ता विष्णूचा आहे. या देवतांना दररोज तांदूळ, फळे, दूध आणि फुले अर्पण केली जातात आणि त्यांच्यावर सतत पाण्याचा अभिषेक केला जातो.’ (जर्नल ऑफ ए शॉर्ट रेसिडन्स इन इंडिया, दुसरी आवृत्ती, १८१३, पा. १४). ग्रॅहम यांनी उल्लेख केलेले मुंबादेवीचे तळे शेठ नागरदास नवलाखा यांनी बांधले होते.

भुलेश्वर येथील मोठ्या रस्त्यावर अनेक दुकानांच्या गर्दीत मुंबादेवी मंदिर परिसराचे प्रवेशद्वार आहे. येथील दर्शनरांग आणि भाविकांची गर्दी यावरूनच ते लक्षात येते. एखाद्या नगारखान्यासारख्या या प्रवेशद्वाराच्या वरच्या मंडपात मध्यभागी अठरा भुजांच्या दुर्गादेवीची मूर्ती विराजमान आहे. येथे देवी दैत्यसंहारिणी स्वरूपात आहे. या मूर्तीच्या बाजूला दोन ऋषींच्या मूर्ती आहेत. वरच्या भागात तीन कळस आहेत. येथून पुढे पूजासाहित्य व अन्य वस्तूंच्या दुकानांच्या गर्दीतून काही अंतर गेल्यानंतर देवीचे हे अडीचशे वर्षांहून जुने मंदिर लागते. मंदिराच्या समोरच्या भागात छोटेसे प्रांगण आहे. त्यावर भाविकांच्या सोयीसाठी गजपृष्ठाकार छत आहे. या प्रांगणात मोठा स्तंभ आहे. त्याच्या बाजूलाच शंखाची मोठी प्रतिकृती उभारलेली आहे. येथे बाजूलाच मोठे हवनकुंडही आहे. मंदिराच्या पायऱ्यांसमोर मोठा सोनेरी त्रिशूळ आहे. देवीचे हे मंदिर उंच व भव्य असे असून ते संगमरवरी पाषाणात बांधलेले आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचे शिखर नागर स्थापत्य शैलीतील उरूशृंग पद्धतीचे आहे. त्यावर आमलक आणि कळस आहे. शिखरावर धर्मध्वज फडकत आहे. मंदिराचा सभामंडप साधारणतः दोन मजल्यांएवढा उंच आहे. सभामंडपास तीन प्रवेशद्वारे आहेत. यातील दोन प्रवेशद्वारे रुंदसर आहेत व तिसरे तुलनेने लहान आहे. या प्रवेशद्वारांच्या कमानीस मकरतोरणे आहेत. त्या ठिकाणी सूरसुंदरींची, तसेच शंख व वीणावादन करणाऱ्या तपस्वींची शिल्पे आहेत. दोन कमानींच्या मध्यभागी वरच्या भागात अठरा भुजा असलेल्या दैत्यसंहारिणी दुर्गामातेची मूर्ती विराजमान आहे.

येथील दर्शनरांगेतून सभामंडपात प्रवेश होतो. समोरच मंदिराचे गर्भगृह आहेत. या गर्भगृहांचा दर्शनीभाग कोरीव नक्षीकामाने सुशोभित आहे. गर्भगृहांच्या प्रवेशद्वारांस नक्षीकाम केलेला सोनेरी पत्रा जडवलेला आहे. मुंबादेवीच्या गर्भागाराच्या द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. आत उंच संगमरवरी वेदीवर मुंबईची अधिष्ठात्री मुंबादेवी विराजमान आहे. देवीची मूळ मूर्ती काळ्या पाषाणातील असून ती उभ्या स्वरूपात आहे. तिला वस्त्रालंकारांनी व पुष्पमालांनी शृंगारलेली आहे. देवीचे डोळे मोठ्या आकाराचे आहेत. तिने नाकात नथ हा मराठी अलंकार घातलेला आहे. विशेष सण व उत्सव प्रसंगी देवीच्या मुखावर सुवर्ण मुखवटा घातला जातो. देवीच्या मस्तकी सुवर्णमुकूट आहे. तिच्या समोर सुवर्णलेप दिलेल्या सिंहाचे मुख दिसते. देवीसमोर एका पितळी स्टँडवर तलवार ठेवलेली आहे. देवीची ही मूर्ती प्राचीन काळापासूनची आहे. मुंबादेवीच्या गर्भगृहाच्या शेजारील अत्यंत सुशोभित अशा गर्भगृहातील मखरांमध्ये जगदंबा माता व अन्नपूर्णा देवी यांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. जगदंबेची मूर्ती संगमरवरी पाषाणातील आहे. येथे देवी सिंहारूढ आहे. या मूर्तीच्या शेजारी देवीची एक लहानशी पितळी मूर्ती आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती मूळ पाषाणातील असून तिला शेंदूर लावलेला आहे. मूर्तीच्या मूळ शिळेवर चांदीचा पत्रा चढवण्यात आलेला आहे. १८९५ साली कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी मुंबादेवीचे वर्णन लिहून ठेवले, त्या वेळी येथे मुंबादेवी आणि अन्नपूर्णा देवी यांच्याच मूर्ती होत्या. येथे नवरात्रोत्सवाचा काळ वगळता मुंबादेवी आणि जगदंबा माता यांची वाहने बदलली जातात. देवींची वस्त्रेही वारानुसार बदलत असतात. मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे सोमवारी पांढऱ्या, मंगळवारी लाल, बुधवारी हिरव्या, गुरुवारी पिवळ्या, शुक्रवारी पोपटी, शनिवारी निळ्या, तर रविवारी पुन्हा लाल रंगाच्या वस्त्रांनी देवीचा शृंगार केला जातो.

या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील श्रीयंत्र. मुंबादेवीच्या गर्भगृहात हे सुवर्णाचे श्रीयंत्र ठेवलेले आहे. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी पूजन केलेले हे श्रीयंत्र आहे. त्याची येथे नवरात्रांत राजोपचार नावाची विशेष पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी मंदिरासमोर होम करून या पूजेची सांगता केली जाते.

या मंदिरात भल्या सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. मंदिरात सकाळी ६.३० ते रात्री ९ या कालावधीत भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. नवरात्रीच्या कालावधीत दर्शनाचा कालावधी पहाटे ५.३० ते रात्री १०.३० असा असतो. मंदिरात रोज सकाळी ५.३० वाजता आरती होती. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता मुख्य आरती, ११.३० वाजता दूध व फळांचा नैवेद्य व आरती, सायंकाळी ६.३० वाजता धुपारती, रात्री ८ वाजता मुख्य आरती आणि १०.१५ वाजता शयन आरती होते. देवीच्या मुख्य आरत्यांना मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. या मंदिरात वर्षातील शारदीय, चैत्र, आषाढ आणि माघ असे चार नवरात्रोत्सव साजरे केले जातात. त्या काळात भुलेश्वरमधील या मंदिर परिसरास मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. याशिवाय मंदिरात रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, महावीर जयंती, कृष्णजयंती हे उत्सवही साजरे केले जातात. दरवर्षी कार्तिक प्रतिपदेस येथे मुंबादेवी अन्नकूट महोत्सव असतो, तर दर पौर्णिमेस नवचंडी यज्ञ केला जातो. माघ एकादशी हा मंदिराचा स्थापना दिन (पाटोत्सव) म्हणून साजरा केला जातो. मुंबईकरांच्या आस्था आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिरातील सर्वच उत्सवांना भाविकांची प्रचंड गर्दी असते. या मंदिराच्या शेजारी इंद्रायणी अंबाजी मंदिर आहे. त्यात अंबा मातेची तांदळा स्वरूपातील मूर्ती प्रतिष्ठित आहे.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, फोन नं. ०२२-२२४२४३३३

मुंबादेवी मंदिर,

भुलेश्वर, मुंबई शहर, मुंबई

Back To Home