रायगड जिल्ह्यातील नेरळजवळ समुद्रसपाटीपासून २१०० फूट उंचीवर असलेल्या पेब ऊर्फ विकटगड किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर भगवान दत्तात्रय आणि श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे. साध्या वास्तुरचनेत उभारलेल्या या मंदिरात अखंड पाषाणातील एकमुखी व सहा हात असलेली दत्ताची बैठी मूर्ती असून समोर स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. या स्थानाला गिरनारशी असलेल्या साधर्म्यामुळे ‘प्रति गिरनार’ असे संबोधले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेला येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
कर्जत तालुक्यातील नेरळजवळ असलेल्या या पेब किल्ल्याचा आकार गणपतीच्या मुखासारखा दिसत असल्याने याला ‘विकटगड’ असेही म्हटले जाते. गडावर असलेल्या पेबी देवीच्या मंदिरावरून या किल्ल्याला पेब हे नाव पडले आहे. कल्याण आणि कर्जत या भागातील व्यापारी मार्गांवर आणि लगतच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच स्वराज्याच्या संरक्षणासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यावरील गुहांचा वापर धान्य कोठार म्हणून केला जात असल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.
गडावर आजही जुन्या तटबंदीचे अवशेष आणि घरांची जोती दिसून येतात.
नेरळपासून माथेरानला जाताना चार किलोमीटर अंतरावरून पेब किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. कड्यावरच्या गणपती देवस्थानासाठी जाणाऱ्या मार्गावरून माथेरान मिनीट्रेनच्या रुळांवरून साधारणतः दोन किलोमीटर अंतर चालावे लागते. त्यानंतर सुमारे दीड तास डोंगरांमधील अवघड वाट चालून या किल्ल्यावर पोहोचता येते. मिनीट्रेनचा ट्रॅक सोडल्यावर तेथून एक डोंगर खाली उतरून पुन्हा दुसऱ्या डोंगराच्या वरील पठारावर यावे लागते. हा मार्ग एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल इतका अरुंद आहे. या वाटेच्या एका बाजूला खोल दरी असून काही ठिकाणी दोन्ही बाजूंना दरी आणि मधून रस्ता अशी भौगोलिक रचना आहे. या मार्गावर तीन ते चार ठिकाणी लोखंडी शिड्यांवरून चढावे आणि उतरावे लागते. साधारणतः अडीच तासांची पायपीट केल्यावर मंदिरापर्यंत पोहोचता येते. या किल्ल्याचा आणि येथील दत्त मंदिराचा उल्लेख मिलिंद गुणाजी यांच्या प्रसिद्ध असलेल्या ‘माझी आवडती दुर्गभ्रमंती’ या पुस्तकात, तसेच ‘दुर्गवेध’ आणि इतर गिर्यारोहणाच्या पुस्तकांमध्ये गडाचा सर्वोच्च बिंदू म्हणून केलेला आहे.
गडाच्या सर्वोच्च आणि चिंचोळ्या टोकावर भगवान दत्तात्रय आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर आहे. हे देवस्थान साध्या वास्तुरचनेत उभारलेले आणि सभोवतालच्या नैसर्गिक कातळाशी साधर्म्य सांगणारे आहे.
या छोटेखानी मंदिराला भिंती नसून ते चार खांबांवर उभे आहे. सर्व बाजूंनी त्याला लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. मंदिरावर एक कळस आहे. हा कळस नेरळ आणि माथेरानमधूनही दिसतो. मंदिरात अखंड पाषाणापासून बनलेली एकमुखी आणि सहा हात असलेली दत्ताची बैठी मूर्ती आहे. मूर्तीच्या एका बाजूला गणपती आणि दुसऱ्या बाजूला हनुमानाची छोटी मूर्ती आहे. मूर्तीसमोर स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या असून त्यांना ‘पेबच्या पादुका’ म्हणून पुजले जाते.
जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार २००४ च्या सुमारास श्री स्वामी सखा आणि इतर दत्तभक्तांनी केला. त्यावेळी गिरनार येथील मूळ पादुकांना स्पर्श करून आणलेल्या पादुकांची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधला असून तेथून खाली पाहिले असता खोल दरी दिसते. मंदिराच्या जवळच महादेवाची पिंड असलेले शंकराचे मंदिर आहे. गडावर नैसर्गिक गुहा आहेत. यातील एका गुहेत किमान शंभर माणसे बसू शकतील एवढी जागा आहे. अशी नोंद आहे की पूर्वी येथे अनेक साधू ध्यानधारणा करीत असत. स्वामी समर्थांनीही येथे दीर्घकाळ साधना केल्याचा आणि त्यांच्या पादुका एका मुख्य गुहेत असल्याचा उल्लेख आढळतो. गडावर दगडात कोरलेली तीन नैसर्गिक पाण्याची कुंडे आहेत. या कुंडांमध्ये वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते आणि त्याचा वापर मंदिरातील दैनंदिन कामे व पूजेसाठी केला जातो. परिसरात स्वामी समर्थ मठ असून तिथे भाविकांना विश्रांती घेता येते, मात्र खाण्याची सोय नसल्याने पर्यटकांना स्वतःचे अन्न सोबत आणावे लागते. हे ठिकाण गिरनारप्रमाणेच उंचीवर असल्याने, तसेच तेथे महादेवाचे मंदिर, ध्यानधारणेसाठी जागा आणि मुबलक पाण्याची सोय असल्यामुळे भाविक याला ‘प्रति गिरनार’ असे संबोधतात. गडाच्या माथ्यावरून प्रबळगड आणि माथेरानचा परिसर दिसतो.
या मंदिरात बाराही महिने गिर्यारोहक, पर्यटक आणि भाविकांची ये-जा असते. येथे दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा हे मुख्य उत्सव असतात. तसेच स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्तही विशेष उत्सवांचे आयोजन केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात येणारा दत्त जयंतीचा उत्सव हा येथील सर्वात मोठा सोहळा असतो. या दिवशी मंदिरात पहाटे अभिषेक, विशेष पूजा आणि भजनांचे कार्यक्रम होतात. या उत्सवासाठी नेरळ, मुंबई आणि पुण्यासह अनेक भागांतून हजारो भाविक गडावर येतात.