रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले श्री बापुजीबुवा आणि श्री कालिकाई मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पौराणिक काळापासून कोकणभूमी ही जागृत देवस्थानांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचा ग्रामीण समाज हा मुळात निसर्गपूजक आहे. येथील लोक डोंगर, कडे, झाडे, वारूळ आणि पाषाण यांची देव म्हणून वर्षानुवर्षे पूजा करतात. कडापे येथील हे मंदिर याच परंपरेचा एक भाग आहे. येथील देवतांना स्थानिक लोकजीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि गर्द झाडीत वसलेले हे मंदिर गावाच्या सामाजिक आणि न्याय व्यवस्थेशी जोडलेले आहे.
कडापे येथील हे मंदिर शंभर वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी येथे गुराख्यांचा गोठा होता. बापू नावाचा एक गुराखी येथे गुरे पाळत असे. त्याला बापू अणली किंवा बापू गावण अशा नावांनी ओळखले जात असे. साधारण १९६८ च्या सुमारास त्याच्या गोठ्यातील एका वारुळातून पाषाण बाहेर येऊ लागला. बापूने ती जागा सपाट करण्याचा प्रयत्न केला असता, त्या पाषाणातून रक्ताची धार वाहू लागली. त्याच रात्री बापूच्या स्वप्नात भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी सांगितले की ‘मी येथे बापुजीबुवांच्या रूपात अवतरलो आहे.’ या दृष्टांतानंतर तिथे लहान मंदिर बांधले गेले. पुढे ताम्हिणी घाटातून कालिका माता समुद्राकडे निघाली होती, तेव्हा बापुजीबुवांनी भक्तांच्या रक्षणासाठी देवीला येथेच थांबण्याची विनंती केली.
देवीने बापुजीबुवांच्या उजव्या बाजूला बसणे, जमिनीतूनच नवसाला पावणे आणि भक्तांनी आधी बापुजीबुवांचे दर्शन घेणे, या अटींवर येथे राहणे मान्य केले. अशा प्रकारे कालिका माताही येथे स्थापित झाली.
मंदिराची सध्याची मुख्य इमारत १९६७ ते १९७० दरम्यान बांधलेली आहे. पुढे १९७७ मध्ये लोकसहभागातून तिचा जीर्णोद्धार झाला. बांधकामात काळ्या पाषाणाचा वापर केलेला आहे. येथे ११व्या ते १३व्या शतकातील वीरगळ आणि सती शिळांचे प्राचीन अवशेष आढळतात. एका पाषाणावर कलश, सूर्य, चंद्र आणि गाय-वासरू यांची शिल्पे कोरलेली आहेत. हे अवशेष या जागेची प्राचीनता सिद्ध करतात. मंदिराकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक जुना चौथरा आणि त्यावर तीन थरांची षटकोनी दीपमाळ आहे. सभोवती असलेल्या आवारभिंतीमध्ये मंदिराचे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष आहेत. मुख्य मंदिरासमोर पुन्हा एक तीन थरांची दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे.
मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. मुखमंडप दोन चौकोनी स्तंभांवर तोललेला आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रवेशद्वारे असून तिथे उतरत्या छताच्या ओसऱ्या आहेत. सभामंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभ्या धारेचे नक्षीकाम आणि नक्षीदार लाकडी कवाडे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या येथील सभामंडपात हवा व उजेडासाठी खिडकीची व्यवस्था आहे. येथील छताला पितळी घंटा टांगल्या आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी खुल्या स्वरूपाचे गर्भगृह आहे. यात सहा नक्षीदार स्तंभ महिरप कमानींनी जोडलेले आहेत. गर्भगृहात बापुजीबुवांची तांदळा स्वरूपातील पाषाण मूर्ती असून त्यामागे कालिकाई देवीची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींची पाठ एकमेकांकडे असून तोंडे विरुद्ध दिशेला आहेत. देवीला चांदीचा मुखवटा लावलेला आहे. बापुजीबुवांच्या बाजूला भैरोबा, खंडोबा, म्हाळसा, बाणाई, तुळजाभवानी, वाघजाई, जरीमरी आणि धाकसिद्ध बुवा या उपदेवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. मुखमंडपावर घुमटाकार शिखर आहे, तर गर्भगृहावर उरुश्रृंग प्रकारचे चौकोनी शिखर आहे. या मुख्य शिखरावर आठ लहान उपशिखरे आहेत. शिखरांच्या शीर्षभागी आमलक, कळस आणि ध्वजपताका आहेत.
मंदिराच्या परिसरात इतरही काही महत्त्वाच्या वास्तू आहेत. तटबंदीला लागून गोसावीबुवांचे स्वतंत्र लहान मंदिर आहे. येथे गोसावीबुवांचे स्वयंभू पाषाण आहे. परिसरात एक जुने शिवमंदिर देखील आहे. या मंदिरात गणपती, भवानी माता आणि हनुमानाच्याही मूर्ती आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दुमजली सभागृह, भक्तनिवास, उपाहारगृह आणि व्यासपीठ उपलब्ध आहे. येथे काही खास धार्मिक प्रथा पाळल्या जातात. दर्शनापूर्वी राऊळ (ग्रामदैवत) मंदिरात जाणे अनिवार्य मानले जाते. मंदिरात ‘सोटे मारणे’ हा विधी वाईट शक्तींच्या नाशासाठी केला जातो. तसेच पुजारी भाविकांच्या वतीने देवासमोर गाऱ्हाणे घालतात. चैत्र पौर्णिमेला येथे मोठा वार्षिक जत्रोत्सव होतो. यावेळी बापुजीबुवा आणि कालिकाई मातेची पालखी मिरवणूक संपूर्ण गावात निघते. शारदीय नवरात्र हा दुसरा मोठा उत्सव येथे साजरा केला जातो. उत्सवकाळात येथे भजन, कीर्तन, प्रवचन आणि नृत्य कार्यक्रम होतात. चैत्र पाडवा, महाशिवरात्री, दिवाळी आणि दसरा हे सणही येथे साजरे केले जातात. मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला भाविकांची विशेष गर्दी असते. दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.