राजे लखुजीराव जाधव समाधीस्थळ

सिंदखेड राजा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात वसलेले सिंदखेड राजा हे शहर मराठा साम्राज्याच्या उदयाची नांदी ठरलेल्या एका महत्त्वाच्या पर्वाचे केंद्रबिंदू आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ यांचे हे जन्मस्थान आहे. ही भूमी दख्खनच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक वादळी घडामोडींची मूक साक्षीदार आहे. या ऐतिहासिक वारशाचा सर्वात प्रबळ आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे सिंदखेड राजा येथे असलेले राजे लखुजीराव जाधव यांचे समाधीस्थळ होय. हे समाधीस्थळ १७व्या शतकातील अस्थिर राजकीय परिस्थिती, निजामशाही आणि मुघल साम्राज्याच्या संघर्षात ताठ मानेने उभ्या राहिलेल्या मराठा सरदारांच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे जिवंत प्रतीक मानले जाते.

१३व्या शतकात अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे देवगिरीचे यादव साम्राज्य लयाला गेले. तरीही यादवांच्या अनेक शाखांनी महाराष्ट्राच्या विविध भागांत आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. त्यातीलच एक पराक्रमी शाखा म्हणजे सिंदखेडचे जाधव घराणे. १५व्या शतकात बहमनी राजवटीत हा परगणा एका स्थानिक काझीकडे होता, परंतु १५५० च्या सुमारास त्याचा ताबा जाधव घराण्याकडे आला आणि तेव्हापासून या स्थानाला ‘सिंदखेड राजा’ ही ओळख प्राप्त झाली. लखुजीराव जाधवांचे वडील विठोजीराव यांनी या जहागिरीचा विस्तार केला. तथापि, लखुजीरावांच्या काळात सिंदखेडला खऱ्या अर्थाने राजधानीचे वैभव प्राप्त झाले. त्यांनी आपल्या पराक्रमाने निजामशाहीतील एक अत्यंत मातब्बर सरदार म्हणून स्थान निर्माण केले होते.

राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव हे त्या काळातील एक बलाढ्य सरदार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. त्यांच्याकडे हजारो घोडदळाची मनसब होती. दख्खनच्या राजकारणात त्यांचे महत्त्व इतके होते की निजामशहा असो वा मुघल सम्राट जहांगीर, प्रत्येकाला लखुजीरावांची साथ हवी होती. १६२१ च्या सुमारास त्यांनी मुघलांकडून ५००० जात आणि ५००० स्वार अशी उच्च मनसब मिळवली होती. याच काळात लखुजीरावांची कन्या जिजाबाई यांचा विवाह वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. हा विवाह म्हणजे दख्खनमधील दोन सर्वात शक्तिशाली मराठा कुटुंबांचे मिलन होते. मात्र, पुढे ‘खंडागळ्याचा हत्ती’ या दुर्दैवी प्रकरणामुळे जाधव आणि भोसले यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. ती घटना अशी की १६२१-२२ च्या सुमारास निजामशाहीच्या लष्करी छावणीत निजामशाहीतील एक सरदार दत्ताजीराव खंडागळे यांचा ‘रायबाघ’ नावाचा हत्ती अचानक पिसाळला आणि त्याने छावणीत धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या हत्तीला आवरण्यासाठी लखुजीराव जाधवांचे पुत्र दत्ताजी जाधव आपल्या पथकासह पुढे सरसावले. त्याच वेळी शहाजीराजे भोसले यांचे बंधू शरीफजी भोसले आणि इतर भोसले मंडळीही तिथे बचावासाठी आली. मात्र, हत्तीला आवरण्याच्या प्रक्रियेतून उभय पक्षात अहंकाराचा संघर्ष सुरू झाला. या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण युद्धात झाले आणि भरदरबारात तलवारी निघाल्या. या संघर्षात लखुजीरावांचे पुत्र दत्ताजी जाधव हे भोसल्यांच्या हातून मारले गेले. आपल्या मुलाची हत्या स्वतःच्या जावयाच्या (शहाजीराजे) भावांनी केल्याने लखुजीरावांचा संताप अनावर झाला. या एका घटनेमुळे जाधव आणि भोसले या दोन बलवान घराण्यांतील नातेसंबंधांत कायमची दरी निर्माण झाली. जिजाऊंच्या माहेरचा आणि सासरचा हा संघर्ष इतका विकोपाला गेला की त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटले.

लखुजीरावांच्या आयुष्याचा आणि पर्यायाने एका मोठ्या पर्वाचा शेवट ज्या घटनेने झाला, ती घटना मराठा इतिहासातील एक भीषण शोकांतिका मानली जाते. २५ जुलै १६२९ रोजी देवगिरी किल्ल्यावर (दौलताबाद) निजामशहाने लखुजीरावांना काही तातडीच्या मसलतीसाठी बोलावले. लखुजीराव आपले पुत्र अचलोजी, राघोजी आणि नातू यशवंतराव यांच्यासह दरबारात हजर झाले. मात्र, हा सुलतानाचा एक विश्वासघातकी कट होता. ते दरबारात प्रवेश करत असतानाच त्यांच्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला. भर दरबारात, सुलतानाच्या डोळ्यासमोर मराठा इतिहासाच्या या आधारस्तंभाची आणि त्यांच्या वारसदारांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने जाधव घराण्याचे अतोनात नुकसान झाले आणि त्यातून निजामशाहीच्या अंताची आणि स्वराज्याच्या निर्मितीची बीजे रोवली गेली. आपल्या सासऱ्यांची झालेली ही हत्या पाहून शहाजीराजांनी निजामशाहीचा कायमचा त्याग केला आणि जिजाऊंच्या मनात परकीय सत्तेविरुद्ध जो संताप निर्माण झाला, त्यातूनच पुढे शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली.

‘सिंदखेड राजाचा इतिहास’ या डॉ. शिवरतन शेठ लिखित पुस्तकात व सुनील कोष्टी लिखित ‘राजमाता जिजाऊंचे माहेर : सिंदखेड राजा’ या पुस्तकांतील वर्णनानुसार, लखुजीरावांच्या या बलिदानानंतर त्यांचे बंधू राजे जगदेवराव (भूतजी) जाधव यांनी सिंदखेड राजाचा कारभार सांभाळला. राजे जगदेवराव यांनी सिंदखेड राजा येथे लखुजींचे भव्य स्मारक उभारण्याचे कार्य केले. ही वास्तू आज ‘इंडो-इस्लामिक-मराठा’ स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून गणली जाते. सुमारे ४० बाय ४० फूट आकाराची ही चौरस वास्तू एका उंच दगडी जोत्यावर उभारलेली आहे. समाधीचे ताशीव चिरेबंदी बांधकाम आजतागायत चांगल्या स्थितीत उभे आहे. तिचे बांधकाम काळ्या बेसाल्ट पाषाणात आणि वरचा भाग विटा व चुन्यात केलेला आहे. चौरसाकृती समाधीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे, तर दक्षिण-उत्तर बाजूस दोन उपद्वारे आहेत. स्मारकाचे घुमट २४ कमानींवर बांधलेले आहे. स्मारकाच्या बाहेरच्या भिंतीवर दोन ठिकाणी लखुजी जाधवांच्या वंशावळीचे शिलालेख कोरलेले आहेत. मुख्य प्रवेशाच्या दोन्ही बाजूंनी गच्चीकडे जाणारी पायऱ्यांची रचना आहे. यापैकी एक मार्ग सध्या बंद आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस हत्तींना मारणाऱ्या सिंहांचे (शरभ) लक्षवेधी पुतळे आहेत. या समाधीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा भव्य घुमट. एका हिंदू सरदाराच्या समाधीवर असा घुमट असणे हे त्या काळातील समन्वयवादी संस्कृतीचे दर्शन घडवते. बाहेरून ही वास्तू एखाद्या इस्लामिक मकबऱ्यासारखी भासते. या वास्तूच्या मध्यभागी लखुजीरावांच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक मोठे शिवलिंग प्रतिष्ठापित केलेले आहे. याच इमारतीत लखुजीरावांसह त्यांच्या पुत्रांच्या आणि नातवाच्या अशा एकूण पाच समाध्या आहेत. या स्मारकासमोरच जाधव घराण्यातील काही समाध्या आणि सतीशिळा आहेत.

सिंदखेड राजाचा हा वारसा प्राचीन काळाशीही जोडलेला आहे. याची प्रचिती जून २०२४ मध्ये लागलेल्या एका शोधातून आली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे या समाधीच्या परिसरात उत्खनन सुरू असताना, सुमारे २.२५ मीटर खोलीवर भगवान विष्णूंची एक अत्यंत दुर्मिळ ‘शेषशायी’ मूर्ती सापडली. क्लोराईट शिस्ट या मऊ दगडापासून बनवलेली ही मूर्ती साधारणपणे ११ व्या शतकातील असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. १.७० मीटर लांबीची ही अखंड शिळा भगवान विष्णूंच्या शांत मुद्रेतील रूपाचे दर्शन घडवते. विष्णूंच्या चरणांशी देवी लक्ष्मी, प्रभावळीवर कोरलेले दशावतार आणि समुद्रमंथनाचा प्रसंग इतक्या सुबकपणे कोरलेला आहे की त्या काळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष पटते. जाधव घराणे स्वतःला ‘यदुवंशी’ म्हणजेच विष्णूचे वंशज मानतात. त्यामुळे लखुजीरावांच्या आधी म्हणजेच ५०० वर्षांपूर्वीपासून येथे एक भव्य विष्णू मंदिर अस्तित्वात असावे, असा दावा केला जातो.

दरवर्षी १२ जानेवारीला राजमाता जिजाऊंची जयंती असते. हा जयंती सोहळा येथील जिजाऊ सृष्टीवर होत असला, तरी लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळावर आणि राजवाड्यात या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यावेळी हजारो शिवभक्त व जिजाऊभक्त येथे अभिवादन करण्यासाठी येतात. याशिवाय २५ जुलै रोजी राजे लखुजीराव जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या समाधीस्थळावर दरवर्षी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी धार्मिक विधी, पूजा आणि मराठा इतिहासाच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. मराठा परंपरेत दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंदखेड राजा येथे जाधव घराण्याचे वंशज आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन ‘शस्त्रपूजन’ करतात. राजे लखुजीराव जाधव यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून या दिवशी समाधीस्थळावर आणि परिसरात पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा होतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असल्याने सिंदखेड राजा येथे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. त्यावेळी समाधीस्थळावर फुलांची सजावट, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे समाधीस्थळ खुले असते.

उपयुक्त माहिती:

  • सिंदखेड राजा बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८५ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून सिंदखेड राजासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने समाधी स्थानापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

राजे लखुजीराव जाधव समाधिस्थल

सिंदखेड राजा, त. सिंदखेड राजा, जिला. बुलढाणा

Back To Home