विराट हनुमान मंदिर

औसा मार्ग, लातूर, ता. जि. लातूर

लातूरमधील विराट हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पारंपरिक शिखर नाही. मंदिराच्या शिखराच्या जागी, छतावर हनुमानाची २५ फूट उंच मूर्ती आहे. खालच्या मुख्य मंदिरात हनुमानाची काळ्या पाषाणात कोरलेली, खांद्यावर गदा घेतलेली मूर्ती जशी आहे, तशीच उभी असलेली आणि खांद्यावर गदा घेतलेली मारुतीची मूर्ती छतावरही आहे. काही विशिष्ट प्रसंगी मंदिराच्या छतावरून पाण्याचा कृत्रिम धबधबा सुरू केला जातो. अशा वेळी खालच्या मंदिरासमोर तयार होणारा जलपडदा हे या मंदिराचे खास आकर्षण ठरते.

हनुमंत, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, महाबली, महावीर, मारुती अशा विविध नावांनी पूजला जाणारा हनुमान हा मूळचा लोकदेव आहे. तो शक्ती, भक्ती आणि युक्तीचा आदर्श मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, हनुमान हा सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. पौराणिक कथांनुसार हनुमान हा रुद्रावतार आहे. स्कंदपुराणानुसार तो शिवाचा अवतार आहे. रामायण, महाभारतातील हनुमान शास्त्रप्रवीण, राजनीतिज्ञ, शौर्य, बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, रामभक्ती, वक्तृत्व इ. अलौकिक गुणांनी परिपूर्ण आहे. ‘आंजनेयसंहिता’ (हनुमत्संहिता) हा ग्रंथ त्याच्या नावावर आहे. तो संगीतशास्त्राचा एक प्रवर्तकही मानला जातो. हनुमानाची वीर, दास, चपेटदाता, वीणा-पुस्तकधारी, पंचमुखी आदी विविध रूपांत पूजा केली जाते. समर्थ रामदास स्वामींनी ‘हनुमान स्तोत्रा’त ‘भीमरूपी’, ‘महाबळी’ अशा स्वरूपात त्याचे वर्णन केले आहे.

लातूरमधील या मंदिरातील हनुमान त्याच्या विराट स्वरूपात पूजला जातो. या मंदिराचा इतिहास असा की १९८२ मध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर शहराचा विस्तार होऊ लागला. याच काळात औसा रोड परिसराला एक वेगळी ओळख मिळावी यासाठी येथे हनुमानाची भव्य मूर्ती असलेले मंदिर उभे राहावे, अशी इच्छा काही भाविकांनी व्यक्त केली. या संकल्पनेला उद्योजक प्रदीप राठी यांनी पाठबळ दिले. लातूर शहरातील प्रसिद्ध अष्टविनायक मंदिर उभारणाऱ्या त्यांच्या ‘अष्टविनायक प्रतिष्ठान’मार्फतच या मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराचे नियोजन आणि पायाभरणी १९८० च्या दशकाच्या शेवटी सुरू झाली, तर पूर्ण बांधकाम व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा १९९२ मध्ये झाली. लातूरच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणारे हे विराट मारुती मंदिर केवळ भाविकांचे श्रद्धास्थान नसून ते पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण बनले आहे.

औसा रोडवरील परिवार हाउसिंग सोसायटी परिसरात हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या बंदिस्त आवारात प्रवेश केल्याबरोबरच उजव्या हाताला हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. डाव्या बाजूला एक सुंदर शिवमंदिर आहे. मंदिरात शिवपिंडी व नंदीमूर्ती आहे. या शिवमंदिराच्या अगदी समोर हनुमानाचे हे विराट रूप दाखवणारे दोन स्तरीय मंदिर आहे. मंदिराची रचना आधुनिक आणि कल्पक आहे.

मंदिराच्या छतावर हनुमानाची सुमारे २५ फूट उंच मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात धरलेली गदा खांद्यावर तोलली आहे, तर डावा हात कमरेवर आहे. ही मूर्ती सिमेंट-काँक्रीट आणि फायबरच्या साहाय्याने तयार करण्यात आली आहे. छतावर जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्यांची व्यवस्था आहे. तेथून हनुमानाच्या चरणाशी उभे राहून त्याच्या विराट रूपाचे दर्शन घेता येते. मूर्तीसमोरून पडणारा कृत्रिम धबधबा आणि त्याखाली असलेला छोटा तलाव यामुळे हनुमान आणि पाण्याचा संबंध दृढ होतो. भाविकांच्या श्रद्धेनुसार, हनुमानाने जेव्हा लंकेला जाण्यासाठी समुद्र ओलांडला, तेव्हा त्यांनी जे विराट रूप धारण केले होते त्याची आठवण म्हणून ही २५ फुटी मूर्ती छतावर स्थापन केली आहे व तर खालचा धबधबा हा त्यांनी ओलांडलेल्या समुद्राचे प्रतीक मानला जातो.

खालच्या मजल्यावर मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे. येथील हनुमानाची पारंपरिक मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती धाराशिव जिल्ह्यातून आणलेल्या एका अखंड काळ्या पाषाणातून घडवण्यात आली आहे. मात्र मूर्तीवर शेंदूर असल्याने तिचा रंग शेंदरी झाला आहे. हनुमानाच्या मस्तकावर धातूचा मुकुट आहे. मूर्तीच्या शेजारी छोट्या आकाराच्या काही धातूच्या हनुमान मूर्ती आहेत.

या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. हनुमान जयंती हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी विशेष रोषणाई, अभिषेक आणि भजनांचे आयोजन केले जाते. तसेच रामनवमीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. दर शनिवारी लातूर शहरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष सजावट केली जाते. या दिवशी पहाटेपासूनच विशेष अभिषेक, पूजा आणि होमहवन आयोजित केले जातात.

अशाच प्रकारचे छतावर भव्य हनुमान मूर्ती असलेले आणखी एक मंदिर लातूर-औसा मार्गावरील केशव बालाजी मंदिर परिसरात आहे. तेथील मूर्ती बैठ्या स्थितीतील आहे. त्या हनुमानाला ‘सालासर हनुमान’ म्हणून ओळखले जाते.

उपयुक्त माहिती:

  • लातूर बस स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • लातूर येथून एसटी व खासगी वाहने उपलब्ध
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून लातूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

विराट हनुमान मंदिर

औसा मार्ग, लातूर, तालुका। जिला. लातूर

Back To Home